Ad will apear here
Next
...तर प्रभाग रचनेविरोधात न्यायालयात, शिवसेनेसह विरोधी पक्षांचा इशारा


सरकारचा हस्तक्षेप होण्याची भीती व्यक्त

पुणे - महापालिकेच्या निवडणुकीची नवी प्रभागरचना करण्याचा कार्यक्रम घोषित झाला असून याचे सर्व पक्षियांनी स्वागत केले आहे. मात्र, एखाद्या विशिष्ट पक्षाला डोळ्यासमोर ठेवून प्रभाग रचना झाल्यास या विरोधात न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

 
मुंबई महानगरपालिका वगळता राज्यातील महापालिकांमध्ये चार प्रभागाचा मतदारसंघ पद्धती राबविण्यात येणार आहे. याला भाजप सोडून सर्व पक्षांनी सुरवातीला विरोध केला होता. निवडणूक आयोगाने प्रभाग रचना करण्याचा कार्यक्रम जाहीर केला असून यामध्ये राज्यातील सत्ताधारी पक्षाकडून हस्तक्षेप होण्याची शक्‍यता सर्वच विरोधी पक्षांनी वर्तविली आहे. प्रभाग रचना करताना विरोधी पक्षांचे उमेदवार प्रबळ असणाऱ्या भागाला दुसऱ्या प्रभागात टाकण्यासारखे प्रकार घडण्याची भीती राष्ट्रवादी, कॉंग्रेससह राज्यातील सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेलाही आहे. यामुळे त्यांच्याकडून निर्णयाचे सावधपणे स्वागत आणि न्यायालयीन लढाईचा इशारा देण्यात आला आहे.

 
अंकुश काकडे (प्रदेश प्रवक्ते, राष्ट्रवादी कॉंग्रेस) - आयोगाचा हा निर्णय निश्‍चितपणे स्वागतार्हच आहे. मात्र, प्रभागांची रचना तयार करताना आयोगाने मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्याची आवश्‍यकता आहे. त्यातूनच सर्व पक्षांना न्याय मिळणार आहे, असे असले तरी सध्याच्या सरकारचे काम संशयास्पद असून या रचनेत सरकार ढवळाढवळ करत असल्याची माहिती आम्हाला मिळत आहे. ही बाब निश्‍चितपणे चुकीचीच आहे. चारचा प्रभाग झाला असला तरी त्याला आमच्या राष्ट्रवादी पक्षाची कोणतीही हरकत नाही. पक्षाने गेल्या पंधरा वर्षांच्या कालावधीत शहरात प्रभावी कामे केली आहेत. त्याच बळावर आम्ही पूर्ण ताकदीनीशी निवडणुकांना सामोरे जाणार असून पूर्ण ताकदीनीशी सत्ता मिळविणारच यामध्ये कोणतीही शंका नाही. मात्र, चुकीच्या पध्दतीने रचना झाल्यास या निर्णयाच्या विरोधात पक्षाच्या वतीने दाद मागण्यात येणार आहे.

 
संजय बालगुडे (प्रवक्ते, शहर कॉंग्रेस) - प्रभागांची रचना करताना आयोगाने निपक्षपातीपणाने ही रचना करावी, अशी कॉंग्रेसची पहिल्यापासूनच भूमिका असून याबाबत पक्षाच्या वतीने त्याबाबत वारंवार मत प्रदर्शनही करण्यात आले आहे. मात्र, प्रभाग रचनेचे काम करणाऱ्यांचीच भूमिका संशयास्पद आहे. याबाबत पक्षाचे सर्व आमदार निवडणूक आयोगाची भेट घेणार आहेत, या भेटीत पक्षाची भूमिका आयोगाला सांगण्यात येणार आहे.

 

हेमंत संभूस (शहराध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना) - चारचा प्रभाग झाला तरी त्याला मनसेची कोणतीही हरकत नाही. याउलट निवडणुकांना संपूर्ण ताकदीनीशी सामोरे जाण्याची पक्षाची तयारी असून सत्ता आम्हीच मिळविणार यामध्ये कोणतीही शंका नाही. मात्र, प्रभागांची रचना तयार करताना आयोगाने त्यामध्ये पारदर्शकता ठेवण्याची आवश्‍यकता आहे. अन्यथा या त्रुटीच्या विरोधात पक्षाच्या वतीने हरकती आणि सूचना नोंदविण्यात येणार आहेत, तरीही आमची मागणी पूर्ण न झाल्यास त्या निर्णयाच्या विरोधात न्यायालयात जाण्याची तयारी पक्षाने ठेवली आहे.

 
गणेश बीडकर (गटनेते, भारतीय जनता पक्ष) - चारचा प्रभाग होणार असल्याने निवडणुकीमध्ये अपप्रवृत्तीला आळा बसणार आहे. त्याशिवाय महापालिकेत स्वच्छ चारित्र्याचेच उमेदवार निवडून येणार आहेत. त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य शासनाने हा अतिशय चांगला निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाने प्रभाग रचना तयार करण्याचा जो निर्णय घेतला आहे, तो निश्‍चितपणे स्वागतार्हच आहे. त्याशिवाय प्रभाग रचना तयार करताना निवडणूक आयोग निश्‍चितपणे पारदर्शक काम करेल, यात शंका नाही.

 
अशोक हरणावळ (गटनेते, शिवसेना) - आयोगाचा हा निर्णय चांगलाच आहे. मात्र, प्रभागांचे रचना तयार करतान कोणत्याही एका पक्षाला डोळ्यासमोर न ठेवता पारदर्शकपणे ही रचना करण्याची आवश्‍यकता आहे. त्यातूनच सर्व पक्षांना आणि उमेदवारांना न्याय मिळणार आहे, ही बाब लक्षात घेऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी होण्याची आवश्‍यकता आहे. ही कार्यवाही प्रभावीपणे आणि पारदर्शक न झाल्यास त्या विरोधात काय भूमिका घ्यायची याचा निर्णय पक्षश्रेष्ठींशी चर्चा केल्यानंतर घेण्यात येणार आहे.

 
डॉ. सिध्दार्थ धेंडे (गटनेते, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया) - निवडणूक आयोगाने घेतलेला हा निर्णय निश्‍चितपणे स्वागतार्हच आहे. मात्र, आयोगाच्या या निर्णयाचे राज्य शासनाने पालन करावे. या निर्णयामुळे प्रभागांची रचना लवकर समजण्यास मदतच होणार आहे. त्याशिवाय प्रत्येक उमेदवारांना त्यांची कामे मतदारांपर्यंत पोचविता येणार आहेत. या निवडणुकीला पक्ष संपूर्ण ताकदीनीशी सामोरे जाणार असून पक्षाने त्याबाबत तयारीही सुरू केली आहे. त्यातूनच अधिकाअधिक उमेदवार निवडून आणण्यावर पक्षाचा भर राहणार आहे.
महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. आयोगाच्या या निर्णयाचे विविध पक्षाच्या गटनेत्यांनी आणि शहराध्यक्षांनी स्वागत केले आहे. मात्र, प्रभागांची रचना करताना आयोगाने एखाद्या विशिष्ट पक्षाला डोळ्यासमोर न ठेवता ही रचना तयार करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. त्याची प्रभावी अंमलबजावणी न झाल्यास न्यायालयात दाद मागण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language