Ad will apear here
Next
मोदींच्या शपथविधीसाठी मराठमोळ्या शेफची ‘रेसिपी’

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी सलग दुसऱ्यांदा शपथ घेणार असून, आज (३० मे २०१९) होणाऱ्या या शपथविधी सोहळ्याला जगभरातील अनेक देशांच्या राष्ट्रप्रमुखांसह देशभरातील मान्यवर नेते आणि विविध क्षेत्रांतील नामवंत व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. या महत्त्वाच्या सोहळ्याकडे जगाचे लक्ष लागून राहिले आहे. या वेळी उपस्थित राहणाऱ्या सुमारे सहा हजार पाहुण्यांना दिल्या जाणाऱ्या मेजवीनामध्ये दाल रायसीना या विशेष पदार्थाचा समावेश आहे. राष्ट्रपतिभवनाचे पहिले शेफ मच्छिंद्र कस्तुरे यांची ही खास ‘रेसिपी’ आहे. हा पदार्थ २०१०मध्ये त्यांनी पहिल्यांदा तयार केला होता.

नरेंद्र मोदी यांच्यासह त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांना आज सायंकाळी राष्ट्रपती पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. राष्ट्रपतिभवनाकडून या सोहळ्याचे आयोजन केले जात असल्याने पाहुणचाराची जबाबदारीही राष्ट्रपतिभवनाकडेच असते. या सोहळ्यासाठी विशेष आमंत्रित करण्यात आलेल्या पाहुण्यांना दिल्या जाणाऱ्या मेजवानीमध्ये अनेक शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांचा समावेश आहे. त्यामध्ये सामोश्यापासून राजभोगपर्यंतचे कित्येक चविष्ट पदार्थ समाविष्ट असतील. दाल रायसीना या वैशिष्ट्यपूर्ण पदार्थाची लज्जतही सर्व पाहुण्यांना चाखता येणार आहे.

प्रतिभा पाटील राष्ट्रपती असताना मराठमोळ्या मच्छिंद्र कस्तुरे यांची राष्ट्रपतिभवनाचे पहिले एक्झिक्युटिव्ह शेफ म्हणून निवड झाली. २००७ ते २०१५ अशी आठ वर्षे ते त्या पदावर कार्यरत होते. (त्याआधी राष्ट्रपतिभवनात असे पद नव्हते. प्रत्येक नवा राष्ट्रपती आपापला शेफ आपल्यासोबत घेऊन येई.) कस्तुरे यांच्यानंतर माँटी सैनी हे सध्या राष्ट्रपतिभवनाचे एक्झिक्युटिव्ह शेफ आहेत. त्याव्यतिरिक्त २८ शेफ राष्ट्रपतिभवनात कार्यरत आहेत. कस्तुरे सध्या नवी दिल्लीतील ‘हॉटेल अशोका’चे एक्झिक्युटिव्ह शेफ आहेत. त्यांनी २०१०मध्ये दाल रायसीना हा पदार्थ पहिल्यांदा तयार केला होता. राष्ट्रपतिभवन ‘रायसीना हिल’वर असल्याने या विशेष पदार्थाच्या नावात रायसीना हा शब्द घेण्यात आला आहे.

‘अख्खे उडीद आणि टोमॅटो प्युरी यांपासून बनविलेल्या ‘दाल रायसीना’मध्ये केशरही घातले जाते. उडीद आणि राजमा रात्रभर पाण्यात भिजवून ठेवले जातात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी चार ते पाच वेळा धुवून घेतले जातात. बटर, क्रीम, टोमॅटो प्युरी, गरम मसाला आणि कसुरी मेथी या घटकांसह हा पदार्थ तयार केला जातो. सहा ते आठ तासांपर्यंत तो शिजवावा लागतो. कसुरी मेथीची थोडीशी कडवट पाने आणि गरम मसाल्याचा तडका यांमुळे या पदार्थाची चव खुलते,’ अशी माहिती शेफ कस्तुरे यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिली. सध्याचे शेफ सैनी यांच्या मतानुसार मात्र हा पदार्थ करायला कमीत कमी ४८ तास लागतात. त्यामुळे मंगळवारी रात्रीपासूनच हा पदार्थ तयार करण्याची तयारी सुरू झाली आहे. हा पदार्थ पचायला जड असून, भातासोबत ‘सर्व्ह’ केला जातो.


शेफ मच्छिंद्र कस्तुरे‘आपण तयार केलेली एखादी ‘रेसिपी’ आपल्या कार्यकाळानंतरही जगभरातील नेत्यांना खाऊ घातली जाणे हा माझा मोठा सन्मान आहे. राष्ट्रपतिभवनात सातत्याने प्रयोग केले जात असतात आणि नवनवे पदार्थ तयार केले जातात. दाल रायसीना हा पदार्थही असाच एका कार्यक्रमावेळी प्रथम तयार करण्यात आला होता,’ असे कस्तुरे यांनी सांगितले.

कस्तुरे यांनी आपल्या आठ वर्षांच्या काळात प्रतिभा पाटील, प्रणव मुखर्जी यांना वेगवेगळे पदार्थ करून खाऊ घातले आहेत. तसेच अंजीर कोफ्ते, सीताफळ हलवा असे काही वैशिष्ट्यपूर्ण पदार्थही त्यांनी तयार केले.

मच्छिंद्र कस्तुरे यांचा जन्म पुण्याचा. पुणे विद्यापीठातून बीए झाल्यानंतर त्यांनी १९८३मध्ये मुंबईतील 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी'मधून हॉटेल मॅनेजमेंटचा डिप्लोमा केला होता. देशभरातील अनेक महत्त्वाच्या हॉटेल्समध्ये त्यांनी काम केले आहे. या क्षेत्रात येण्याची प्रेरणा त्यांना आईकडून मिळाली. २०१६मध्ये त्यांना बेस्ट शेफ ऑफ इंडिया हा पुरस्कारही मिळाला आहे. त्यांच्या पत्नी हेमलता कस्तुरे आकाशवाणीत मराठी वृत्तनिवेदक आहेत.

 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi
Select Language