Ad will apear here
Next
‘तो काळच मंतरलेला होता...!’
मराठी चित्र-नाट्य सृष्टीतले बुजुर्ग कलाकार आणि ‘जागर’सारख्या संस्थेशी प्रारंभापासून निगडित असलेले आदरणीय व्यक्तिमत्त्व म्हणजे माधव वझे. बालगंधर्व रंगमंदिरसारख्या देखण्या वास्तूच्या उभारणीसाठी जी समिती काम करत होती, त्या समितीत पु. ल. देशपांडे यांच्याबरोबर काम करण्याचे भाग्य वझे यांना लाभले आहे. त्यांच्याकडे तेव्हाच्या अनेक सुखद स्मृतींचा ठेवा आहे. बालगंधर्व रंगमंदिराच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने ‘बाइट्स ऑफ इंडिया’चे प्रतिनिधी प्रसन्न पेठे यांनी त्यांच्याशी साधलेला हा संवाद... 
....................
प्रश्न : ‘बालगंधर्व’शी आपला संबंध कधीपासूनचा? त्या वेळच्या काही खास आठवणी?
उत्तर : अगदी सुरुवातीपासूनच माझा या नाट्यगृहाशी संबंध आहे. बालगंधर्व रंगमंदिराच्या उभारणीसाठी जी समिती नेमली होती, त्यात ‘पुलं’च्या समवेत माझाही समावेश होता. त्यामुळे त्या वेळच्या अनेक आठवणी आहेत. त्या वेळी मुंबई-पुण्यात इतका अप्रतिम रंगमंच नव्हता. ‘पुलं’नी जातीने लक्ष घालून या वास्तूसाठी प्रत्येक सोय करून घेतली आहे. रंगमंचाची लांबी रुंदी बघा.... दोन्ही बाजूंच्या विंगांच्या मागे असणारी प्रशस्त जागा बघा....प्रयोग चालू असताना पुढच्या प्रवेशाचे सामान आणून ठेवण्यासाठीच्या सोयी....नाटक कंपनीचे सामान प्रेक्षकांसमोरून न आणता, वेगळ्या दाराने ट्रकने आणून थेट रंगमंचावर नेण्याची सोय.....रंगमंचाच्या मध्यभागी खड्डा.....तिथून तळघरातल्या अवजड सामानापर्यंत पोहोचण्याची आणि ते सामान चटकन रंगमंचावर आणण्याची सोय....या गोष्टींमधून ‘पुलं’ची दूरदृष्टी दिसून येते.
 
प्रश्न : नाट्यगृहाच्या संदर्भात एक रंगकर्मी म्हणून ‘पुलं’च्या दूरदृष्टीची तुम्हाला जाणवलेली वैशिष्ट्ये कोणती?
उत्तर : प्रकाशयोजनेसाठी प्रेक्षकांच्या मागच्या बाजूला केलेली खास व्यवस्था हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. प्रकाशयोजना करणाऱ्याला प्रेक्षकांप्रमाणेच रंगमंचाचा कानाकोपरा दिसायला हवा हा त्यामागचा हेतू. त्यासाठी ‘पुलं’नी पुणे नगरपालिकेला सांगून मुंबईच्या साहित्य संघातील त्या वेळचे ख्यातनाम प्रकाशयोजनाकार वझे यांना बोलावून घेतले आणि त्यांच्या जाणकार नजरेखाली प्रकाशयोजनेसंबंधीची सर्व व्यवस्था करून घेतली. आवाज व्यवस्थित पोहोचतोय की नाही, हे तपासण्यासंबधीचीही एक विशेष आठवण आहे. नाट्यगृहाचे बांधकाम पूर्ण झाले होते. परंतु प्रेक्षागृहातल्या खुर्च्या लागायच्या होत्या. त्या वेळी पुलं प्रेक्षागृहातल्या त्या रिकाम्या जागेत जाऊन उभे राहिले आणि आवाजाच्या ट्रायलसाठी त्यांनी मला रंगमंचावर उभे राहून नाटकातला एक उतारा म्हणायला सांगितले. आणि त्यांनी तो रिकाम्या प्रेक्षागृहातल्या वेगवेगळ्या कोपऱ्यांत जाऊन ऐकला.... प्रतिध्वनी (Echo) वगैरे येत नाही ना बघण्यासाठी! आणि मला तिथूनच म्हणाले, ‘अरे, तू मोठ्याने बोलतोयस... आवाज फेकत नाहीयेस!’ ते ऐकून मी गोंधळलो. त्यावर पुलं म्हणाले, ‘आता मी वर येतो, तू खाली जाऊन उभा राहा.’ आणि ‘पुलं’नी रंगमंचावर जाऊन त्यांच्या ‘बटाट्याच्या चाळी’तली सुरुवातीची वाक्यं म्हणायला सुरुवात केली. आणि मी थरारलो – मोठ्याने बोलणे (speaking loudly) ही गोष्ट वेगळी आणि तुमच्या आवाजाची फेक करणे (projecting your voice) हे वेगळे, हा अनौपचारिक धडा मला साक्षात ‘पुलं’कडून तिथल्या तिथे मिळाला. दुसरे सांगायचे म्हणजे ज्येष्ठ चित्रकार गोपाळराव देऊस्कर यांच्याकडून काढून घेऊन बालगंधर्वांची तैलचित्रे तिथे लावण्याची कल्पना ‘पुलं’चीच आणि त्या दोन्ही तैलचित्रांसाठी खास ‘गदिमां’ना गळ घालून चार-चार ओळी लिहून घेण्याची कल्पनाही ‘पुलं’चीच! 

प्रश्न : ‘पुलं’च्या सहवासातील सोहळ्याच्या वेळची एखादी खास आठवण...
उत्तर : हो. एक विशेष आठवण सांगायची म्हणजे उद्घाटन सोहळ्याच्या रात्री बालगंधर्वांच्या नाट्यपदांवर विशेष कार्यक्रम करायचे त्यांनी ठरवले. त्यासाठी हिराबाई बडोदेकर, मालती पांडे, भीमसेन जोशी, सुधीर फडके, वसंतराव देशपांडे वगैरे मातब्बर गायकांकडून एकेक पद गाऊन घ्यायचे ठरले; पण आता पदे शोधायची तर नाटकांची पुस्तके हवीत. बालगंधर्वांच्या नाटकांची पुस्तके आणण्याची जबाबदारी त्यांनी माझ्यावर सोपवली. बाळ मोघे याचे वडील गंधर्वांचे मोठे चाहते असल्याचे मला ठाऊक होते आणि त्यांच्याकडे काही मिळू शकेल याची मला खात्री होती. मी लगोलग त्यांच्याकडे गेलो. त्यांनी सुतळीने बांधून ठेवलेला बालगंधर्वांच्या २५-३० नाटकांचा गठ्ठाच माझ्यापुढे ठेवला. मी तो उचलून सारसबागेसमोर ‘पुलं’ज्या हॉटेलमध्ये उतरले होते तिथे गेलो. पुलं तो गठ्ठा बघून एकदम खूषच झाले. ‘काय सांगतोयस? सगळी मिळाली?...बस आता समोर. मी तुला यातली पदं वाजवून दाखवतो’ असं म्हणून मला समोर बसवून ‘पुलं’नी पेटी ओढली आणि मला एकेक पद वाजवून दाखवलं. सुनीताबाईही त्या वेळी तिथे होत्या. ते करताना, ‘हां, हे पद हिराबाईंना देऊ या...हे पद अमुक यांना देऊ या’ असे करत करत कोणाकोणाला कोणते पद गायला द्यायचे ते ही त्यांनी ठरवून टाकले. एकंदरीतच ‘बालगंधर्वच्या’ उद्घाटन सोहळ्यावेळचा तो काळ मंतरलेलाच होता.
................
‘पुलं’च्या पत्राचा अमूल्य ठेवा
‘पुलं’च्या पंच्याहत्तरीनिमित्त माधव वझे यांनी त्यांना पत्र पाठवले होते आणि जुन्या आठवणी काढल्या होत्या. खरे तर ‘पुलं’ची तब्येत ढासळली होती आणि हातही कंप पावत होते, तरी आपल्या त्या वेळच्या सहकाऱ्याचे कौतुक म्हणून ‘पुलं’नी त्याही अवस्थेत दोन ओळींचे पत्र वझे यांना पाठवले होते. तो पत्राचा अमूल्य ठेवा माधव वझे यांनी आजही जपून ठेवला आहे.

(पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिराचं सुवर्णमहोत्सवी वर्ष २६ जून २०१७ रोजी सुरू झालं. त्या निमित्तानं, या रंगमंदिराशी निगडित असलेल्या अनेक मान्यवरांच्या आठवणींचा खजिना ‘गंधर्वनगरीची पन्नाशी’ या विशेष लेखमालेद्वारे ‘बाइट्स ऑफ इंडिया’ उलगडत आहे. या लेखमालेतले सगळे लेख एकत्रितरीत्या या लिंकवर उपलब्ध असतील.)
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi
Select Language