Ad will apear here
Next
तारकर : भय व गूढतत्त्वाची सशक्त अनुभूती
आपल्या आजूबाजूच्या, आपल्या रोजच्या वावरण्यात असणाऱ्या जगातल्याच वास्तू, व्यक्ती किंवा साध्याश्याच वाटणाऱ्या घटना वेचून, कमीत कमी शब्दांत गूढ आणि भयाची निर्मिती करणं, ही रत्नाकर मतकरींची खासियत आहे. जोरदार पाऊस पडत असला, विजा कडाडत असल्या, वीज गेलेली असली, की मला त्यांची ‘तारकर’ ही भयकथा हमखास आठवते... ‘रसास्वाद’ या सदरात या वेळी पाहू या ‘तारकर’ या रत्नाकर मतकरी यांच्या कथेबद्दल....
..................
नुकताच मोसमी पाऊस सुरू झालेला आहे. पाऊस, आकाशात दाटून आलेले काळे ढग, संध्याकाळी वातावरणात असलेली एक प्रकारची उदासी, किंचित भेडसावणारा अंधार, कडाडणाऱ्या विजा, सुप्त भयाची भावना, या सगळ्याचं एक अतूट नातं आहे. जोरदार पाऊस पडत असला, विजा कडाडत असल्या, वीज गेलेली असली, की मला ‘तारकर’ ही भयकथा हमखास आठवते. माझे अत्यंत आवडते लेखक, रत्नाकर मतकरी यांची ही कथा. ‘ऐक.. टोले पडताहेत!’, या ३० निवडक कथांच्या संग्रहामधली दुसरी कथा.

शेजारचं बिऱ्हाड तारकरांचं – घरमालक म्हणाले. 

संजीवनीनं पाहिलं, गडद निळ्या ऑईलपेंटनं रंगवलेल्या दरवाजावर एक लहानशी लाकडी पाटी होती.. तारकर.. बस्स. आद्याक्षरं नाहीत, काही नाही.

अशी या कथेची सुरुवात. साधीशीच, पण प्रभावी वातावरणनिर्मिती करणारी. त्या वाक्यात वर्णिलेल्या वस्तू त्यांच्या रंगांसमवेत मनात उभी करणारी आणि त्यातलं वैचित्र्य अथवा गूढ अधोरेखित करणारी. आयुष्यात नुकतंच पराकोटीचं दु:ख अनुभवलेली संजीवनी ही कथानायिका, एका उपनगरातल्या चाळीत राहायला आलेली असते. नुकत्याच आलेल्या वाईट अनुभवांमुळे, एकाही माणसाला न भेटता स्वतःला कोंडून घेण्याच्या मनःस्थितीत असलेल्या संजीवनीला, हवी तशी जागा मिळालेली असते. कुणाचा संपर्क नको, नि काही नको. ‘फळाच्या फाकेसारखी अरुंद, काळवंडलेली जुनाट चाळ’ असं अगदी मोजक्या शब्दांत मतकरी सर या चाळीचं वर्णन उभं करतात. केवळ सहा शब्दांमधून वाचकाच्या मनात चाळीचं चित्र उभं राहतं. त्या जागेचा कोंदटपणा, जुनकटपणा आणि एकंदरीत जीर्ण पोत अगदी नेमकेपणानं ध्यानी येतो. 

रत्नाकर मतकरीकथेच्या सुरुवातीला, चाळीचं मोजक्या शब्दांत केलेलं वर्णन, कथानायिका संजीवनीची पार्श्वभूमी, घरमालक आणि तिच्या संवादातून उभं राहणारं चाळीचं आणि तिथे वस्तीला असणाऱ्या लोकांबाबतचं वर्णन इत्यादी येऊन जातं. शेजारी राहणाऱ्या तारकरांचा कसलाही त्रास नाही आणि तो माणूस फक्त झोपण्यापुरताच चाळीत येतो. एरवी दिवसभर तो बाहेरच असतो, असं घरमालक सांगतात. जेमतेम एक पान उलटून होईपर्यंत, संजीवनीची त्या चाळीतल्या खोलीतली पहिली रात्र होते आणि तिला आपल्या खोलीच्या दाराला कुणी चावी लावत आहे की काय, असा भास होतो. या कल्पनेनं ती घाबरते; पण तिच्या लक्षात येतं, की चावी शेजारच्या खोलीच्या कुलपाला लावली जात आहे. आधीच बराच वेळ झोप लागत नसलेली संजीवनी आता उठून बसते. तारकर कुलूप काढून घरात येतात ते तिला अंदाजाने कळतं. पुढे तिला झोप लागते. 

सकाळी तारकरांच्या घराला परत कुलूप असतं. तिला तारकर दिसत नाहीत; पण त्यांच्याविषयी उत्सुकता वाटते. ते कसे दिसत असतील, काय करत असतील याचा विचार ती करू लागते. दुसऱ्या दिवशी तारकर उशिराने येतात, तेव्हा संजीवनीला झोपेतून जाग येते. तिला तारकरांचा आवाज ऐकू येतो. ते धडपड करत आहेत का, असंही तिला वाटतं. तारकरांचं ते अपरात्री येणं, नंतर वेगवेगळे आवाज करणं आणि सकाळी लवकर उठून निघून जाणं या सगळ्याची संजीवनीला सवय होते; पण याचबरोबर, ते काय करत असतील, नेमके कसे दिसत असतील, याचं कुतूहलही दिवसागणिक वाढू लागतं. त्यांचा स्वभाव कसा असेल, ते व्यसनी असल्यामुळे धडपड करत असतील का, त्यांना जेवायला कोण घालत असेल, इत्यादी प्रश्न तिच्या मनात गर्दी करू लागतात. एके दिवशी संजीवनी खालच्या मजल्यावरच्या लोकांकडे तारकरांबद्दल चौकशी करू पाहते; पण तिला तिच्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत. ज्यांना ती हे विचारते, त्यांच्याकडून विचित्र प्रतिक्रिया येतात. 

पावसाळा असतो. एके दिवशी वातावरण अतिशय कुंद होतं आणि मुसळधार पावसाला सुरुवात होते. अपरात्र झालेली असते. आज काही झालं, तरी तारकर जेव्हा येतील, तेव्हा त्यांना पाहायचं, असा निश्चय संजीवनी करते. तारकर एकदाचे येतात. त्यांना पाहायला संजीवनी बाहेर पाऊल टाकते आणि विपरीत घडतं. संजीवनी तारकरांना पाहते, तेव्हा खरं तर कथा संपली, असं वाटतं; पण त्यानंतर असणाऱ्या काही शेवटच्या ओळी कथेला खोली प्राप्त करून देतात. या कथेच्या रचनेत गंमत आहे. तिचा सुरुवातीचा भाग आणि शेवटचा भाग हा जवळपास सारखा आहे. परंतु शेवटच्या वाक्यातल्या त्याच शब्दांचा अर्थ शेवटी बदलतो. 

या कथेला म्हटलं, तर निश्चित एक शेवट आहे आणि म्हटलं, तर अंतच नाही. त्या जुनाट, बुरसटलेल्या, कोंदट चाळीमध्ये संजीवनीसारख्या नव्या भाडेकरूने राहायला येणं, गत आयुष्यातील आठवणींमधून सावरलेलं नसणं, आयुष्याला विटलेलं असणं, माणसं नकोशी वाटणं, एकटेपणा बरा वाटणं आणि असं वाटत असताना, शेजारच्या कधीही न पाहिलेल्या आणि फक्त ‘ऐकलेल्या’ व्यक्तीबाबत केलेल्या विचारातून, त्यांना पाहायची उत्सुकता निर्माण होणं आणि त्या उत्सुकतेमधून कथानायिकेनं उचललेलं एक पाऊल हा सगळा ‘सेटअप’ एखाद्या प्रेमकथेसदृश वाटतो. परंतु हाच सगळा सेटअप वापरून, कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त वर्णन करून, कथेच्या रचनेत बदल करून, फारसं काहीही भयंकर, भेडसावणारं, विकृती दर्शवणारं लिखाण न करताही, अतिशय परिणामकारक अशी वातावरणनिर्मिती करत, भयकथेची निर्मिती करणं, हे केवळ रत्नाकर मतकरीच जाणोत. 

कथेची भाषा साधी सोपी आहे. यातली पात्रं, चाळीची एकंदर पार्श्वभूमी, त्यात घडणाऱ्या घटना, हे सगळंच आपल्या रोजच्या जगण्यातलं आहे. परिचित आहे. यात कुठलाही उसना आव आणलेला नाही. एक सर्वसाधारण वेग पकडून कथा सरकत राहते. संजीवनी तारकरांना जेव्हा पहिल्यांदाच पाहते, त्या वेळी वेग वाढतो, घटना घडते आणि वाचकाला एक जोराचा धक्का बसतो. या धक्क्यातून वाचक सावरतो न-सावरतो, तोपर्यंत या कथेचा शेवटचा भाग सुरू होतो. या शेवटच्या भागात पुन्हा त्याच ओळी वाचायला मिळतात ज्या कथेच्या सुरुवातीलाही आपण वाचतो, पण त्याच ओळींचा, त्याच शब्दांचा अर्थ आता मात्र पूर्णत: बदललेला असतो. शेवटचा भाग बुचकळ्यात टाकतो. तो वाचताना, कथेतील पात्राच्या भविष्यात पुढे काय होणार, हे आपल्याला माहीत असल्यानं किंचित हताश व्हायला होतं आणि चरकायलादेखील होतं! आपल्या आजूबाजूच्या, आपल्या रोजच्या वावरण्यात असणाऱ्या जगातल्याच वास्तू, व्यक्ती किंवा साध्याश्याच वाटणाऱ्या घटना वेचून, कमीत कमी शब्दांत गूढ आणि भयाची निर्मिती करणं, ही मतकरींची खासियत आहे. 

या कथेमध्ये एरवी गूढ अथवा भयकथेमध्ये असतात, तशा ठराविक साच्याच्या, छापाच्या घटना नाहीत. आपल्या आजूबाजूला घटना घडतात तशाच त्या घटना आहेत. कथेत असणारं गूढतत्त्व एका ठराविक गतीने आकार धारण करतं, हळूहळू गती पकडतं आणि एका परमोच्च बिंदूला पोहोचून, वाचकाला एक जबरदस्त धक्का देतं. या ठिकाणी भयाची निर्मिती होते. वाचकाला धक्का बसतो. त्यातून तो सावरतो आहे, तोवर कथेचा एपिलॉग सुरू होतो. एपिलॉग वाचताना वाचकाचं भय ओसरत नाही. कथेत त्या क्षणी असणाऱ्या पात्रांच्या भविष्याचा विचार करून तो खिन्न होतो. चरकतो. मतकरी सरांच्या अनेक गूढ अथवा भयकथांपैकी, ही कथा माझी सर्वांत आवडती आहे. 

रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या साध्याश्या घटनांचा केलेला सुयोग्य वापर, परिणामकारक वातावरणनिर्मिती, साधी सोपी पण प्रवाही भाषा, धक्कातंत्र आणि या कथेचं आपल्या जगण्याशी जवळीक साधणं, कायम स्मरणात राहणं, अशा सर्व घटकांमुळे मला ही कथा विशेष आवडते. दर वर्षीच्या पावसाळ्यात, वातावरण झाकोळलं, अंधारं झालं, की न चुकता आठवते अशी ही कथा.. 

- हर्षद सहस्रबुद्धे
ई-मेल : sahasrabudheharshad@gmail.com

(लेखक पुण्यात उत्पादन अभियांत्रिकी क्षेत्रात कार्यरत असून, गेली अनेक वर्षे वैविध्यपूर्ण विषयांवर लेखन करतात. त्यांचे ‘रसास्वाद’ हे सदर दर १५ दिवसांनी, मंगळवारी ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर प्रसिद्ध होते. या सदरातील सर्व लेख https://goo.gl/bBLgCE या लिंकवर उपलब्ध आहेत.)

(‘ऐक.. टोले पडताहेत!’ हा रत्नाकर मतकरी यांचा कथासंग्रह  ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language