Ad will apear here
Next
कुल फाउंडेशन घडविणार नवउद्योजक
विशेष प्रशिक्षण प्रकल्पाची निर्मिती
कुल फाउंडेशनतर्फे राबविण्यात येणाऱ्या उद्योजकता विकास प्रकल्पाची माहिती देताना ललितकुमार जैन. या वेळी (डावीकडून)विवेक अत्रे, डॉ. वासुदेव बर्वे, जैन, नितीन घोले व अभय मठ

पुणे : व्यवसायाच्या उत्तम कल्पना आणि उद्योजक बनण्याची प्रबळ इच्छा बाळगणाऱ्या होतकरू तरुणांना कुल फाउंडेशन फॉर सोशल इनिशिएटिव्हतर्फे उद्योजक होण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येणार आहे. 

‘नवीन पिढीतील उद्योजक घडविण्यासाठी फाउंडेशनच्या माध्यमातून येत्या १७ ऑगस्टपासून ‘देशासाठी उद्योजकता’ हा विशेष प्रकल्प सुरू करण्यात येत आहे. याद्वारे येत्या दोन  वर्षांत राज्यात शंभर नवे उद्योजक घडविले जाणार आहेत,’अशी माहिती कुल फाउंडेशनचे संस्थापक व प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक ललितकुमार जैन यांनी पत्रकार परिषदेत दिली. संस्थेचे संयोजक अभय मठ, विवेक अत्रे, डॉ. वासुदेव बर्वे, नितीन घोले या वेळी उपस्थित होते.

‘या उद्योजकता विकास कार्यक्रमात पुणे, निगडी, कोल्हापूर आणि औरंगाबाद या चार केंद्रांवर प्रत्येकी २० ते २५ तरुण-तरुणींची निवड करून त्यांना तीन महिन्यांचे पूर्णवेळ उद्योजकता प्रशिक्षण देण्यात येणार आहे. केवळ प्रशिक्षण देऊन हा कार्यक्रम संपणार नाही, तर प्रशिक्षणानंतर आठ ते नऊ महिन्यांपर्यंत त्यांना व्यवसाय उभारण्यासाठी सातत्याने सहकार्य केले जाणार आहे. इतकेच नव्हे, तर पुढील दोन वर्षे व्यवसायाच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांच्या मदतीसाठी कुल फाउंडेशन सज्ज राहणार आहे,’ असे ललितकुमार जैन यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, ‘उद्योजक बनण्याची उर्मी असणाऱ्या गरजू तरुणांना नोकरीसाठी वणवण करावी लागू नये, तर त्यांनी स्वतःच इतरांना नोकरी देणारे बनावे, असा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात सीमेवर लढणाऱ्या सैनिकांप्रमाणेच देशासाठी योगदान देऊ इच्छिणारे उद्योजकदेखील आवश्यक आहेत. देशातील युवाशक्तीचे उद्योजकतेमध्ये परावर्तन करणे ही आजची गरज आहे. देशात खूप ठिकाणी उद्योजकता विकास कार्यक्रम चालविले जातात, परंतु त्यातील बरेचसे सामान्यांसाठी महागडे आहेत;तसेच केवळ अभ्यासक्रम पूर्ण करणे हेच उद्योजकता विकास कार्यक्रमाचे उद्दिष्ट नसून, उद्योजक होण्याच्या मार्गातील अपयश कसे टाळता येईल या सर्व गोष्टी लक्षात घेऊनच आम्ही आमच्या या पथदर्शी प्रकल्पाची रचना केली आहे. महाराष्ट्रात या कार्यक्रमाची यशस्विता पारखून कार्यक्रमाचा हळूहळू संपूर्ण भारतभर विस्तार करण्याचा संस्थेचा संकल्प आहे’. 

‘व्यवसाय धोरण कसे आखावे, वित्त पुरवठा कसा मिळवावा, सरकारी योजना कोणत्या, काटेकोर हिशेब ठेवणे, विपणन व ग्राहक सेवा हे विभाग व्यावसायिकाने कसे सांभाळावेत, तंत्रज्ञानाचा वापर,  समाजमाध्यमांचा विपणनासाठी कल्पक वापर, व्यवसायाला पूरक ठरतील अशी संवाद व संज्ञापन कौशल्ये कशी आत्मसात करावीत या विविध विषयांची सखोल माहिती प्रशिक्षणात उमेदवारांना दिली जाणार आहे,’ असेही त्यांनी नमूद केले.

संस्थेचे संयोजक अभय मठ म्हणाले, ‘या उपक्रमाची निवड प्रक्रिया अतिशय काटेकोरपणे राबवली जाणार असून, खरोखरच गरजू असलेल्या आणि प्रत्यक्षात येण्या जोग्या तसेच वेगळ्या अशा व्यवसायाच्या कल्पना राबवू पाहणाऱ्या तरुणांची या उपक्रमासाठी निवड केली जाणार  आहे. या भावी उद्योजकांना अनुभवी मंडळींचे मार्गदर्शन मिळावे आणि त्यांनी उद्योजक म्हणून भरारी घ्यावी, असा संस्थेचा प्रयत्न आहे. प्रकल्पासाठीच्या निवड प्रक्रियेत इच्छुकांचे शिबिर, कलचाचणी, गटचर्चा आणि त्यांच्यातील उद्योजकतेची प्रामाणिक महत्त्वाकांक्षा तपासण्यासाठी मुलाखत याद्वारे प्रत्येक केंद्रावर २५ युवकांची निवड केली जाईल. यानंतर त्यांना तज्ज्ञ प्रशिक्षकांमार्फत प्रशिक्षण दिले जाणार आहे. या तीन महिन्यांच्या प्रशिक्षणादरम्यान व्यवसायामध्ये मोठी उंची गाठलेले उद्योजक स्वतः येऊन त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे व्यवसायात प्रत्यक्ष येणाऱ्या अडचणींवर मात करत कसे पुढे जावे याचे बाळकडू त्यांना मिळेल’.

‘संस्थेतर्फे दिले जाणारे हे उद्योजकता विकास प्रशिक्षण उमेदवारांसाठी पूर्णतः विनामूल्य असून, प्रशिक्षणाचा आर्थिक भार कुल फाउंडेशन  उचलणार आहे. प्रत्येक उमेदवारास काहीतरी उत्तरदायित्त्व राहावे, या हेतूने उमेदवारांना निवडीनंतर आठ हजार रुपये ‘रीफंडेबल डिपॉझिट’ भरावे लागणार आहे. प्रशिक्षण सुरू झाल्यापासून सहा महिन्यांनी त्यांना हे डिपॉझिट परत दिले जाणार आहे. या कालावधीत उमेदवाराने आपले स्वप्न साकारण्यासाठी प्रामाणिकपणे धडपड करणे गरजेचे आहे,’ असेही मठ यांनी सांगितले.
  
‘याच प्रकारे शालेय विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेस पूरक अशी मानसिकता तयार करण्यासाठी संस्थेतर्फे पाठ्यक्रम विकसित करण्यात येत असून, लवकरच काही शाळांमध्ये तो प्रायोगिक तत्त्वावर चालविला जाईल,’ अशी माहितीही त्यांनी या वेळी दिली. 
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi
Select Language