Ad will apear here
Next
‘माझ्यासाठी देश महत्त्वाचा’
‘वर्डस् काउंट’मध्ये प्रसून जोशी यांचे मत
‘वर्डस् काउंट’ शब्दोत्सवात ‘सीएनएन-टीव्ही १८’चे कार्यकारी संपादक भूपेंद्र भूपेन चौबे यांनी कवी, गीतकार आणि भारतीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांची मुलाखत घेतली.

पुणे : ‘देश हा माझ्यासाठी महत्त्वाचा आहे, देश सर्वात मोठा आहे,’ असे मत कवी, गीतकार आणि भारतीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी व्यक्त केले. ‘सीएनएन-टीव्ही १८’चे कार्यकारी संपादक भूपेंद्र चौबे यांनी जोशी यांची मुलाखत घेतली. पंचशील रिअल्टीचे अध्यक्ष अतुल चोरडिया आणि सागर चोरडिया या वेळी उपस्थित होते.

पुण्यातील साहित्य आणि कला क्षेत्रातील जाणकार असलेल्या वर्षा चोरडिया आणि सबिना संघवी यांच्या पुढाकाराने सेनापती बापट रस्त्यावरील हॉटेल जे. डब्लू. मॅरिएट येथे ‘वर्डस् काउंट’ या शब्दोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ‘वर्डस् काउंट’ या शब्दोत्सवाची संकल्पना ही प्रसिद्ध लेखिका, पटकथाकार आणि स्तंभलेखिका अद्वैता कला यांची असून, शब्दोत्सवाची ही दुसरी आवृती आहे.    

प्रसून जोशी
मणिकर्णिका या चित्रपटातील जोशी यांनीच लिहिलेल्या ‘मै रहू, या ना रहू, भारत रहना चाहिये,’ या गीताला उजाळा देत, जोशी म्हणाले, ‘राष्ट्रवाद, राष्ट्रीयता या केवळ संकल्पना आहेत. या देशासाठी जे चांगले आहे ते माझ्यासाठी चांगले आहे हे मला समजते. देश हा माझ्यासाठी महत्त्वाचा आहे, देश सर्वात मोठा आहे.’

लंडनमध्ये प्रसून जोशी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेतली होती, त्यावर खूप टीका झाली होती, त्याविषयी बोलताना, जोशी म्हणाले,‘मी लंडनमध्ये जाऊन पंतप्रधान मोदी यांची मुलाखत घेऊन, भारताची बदनामी करायची होती का? नरेंद्र मोदी यांचे देशाच्या प्रती असणारे योगदान, ते करीत असलेले काम आणि त्यांच्या काळात होणारी प्रगती हे सगळे मला भावले. ते मला शुध्द असल्याचे वाटते. निंदकांना शेजारी ठेवावे अशी आपल्याकडे म्हण आहे, पण मला वाटते त्यांना डोक्यावर बसवू नये. सत्याला सामोरे जायला हवे, कारण या देशात आपल्याला जे सोयीचे नाही, त्याकडे दुर्लक्ष करण्याची प्रथा आहे. आपल्याकडे लोकांना लेबल लावली जातात.’

जोशी पुढे म्हणाले, ‘तंत्रज्ञानामुळे सगळ्यांकडे माध्यमे आली आहेत. त्यामुळे ते आपापली अभिव्यक्ती करू शकतात आणि त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.’

‘सामुहिक जाणीवा आणि वैयक्तिक जाणीवा यांमध्ये फरक असतो, त्यामुळे मोबाईलवर बघितल्या जाणाऱ्या दृकश्राव्य गोष्टींवर बंधने असावीत की नाही,याचे उत्तर हो किंवा नाहीमध्ये देणे अवघड आहे,’ असेही जोशी यांनी एका उत्तरात सांगितले.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language