Ad will apear here
Next
लीलावती भागवत, कविता महाजन
बालकुमार साहित्यात मोलाची भर टाकणाऱ्या लीलावती भागवत, सामाजिक विषमता आणि स्त्रियांच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या कविता महाजन, ज्ञानेश्वरीचे अभ्यासक भालचंद्र बहिरट, गोव्याविषयी विशेष संशोधन करणारे अनंत प्रियोळकर आणि ‘गावगाडा’कार त्रिंबक आत्रे या साहित्यिकांचा पाच सप्टेंबर हा जन्मदिवस. त्यानिमित्त आज ‘दिनमणी’मध्ये या सर्वांचा अल्पपरिचय...
..........................

लीलावती भागवत


पाच सप्टेंबर १९२० रोजी रोह्यामध्ये जन्मलेल्या लीलावती भागवत या त्यांच्या बालकुमार साहित्यामुळे लोकप्रिय आहेत. ५०च्या दशकात जेव्हा मुलांसाठी विशेष स्वतंत्र मासिकं नव्हती अशा काळात त्यांनी आपले पती भा. रा. भागवत यांच्यासह ‘बालमित्र’ हे मासिक काढलं. त्या काळी पालकांकडून मुलांसाठी अशा मासिकांसाठी विशेष प्रतिसाद नव्हता. तरीही त्यांनी पदरच्या खर्चाने ते बराच काळ सुरू ठेवलं. त्या मासिकासाठी सुप्रसिद्ध चित्रकार द. ग. गोडसे यांनी चित्रं काढून दिली होती.

त्यांनी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून ‘वनिता मंडळ’ हा कार्यक्रम तब्बल २० वर्षं चालवला होता. त्यांनी पती भा. रा. भागवत यांच्या साहित्याचं संपादन त्यांच्याच नावाचं संक्षिप्त रूप ‘भाराभर गवत’ अशा मजेशीर नावान प्रसिद्ध केलं होतं.
 
कोण असे हे राव?, मचव्यातले साहस, प्रेमचंद कथा, वाट वळणा वळणाची, खेळू होडी होडी, भावले भावले, अभयारण्यातील चोरी, छोट्यांच्या छोट्या गंमती, रघु रघु राणा अशी त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत.
 
२५ नोव्हेंबर २०१३ रोजी त्यांचं पुण्यामध्ये निधन झालं.
.................................

कविता महाजन

पाच सप्टेंबर १९६७ रोजी नांदेडमध्ये जन्मलेल्या कविता महाजन या सामाजिक विषमता आणि स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या लेखिका म्हणून ओळखल्या जातात.

स्त्रियांच्या प्रश्नांविषयी त्यांनी सातत्यानं लिहिलं आहे आणि त्या संदर्भातल्या काही महत्त्वाच्या पुस्तकांचे अनुवादही केले आहेत. त्यांना अनुवादित साहित्यासाठीचं ‘साहित्य अकादमी पारितोषिक’ मिळालं आहे.  

ब्र, भिन्न, ठकी आणि मर्यादित पुरुषोत्तम, धुळीचा आवाज, आगीशी खेळताना, मृगजळीचा मासा, तुटलेले पंख, ग्राफिटी वॉल, जोयानाचे रंग, अम्बई, कुहू- मराठी, इंग्रजी भाषेतून, समुद्रच आहे एक विशाल जाळं अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत.

२७ सप्टेंबर २०१८ रोजी त्यांचं पुण्यात निधन झालं. (त्यांच्याविषयीचा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
.............................

भालचंद्र पंढरीनाथ बहिरट

पाच सप्टेंबर १९०४ रोजी पंढरपूरमध्ये जन्मलेले भालचंद्र बहिरट हे संतसाहित्याचे अभ्यासक होते. ज्ञानेश्वरीवर त्यांनी विशेष संशोधन करून ग्रंथ लिहिले. त्यांना पुणे विद्यापिठाने डी. लिट. ही सन्माननीय पदवी दिली होती.

संतवाणीचा अमृतकलश, वारकरी संप्रदाय - उदय आणि विकास, अमृतानुभव, भक्तिसाधना अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत.

१४ ऑक्टोबर १९९८ रोजी त्यांचं पंढरपूरमध्ये निधन झालं.
..........

अनंत काकबा प्रियोळकर

पाच सप्टेंबर १८८५ रोजी जन्मलेले प्रियोळकर हे मोठे विद्वान इतिहास संशोधक होते. त्यांनी अनेक दुर्मीळ ग्रंथांचा अभ्यास केला होता.

१९५१ साली कारवारमध्ये भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. गोमंतकाची सरस्वती, दमयंती स्वयंवर अशी त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत.

१३ एप्रिल १९७३ रोजी त्यांचा मृत्यू झाला.
......................................

त्रिंबक नारायण आत्रे

पाच सप्टेंबर १८७२ रोजी जन्मलेले त्रिंबक आत्रे हे समाजशास्त्राचे गाढे अभ्यासक होते. त्यांनी वंजारी, कैकाडी, रामोशी यांसारख्या जातीजमातींचा अभ्यास करून लेखन केलं आहे. 

त्यांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातल्या सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक व्यवस्थेचा अभ्यास करून लिहिलेला ‘गावगाडा’ हा ग्रंथ मराठीतील अभिजात साहित्यकृती समजला जातो.

१९३३ साली त्यांचं निधन झालं.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language