Ad will apear here
Next
‘संभाव्य टंचाई स्थितीसाठी नियोजन करा’
सोलापूर : ‘जिल्ह्यातील मंगळवेढा, माढा सांगोला, करमाळा आणि अक्कलकोट या तालुक्यांत ३१ ऑगस्टअखेर ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे संभाव्य टंचाई स्थिती लक्षात घेता संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी आवश्यक नियोजन करावे,’ अशा सूचना अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी केल्या.

तीन सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुद्देशीय सभागृहात लोकशाही दिन, जिल्हा समन्वय समिती आणि भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे यांच्यासह आरोग्य, कृषी, सहकार, सार्वजनिक बांधकाम अशा विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

अतिरिक्त जिल्हाधिकारी शिंदे म्हणाले, ‘जिल्ह्यातील पाच तालुक्यांत ३१ ऑगस्टअखेर सरासरी ५० टक्क्यांहून कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे संबंधित तालुक्यात टंचाई स्थिती निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून संबंधित तालुक्यातील कृषी, पशुसंवर्धन, जलसंधारण अशा विविध विभागांनी आपल्या जिल्हास्तरीय कार्यालयाला आवश्यक ती माहिती द्यावी जेणेकरून नियोजन करणे शक्य होईल. ‘आपले सरकार’ या  पोर्टलवर करण्यात आलेल्या तक्रारीचा निपटरा वेळेत केला जावा. या पोर्टलवर भूमी अभिलेख, नगर रचना, कृषी विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याबाबत तक्रारी आहेत.’

‘ध्वजदिन निधीचे उद्दिष्ट लवकरात लवकर पूर्ण करावे. ज्या विभागांनी अद्याप निधी दिला नाही त्यांनी प्राधान्याने निधी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयाकडे जमा करावा; तसेच २८ सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा करायचा आहे. त्यासाठी शालेय शिक्षण, माध्यमिक शिक्षण आयटीआय स्वयंसेवी संस्था यांच्या सहाय्याने माहिती अधिकार कायद्याबाबत जनजागृती व्हावी यासाठी उपक्रम साजरे करावेत,’ अशा सूचना या वेळी शिंदे यांनी केल्या.

‘जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीची लोकशाही दिनाच्या बैठकीनंतर बैठक घेतली जाईल. नागरिक आपल्या तक्रारी या समितीसमोर मांडू शकतात,’ अशी माहिती शिंदे यांनी दिली.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language