Ad will apear here
Next
‘नाच रे मोरा’ कार्यक्रमातून रत्नागिरीतील बालकलाकार उलगडणार ‘गदिमां’चे बालपण
रत्नागिरी : शब्दप्रभू गदिमा अर्थात ग. दि. माडगूळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने रत्नागिरीत २५ ऑगस्ट रोजी ‘नाच रे मोरा’ या नाट्य-नृत्य-संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गदिमांचे बालपण उलगडणारा हा कार्यक्रम रत्नागिरीतील बालकलाकार सादर करणार आहेत.

बालरंगभूमी परिषद आणि पुण्याची नाट्यसंस्कार कला अकादमी या दोन संस्थांच्या रत्नागिरी शाखा आणि रत्नागिरी नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. २५ ऑगस्टला सायंकाळी साडेचार वाजता रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात हा कार्यक्रम होणार आहे. 

‘कोकण ही अनेक लेखक, कवी, कलावंतांची जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. या कलांची जोपासना व्हावी आणि पुढील पिढीही या कलांमध्ये सक्षम व्हावी, त्यांच्यासाठी काही विचार केला जावा, या हेतूने काही रसिक कलावंतांनी एकत्र येऊन बालरंगभूमी परिषदेच्या रत्नागिरी शाखेची निर्मिती करायचे ठरवले,’ अशी माहिती बालरंगभूमी परिषदेच्या रत्नागिरी जिल्हा शाखेच्या अध्यक्षा आणि मध्यवर्ती शाखेच्या कोषाध्यक्षा आसावरी शेट्ये यांनी दिली. 

जिल्ह्यातील बालकलाकारांना व्यासपीठ मिळण्यासाठी गेली दोन वर्षे नृत्य, नाट्यशिक्षणासारखे अनेक उपक्रम रत्नागिरीत राबविले जात आहेत. गेल्या वर्षी राज्य शासनाच्या बालनाट्य स्पर्धेत कोल्हापूर केंद्रावर रत्नागिरीच्या संघाने ‘नवे गोकुळ’ हे पु. ल. देशपांडेंचे बालनाट्य सादर केले होते. यंदा शब्दप्रभू गदिमांची जन्मशताब्दी आहे. त्याचे औचित्य साधून ‘नाच रे मोरा’ ही गदिमांचे बालपण उलगडणारी नृत्यनाटिका सादर केली जाणार आहे. पुण्याच्या नाट्यसंस्कार कला अकादमीच्या या सुमारे दोन तासांच्या प्रयोगात सहभागी असलेले सर्व बालकलाकार रत्नागिरीतील आहेत. 

‘गदिमां’ची नात लीनता माडगूळकर-आंबेकर यांनी याचे लेखन केले असून, अशोक अडावतकर यांनी दिग्दर्शन केले आहे. याची मूळ संकल्पना दीपाली निरगुडकर आणि प्रकाश पारखी यांची असून, या कार्यक्रमाची संकल्पना आसावरी शेट्ये यांची आहे. कु. मीरा खालगावकर हिने नृत्यदिग्दर्शन केले आहे.

कार्यक्रमाच्या प्रवेशिकांसाठी संपर्क : 
किरण जोशी (जीजीपीएस) : ९४२३८ ३३१५८
किरण सनगरे (शिर्के प्रशाला, गुरुकुल) : ९४२१२ ३०९९२
आसावरी शेट्ये : ७५०७४ १६१६६
अॅड. सरोज भाटकर : ९४२२६ ३११४४
मिलिंद टिकेकर (फाटक प्रशाला)

(व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language