Ad will apear here
Next
कलाकारांच्या मदतीसाठी कलाकारांचा हात
पुण्यात ‘सूरस्पर्श’ उपक्रम
कलाकारांना मदत सुपुर्द करताना पं. सुरेश तळवलकर, उस्ताद तौफिक कुरेशी, पं. मिलिंद तुळाणकर, पं. रामदास पळसुले, कथक गुरु शमा भाटे, हेरिटेजचे संतोष पोतदार आदी

पुणे : कलाकाराचे दु:ख ओळखण्यासाठी शेवटी कलाकाराचेच मन लागते, असे म्हणतात. याचीच अनुभूती रविवारी पुण्यात झालेल्या ‘सूरस्पर्श’ या कार्यक्रमात आली. पूरस्थितीमुळे सांगली, कोल्हापूर भागातील ज्या कलाकारांच्या वाद्यांचे नुकसान झाले आहे, त्यांना गरजेप्रमाणे दुरुस्ती करून अथवा नवी वाद्ये देऊन आवर्तन गुरुकुल, पारिजात अॅकॅडमी व हेरिटेज इव्हेंट्स यांच्या वतीने मदतीचा हात देण्यात आला.

एरंडवणे येथील शकुंतला शेट्टी सभागृहात तालयोगी पं. सुरेश तळवलकर, उस्ताद तौफिक कुरेशी, पं. मिलिंद तुळाणकर, पं. रामदास पळसुले, कथक गुरू शमा भाटे, हेरिटेजचे संतोष पोतदार, पारिजात अॅकॅडमीचे भुवनेश व विजय कुलकर्णी, संस्कार भारतीचे प्रांताध्यक्ष सतीश कुलकर्णी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. 

या वेळी प्रसाद कुलकर्णी, केतन आठवले, रवींद्र नाशिककर, चैतन्य कुलकर्णी आणि अंजनी खाडीलकर यांना प्रातिनिधिक स्वरूपात वाद्ये सुपुर्द करण्यात आली.  

यानंतर उस्ताद तौफिक कुरेशी (जेंबे), पं. रामदास पळसुले (तबला), व पं. मिलिंद तुळाणकर (जलतरंग) यांची जुगलबंदी, ज्येष्ठ कथक नृत्यांगना गुरु शमा भाटे यांच्या शिष्यांचे कथक नृत्य यांमुळे पुणेकरांची सायंकाळदेखील सुरेल झाली.


नादरूपाच्या नृत्यांगना अमीरा पाटणकर, अवनी गद्रे, शिवानी करमरकर, निकिता कारळे आणि भार्गवी सरदेसाई यांनी रामवंदनेने कार्यक्रमाला सुरुवात केली. त्यानंतर दलित संत नंदनार या शिवभक्ताची कथा, ‘नायिका हिडिंबा’ आणि अन्य रचना त्यांनी सादर केल्या. चतुरंगने त्यांनी आपल्या सादरीकरणाचा समारोप केला.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पं. मिलिंद तुळाणकर यांनी चीनी मातीची भांडी आणि नायलॉनच्या स्टीक्सच्या मदतीने जलतरंग वादनातून सुरेल वातावरणाची निर्मिती केली. या वेळी त्यांनी सादर केलेल्या नऊ मात्रा तीन तालातील राग अभोगीने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर तौफिक़ कुरेशी (जेंबे), पं. रामदास पळसुले (तबला) व पं. मिलिंद तुळाणकर (जलतरंग) यांच्यामध्ये झालेल्या जुगलबंदीने कार्यक्रमाला कळस चढविला. 


या वेळी बोलताना तालयोगी पं. सुरेश तळवलकर म्हणाले, ‘समाजाची चित्तशुद्धी करण्यात कला आणि कलाकाराचे योगदान महत्त्वाचे असते. त्यामुळे कलाकार अडचणीत असताना त्याला मदत करण्यासाठी पुढे येणे हे समाजाचेही कर्तव्य आहे. सूरस्पर्श या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते होत असल्याचा आनंद आहे. आज सांगली, कोल्हापूर भागात आलेल्या पूर परिस्थितीत कलाकारांचे दु:ख आपण समजून घेतले हे कला मनाचे द्योतक आहे.’            

या कार्यक्रमातील सर्व कलाकारांनी कोणतेही मानधन न घेता हा कार्यक्रम केला. देणगी प्रवेशिकांच्या माध्यमातून जमा झालेली रक्कमदेखील पूरग्रस्त भागातील शास्त्रीय संगीताशी संबंधीत कलाकारांची वाद्य दुरुस्ती किंवा आवश्यकता असल्यास नवीन घेऊन देण्यासाठी वापरण्यात येणार आहे.

 नीरजा आपटे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi