Next
रत्नागिरीत विठूमाऊलीची नगरप्रदक्षिणा उत्साहात
BOI
Thursday, November 22, 2018 | 12:12 PM
15 0 0
Share this story

नगर प्रदक्षिणेदरम्यान समुद्रकिनाऱ्यावरून पेठकिल्ल्याकडे निघालेली विठूरायाची पालखी आणि सहभागी झालेले भाविक. (फोटो : पराग हेळेकर, रत्नागिरी)

रत्नागिरी :
कार्तिकी एकादशीला रात्री १२ वाजता नगरप्रदक्षिणा केल्यानंतर रत्नागिरीतील विठोबाच्या पालखीची नगरप्रदक्षिणा प्रथेप्रमाणे वैकुंठ चतुर्दशीला (२१ नोव्हेंबर २०१८) पुन्हा एकदा पार पडली. पालखी दुपारी १२ वाजता बाहेर पडली आणि विठूनामाचा गजर करत, ढोल-ताशांच्या गजरात ही पालखी रात्री उशिरा पुन्हा विठ्ठल मंदिरात परतली.

चातुर्मास व कार्तिकी एकादशीनंतरच्या या नगरप्रदक्षिणेला शेकडो वर्षांची परंपरा आहे. पांडुरंग भाविकांची ख्यालीखुशाली जाणून घेण्यासाठी ही प्रदक्षिणा करतो, अशी लोकभावना आहे. जुन्या रत्नागिरीच्या सर्व हद्दींवरून काढल्या जाणाऱ्या या प्रदक्षिणेत हजारो भाविक सहभागी झाले. अठरापगड जातींना एकत्र आणून ही प्रदक्षिणा पारंपरिक पद्धतीने काढली जाते.

पालखी गोखले नाका, राधाकृष्ण नाक्यामार्गे धनजी नाका, गवळीवाडा, जेल रोडने गोगटे कॉलेजवरून कोर्टासमोरून विश्वेश्वराच्या घाटीने विश्वेश्वर मंदिरात पोहोचली. तिथून ती राजिवडा, तेली आळी तळ्याजवळून खडपे वठार, चवंडे वठार रस्त्याने मांडवी नाक्यात आली. ग्रामदैवत श्री भैरी मंदिरावरून पालखी नाईक फॅक्टरीपर्यंत पोहोचली. तिथून रस्ता सोडून पालखी लगतच्या रस्त्याने समुद्रावर आली. त्यानंतर पालखीतील विठ्ठलाला समुद्रस्नान घालण्यात आले. माऊलींच्या निरास्नानासारखी ही परंपरा रत्नागिरीकर शेकडो वर्षे जोपासत आहेत. या वेळी बबनशेठ मलुष्टे, पराग हेळेकर, स्वप्नील  पांचाळ, मंदार  व केदार मयेकर, पराग  तोडणकर, केदार मलुष्टे, प्रवीण हेळेकर, गौरव  हेळेकर आदी उपस्थित होते.

त्यानंतर पेठकिल्ल्यात श्री सांब मंदिर, नाक्यातील राम मंदिरावरून पालखी मुरुगवाड्यातून आली. मिऱ्या बंदराच्या चौकातून पांढऱ्या समुद्राच्या पुळणीजवळच्या रस्त्याने पालखी पिलणकर भोळे मंडळींच्या वाडीत शिरली. तिथून रेमंडच्या जवळील शेतातून परटवणे नाक्यात येऊन पालखी भार्गवराम मंदिराकडे पोहोचली.
नर्मदा हायवेच्या खालच्या बाजूने डोंगर उतारावरच्या पायवाटेने पालखीने आंब्याच्या बागेतून छोट्या छोट्या दिव्यांच्या प्रकाशात सावंतनगर, खालच्या फगरवठारकडे वाटचाल केली. चढउतारातून, परटवणे नदीतून, काट्याकुट्यातून वाट काढत पालखी वरच्या फगरवठारात आली. तिथे पांडुरंगाचा जयजयकार झाला. तिथून पालखी डीएसपी बंगल्याला लागून उताराने चावडीवरून धनजी नाक्यात आली. तिथे भजन करून पालखी पुन्हा राधाकृष्ण नाक्यामार्गे मंदिरात आली आणि नगरप्रदक्षिणेची सांगता झाली.

(रत्नागिरीतील विठोबाच्या नगरप्रदक्षिणेच्या या परंपरेबद्दल सविस्तर माहिती देणारा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link