Ad will apear here
Next
कर्नाटकचा रमणीय किनारी प्रदेश
कारकल
‘करू या देशाटन’ सदराच्या गेल्या भागात आपण शिमोगाची सैर केली. आजच्या भागात माहिती घेऊ या कर्नाटकच्या किनारी भागातील पर्यटनस्थळांची....
..........
कोस्टल कर्नाटक म्हणजेच तुळुनाडू. येथील उडुपीचा किनारा आठ कोटी वर्षांपूर्वी आफ्रिकेतील मादागास्कर बेटांशी जोडलेला होता. त्याचा संबंध दाखविणारे खडक मालपेजवळ आढळून आले आहेत. आपण उतरतो ते उडुपी जिल्ह्यात. उडुपी हे नाव आपल्या चांगल्या ओळखीचे आहे. १९९७मध्ये हा जिल्हा अस्तित्वात आला.

भारतात सर्वत्र, प्रामुख्याने महाराष्ट्रात उडुपी रेस्टॉरंट्स आपल्याला डोसा-इडली खायला घालत असतातच. कामत, शानभाग, प्रभू, शेणवी ही सर्व सारस्वत मंडळी सर्वत्र आढळतात. त्यातील काही जण महाराष्ट्राशी एकरूप झाले. मुदबिद्री येथील शिलालेखावरील माहितीवरून, इ. स. २०० ते इ. स. १४००पर्यंत येथे अलुपा किंवा अल्वा राजवट होती. त्यावर चालुक्य, होयसळ, कदंब राजांचा प्रभाव राहिला होता.

उडुपीउडुपी : हे जिल्ह्याचे ठिकाण. उडुपी परशुराम क्षेत्र म्हणूनही ओळखले जाते. सिंडिकेट बँक व कॉर्पोरेशन बँक यांची स्थापना येथेच झाली. हँडलूम रेशीम उद्योगासाठी हे गाव प्रसिद्ध आहे. कॉटन साडी व त्यावरील बुट्टी पैलू हेही येथील वैशिष्ट्य. उडुपी हे एक सांस्कृतिक केंद्र म्हणूनही प्रसिद्ध आहे.

यक्षगानयक्षगान हा येथील लोकांचा आवडता नाट्यप्रकार. उडुपी येथे अनेक मंदिरे आहेत. त्यापैकी श्रीकृष्ण मठ प्रसिद्ध आहे. आपल्याकडे जसे अष्टविनायक, अकरा मारुती प्रसिद्ध आहेत, तशी तेथील अष्टमठ मंदिर परंपरा प्रसिद्ध आहे.


श्रीकृष्ण मठ१३व्या शतकात स्वामी मध्वाचार्यांनी याची स्थापना केली. स्वामी मध्वाचार्यांनी त्यांच्या शिष्यासाठी पेजावरा येथे श्री विश्ववेश तीर्थ स्वामीजी, पालिमारू येथे विध्यादिशा तीर्थ स्वामीजी, अडामारू येथे श्री विश्वप्रिय तीर्थ स्वामीजी, पुट्टिगे येथे श्री सुगुनेन्द्र तीर्थ स्वामीजी, सोढे येथे श्री विश्ववल्लभ तीर्थ स्वामीजी, कनियुरू येथे श्री विद्यावल्लभ तीर्थ स्वामीजी, शिरूर येथे श्री लक्ष्मीवरा तीर्थ स्वामीजी व कृष्णापुरा येथे श्री विद्यासागर तीर्थ स्वामीजी असे अष्टमठ स्थापन केले. 

मणिपालमणिपाल : हे कर्नाटकातील एक नामवंत शैक्षणिक केंद्र असून, ते उडुपीपासून पाच किलोमीटरवर आहे. मणिपाल हे उडुपीचे उपनगर आहे. डॉ. टी. ए. पै यांनी येथे शैक्षणिक संकुल स्थापन केले. येथे वैद्यकीय महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय, व्यवस्थापन कौशल्य महाविद्यालय आहे. २५ हजार विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. कर्नाटकचे टागोर म्हणून ज्यांना ओळखले जाते, ते शिवराम कारंथ मणिपालमध्येच जन्मले. ते स्वतः यक्षगान कलाकार होते. मोबाइल व इंटरनेट वापरात देशात प्रथम क्रमांक असणारे हे ठिकाण आहे.
कोडी बीच

कोडी बीच : हा किनारा कुंडापूरपासून सुमारे चार किलोमीटरवर असून, अरबी समुद्राच्या सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी ते एक उत्तम ठिकाण समजले जाते.

मालपे बीच
मालपे : मालपे बीचवर पर्यटकांची कायम गर्दी असते. येथे डॉल्फिन्स पाहायला मिळतात. उडुपीच्या पश्चिमेला सहा किलोमीटर अंतरावर असलेले हे एक नैसर्गिक व प्रमुख मासेमारी बंदर आहे. येथे टेब्मा (TEBMA) या कंपनीचा जहाजबांधणी उद्योग आहे. मालपे गाव टाइल्स उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. नारळांचा व्यापार हेही येथील वैशिष्ट्य. उडुपी शहराचे हे उपनगर आहे. मालपे गावात मोघवीर कोळी समाजाची वस्ती असून, मासेमारी हा प्रमुख व्यवसाय आहे. तुलू, कन्नड, उर्दू आणि कोंकणी या भाषा येथे बोलल्या जातात. ‘२४ बाय ७’ वाय-फाय सेवा भारतात प्रथम मालपे बीचवर सुरू झाली. मालपे गावाच्या जवळ असलेल्या एका बेटावर दर्याबहादूरगड नावाचा छोटा किल्ला आहे. ते निसर्गरम्य ठिकाण आहे आणि तेथे काही मंदिरे आहेत.

सेंट मेरी बेटे : सन २००१मध्ये ‘जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया’ने घोषित केलेल्या भारतातील २६ भूगर्भीय स्मारकांपैकी सेंट मेरी आयलँड हे एक आहे. पूर्वी आफ्रिकेच्या मादागास्करशी हे बेट जोडलेले होते. सुमारे आठ कोटी ८८ लाख वर्षांपूर्वी हे ठिकाण भूपृष्ठीय घडामोडींमुळे सरकले गेले. वैज्ञानिक नोंदींनुसार, आफ्रिकेतील मादागास्कर येथील खडक व भौगोलिक रचना सेंट मेरी बेटांवरील खडकांशी मिळती जुळती आहे. हे बेसाल्टिक लाव्हा प्रकारातील खडकांचे बेट आहे, ज्याला कोकोनट बेट आणि थोनसेपर असेही म्हटले जाते. उडुपी येथील मालपे किनारपट्टीवरून जवळ अरबी समुद्रात ही चार छोटी बेटे आहेत. येथे डॉल्फिन्स पाहायला मिळतात.

सेंट लॉरेन्स चर्चअत्तुर : हे गाव कारकलजवळ असून, ते पोर्तुगीज सेंट लॉरेन्स चर्चसाठी प्रसिद्ध आहे. मला पर्यटकांना एक सुचवावेसे वाटते, की पर्यटनाला निघताना जाती-धर्माचे जोडे काढून बाहेर पडायला हवे. भारतात अनेक राजवटी आल्या, अनेक धर्मांचे लोक आले. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या स्थापत्याचे नमुने पाहण्यास मिळतात. डच, पोर्तुगीज, ब्रिटिश, मुघल, पर्शियन, अरेबिक अशा अनेक प्रकारची बांधकामे पाहायला मिळतात. अत्तूर येथे असलेले असेच घडीव दगडातील चर्च म्हणजे वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. आताच्या ठिकाणापासून सात किलोमीटरवर १७५९पूर्वी जुने कॅथलिक चर्च होते. टिपू सुलतानाने ते नष्ट केले व तेथील ख्रिश्चन लोकांना बंदी बनवून श्रीरंगपट्टण येथे नेले. त्यातील काही जण सुटून परत आल्यावर त्यांनी पुन्हा चर्च बांधले. रेव्हरंड फ्रँक परेरा यांनी सेंट लॉरेन्सच्या अनेक भाविकांना या चर्चमध्ये एकत्र येण्याचे आवाहन केले आणि ते एक तीर्थक्षेत्र झाले. इ. स. ३००मध्ये स्पेनमध्ये जन्मलेल्या सेंट लॉरेन्स यांच्या स्मृतीसाठी या चर्चला त्यांचे नाव देण्यात आले. अत्तूर येथील सेंट लॉरेन्सचे तीर्थक्षेत्र १७५९पूर्वी अस्तित्वात होते, असे दिसते. येथील चर्च एक शाळा आणि एक अनाथालय चालविते.

बसरूरबसरूर : पूर्वी हे ठिकाण वासुपुरा म्हणून ओळखले जायचे. हे कर्नाटकातील वराही नदीच्या (खाडी) काठावरील ऐतिहासिक बंदर असलेले शहर आहे. श्री विष्णूच्या वराह अवतारावरून वाराही हे नाव पडले आहे. या नदीला पंचगंगावली असेही संबोधले जाते. सोळाव्या शतकातील त्या भागातील तांदूळ व मसाल्याच्या व्यापारासाठी हे बंदर प्रसिद्ध होते. शिमोग्याजवळ असलेल्या संस्थांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक विदेशी देशांतील व्यापारी येथे येत असत. पूर्वी हे गाव सांस्कृतिक कार्यक्रमात आघाडीवर असे. व्यापारी, कारागीर, नर्तक, विणकर या गावात होते. इ. स १३००मध्ये मोरोक्कोहून आलेल्या अबू अब्दुल्ला मोहम्मद या व्यापारी प्रवाशाने या गावाबद्दल लिहून ठेवले आहे. या गावात नारळांचे उत्पादन भरपूर आहे. ब्रिटिश मेजर जेम्स रेनेल यांनीही या गावाची महत्त्वाचे ठिकाण म्हणून नोंद केली आहे. हे गाव मंदिरांसाठीही प्रसिद्ध असून, येथील श्री महातोबर लिंगेश्वर मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या गातील २४ मंदिरापैकी नखरेश्वर मंदिराला ऐतिहासिक महत्त्व आहे. तेथे इ. स. १२००मधील शिलालेख आहे. प्रसिद्ध कन्नड कादंबरीकार डॉ. के. शिवराम कारंथ यांनी बसरूर गावातील लोकांच्या जीवनावर आधारित एक कादंबरी लिहिली आहे. त्या कादंबरीत प्रामुख्याने गाणे आणि नृत्य समुदायाचे तपशील वर्णन केले आहेत.

गंगोलीगंगोली : हे उडुपी जिल्ह्याच्या कुंडापूर तालुक्यातील अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरील एक गाव असून, ते पंचगंगवल्ली नदीच्या मुखावर वसलेले आहे. गावचे मूळ नाव ‘गंगुली’ असेच होते. परंतु नंतर हळूहळू ‘गंगोली’ असे त्याचे रूप झाले. या गावात अनेक मशिदी व चर्च आहेत. येथील जुन्या चर्चचे नूतनीकरण करण्यात आले आहे. मूळ चर्च १६व्या शतकातील सुमारे ३८७ वर्षांपूर्वीचे आहे. एका पोर्तुगीज कमांडरने ते बांधलेले आहे. 

श्री व्यंकटेश्वर१५६५मध्ये तल्लीकोटाच्या लढाईत विजयनगरचे राजे पराभूत झाल्यावर हा भाग त्यांच्याच सरदार केळदीच्या नायकांच्या आधिपत्याखाली आला. त्याच वेळी  पराभव झाल्यानंतर विजयनगर साम्राज्यात झालेल्या गोंधळाच्या दरम्यान, गंगोली केळदीतील नायकांच्या शासनाखाली आले. त्यानंतर ते विजयनगरचे सरदार होते. परंतु त्यांनी स्वातंत्र्य घोषित करण्याची संधी मिळवली. गंगोलीच्या आसपास लोकवस्ती कमी होती, तसेच जंगलही होते. याच वेळी मोठ्या प्रमाणात पोर्तुगीज व गोव्यातील कॅथलिक कुटुंबे गंगोली आणि पुढे दक्षिणेकडे स्थलांतरित झाली. या लोकांनी  रहिवाशांकडून मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी केली आणि थेट केळडी नायक यांच्याकडून मंजुरी घेतली. घरे बांधणे, शेतीचा पाठपुरावा करणे आणि व्यापार करणे हे त्यांचे ध्येय होते. त्याच सुमारास कुमठा येथील नारायण मल्ल्या यांनी श्री व्यंकटेश्वर मंदिराची स्थापना केली.

मरवंथे
मरवंथे : मरवंथे बीच म्हणजे कोडाकाद्री हिल्सच्या पार्श्वभूमीवर अरबी समुद्र आणि सत्पुरणिका नदीच्या मधोमध असलेला वाळू भागाचा समुद्रकिनारा आहे. येथे सोनेरी वाळू, खजूर झाडे, स्पष्ट आकाश असे विलोभनीय दृश्य दिसते. हे ठिकाण उडुपीपासून ३४ किलोमीटरवर आहे.

केवलगडचा किल्लाकेवलदुर्ग : केवलगडचा किल्ला भुवनगिरी म्हणूनही ओळखला जातो. हा प्राचीन किल्ला पाच हजार फूट उंचीवर आहे. बेलागुटच्या राजाने इ. स. ९००मध्ये हा किल्ला बांधला. १४व्या शतकात चेलुवीरनगप्पा याने हा किल्ला मजबूत केला. केळदी राजा व्यंकटप्पा नायक याने इ. स. १६००मध्ये हा किल्ला संरक्षित करण्यासाठी आणखी सात किल्ले बनवले. १८व्या शतकात हैदर अलीने हा किल्ला जिंकला आणि नंतर तो टिपू सुलतानाच्या शासनाखाली आला. आता या किल्ल्याचे फक्त अवशेष शिल्लक आहेत. याचे शिमोग्यापासून अंतर ७५ किलोमीटर असून, उडुपीपासून ते ८१ किलोमीटरवर आहे.

दर्याबहादूरगडकारकल : पश्चिम घाटाच्या पायथ्याशी असलेले हे जैनधर्मीयांचे तीर्थक्षेत्र आहे. येथे जैन वस्ती मोठ्या प्रमाणावर आहे, तसेच जैन धर्मातील ऐतिहासिक महत्त्वामुळेही हे महत्त्वाचे ठिकाण आहे, राजा वीरभैरव याने इ. स. १४००मध्ये ४१ फूट उंचीची ग्रॅनाइटमधील बाहुबलीची मूर्ती येथे उभारली.

कसे जायचे?
उडुपीला रेल्वे व रस्त्याने जात येते. उडुपी येथे रेल्वे स्टेशन आहे. जवळचा विमानतळ मंगळूर येथे ५४ किलोमीटरवर आहे. येथे जाण्यासाठी उत्तम कालावधी नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा असतो. उडुपी, मालपे येथे राहण्याची, जेवणाची उत्तम सोय होऊ शकते.

- माधव विद्वांस
ई-मेल : vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)

श्रीकृष्ण मठ

 ( कर्नाटकचा रमणीय किनारी प्रदेशाची झलक दर्शविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)


 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language