Ad will apear here
Next
कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी सरपंचांनी ठेवले दागिने गहाण
एकलहरे ग्रामपंचायतीच्या सरपंच मोहिनी जाधव यांची कृती
नाशिक : नाशिक शहराच्या अगदी जवळ असलेल्या एकलहरे ग्रामपंचायतीच्या सरपंच मोहिनी जाधव यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी स्वतःचे दागिने गहाण ठेवले. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन व सानुग्रह अनुदान देण्यासाठी त्यांनी दागिने गहाण ठेवले.

नाशिक तालुक्यात अव्वल दर्जाची ग्रामपंचायत असा नावलौकिक असलेल्या आणि वीजनिर्मिती प्रकल्प असलेल्या एकलहरे ग्रामपंचायतीची आर्थिक परिस्थिती विविध कारणांमुळे खालावल्याने, देयके रखडल्याने कर्मचाऱ्यांचे पगार होऊ शकले नाहीत. ज्या कर्मचाऱ्यांच्या भरवशावर ग्रामपंचायत कारभार चालतो, त्यांच्या कुटुंबाची दिवाळी चांगली जावी, या उद्देशाने सरपंच मोहिनी जाधव यांनी स्वतःचे मंगळसूत्र आणि इतर मौल्यवान दागिने गहाण ठेवले. त्यातून आलेल्या दीड लाख रुपयांतून त्यांनी ग्रामपंचायतीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बोनस आणि पगार दिले. यामुळे इतर लोकप्रतिनिधींसमोर एक आदर्श निर्माण झाल्याची चर्चा नाशिक जिल्ह्यात सध्या रंगते आहे. ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी सरपंच मोहिनी जाधव यांचे आभार मानले आहेत.

‘ग्रामपंचायतीमध्ये काम करताना करातून मिळणारे उत्पन्न महत्त्वाचे असते. एकलहरे ग्रामपंचायतीमध्ये महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कंपनीद्वारे करण्यात येणारा करभरणा हा महत्त्वपूर्ण वाटा होता. परंतु कलम १२५नुसार ठोक अंशदान रद्द होऊन कलम १२४नुसार करआकारणीचे आदेश देण्यात आले. ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी करभरणा करण्याचे आदेश देऊनसुद्धा वीजनिर्मिती कंपनी प्रशासन करभरणा करण्यास टाळाटाळ करत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीची आर्थिक परिस्थिती खालावल्याने कारभार चालविणे अवघड होऊन बसले आहे. वरिष्ठ पातळीवरून याबाबत ठोस निर्णय होऊन ग्रामपंचायतची आर्थिक घडी सुरळीत करण्यासाठी मदत होईल, ही अपेक्षा आहे. म्हणून ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी मजेत साजरी व्हावी या उद्देशाने मी माझे मंगळसूत्र आणि इतर मौल्यवान वस्तू गहाण ठेवून त्यांचा पगार आणि बोनसची व्यवस्था केली आहे,’ असे मोहिनी जाधव यांनी सांगितले. 
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language