Ad will apear here
Next
मुंबई पर्यटन : आणखी काही ऐतिहासिक इमारती
जनरल पोस्ट ऑफिस, मुंबई

‘करू या देशाटन’
सदरात सध्या आपण मुंबईतील पर्यटनस्थळांची माहिती घेत आहोत. आजच्या भागात माहिती घेऊ या जनरल पोस्ट ऑफिस, जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, सरदार गृह, क्रॉफर्ड मार्केट यांसारख्या काही ऐतिहासिक इमारतींची...
............
मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनसमोरच्या परिसरात जनरल पोस्ट ऑफिस, टाइम्स ऑफ इंडिया, अंजुमन इस्लाम स्कूल, जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् या ब्रिटिश वास्तुशास्त्राचा वारसा असलेल्या ऐतिहासिक इमारती आहेत. इंडोसारासेनिक आर्किटेक्चर शैली (Indo-Saracenic architecture) एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीस भारतातील ब्रिटिश आर्किटेक्ट्सनी विकसित केली. यामध्ये हिंदू आणि मुघल यांच्या विविध वास्तुशास्त्रीय पद्धतींचा संगम आढळतो. तसेच गॉथिक शैलीतील कमानी, घुमट, जिने आणि स्टेनग्लास खिडक्या असे प्रकार एकत्र करण्यात आले. त्यातून एक सुरेख शैली निर्माण झाली. या प्रकारच्या इमारती प्रामुख्याने मुंबईच्या फोर्ट व आसपासच्या भागात आहेत. मुंबईतील अनेक इमारतींची कामे कुर्ला बेसाल्टच्या दगडात, मालाड पिवळ्या आणि ध्रांगधरा (Dhrangdra) दगडात केलेली आहेत. त्यामुळे या भागात फिरल्यावर त्याचे एक वेगळेपण नक्कीच जाणवते. 

जनरल पोस्ट ऑफिस, मुंबई

जनरल पोस्ट ऑफिस (जीपीओ) :
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशनच्या मुख्य इमारतीमधून बाहेर आल्यावर समोर सेंट जॉर्ज रस्ता व हिराचंद वालचंद मार्ग या दोन रस्त्यांच्या मध्यभागी कर्नाटकातील विजापूरच्या प्रसिद्ध गोल घुमटाप्रमाणे असलेली ‘जीपीओ’ची इंडोसारासेनिक शैलीतील इमारत तिच्या घुमटामुळे उठून दिसते. याचे संकल्पचित्र ब्रिटिश आर्किटेक्ट जॉन बेग यांनी १९०२मध्ये केले होते. ११ हजार चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या या इमारतीचे बांधकाम सप्टेंबर १९०४मध्ये सुरू झाले व १९१३ साली पूर्ण झाले. ही इमारत कुर्ला अग्निजन्य पाषाणामध्ये बांधली आहे. मध्यभागी असलेल्या वर्तुळाकार हॉलची उंची १२० फूट आहे. घुमटाचा व्यास ६५ फूट असून, तो मुंबईतील सर्वांत मोठा घुमट आहे. हे कार्यालय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या (पूर्वीचे व्हिक्टोरिया टर्मिनस) जवळ असल्याने इतर देशांतून पार्सल व पत्र पाठविणे सोपे होत असे. 

जनरल पोस्ट ऑफिसचे स्थान

भारतीय टपाल इतिहास :
१५ वर्षांपूर्वी लोकांच्या हाती मोबाइल फोन आल्यापासून पत्रे लिहिणे, पोस्टमनची वाट पाहणे या गोष्टी कालबाह्य झाल्या आहेत. खासगी कुरिअर सेवेमुअळे पार्सल व पत्रव्यवहारही पोस्टामार्फत कमी झाला आहे. टपाल विभागाने काळाची गरज ओळखून आमूलाग्र बदल केले आहेत. भारतात १७६६ साली लॉर्ड क्लाइव्हने फक्त सरकारी कामकाजाकरिता टपाल सेवा सुरू केली. आधुनिक टपाल सेवा आम जनतेसाठी १८३७ साली खुली करण्यात आली. त्या वेळी लोक म्हणायचे ही भुताटकी आहे. पेटीत टाकलेले पत्र आपल्या लांब असणाऱ्या नातेवाईकाकडे पोहोचतेच कसे, असे प्रश्न विचारले जायचे. १५८२मध्ये पहिले टपाल तिकीट (पोस्टाचे तिकिट) कराची येथे जारी करण्यात आले. तथापि ते केवळ सिंध प्रांतापुरतेच मर्यादित होते. १८५४मध्ये टपाल विभाग स्थापन करण्यात आला. त्या सुमारास देशात सुमार ७०० टपाल कचेऱ्या (डाकघरे) स्थापन करण्यात आल्या. १८८० साली मनीऑर्डर सेवा चालू करण्यात आली. १८८२ हे वर्ष म्हणजे भारतीय टपाल कार्यालयाच्या इतिहासातील अतिमहत्त्वाचे वर्ष मानले पाहिजे. त्या वर्षी डाकघर बचत बँकेने सबंध देशभर कार्य करण्यास प्रारंभ केला. रेल्वे डाक सेवा १९०७मध्ये व हवाई डाक सेवा १९११ साली सुरू झाली.  

टाइम्स ऑफ इंडिया बिल्डिंग (१८९८)

टाइम्स ऑफ इंडिया बिल्डिंग

टाइम्स ऑफ इंडिया बिल्डिंग :
मुंबई महापालिकेला लागूनच दादाभाई नौरोजी पथावर सन १८९६मध्ये इंडोसारासेनिक शैलीतील टाइम्स ऑफ इंडियाची इमारत उभारण्यात आली. तीन नोव्हेंबर १८३८ रोजी बॉम्बे टाइम्स आणि जर्नल ऑफ कॉमर्स या नावाने हे वृत्तपत्र प्रथम प्रकाशित झाले. या वृत्तपत्राच्या मालकीबाबत १८१ वर्षांत अनेक स्थित्यंतरे झाली. १८६१मध्ये टाइम्स ऑफ इंडिया या शीर्षकासह या पेपरला अधिक राष्ट्रीय व्याप्ती मिळाली. १९१५मध्ये बेनेट-कोलमन या नवीन संयुक्त कंपनीमार्फत हे वृत्तपत्र ताब्यात घेण्यात आले. स्वातंत्र्यप्राप्तीवेळी १९४६मध्ये उद्योगपती रामकृष्ण डालमिया यांनी हा वृत्तसमूह ब्रिटिश मालकांकडून ताब्यात घेतला. काही अडचणीमुळे त्यांचे जावई साहू शांतिप्रसाद जैन कारभार पाहू लागले. सध्या ११ हजारांहून अधिक कर्मचारी या समूहात काम करतात. 

अंजुमन-ए-इस्लाम स्कूल

अंजुमन-ए-इस्लाम स्कूलअंजुमन-ए-इस्लाम स्कूल : टाइम्स ऑफ इंडिया कार्यालयाच्या उत्तर बाजूला अंजुमन-ए-इस्लाम स्कूलची इंडोसारासेनिक शैलीतील देखणी इमारत आहे. या इमारतीचे संकल्पचित्र ब्रिटिश आर्किटेक्ट जेम्स विलकॉक यांनी बनवले होते. या इमारतीचा कोनशिला समारंभ (पायाभरणी) तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड रे यांच्या हस्ते ३१ मार्च १८९० रोजी झाला. इमारतीचे बांधकाम १८९३मध्ये पूर्ण झाले. या संस्थेची स्थापना मुंबई हायकोर्टाचे पहिले कार्यवाहक भारतीय मुख्य न्यायाधीश डॉ. बद्रुद्दीन तैबजी आणि त्यांच्या पुरोगामी विचारांच्या सहकाऱ्यांनी १८७४मध्ये केली होती. सध्या या संस्थेच्या पूर्व प्राथमिक शाळांपासून पदवी आणि पदव्युत्तर स्तरापर्यंतच्या ऐंशीहून अधिक संस्था आहेत. तसेच अभियांत्रिकी महाविद्यालय, पॉलिटेक्निक, युनानी वैद्यकीय महाविद्यालय, शिक्षण महाविद्यालय, वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय, व्यवस्थापन अभ्यास, हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ होम सायन्स, स्कूल ऑफ फार्मसी आणि स्कूल ऑफ आर्किटेक्ट इत्यादी महाविद्यालयेही आहेत. 

जे. जे. स्कूल ऑफ आर्टजे. जे. स्कूल ऑफ आर्टस् : अंजुमन-ए-इस्लाम स्कूलच्या उत्तरेस जे. जे. स्कूल ऑफ आर्टची इंडोसारासेनिक शैलीतील सुंदर इमारत आहे. जॉर्ज ट्विग मोलेसी यांनी ‘निओ गोथिक शैली’मध्ये या इमारतीची रचना केली. ब्रिटिश राजवटीत भारतात अनेक ठिकाणी प्रशासकीय इमारती शाळा महाविद्यालये यांच्या इमारतींची कामे सुरू झाली. त्या वेळी ब्रिटिश आर्किटेक्ट संकल्पचित्र बनवीत असत. तेव्हा सुपरव्हिजन करणे, वर्किंग ड्रॉइंग करणे यासाठी माणसांची कमतरता भासू लागली. तसेच भारतीय विद्यार्थ्यांना एक नवे व्यावसायिक दालन मिळावे या उद्देशाने सर जमशेटजी जिजीभाई यांनी मोठी देणगी देऊन जे. जे. स्कूल ऑफ आर्ट या संस्थेची उभारणी केली.

जमशेटजी जिजीभाई यांचे जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधील तैलचित्रसुरुवातीला १८५७मध्ये एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूटमध्ये आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समनचा कोर्स चालू करण्यात आला. प्रख्यात आर्किटेक्ट जॉर्ज विट्टेट यांनीही सुरुवातीच्या काळात येथे अध्यापनाचे काम केले. स्कूल ऑफ आर्किटेक्चर इमारतीची रचना केली. येथे आर्किटेक्चर, मूर्तिशास्त्र, व्यक्तिचित्र, शिल्पशास्त्र अशा कलेच्या विविध शाखांचे शिक्षण दिले जाते. सासवणे येथील करमरकर यांच्यासारखे मूर्तिकार येथे घडले. तसेच, अनेक प्रसिद्ध शिल्पकार, अच्युत कानविंदे, बाळकृष्ण दोशी यांच्यासारखे आर्किटेक्ट, रेमो फर्नांडिससारखे गायक, तसेच चंद्रकला कदम यांच्यासारखे चित्रकार अशी अनेक नामवंत मंडळी येथे घडली आहेत. 

क्रॉफर्ड मार्केट

महात्मा ज्योतिबा फुले मंडई (क्रॉफर्ड मार्केट) :
मुंबई पोलीस कमिशनर कार्यालयापुढे महात्मा ज्योतिबा फुले मंडई असून, त्याचे जुने नाव क्रॉफर्ड मार्केट असे होते. मुंबई महापालिकेचे पहिले आयुक्त आर्थर क्रॉफर्ड यांचे नाव त्या वेळी देण्यात आले होते. त्यांच्याच कल्पकतेतून इ. स. १८६५ ते १८७१ या काळात ही इमारत बांधली गेली. अत्यंत गजबजलेल्या भागात हे ठिकाण आहे. ब्रिटिश आर्किटेक्ट विल्यम इमर्सन यांनी नॉर्मन आणि फ्लेमिश आर्किटेक्चरल शैलींमध्ये या इमारतीचे संकल्पचित्र तयार केले होते. बाहेरील प्रवेशद्वारावरील नक्षीकाम, भारतीय शेतकऱ्यांची शिल्पे व आतील कारंजी यांचे डिझाइन कादंबरीकार रुडयार्ड किपलिंग यांचे वडील लॉकवूड किपलिंग यांनी केले होते. बाजाराच्या जमिनीचे क्षेत्रफळ २२ हजार ४७१ चौरस मीटर असून, बांधकाम क्षेत्र ५५१५ चौरस मीटर आहे. भरपूर उजेड येईल आणि पावसापासून संरक्षण होईल अशा पद्धतीचे छत कल्पकतेने तयार करण्यात आले आहे. इमारतीवर भारतीय समाजजीवनाशी आणि संस्कृतीशी सुसंगत जी कलात्मक शिल्पे उभारली आहेत, त्यामुळे त्याच्या सौंदर्यात भर पडली आहे. त्याचे आराखडे जे. जे. कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बनवले आहेत. या अवाढव्य मंडईच्या बांधकामासाठी त्या काळी १९ लाख ४९ हजार ७०० रुपये खर्च झाल्याची नोंद आहे. 

क्रॉफर्ड मार्केट

क्रॉफर्ड मार्केट १९९६पर्यंत मुंबईतील फळांची मुख्य घाऊक बाजारपेठ होती. त्यानंतर घाऊक बाजार नवी मुंबईत हलविला गेला. येथे सर्व प्रकारच्या भाज्या, धान्य, पाव, लोणची, बिस्किटे, चॉकलेट्स, सुका मेवा, आकर्षक लेखनसामग्री, कटलरी, कॉस्मेटिक्स, नॉव्हेल्टी, मसाले, किराणा माल, तंबाखू, पादत्राणे यांची दुकाने आहेत. तसेच मासेविक्रीसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. 

सरदार गृहातील चौथ्या मजल्यावर लोकमान्य टिळक यांची खोली आहे. (फोटो : मुंबई हेरिटेज ट्विटर)

सरदार गृह (फोटो : Nicholas - Wikipedia)सरदार गृह : हे अत्यंत दुर्लक्षित, पण अत्यंत महत्त्वाचे असे ठिकाण आहे. भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांचे येथे निधन झाले. त्यांच्या आयुष्याच्या अखेरचे २० दिवस त्यांनी येथे व्यतीत केले. त्यांच्यावरील एका खटल्याच्या कोर्टकामासाठी ते १२ जुलै रोजी पुण्याहून मुंबईला आले. २१ जुलै रोजी निकाल त्यांच्या बाजूने लागला; पण त्यांना तो वाचताही आला नाही. २० जुलै रोजी त्यांचे सहकारी चमनलाल यांच्याबरोबर ते उघड्या मोटारीने थोडे बाहेर फिरून आले. दुसऱ्या दिवशी त्यांचा ताप बळावला. त्याचे रूपांतर न्यूमोनियात झाले. मुंबईतील त्यांच्या या मुक्कामात ते आजारी आहेत असे कळताच गांधीजी, मौलाना शौकत अली, बॅ. जिना, पंडित नेहरू आणि इतर नेते सरदारगृहात टिळकांना भेटून गेले. एक ऑगस्ट १९२० रोजी मध्यरात्री १२ वाजून ४० मिनिटांनी त्यांनी येथेच अखेरचा श्वास घेतला. पहाटेपर्यंत बातमी मुंबईत पसरली. पाऊस असूनही हजारोंचे लोंढे सरदारगृहाकडे येऊ लागले. पुण्याहून खास रेल्वे सोडण्यात आली होती. दुपारी दीड वाजता अंत्ययात्रा निघाली. गिरगाव चौपाटीवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

लोकमान्य टिळक यांची अंत्ययात्रा

एवढ्या महान नेत्याचे जेथे निधन झाले, त्या ठिकाणाकडे दुर्लक्ष व्हावे, यासारखी खेदाची गोष्ट नाही. त्यांच्या निधनाला ९९ वर्षे झाली. २०२० हे त्यांचे स्मृतिशताब्दी वर्ष आहे. तेथे त्यांचे स्मारक व्हावे, अशी मागणी आहे. हे ठिकाण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व मुंबई महापालिका या ठिकाणापासून १५ मिनिटांच्या अंतरावर आहे. 

कसे जाल महात्मा ज्योतिबा फुले मंडई परिसरात?
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला मध्य रेल्वेच्या उपनगरी व मुख्य रेल्वे मार्गावरील कोणत्याही ट्रेनने येता येते. मुंबईतील कोणत्याही भागातून येथे बेस्टच्या बसेस उपलब्ध आहेत. तसेच टॅक्सी सेवाही उपलब्ध आहे. तेथून फुले मंडई परिसर १५-२० मिनिटांच्या अंतरावर आहे.

(या लेखासाठी मुंबईतील ज्येष्ठ आर्किटेक्ट चंद्रशेखर बुरांडे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. तसेच सातारा येथील आर्किटेक्ट विवेक गुप्ते यांचेही सहकार्य झाले.)

- माधव विद्वांस

ई-मेल : 
vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी आणि शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)

(मुंबईतील पुरातन वारसा वास्तूंबद्दल माहिती देणारे, आर्किटेक्ट चंद्रशेखर बुरांडे यांनी लिहिलेले  लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language