Ad will apear here
Next
‘पं. भीमसेन जोशी संगीत महोत्सवा’त सुरांची बरसात
‘भारतरत्न पं. भीमसेन जोशी संगीत महोत्सवा’त गायन सादर करताना धनंजय मराठेपुणे : बरसणाऱ्या पाऊस धारांसोबत सुरांच्या बरसातीचा पुणेकर रसिकांनी मनमुराद आनंद घेतला. राग मधुकंस, दुर्गा, बिहाग, बागेश्री, मारुबिहाग यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. निमित्त होते ‘भारतरत्न पं. भीमसेन जोशी संगीत महोत्सवा’चे.

पं. भीमसेन जोशी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ‘कलाश्री संगीत मंडळा’च्या वतीने ‘भारतरत्न पं. भीमसेन जोशी संगीत महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी (२६ जुलै) सुरू झालेला हा महोत्सव रविवार, २८ जुलैपर्यंत सुरू राहणार आहे. औंध येथील पं. भीमसेन जोशी कलामंदिरात हा महोत्सव सुरू असून, महोत्सवाचे हे सहावे वर्ष आहे.  ज्येष्ठ गायक डॉ. सुधाकर मराठे यांच्या पत्नी माधुरी मराठे, कलाश्री संगीत मंडळाचे संस्थापक सुधाकर चव्हाण, मंडळाचे विश्वस्थ गोकुळ बागल, मल्टी नॅशनल बँकेचे संचालक समीर महाजन, एसआरके कन्सल्टींगचे संस्थापक सच्चिदानंद कुलकर्णी, संध्या केळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

महोत्सवाची सुरुवात ग्वाल्हेर घराण्याचे गायक डॉ. सुधाकर मराठे यांचे शिष्य धनंजय मराठे यांच्या गायनाने झाली. त्यांनी राग मधुकंसमधील ‘मानत ना पिया मोरा..’ ही बंदीश सादर करत सुरेल वातावरणनिर्मिती केली. ‘पिया मोरा रे..’ हा तीनतालातील छोटा ख्याल,  पं. अरुण कशाळकर यांची बंदीश ‘बैरन मोरी ननंदिया..’ म्हणत राग दुर्गामधील आडाचौताल पेश केला. आपल्या मैफलीचा समारोप त्यांनी ‘भोलेनाथ दिगंबर...’ या भजनाने केला.

बासरीवादन सादर करताना अनुपम वानखेडे
त्यांनतर भोपाळ येथील अनुपम वानखेडे यांचे बासरीवादन झाले. त्यांनी राग बिहागने आपल्या वादनाची सुरुवात केली. गायकी ढंगाचे त्यांचे वादन सर्वांचेच मन मोहणारे ठरले. विलंबित एकतालातील ‘कैसे सुख सोवे...’ या पारंपरिक बंदिशीने त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर मध्यलयीतील ‘बालम रे..’,  द्रुत सरगम, राग बागेश्रीमध्ये पं. कुमार गंधर्व यांची ‘ऋतू बसंत तुम..’ मध्यलय तीनतालातील बंदीश पेश केली. त्यानंतर पहाडी ठुमरी सादर करून आपल्या मैफलीला विराम दिला.   

पहिल्या दिवशीच्या महोत्सवाचा समारोप पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य व सुपुत्र पं. श्रीनिवास जोशी यांच्या गायनाने झाला. त्यांनी राग मारुबिहागने आपले गायन सुरू केले. विलंबित एकतालातील ‘रसिया आवोना..’ ‘परी मोरी नाव...’, ‘तरपत रैना दिना...’ या तीन तलातील बंदिशी सादर केल्या. ‘जो भजे हरी को सदा...’ ही भैरवी व ‘वैकुंठीच्या राया...’ हे भजन गाऊन त्यांनी समारोप केला.
पं. श्रीनिवास जोशी गायन सादर करताना
या वेळी हार्मोनियमवर प्रभाकर पांडव, सुयोग कुंडलकर, गंगाधर शिंदे, तबल्यावर पं. पांडुरंग मुखडे, संजय देशपांडे, रोहित मुजुमदार, पांडुरंग पवार,  प्रशांत पांडव, अश्विनी वाघचौरे, निलेश रणदिवे तर पखावजवर गंभीर महाराज अवचर यांनी साथसंगत केली. सूत्रसंचालन नामदेव तळपे यांनी केले.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language