Ad will apear here
Next
कावेरीच्या खोऱ्यातील रम्य प्रदेश
श्री रंगनाथस्वामी मंदिर

‘करू या देशाटन’
या सदरात आपण सध्या कर्नाटक राज्याची सैर करत आहोत. बेंगळुरूहुन म्हैसूरला जाताना मंड्या जिल्हा पार करून जावे लागते. कावेरीच्या खोऱ्यातील हा प्रदेश ऐतिहासिक आणि नैसर्गिक ठेवा असलेल्या पर्यटनस्थळांसाठी प्रसिद्ध आहे. आज या जिल्ह्यात फेरफटका मारू या.
...........
श्री गंगादेश्वर मंदिर

सुरुवात करू या श्रीरंगपट्टणपासून. साधारण इ. स. ८९८च्या सुमारास येथे गंगा राजवट होती. त्यानंतर हे गाव इ. स. १२००मध्ये होयसळ, १३व्या शतकात विजयनगर, तर १६व्या शतकात म्हैसूरचे वाडियार राजे यांच्याकडे आले. श्रीरंगपट्टणचे नाव पूर्वी श्रीरंगपुरी असे होते. हे शहर म्हणजे कावेरी नदीमध्ये बनलेले एक बेट आहे. या शहरात प्रसिद्ध श्रीरंगनाथ मंदिर आहे. श्रीलक्ष्मीनरसिंह, श्री गंगादेश्वर, श्री ज्योतिरामेश्वर आणि इतर लहान मंदिरेही येथे आहेत. 

टिपू सुलतानाचे रॉकेट

टिपू सुलतानजगातील पहिले रॉकेट युद्ध श्रीरंगपट्टणला ब्रिटिश व टिपू सुलतान यांच्यात झाले. यामुळे श्रीरंगपट्टणचे नाव जागतिक स्तरावर ऐतिहासिक महत्त्वाचे ठिकाण म्हणून नोंदले गेले. टिपू सुलतानला रॉकेटचा जनक म्हटले जाते. अर्थात, यावर संशोधकांमध्ये मतभेद आहेत. रॉकेटचा शोध चीनमध्ये ११व्या शतकात लागला असावा; पण त्याचा वापर मुघलांनी केला असे उल्लेख सापडतात; पण ती रॉकेट्स खूपच प्राथमिक अवस्थेत होती आणि फारशी प्रभावी नव्हती; पण प्रथमच लोखंडी नळीचा वापर करून टिपूने तीन हजार फूट पल्ल्याचे रॉकेट वापरून ब्रिटिश सेनेला चकित केले. फ्रान्सच्या साह्याने त्याने हे रॉकेट तयार केले. ते म्हैसूर रॉकेट नावाने प्रसिद्ध झाले. श्रीरंगपट्टणच्या लढाईनंतर ब्रिटिशांना ६०० रॉकेट लाँचर व एक हजार रॉकेट्स सापडली. यानंतर ब्रिटिशांनी टिपूच्या रॉकेटवर आधारित संशोधनाला १८०१मध्ये सुरुवात केली. 

रंगनाथस्वामी मंदिर

श्रीरंगपट्टण प्रसिद्ध झाले ते रंगनाथस्वामी मंदिर आणि टिपू सुलतान यांमुळे. टिपू व त्याचे वडील हैदरअली हे अंगच्या गुणामुळे लष्करात वरच्या पदावर पोहोचले व त्यांनी म्हैसूरच्या वाडियार राजांचा विश्वास संपादन करून हळूहळू ते सर्वसत्ताधीश झाले. दोघेही प्रशासक म्हणून प्रभावी होते व लष्कर ताब्यात असल्याने वाडियार नामधारी झाले व हैदरने प्रशासकीय सत्ताकेंद्र म्हणून श्रीरंगपट्टणची निवड केली. टिपूवर धर्मांध असल्याचा आरोप केला जातो; पण म्हैसूर व आसपासच्या धार्मिक ठिकाणांना त्याने मदत केल्याचे सांगितले जाते. शृंगेरीच्या शंकराचार्यांनाही टिपूने मदत केल्याचे सांगितले जाते. म्हैसूरच्या आसपास होयसळ, चोळ राजवटीत बांधलेली हिंदूंची देवळे शाबूत आहेत. मोगलाईत जशी तोडफोड झाली, तशी येथे झालेली दिसत नाही. 

श्री रंगनाथस्वामी मंदिर

श्री रंगनाथ मंदिर :
इ. स. ८१४मध्ये हंबी नावाच्या नर्तिकेने येथील मूळ मंदिर बांधले. गंगा घराण्यातील राजवटीत तिरुमलरा नावाच्या व्यक्तीने नवरांग मंडप बांधला. सन १११७मध्ये जेव्हा श्रीरामानुजस्वामी चोळ राज्यातून येथे आले, तेव्हा होयसळ राजा बित्तदेव हा शासक होता. रामानुजस्वामींनी त्याला वैष्णव बनवून त्याला विष्णुवर्धन असे नाव दिले. श्रीरामानुजस्वामींना त्याने आठ गावे इनाम दिली. त्या ठिकाणी त्यांनी अधिकारी नेमले व देवस्थानाला ऊर्जितावस्था आणली. या मंदिराला गंगा राजे, होयसळ, विजयनगर, वाडियार या राजवटींनी विस्तारासाठी हातभार लावला. मंदिराच्या प्रवेशद्वारावर श्री विष्णूचे २४ अवतार दाखविले आहेत. श्रीरंगाची मुख्य, भव्य मूर्ती १५ फूट लांबीची असून, ती शेषशायी आहे. मंदिराला एखाद्या किल्ल्यासारखी तटबंदी आहे. या मंदिराच्या वास्तुशैलीवर होयसळ आणि विजयनगर शैलींचा प्रभाव पडला आहे. म्हैसूर साम्राज्यातील वाडियार राजांनीदेखील मंदिर दुरुस्ती व सुशोभीकरणास हातभार लावला, असे इतिहासकार जॉर्ज मिशेल यांनी नमूद केले आहे. टिपू सुलतान व हैदर यांनीही या देवळाला मदत केल्याचे सांगितले जाते. 

श्री रंगनाथ

दक्षिणेत श्रीरंगाची तीन प्रमुख क्षेत्रे आहेत. आदि रंगा : श्रीरंगपट्टण रंगनाथस्वामी मंदिर, मध्य रंगा: शिवानासमुद्र येथील रंगनाथस्वामी मंदिर, ३) अंत्य रंग : श्रीरंगमचे (तमिळनाडू) रंगनाथस्वामी मंदिर. 

दर्या दौलत बाग

दर्या दौलत बाग :
हे टिपूचे ग्रीष्मकालीन निवासस्थान होते. इ. स. १७८४मध्ये टिपूने याची निर्मिती केली. हा बहुतांश सागवानी लाकूड वापरून केलेला महाल आहे. हे बांधकाम इंडो-मुस्लिम शैलीचे असून, थोडा पाश्चात्य प्रभावही जाणवतो. यात चित्रकलेचा आविष्कार पाहायला मिळतो. हे चित्रकलेचे एक संग्रहालयच आहे. इ. स. १८००मध्ये ब्रिटिश चित्रकार सर रॉबर्ट केर पोर्टर यांनी काढलेले ‘श्रीरंगपट्टणचे वादळ’ हे प्रसिद्ध तैलचित्र येथे पाहायला मिळते. येथील बगीचाही खूपच सुंदर आहे. येथील खांब, छत व भिंतीवर सुंदर नक्षीकाम आहे आणि ऐतिहासिक प्रसंगांच्या देखाव्यांची, तसेच काही व्यक्तिचित्रेही आहेत. 

कर्नल बेली अंधारकोठडी

कर्नल बेली अंधारकोठडी :
रंगनाथस्वामी मंदिराच्या उत्तरेस ही कोठडी आहे. येथे टिपूच्या कैद्यांना ठेवले जात असे. ब्रिटिश कर्नल बेली याला येथे कैदी म्हणून ठेवले होते आणि इथेच तो १७८०मध्ये मरण पावला. त्याचे नाव या कोठडीला देण्यात आले आहे. येथे कॅप्टन बेअर्ड, कर्नल ब्रिथ्वाइट, कॅप्टन रुले, फ्रॅझर, सॅमसन आणि लिंडसे यांना टिपू सुलतानाने बंदिवान करून ठेवले होते. श्रीरंगपट्टणच्या घेराबंदीदरम्यान ७५० किलो वजनाची एक तोफ मागे घसरली व तुरुंगाचे छप्पर तोडून खाली पडली, ती आजही तशीच आहे.

तुरुंगात पडलेली तोफ

जामा मशीद : बेंगळुरू गेटजवळ ही मशीद आहे. म्हैसूरच्या सत्तेचे अधिग्रहण केल्यावर १७८७मध्ये टिपूने ही मशीद बांधली. ही मशीद एका उंचवट्यावर असून,  २०० पायऱ्या आहेत. येथून आजूबाजूचा प्रदेश दिसतो. येथे फारसी भाषेत अल्लाहची ९० नावे कोरलेली आहेत. 

हैदर व टिपू यांची कबर

हैदर व टिपू यांची कबर :
टिपू सुलतानाने त्याचे वडील हैदरअली यांची कबर बांधली. मध्यभागी हैदरची, दक्षिण बाजूला सुलतान बेगम, टिपूची बहीण फातिमा बेगम, टिपूची मुलगी शाजदी बेगम, टिपूचा जावई सय्यद शाहबाज यांच्या कबरी आहेत. इमारतीच्या दरवाजावर हस्तिदंती कारागिरी दिसून येते. घुमटाकार डोम असलेली इमारत अतिशय देखणी आहे. 

मेलुकोटे

श्रीरंगपट्टणच्या आसपासची मंड्या जिल्ह्यातील अन्य ठिकाणे :
मेलुकोटे नरसिंह स्वामी मंदिर : मेलुकोटे येथे संस्कृत विद्यापीठ आहे. मेलुकोटेजवळील यादवगिरी अथवा यदुगिरी पर्वतावर हे पवित्र ठिकाण असून, १४ वर्षे रामानुजस्वामी येथे राहिले होते. लोकांची अशी समजूत आहे, की श्रीराम, श्रीकृष्ण, बलराम, येथे येऊन गेले आहेत. नरसिंह मूर्तीची स्थापना प्रल्हादाने केली, असेही समजले जाते. म्हैसूरचे राजे वाडियार यांचे आद्य राजे यदुराय त्यांच्या भावासह मेलुकोटे येथे देवदर्शनासाठी आले होते. तेथून ते म्हैसूर येथे आले व तेथे त्यांची म्हैसूरचे तत्कालीन राजे चामराज यांची विधवा राणी व राजकन्येशी गाठ पडली. त्यांनी त्या दोघींना आक्रमकांपासून वाचविले. राजकुमारीने यदुराय यांच्याबरोबर विवाह केला व ते तेथील राजे झाले. हे देवस्थान श्रीमंत आहे. 

मंड्या : हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. मंड्यामध्ये अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत. २०१६मध्ये भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणातर्फे (एएसआय) केल्या गेलेल्या उत्खननात बाहुबलीची १३ फूट उंचीची मूर्ती सापडली आहे. जैन धर्माचे प्रथम तीर्थंकर आदिनाथ यांचे पुत्र होते. मूर्ती तिसऱ्या ते नवव्या शतकातील असावी. अशीच मूर्ती जवळच्याच मुद्दुर गावातही सापडली आहे. मंड्या हे गाव साखर कारखान्यांमुळे प्रसिद्ध झाले आहे. 

बसरालू मल्लिकार्जुन मंदिर

बसरालू मल्लिकार्जुन मंदिर :
होयसळ राजा वीरा नरसिंह दुसरा यांच्या शासनकाळात (इ. स. १२३४) हरिहर धनायक यांनी हे मंदिर बांधले. भारतीय पुरातत्त्व खात्यातर्फे हे मंदिर राष्ट्रीय महत्त्वपूर्ण स्मारक म्हणून संरक्षित आहे. हे मंदिर होयसळ वास्तुकलेचे अत्युत्तम उदाहरण आहे. या मंदिरात तीन गाभारे असून, त्या सर्वांसाठी एकच सभामंडप आहे. मंदिरातील शिल्पकला हळेबिडूसारखीच आहे. मंदिरामध्ये श्रीगणेश, ब्रह्मा व सरस्वती यांची सुंदर शिल्पे आहेत. रामायण व महाभारतातील प्रसंग, द्रौपदी स्वयंवर, रावण कैलास उचलतो तो प्रसंग, तसेच गजासुराचा वध अशी शिल्पे कोरण्यात आली आहेत. हे ठिकाण श्रीरंगपट्टणपासून ५० किलोमीटर अंतरावर आहे. 

बसरालू मल्लिकार्जुन मंदिर

हेमागिरी वॉटरफॉल्स व लक्ष्मीनारायण मंदिर : हेमागिरी हे सहलीचे व चित्रपटांच्या चित्रिकरणाचे ठिकाण आहे. अतिशय नयनरम्य असे हे ठिकाण असून, येथे सुंदर धबधबा आहे. लक्ष्मीनारायण मंदिर इ. स. पू. १२५०मध्ये होयसळ राजा वीर सोमेश्वराच्या काळात बांधण्यात आले. मंदिर त्रिभुज स्वरूपात आहे. येथील काही मूर्तींची तस्करी झाली आहे. श्रीरंगपट्टणपासून हे ठिकाण ४७ किलोमीटरवर आहे.

किक्केरी ब्रह्मेश्वर मंदिर : ११७१मध्ये होयसळ राजा नरसिंह पहिला याच्या काळात हे मंदिर बम्मेर नायकती नावाच्या एका स्त्रीने बांधले. हे मंदिर श्रवणबेळगोळपासून १५ किलोमीटरवर आहे. 

कोकरेबल्लूर पक्षी अभयारण्य

कोकरेबल्लूर पक्षी अभयारण्य :
हे पक्षी अभयारण्य आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध आहे. गावांमध्ये व त्याच्या आसपास असलेल्या झाडांमधील पक्ष्यांची घरे येथे दिसून येतात. एप्रिल-मे दरम्यान ऑस्ट्रेलिया आणि जगातील इतर काही भागांमधून रंगीबेरंगी स्थलांतरित पक्षी येथे येतात. 

सौम्यकेशव मंदिर, नागमंगल

नागमंगल :
सौम्यकेशव मंदिरासाठी हे गाव प्रसिद्ध आहे. होयसळ राजा विष्णुवर्धन यांच्या शासनकाळात नागमंगल गाव वैष्णव पंथाचे महत्त्वाचे ठिकाण मानले जायचे. पुरातत्त्व विभागाने हे मंदिर राष्ट्रीय ठेवा म्हणून घोषित केले आहे. या मंदिरातील शिल्पकाम पाहण्यासारखे आहे. 

सौम्यकेशव मंदिर, नागमंगल

कावेरी फिशिंग कॅम्प : हे मत्स्य विकास व पैदास केंद्र भीमेश्वरी येथे असून, प्रशिक्षण केंद्रही आहे. 

मुकुंबिका वन्यजीव अभयारण्य : हे उडुपी जिल्ह्यात असून, २४७ चौरस किलोमीटर क्षेत्रावर विस्तारलेले आहे. येथे सांबरे आणि बिबटे आढळतात. 

रंगनाथिट्टू अभयारण्य (फोटो : KTDC)

रंगनाथिट्टू वन्यजीव व पक्षी अभयारण्य :
श्रीरंगपट्टण येथून चार किलोमीटर अंतरावर रंगनाथिट्टू अभयारण्य आहे. येथे मगरी व स्थलांतरित पक्षी आढळून येतात. सायबेरियासारख्या दूरच्या प्रदेशातील पक्षी येथे आपली घरटी बनवितात. हे अभयारण्य मंड्यापासून ३६ किलोमीटरवर आहे. 

शिवसमुद्र फॉल्स (फोटो : KTDC)

शिवसमुद्र फॉल्स :
भारतातील पहिले जलविद्युत केंद्र १९०५ साली येथे निर्माण करण्यात आले. हे गाव निसर्गसौंदर्याने नटलेले असून, कावेरी नदी २४६ फूट उंचीवरून येथे उडी घेते. या प्रकल्पातून कोलारच्या सोन्याच्या खाणीसाठी विद्युत पुरवठा केला जातो. हे ठिकाण मंड्यापासून ४४ किलोमीटर अंतरावर आहे.

कसे जायचे?
मंड्या हे ठिकाण रेल्वे, बस अशा वाहतूक साधनांनी बेंगळुरू व म्हैसूरला जोडलेले आहे. मंड्या, श्रीरंगपट्टण येथे राहण्याची उत्तम व्यवस्था आहे. जाण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च हा कालावधी उत्तम. धबधबे पाहण्यासाठी पावसाळ्यात जावे. 

- माधव विद्वांस
ई-मेल : vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)  

(सोबतचा व्हिडिओ पाहा.)

 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language