Ad will apear here
Next
वैभवशाली साताऱ्याची सफर - भाग ५
श्रीराम मंदिर

‘करू या देशाटन’
सदराच्या मागील भागात आपण सातारा जिल्ह्याच्या दक्षिणेच्या कराडपर्यंतची पर्यटनस्थळे पाहिली. या भागात फलटण, खंडाळ्याचा फेरफटका. 
............
फलटण, खंडाळा, माण, खटाव या तालुक्यांचा बहुतांश भाग कायम दुष्काळी पट्ट्यात येतो; मात्र काही भागांत नीरा पाटबंधारे प्रकल्पामुळे सुबत्ता आली आहे. फलटणच्या आसपास औद्योगिक वसाहत झाली असून, साखर कारखाने, कमिन्स इंडिया लिमिटेड, गोविंद दूध यांसारखे प्रकल्पही आहेत. आळंदी ते पंढरपूर या पालखी मार्गावरील पंढरीच्या वारीचे मुक्कामाचे हे प्रमुख ठिकाण आहे. हा भाग पौराणिक काळापासून प्रसिद्ध आहे. 

श्रीराम मंदिरश्री दत्तात्रेयांची श्री रामचंद्रांशी फलटण येथे भेट झाली अशी लोकांची श्रद्धा आहे. फलटणचे निंबाळकर घराणे भारतातील प्रमुख जुन्या राजघराण्यांपैकी. हे ७५० वर्षांपूर्वीचे असून देवगिरीच्या यादव काळापासून अस्तित्वात असलेले असे हे संस्थान आहे. धारच्या परमार राजांवर दिल्लीच्या सुलतानांनी सतत हल्ले केले होते. त्या वेळी निंबराज परमार नावाचे एक राजघराण्यातील पुरुष दक्षिणेत फलटणनजीक शंभूमहादेवाच्या रानात सन १२४४च्या सुमारास येऊन राहिले. निंबराज ज्या गावी राहिले त्यास निंबळक आणि त्यावरून त्यांच्या वंशास निंबाळकर असे नाव पडले. निंबराजाच्या वंशजांनी पुढे फलटण हे गाव वसविले आणि तेथे ते वतन संपादून राहू लागले. महंमद तुघलकाच्या वेळेस त्यांना ‘नाईक’ हा किताब व फलटणची देशमुखी मिळाली. पुढे आदिलशाहीत निंबाळकरांचे महत्त्व विशेष वाढले. निंबराजापासून १४वा पुरुष वणंगपाळ ऊर्फ जगपाळराव म्हणून झाला. त्याच्या पूर्वीची माहिती उपलब्ध नाही. सर्वांत जास्त राज्यकाळ असणाऱ्या जगातील पहिल्या १० राज्यकर्त्यांत फलटण संस्थानच्या नाईक-निंबाळकर घराण्यातील श्रीमंत मुधोजीराजे नाईक-निंबाळकर (चौथे) यांचा सातवा क्रमांक येतो. देवगिरीच्या यादवांच्या पाडावानंतर महाराष्ट्रातील अनेक सरदार मुघल, बहामनी सुलतानांच्या वर्चस्वाखाली होते; मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुशल धोरणामुळे बहुतांश सरदार, राजे, जहागीरदार स्वराज्याचे आधारस्तंभ झाले. त्यापैकी फलटणचे राजे नाईक-निंबाळकर घराण्याचे नाव घ्यावे लागेल. 

फलटण ही छत्रपती शिवाजी महाराजांची सासुरवाडी, अर्थात थोरल्या महाराणीसाहेब सईबाई यांचे माहेर, छत्रपती संभाजी महाराजांचे आजोळ, बडोदा नरेश प्रतापसिंह महाराजांचे आजोळ अशा नातेसंबंधांनी हे घराणे महाराष्ट्राच्या इतिहासाचे प्रमुख अंग बनले आहे. या इतिहासाची व वैभवाची साक्ष देत फलटण शहर आजही देशाच्या राजकारणात व समाजकारणात महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. रामराजे नाईक-निंबाळकर (सभापती, विधान परिषद), संजीवराजे नाईक-निंबाळकर (सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष), रघुनाथराजे नाईक-निंबाळकर (कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती) हे तिघेही बंधू राजकारण व समाजकारणात अग्रेसर आहेत. 

मुधोजी मनमोहन राजवाडाफलटण : बाणगंगेच्या काठावर ही ऐतिहासिक नगरी वसली आहे. नदीच्या पलीकडे मलठण भाग आहे. फलटण म्हणजे फळांचे ठिकाण. तंजावर येथे सापडलेल्या कवी परमानंदकृत शिवभारत या शिवचरित्रात ‘फलस्थान’ असा या ठिकाणाचा उल्लेख आहे. येथील हवामान कोरडे असल्याने हे फळझाडांच्या लागवडीसाठी योग्य आहे. तसा हा भाग कमी पावसाचा. नीरा पाटबंधारे योजना व्हायच्या अगोदर येथे नगदी पिके घेणे शक्य नव्हते. श्रीमंत मालोजीराजे राजेसाहेब १९५२-१९५७ या कालावधीत बांधकाम खात्याचे मंत्री होते. त्या वेळी पाटबंधारे खातेही त्यांच्या अखत्यारीत होते. फलटण व आजूबाजूच्या विकासाची मुहूर्तमेढ खऱ्या अर्थाने त्यांच्या कारकिर्दीतच रोवली गेली. श्रीराम सहकारी साखर कारखाना त्यांच्या पुढाकारानेच चालू झाला. महाराजसाहेब चांगल्या कामांसाठी सढळ हाताने मदत करायचे. त्यांनी बनारस हिंदू विश्वविद्यालय, हिंगणे स्त्री शिक्षण संस्था, रयत शिक्षण संस्था यांना भरीव आर्थिक मदत दिली. 

मुधोजी मनमोहन राजवाडा - मराठा शैली

गुलाबी हॉल

मुधोजी मनमोहन राजवाडा महात्मा गांधी स्मारक निधीला त्यांनी दानपत्र करून दिला; मात्र देखभालीचा खर्च झेपत नाही या सबबीवर महात्मा गांधी स्मारक निधीने मुधोजी मनमोहन राजवाडा परत केला. हा वसा त्यांनी नंतरही सुरू ठेवला. महाराजसाहेबांनी विनोबा भावे यांच्या भूदान यज्ञास एक हजार एकर जमीन दिली होती. त्यांच्या दातृत्वाची महती सांगणारी अशी अनेक उदाहरणे आहेत. एकदा कर्मवीर भाऊराव पाटील राजेसाहेबांना म्हणाले होते, ‘मी आज एक मुलगा तुमच्या ताब्यात देत आहे.’ हा मुलगा म्हणजे आपल्या अभ्यासपूर्ण ओघवत्या वाणीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे प्राचार्य शिवाजीराव भोसले. त्यांची ही कर्मभूमी. अखेरपर्यंत ते मुधोजी महाविद्यालयात प्राचार्य होते. त्यानंतर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू झाले. रविकिरण मंडळाचे सदस्य कवी गिरीश हेही काही काळ फलटण येथे मुधोजी विद्यालयात अध्यापन करीत होते. फलटण मुक्कामात त्यांनी काही कवितांची रचना केली होती. 

मुधोजी मनमोहन राजवाडा - दिवाणखाना

मुधोजी मनमोहन राजवाडा

मुधोजी मनमोहन राजवाडा :
आज हा वाडा फलटणच्या वैभवाचा इतिहासाचा मानबिंदू ठरला आहे. सुमारे साडेतेरा एकर क्षेत्रफळाची (जवळजवळ सहा लाख स्क्वेअर फूट) ही भव्य वास्तू उत्तम स्थितीत उभी आहे. १६-१७व्या शतकातील मराठा शैलीतील जुनी व १८-१९व्या शतकातील ब्रिटिश शैलीतील नवी रचना अशी जोडवास्तू हे याचे वैशिष्ट्य आहे. जुना भाग भारतीय वास्तुकलेचा व त्यातील लाकडी कलाकुसरीचा सुंदर नमुना आहे. सुंदर कडीपाट, नक्षीदार भक्कम दरवाजे, लाकडी तुळया व आधाराचे खांब अशा पद्धतीच्या वास्तू आता यापुढे निर्माण होणार नाहीत. राजवाड्यात निवासी, कार्यालयीन अशा प्रकारची वास्तुरचना यामध्ये करण्यात आली आहे. त्यानुसार जुन्या व नवीन आकर्षक फर्निचरने सजविलेले दिवाणखाने येथे आहेत. त्यांना ‘गुलाबी हॉल’, ‘हिरवा हॉल’, ‘बदामी हॉल’, ‘दरबार हॉल’, ‘सुरुच हॉल’, ‘हमखासे हॉल’ अशी सुंदर नावेही दिली आहेत. पॅलेस बांधताना खासगी वापराच्या खोल्या, त्यामध्ये, कोठी, मुदपाकखाना (किचन), देवघर, माजघर, व २४ शयनगृहे अशी रचना असून, संस्थानाच्या कामकाजासाठी कार्यालये, दरबार इत्यादी सर्व गोष्टी विचारात घेतल्या आहेत. उजेडासाठी व वारा खेळण्यासाठी अनेक चौकांची खुबीने रचना केलेली आहे. त्यामधे ‘रामाचा चौक’, समारंभासाठी ‘दसऱ्याचा चौक’, ‘देवीचा चौक’, ‘तुळशीचा चौक’, ‘मुदपाक चौक’, ‘पागा चौक’ व ‘नजरबाग’ असे चौक आहेत. त्याच्या बाजूने ओवऱ्या आहेत. सात खणी, चार खणी, गोल खणी असे खोल्यांचे विविध आकारही आहेत. वाड्याचा दर्शनी भागही खूप आकर्षक आहे. या ठिकाणी अनेक चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे व चालूही असते; मात्र हा वाडा इतर राजवाड्यांसारखा खुलेआम बघता येत नाही. फलटणच्या राजघराण्याच्या संग्रहात अनेक दुर्मीळ व्हिंटेज कार आहेत. 

मुधोजी मनमोहन राजवाडा

श्रीराम, लक्ष्मण व सीता यांच्या मूर्ती

श्रीराम मंदिर :
फलटणमधील श्रीराम मंदिर हे शहराचे भूषण आहे. हे मंदिर २२५ वर्षांपूर्वीचे आहे. मंदिराभोवती उंच दगडी भिंत आहे. भव्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यावर डाव्या बाजूला राजवाडा, तर उजव्या बाजूला श्रीरामाचे मंदिर आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून, मंदिरासमोर तीन दीपमाळा आहेत. गाभाऱ्यात श्रीराम, लक्ष्मण व सीता यांच्या नयनमनोहर मूर्ती आहेत. हे मंदिर हेमाडपंती शैलीतील असून, याचा शिखर व कळस अत्यंत प्रेक्षणीय आहे. श्रीराम मंदिराला लागूनच राधाकृष्ण, एकमुखी दत्त व गरुड यांची मंदिरे आहेत. त्याच्या उत्तरेला श्रीमंत मुधोजीराव नाईक-निंबाळकर यांनी बांधलेले दत्तात्रयाचे मंदिर आहे. फलटणमध्ये जैनधर्मीयांची वस्ती मोठी आहे. व्यापार-उदिमासोबत त्यांचा स्थानिक सामाजिक कार्यातही मोठा सहभाग असतो. त्यांची अनेक मंदिरे या गावाची शोभा वाढवीत आहेत. 

जबरेश्वर मंदिर

जबरेश्वर मंदिर :
श्रीराम मंदिराजवळ काही अंतरावर रस्त्याच्या मधोमध जबरेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. हे हेमांडपंती शैलीतील मंदिर असून, त्यावरील शिल्पाकृती व दगडावरील बारीक कलाकुसर आकर्षक आहे. हे मंदिर एकाच प्रचंड आकाराच्या शिळेमधून कोरून काढल्यासारखे वाटते. गाभाऱ्यातील पिंडी चौकोनी आकाराची असून, तिचे तोंड पूर्वेकडे आहे. चौथे मुधोजीराव निंबाळकर (१८५३ - १९१६) यांनी जबरेश्वर मंदिरात महादेवाच्या पिंडीची स्थापना केली. गर्भागृहात छताखाली २४ तीर्थंकरांच्या मूर्ती दिसून येतात. पिंडीवर दोन शाळुंका असून, त्यांचा आकारही वेगळा आहे. अशा प्रकारची पिंडी सहसा कोठे आढळत नाही. गर्भागृहाचे द्वार अनेक शिल्पांनी मढविलेले असून, मंदिरातील मूर्तीमध्ये अष्टदिक्पाल व सुरसुंदरी यांच्या मूर्ती आहेत. गाभाऱ्याच्या प्रवेशद्वाराशेजारी पाच फण्यांची नागीण व तिची दोन पिल्ले यांची मूर्ती आहे. उजव्या बाजूला कोनाड्यात विठ्ठल-रुक्मिणी, नंदी, कासव, गणपती अशा मूर्ती आहेत. येथील गोलाकार आकारातील सभागृह बंदिस्त आहे. 

श्री हरिबुवा समाधीश्री हरिबुवा समाधी देवस्थान : सद्गुरू हरिबुवा शके १७९७मध्ये अश्विन शुद्ध द्वादशीला फलटण येथे प्रकट झाले. आसपासच्या भागांत त्यांचे अनुयायी होते. ते अगदी पणदारे येथेही जाऊन राहिले होते. तेथे त्यांचे मंदिर उभारण्यात आले आहे. आपले अवतारकार्य पूर्ण झाल्यावर, श्री सद्गुरू हरिबुवा महाराज माघ शुद्ध एकादशी शके १८२० (सन १८९८) रोजी सायंकाळी साडेचार वाजता फलटण येथे समाधिस्त झाले. फलटणमध्ये महानपुरा पेठ भागात त्यांची समाधी आहे. 

महानुभाव मठ : फलटण ही महानुभाव पंथीयांची काशी समजली जाते. महानुभाव पंथातील पंचकृष्णांपैकी तिसरा अवतार ‘चांगदेव राऊळ’ अथवा ‘चक्रपाणी’ यांचा जन्म फलटण येथे झाला व त्यांनी योगसामर्थ्याने देहत्याग करून भडोच येथील हरपाळदेवाच्या मृतदेहात प्रवेश करून नवीन अवतार धारण केला, अशी अनुयायांची श्रद्धा आहे. उत्तर भारतातून अनेक अनुयायी या ठिकाणाला भेट देण्यासाठी येत असतात. 

धुमाळवाडी धबधबाधुमाळवाडी : हा निसर्गरम्य प्रदेश आहे. खासकरून पावसाळ्यात येथील सौंदर्य खूप छान असते. येथे एक सुरेख, छोटा धबधबा असून, एक गुंफाही आहे. 

सीतामाईचा डोंगर : फलटणच्या दक्षिणेस सह्याद्री पर्वताची रायरेश्वरापासून शिंगणापूरपर्यंत एक शाखा असून, त्याला महादेवाचा डोंगर म्हणून ओळखतात. यातच सीतामाईचा डोंगर येतो. उत्तर रामायण घडलेले हेच ठिकाण आहे, अशी या भागातील स्त्रियांची श्रद्धा आहे. सीतामाई, लव-कुश व वाल्मिकी ऋषींच्या वास्तव्याच्या पाऊलखुणा येथे आढळतात. भारतात सीतेचे मंदिर केवळ येथेच पाहावयास मिळते, असे म्हणतात. माणगंगा व बाणगंगा नद्या येथून उगम पावतात. स्थानिक कथेनुसार त्रेतायुगात प्रभू रामचंद्र दंडकारण्यात वनवासात असताना भगवान दत्तात्रेयांची भेट याच नगरीत झाली, असे म्हणतात. त्राटिकावधाच्या (स्त्रीहत्या) पातकातून मुक्त होण्यासाठी श्रीरामांनी याच स्थानी अर्धचंद्राकृती बाणाने पाताळातील जल जमिनीवर आणून भगवान दत्तात्रेयांच्या चरणावर घातले व स्त्रीहत्येच्या पातकातून श्रीराम मुक्त झाले. ज्या ठिकाणी बाण मारले, तिथे पवित्र अशी नदी निर्माण झाली, तीच ही बाणगंगा. राम-रावणाच्या युद्धानंतर जेव्हा प्रभू श्रीराम अयोध्येला परत आले, तेव्हा लोकांनी सीतेबद्दल शंका घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे नाइलाजाने श्रीरामांना सीतेचा त्याग करावा लागला. त्यांनी लक्ष्मणाला आज्ञा केली, की सीतेला दूर कुठे तरी नेऊन सोड. लक्ष्मण सीतेला घेऊन अयोध्येपासून खूप दूर आला. त्याने सीतेला एका ठिकाणी सोडले आणि तो अयोध्येला निघून गेला. लक्ष्मणाने सीतेला ज्या ठिकाणी सोडले होते, ते ठिकाण फलटणच्या शेजारी असल्याचे सांगतात. त्या जागेला आजही ‘सीतामाईचा डोंगर’ या नावाने ओळखले जाते.

सौजन्य : Fort Trekkersग्रुपचे अभिजित जाधव व संदेश जोशी

संतोषगड :
या गडालाच किल्ले ताथवडा असे म्हणतात. विजापूरहून होणाऱ्या स्वाऱ्यांना पायबंद बसवण्यासाठी या परिसरात शिवछत्रपतींनी संतोषगड आणि वारूगड हे शिलेदार उभे केले. संतोषगड हा फलटणपासून २० किलोमीटर अंतरावर आहे. हा किल्ला मध्यम आकाराचा असला, तरी भक्कम आहे. त्याची बांधणी खुद्द छत्रपती शिवरायांनी केली आहे. संतोषगड आपल्याला तीन टप्प्यांत चढावा लागतो. पहिला टप्पा चढल्यावर आपण एका मठात पोहोचतो. या मठाजवळ तीन गुहा असून, त्यात एक तळे आणि एक मूर्ती दिसते. या गुहेत थंड पाण्याचा साठा आहे. वाल्मिकी ऋषींची एक मूर्ती आहे. चढणीचा डोंगर चढून दुसऱ्या टप्प्यावर आल्यावर दोन प्रवेशद्वारांतून जाताना मारुतीचे मंदिर दिसते. मुख्य दरवाज्याचे बांधकाम पूर्णपणे कोसळलेले असून, त्याला लागून असलेली चौकीदाराची खोली मात्र शाबूत आहे. किल्ल्यावर एक मोठा खड्डा आहे आणि त्यातही एक मोठे झाड वाढले आहे. त्यामध्ये एक गुहा दिसते. गडाच्या तिसऱ्या टप्प्यावर बालेकिल्ला आहे. तेथे तातोबा महादेवाचे मंदिर पाहण्यासारखे आहे. गडावर अनेक भुयारे व गुहा आहेत. या भुयारांच्या मार्गात पाण्याचा भरपूर साठा आहे. 

सौजन्य : Fort Trekkersग्रुपचे अभिजित जाधव व संदेश जोशी

सौजन्य : Fort Trekkersग्रुपचे अभिजित जाधव व संदेश जोशीफलटणला लागूनच पश्चिमेला खंडाळा तालुका आहे. या तालुक्यात प्रामुख्याने कांदा पीक घेतले जाते. लोणंद येथे कांद्याची मोठी व्यापारी उलाढाल होत असते. जवळील पाडेगाव येथे ऊस संशोधन केंद्र आहे. वीर येथे नीरा नदीवर धरण असून, यामुळे बारामती, इंदापूर, फलटण, माळशिरस व सांगोला भागाला शेतीसाठी पाणीपुरवठा होतो. शिरवळ येथे आता पुण्यानंतर अनेक मोठे औद्योगिक प्रकल्प साकारत आहेत. शिरवळजवळील शिंदेवाडीमध्ये बौद्धकालीन गुंफा सापडल्या आहेत. शिरवळ येथे पूर्वी किल्ला होता. 

फलटण येथे रेल्वे प्रकल्पाचे काम चालू आहे. भू-संपादन अडचणीमुळे हे काम रखडले आहे. हे काम पूर्ण झाल्यावर दक्षिणेकडून दिल्लीला जाणाऱ्या गाड्यांचे अंतर १०० किलोमीटरने कमी होणार आहे. 

फलटण येथे जाण्यासाठी जवळचा विमानतळ पुणे (६० किलोमीटर), जवळचे सध्याचे रेल्वे स्टेशन लोणंद (२९ किलोमीटर) आहे. फलटण येथे राहण्याची, भोजनाची चांगली सोय उपलब्ध आहे. 

(या लेखासाठी शार्दूलसिंहराजे नाईक-निंबाळकर, सरलष्कर, वैराग, छायाचित्रकार नरेंद्र जाधव यांचे सहकार्य मिळाले.)

- माधव विद्वांस
ई-मेल : vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी आणि शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language