Ad will apear here
Next
आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने
पुण्यातील बाजीराव रस्त्यावर जुन्या पुस्तकांची विक्री करताना वसंत आठवलेआपल्याला आवडणारी जुनी व दुर्मीळ पुस्तके कुठे नुसती बघायला मिळाली, तरी होणारा आनंद अवर्णनीय असतो. हाच आनंद परवडेल अशा स्वस्त दरांत कुणी विकत देत असेल तर? किंवा अशी पुस्तके विकणारे पुस्तक विक्रेते आपल्याला भेटले तर तो दुग्धशर्करा योगच! वसंत यशवंत आठवले ऊर्फ आठवले काका हे त्यातीलच एक प्रसिद्ध नाव. दर सोमवारी  सकाळी ते पुण्यातील बाजीराव रस्त्यावरील सरस्वती मंदिरालगतच्या फुटपाथवर जुनी, दुर्मीळ पुस्तके विकत बसलेले दिसतील. या दिवशी ते येणार हे ठाऊक असणारे दर्दी पुस्तकप्रेमी त्यांना गराडा घालून त्यांच्याकडील पोतडीमधील पुस्तके मनसोक्त चाळतात. त्यातील काही विकतही घेतात. आज वयाच्या पंचाहत्तरीतही तितक्याच उत्साहाने आठवले काका हा व्यवसाय गेली चार दशके न चुकता एखादे व्रत जपल्यासारखे करत आहेत. त्यांच्या वडिलांनी सुरू केलेला हा व्यवसाय आता त्यांचा मुलगाही सांभाळत असल्याने आठवले काकांच्या तीन पिढ्या या उद्योगात रमल्या आहेत. नुकत्याच झालेल्या पुस्तक दिनाच्या निमित्ताने ‘बाइट्स ऑफ इंडिया’तर्फे विवेक सबनीस यांनी त्यांच्याशी केलेली ही बातचीत...

- आठवले काका, तुमच्या तीन पिढ्या जुन्या-दुर्मीळ पुस्तकांच्या विक्रीचे काम करत आहेत. हे सारे कसे काय जमून आले? 
- माझे वडील यशवंत नारायण आठवले हे संगीत नाटकांमधून कामे करणारे कसलेले नट. बालगंधर्वांच्या गंधर्व नाटक मंडळींच्या ‘मानापमान’ नाटकात काम करणारा पहिला शिलेदार! याशिवाय ‘स्वयंवर’मधील रुख्मी, ‘मृच्छकटिक’मधील शकार व ‘कान्होपात्रा’मधील आनंदराव, तसेच ‘एकच प्याला’मधील सुधाकरही त्यांनी रंगवला होता. पुढे दुर्दैवाने संगीत नाटकाचे पडते दिवस आले आणि १९४९-५०मध्ये ‘गंधर्व नाटक मंडळी’ बंद पडली, तेव्हा पुस्तके विकण्याच्या व्यवसायानेच त्यांना तारले. त्या काळात ते वेद, धार्मिक व तत्त्वज्ञानावरील दुर्मीळ पुस्तके नाटकाच्या दौऱ्यासाठी जिथे जातील तिथून विकत घेत असत. हा छंद नंतर असा कामी आला! वडील हयात असताना मी त्यांना मदत म्हणून या व्यवसायात काम करायला लागलो. आता माझा मुलगा धनंजय याची मला मोठी मदत होत असून, त्यानेही यात मनापासून लक्ष घातले आहे. आमच्या तीन पिढ्या जुन्या पुस्तकांच्या विक्रीत रमल्यात, हे तुमचे म्हणणे खरे आहे. 

- तुमचे वडील त्या काळात कोणती पुस्तके विकत? 
- दौऱ्यावरून परत येताना आणलेली पुस्तके वडील आमच्या शुक्रवार पेठेतील ‘जुना ९७ मखामले साठे वाड्या’त गोडाउनमध्ये ठेवत. तिथे दीड ते दोन हजार तरी पुस्तके असत. संगीत नाटकाकडे ओढा असणारा रसिक लक्षात घेऊन वडिलांनी तेव्हा बालगंधर्वांची गाण्याची पुस्तके विकली. विशेषत: ‘बालगंधर्व गुंफा’ या नावाची ४०० पुस्तके तरी त्यांनी विकली. १९५४च्या सुमारास बालगंधर्वांची अगदी शेवटची नाटके पुण्यात हिंद विजय टॉकीजमध्ये होत. तिथे बाहेर ही पुस्तके त्यांनी विक्रीसाठी ठेवली होती. याशिवाय इतर किरकोळ पुस्तकेही त्यांनी विकली. 

- तुमची स्वत:ची या व्यवसायातील सुरुवात कशी झाली? आतापर्यंत तुम्ही किती पुस्तके विकली असतील?
- वडील असेपर्यंत मी यात जमेल तसे लक्ष घालत असे. १९६०मध्ये मला ‘किर्लोस्कर ऑइल इंजिन्स’ येथे नोकरी लागली ती मी अगदी १९८५पर्यंत केली; पण याच पुस्तक व्यवसायासाठी व्हीआरएस घेऊन मी इतर अनेक उद्योगही केले. नोकरीतून वेळ मिळाल्यावर पुस्तके विकत असताना मी घरसामान, फर्निचर विकणे अशी कामे केली; पण पूर्णपणे पुस्तक विक्रीत लक्ष घातले ते १९७१पासून आणि तेच आयुष्याचे ध्येय मानले. गेल्या चार-साडेचार दशकांमध्ये मिळून आजपर्यंत मी किमान अडीच ते तीन लाख पुस्तके विकली व तेवढीच विकतही घेतली! पुस्तक खरेदी-विक्रीच्या निमित्ताने माझ्या अनेक ओळखी झाल्यामुळे काही जण मला घरी येऊन पुस्तके देत. वाई, सातारा भागातून मी अक्षरश: पोतीच्या पोती पुस्तके विकत घेऊन पुण्यात घरी आणत असे! माझा होणारा खर्च व त्यातून साधारण ४० टक्के नफा मिळवण्याच्या दृष्टीने मी हा व्यवसाय चालू ठेवला. 

- या काळात तुमच्याकडून अनेक महनीय व्यक्ती व संस्थांनीही तुमच्याकडून पुस्तके विकत घेतली असतील ना?
- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कै. यशवंतराव चव्हाण यांना महात्मा गांधी यांनी सुरू केलेल्या ‘यंग इंडिया’ या नियतकालिकाचे अंक हवे होते. तो निरोप माझ्यापर्यंत आला. तेव्हा त्याच्या ४० प्रती मी त्यांना दिल्लीला पाठवल्या व त्याचे त्यांनी मला ६०० रुपये दिले! याशिवाय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी इतिहासावरची, तर डॉ. रा. चिं. ढेरे यांनी जुन्या धार्मिक पोथ्या व हस्तलिखितेही माझ्याकडून मोठ्या प्रमाणावर विकत घेतली. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे जयकर ग्रंथालय व गोवा इंडोलॉजी या संस्थेलाही मी अनेक पुस्तके विकली. कीर्तनकार वाळिंबे, लेखक वि. ग. कानिटकर, स. गं. मालशे, डॉ. भीमराव कुलकर्णी, श्री. ज. जोशी, विनायकराव नातू हेही माझ्याकडे पुस्तकांसाठी येत. प्रकाशक अ. ह. भावे यांनी तर माझ्याकडील दुर्मीळ पुस्तकांच्या आवृत्याही नव्याने छापल्या!  

- जुनी व दुर्मीळ पुस्तके आधी विकत घेणे हा एक मोठा व्याप असणार. त्यातले कोणते अनुभव आजही आठवतात? 
- जुनी पुस्तके विकत घेण्यासाठी मी खूप हिंडलो आणि कष्ट घेतले आहेत. या व्यवहारासाठी व पुस्तके वाहून नेण्यासाठी मी अनेकदा सायकलवरून फिरत असे. वाईतल्या एका जुन्या चौसोपी वाड्यातून मी मोठ्या प्रमाणात पुस्तके घेतली होती. ती पुस्तकेच चार पोती भरतील इतकी निघाली! अनेक वेळा आपल्याकडचा अमूल्य ठेवा देताना हे पुस्तक संग्राहक हळवे होत. पुस्तके देणाऱ्यांना आपली मुलगीच सासरी पाठवत असल्याचे दु:ख होई. अशा वेळी ही पुस्तके तुम्ही गरजूंनाच द्या असे ते पुन:पुन्हा बजावत. काही जण तर विकलेल्या पुस्तकांचे पैसेही घेत नसत. अशा वेळी मीच त्या पुस्तकांचा खर्च काढून ती रक्कम माझ्या शाळेला म्हणजे पुणे अनाथ विद्यार्थी गृहाला अशा उदार देणगीदारांच्या नावाने देत असे. तेवढेच मानसिक समाधान मिळे! मी फुकट कुणाकडूनच काही घेतले नाही. 

- पुस्तक व्यवहारातील काही अविस्मरणीय आणि गमतीदार अनुभव सांगा ना!
- स्वत:चे दुकान नसताना पुस्तके विकणे हा एक जिकिरीचा उद्योग आहे. त्यामुळे माझ्याकडच्या दुर्मीळ पुस्तकांच्या चोऱ्याही झाल्या आहेत. त्याचा आर्थिक फटकाही मला सहन करावा लागला; पण पुस्तके वाचणाऱ्या वाचकांचे व्यक्तिमत्त्व माझ्यापुढे येत असणाऱ्या पुस्तकांमधून उभे राहत असे. पुस्तक वाचताना खुणेच्या पानावर त्या पुस्तकांचे वाचक अनेक गोष्टी ठेवत. मी आणलेल्या काही पुस्तकांमध्ये पावत्या, बसची तिकिटे, आंबाड्यातील आकडे आणि मोरपिसे आढळली आहेत. कधी कधी त्यात नोटाही असत! दुर्मीळ पुस्तके विकत घेण्यासाठी मी एकदा एका रात्रीसाठी माझी सोन्याची अंगठीही  गहाण ठेवली होती! १९७६-७७च्या सुमारास पुण्यात जोशी-अभ्यंकर खूनसत्रामुळे भीतीचे वातावरण असे. त्या काळात रात्रीच्या वेळी पुस्तके आणण्यासाठी मी एका मद्रासी इंजिनीअरकडे प्रभात रोडवरील त्याच्या घरी गेलो होतो. त्याने मला घरात तर घेतले नाहीच; उलट खिडकीतून मला लागणारी पुस्तके दिली!

- तुम्ही विकलेल्या पुस्तकांमध्ये महत्त्वाची पुस्तके कोणती? 
- तशी पुस्तके बरीच आहेत. मला आता त्यापैकी काहीच आठवतात. महाराष्ट्रात दिवाळी अंक सुरू करणाऱ्या का. र मित्र यांचे मासिक मनोरंजनाचे अनेक अंक, तसेच तेव्हाचे ‘विविधज्ञान विस्तार’ हे नियतकालिक, १८९७ सालातील रंगभूमीवरील अंक व शेकडो हस्तलिखिते. दाते ग्रंथसूची, अठराव्या शतकातील हस्तलिखित पोथी, दाते-कर्वे यांचा मराठी शब्दकोश अशी ही न संपणारी यादी आहे..!

- तुम्हाला व तुमचे चिरंजीव धनंजय यांना या व्यवसायासाठी शुभेच्छा!
- आभारी आहे.
जुन्या-दुर्मीळ पुस्तकांच्या विक्रीत रमलेल्या तीन पिढ्या
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language