Ad will apear here
Next
आकाशातून जमिनीवर झेप घेणारी वेडी मुलगी
दक्षिण ध्रुवावर शीतल महाजन

‘एकदा आकाशातून जमिनीवर उडी मारून तर बघा... मनातली कुठल्याही गोष्टीची सगळी भीती कायमची नष्ट होईल आणि तुम्हाला स्वतःचाच नव्यानं शोध लागेल...’ हे बोल आहेत पद्मश्री शीतल महाजन हिचे... स्काय डायव्हिंगमध्ये आतापर्यंत १७ राष्ट्रीय आणि सहा जागतिक विक्रम केलेल्या या महाराष्ट्रातल्या तरुणीची थरारक गोष्ट पाहू या आज ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या सदरात...
...........
फँटसी किंवा अद्भुतरम्य, अंगावर शहारा उमटवणारे प्रसंग बघितले, की हे सगळं स्वप्नातच घडू शकतं की चमत्कार असतो, असा प्रश्नस पडतो. स्पायडरमॅन आणि सुपरमॅन यांच्या हालचालींनी तर अचंबित व्हायला होतं. आपल्याला जे जे करता येत नाही ते ते ही काल्पनिक मंडळी करत असल्यानं ती आपल्याला खूपच आवडायला लागतात. अशी कल्पनेच्या जगातली एक गोरीगोरी पान, फुलासारखी छान मुलगी मला प्रत्यक्ष जगात भेटली. थंडीत तापमान सात आणि सहा अंशांवर आलं तरी आपण जिथं कुडकुडायला लागतो, तिथं ही मुलगी उत्तर ध्रुवावरून ‘मायनस ३७ डिग्री’ अशा गोठून टाकणाऱ्या तापमानात २४०० फुटांवरून हेलिकॉप्टरमधून चक्क उडी मारते  आणि तरीही जिवंत असते, म्हणजे काय? ती भेटल्यावर मी स्वतःला आणि तिला पाच-दहा चिमटे काढून बघितले. अर्थातच ते स्वप्न नसून खरं होतं. 

‘स्काय डायव्हिंग’ या खेळात जागतिक रेकॉर्ड करणाऱ्या या धाडसी मुलीला तिच्या आगळ्यावेगळ्या कामगिरीबद्दल भारत सरकारनं पद्मश्री देऊन गौरवलं आहे. राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी कौतुकानं तिच्या पाठीवर थाप मारत पुरस्कार देऊन तिचा सन्मान केला आहे. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार तिनं पटकावले आहेत. तिनं आत्तापर्यंत १७ राष्ट्रीय आणि सहा जागतिक विक्रम करून ६९९ पॅराशूट जम्प्स घेतल्या आहेत. भारतातल्याच नव्हे, तर समस्त जगाला जिचा अभिमान वाटावा अशी ही महाराष्ट्रीयन तरुणी म्हणजेच पद्मश्री शीतल महाजन!

शीतल एक उडी मारून गप्प बसली नाही, तर अंटार्टिलाकाच्या दक्षिण ध्रुवावरूनही तिथलं तापमान ‘मायनस ३८ डिग्री’ असताना तिनं ११ हजार ६०० फुटांवरून उडी मारली आणि त्यात ती यशस्वी झाली. असं धाडस करणारी आणि यशस्वी होणारी ती जगातली पहिली महिला आहे. शीतलचे हे पराक्रम जागतिक रेकॉर्ड का आहेत, ती जे धाडस करते त्याला नेमकं काय म्हणायचं आणि ती हे सगळं का करते या प्रश्नांलची उत्तरं तिच्या प्रवासातूनच जाणून घ्यावी लागतील. 

शीतलला लहानपणापासून आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं होतं. आपण पक्ष्यासारखं उडावं, आकाशातून उडणाऱ्या विमानात बसावं, असं शीतलला सतत वाटायचं. शीतलनं त्या वेळी ‘रोजा’ नावाचा हिंदी चित्रपट बघितला आणि त्यातल्या

‘दिल है छोटासा, छोटी सी आशा
मस्तीभरे मनकी भोली सी आशा
चाँद तारों को छूने की आशा
आसमाँनो में उडने की आशा....

या गाण्यातल्या ‘आसमाँनो में उडने की आशा’ या ओळींनी तिला झपाटून टाकलं. सतत स्वप्नं बघणाऱ्या शीतलला आकाशात उडायचे वेधच लागले होते. स्वप्नं बघत शाळा संपली आणि तिनं महाविद्यालयीन विश्वा त प्रवेश केला. अकरावीमध्ये असताना शीतलची भेट तिच्या मैत्रिणीचा भाऊ कर्नल कमलसिंग ओबेरॉय यांच्याशी झाली. वर्तमानपत्रात तिनं त्यांचा फोटो बघितला. तो पुण्याजवळच्या खडकवासला येथील नॅशनल डिफेन्स अॅकॅडमीतर्फे पॅराशूट जम्पिंगचं ट्रेनिंग देत असल्याचं शीतलला कळलं. आपण लहानपणापासून बघितलेली स्वप्नं खरं करायला हाच माणूस मदत करू शकेल असं तिला वाटलं. आपल्या मैत्रिणीबरोबर ती कमलसिंग यांना जाऊन भेटली आणि ‘दादा, मलादेखील स्काय डायव्हिंग म्हणजे काय असतं हे समजून घ्यायचंय, शिकायचंय. तुम्ही मला शिकवा’ असा हट्ट धरून बसली. कमलसिंग यांच्याकडे अनेक मुलं असे हट्ट धरून येत आणि दोनच दिवसांत तो हट्ट विसरूनही जात. शीतलही केवळ तात्पुरत्या आकर्षणापोटी मागे लागलीय, असं समजून त्यांनी तिच्याकडे चक्क दीड वर्ष दुर्लक्ष केलं; पण शीतलचं टुमणं सतत चालू होतंच. कर्नल कमलसिंग हे दक्षिण आणि उत्तर ध्रुवावरून स्काय डायव्हिंग करणारे (उडी मारणारे) पहिले भारतीय पुरुष होते. ते ‘एनडीए’मध्ये स्काय डायव्हिंगचं प्रशिक्षणही देत असत. शीतलनं वारंवार लावलेला तगादा बघून त्यांना ती खूपच तळमळीनं या खेळाविषयी आपल्या मागे लागलीय हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी तिला ‘तू आधी तुझ्या आई-वडिलांची परवानगी काढ आणि मगच माझ्याकडे ये’ असं सांगितलं. 

शीतलनं आपल्या आई-वडलांना ‘मला स्काय डायव्हिंग शिकायचंय’ असं सांगितलं आणि घरात एकच गदारोळ उडाला. सुरुवातीला ती काय म्हणतेय हेच त्यांना कळलं नाही. स्काय डायव्हिंग म्हणजे आकाशात खूप जास्त उंचीवरून पॅराशूटच्या साहाय्यानं जमिनीवर उडी घ्यायची हे त्यांना तिनं समजून सांगितलं; पण हे सगळं का करायचं, सुखाचा जीव दुःखात का टाकायचा, त्यातच मुलीची जात, हिनं अशी उडी मारून हात-पाय तोडून घेतला तर हिचं लग्न कसं होणार, अशा एक ना अनेक प्रश्नांाचा मारा शीतलवर सुरू झाला. शीतलला परवानगी नाकारण्यात आली. 

शीतल खूपच जिद्दी असल्यानं तिनं आपला हट्ट सोडला नाही, जेवणखाण सोडून ती आई-वडिलांजवळ एकच एक गोष्ट मागत राहिली, ती म्हणजे स्काय डायव्हिंगची परवानगी! तिच्या हट्टापुढे मान तुकवून अखेर आई-वडील कर्नल कमलसिंगांना खडकवासाला ‘एनडीए’त जाऊन भेटले. कमलसिंगांनी शीतलच्या चिकाटीचं कौतुक केलं. या खेळात ती काही करू पाहतेय, तर तिला परवानगी द्यावी, असंही सांगितलं. मुलीवरच्या प्रेमामुळे शीतलचे वडील तयार झाले. 

शीतलला उत्तर ध्रुवावरून उडी मारायची होती. त्यासाठी तिला २० लाख रुपयांची गरज होती. तिच्या वडिलांचा पगार तर केवळ १८ हजार रुपये होता. त्यात कुटुंबाचा खर्च जाऊन हाती काहीच शिल्लक राहत नव्हती. एवढी मोठी रक्कम आणायची कुठून? मग प्रायोजक शोधणं सुरू झालं. एवढी मोठी रक्कम द्यायला कोणीही तयार होत नव्हतं. उडी मारण्याचे दिवस जवळ जवळ येत चालले होते. दहा दिवस बाकी असतानाच टाटा मोटर्स यांनी आपण ही मदत करू असं सांगितलं आणि शीतलचा जीव भांड्यात पडला. कुठल्याही प्रशिक्षणाशिवाय, कधीही विमानातसुद्धा न बसलेल्या शीतलनं केवळ आपल्या स्वप्नांना खरं करण्यासाठी हे पाऊल उचललं आणि कसलीही चिंता न करता स्वतःला आकाशातून जमिनीकडे भिरकावून दिलं. तो अनुभव चित्तथरारक होता. शीतलच्या आई-वडिलांचा जीव कासावीस झाला होता. आपल्या मुलीचं हे वेड तिला जिवंत ठेवेल की मृत्यूकडे घेऊन जाईल या काळजीनं ते वेडेपिसे झाले होते; पण शीतल सुखरूप जमिनीवर पाय ठेवती झाली आणि हे तिचं जागतिक रेकॉर्ड ठरलं. 

मग मात्र शीतलनं मागे वळून बघितलं नाही. घरात तिच्या लग्नाची बोलणी सुरू झाली. आपल्याला स्काय डायव्हिंगमध्ये सपोर्ट करणाराच नवरा आपण करू असं तिनं ठामपणे ठरवलं. त्याप्रमाणे आयटी क्षेत्रातल्या एका तरुणानं तिच्या या वेडाला संमती दिली. एवढ्यावर गप्प बसेल तर ती शीतल कसली? आपण हे लग्न हवेतच करायचं असं तिनं आपल्या भावी नवऱ्याला सांगितलं. त्यानं या मनस्वी मुलीचं म्हणणं ऐकलं; पण शीतलची सासरची मंडळी बिथरून गेली. लग्न कुठे हवेत असतं का? त्यांनी विरोधही केला, पण अखेर याही वादात शीतल जिंकली आणि तिचं लग्न हवेत साजरं करता आलं. 

लग्नानंतरही शीतलचे स्काय डायव्हिंगचे वेगवेगळे विक्रम सुरूच होते. उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव याशिवाय ऑस्ट्रेलिया, आशिया, आफ्रिका, युरोप, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका इथून तिनं जम्प करून जागतिक विक्रम केले. असं असताना तिला आपण आई होणार असल्याची चाहूल लागली. आता ही मुलगी काही काळ शांत बसेल आणि मग हे वेड विसरून जाईल असं घरी सगळ्यांना वाटलं. शीतलनं  जुळ्या मुलांना जन्म दिला; पण मुलं होताच पुन्हा तिचं वेड तिला पुन्हा आकाशाकडे खुणावू लागलं. तिच्या जागतिक रेकॉर्डनं हा खेळ काय असतो हे भारताला समजलं. तिला पद्मश्री मिळणार अशी कुणकुण लागताच काहींनी विरोध करायला सुरुवात केली; मात्र तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना शीतलच्या खेळाचं महत्व्् समजलं होतं. तिच्या विक्रमामुळेच ती या खेळात पहिली भारतीय महिला तर ठरली होतीच; पण जागतिक विक्रम करण्यातही तिचा हात धरेल असं दुसरं कोणी नव्हतं. स्त्रियांना प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी किती झगडावं लागतं, याची जाणीव प्रतिभाताईंना होती. त्यांनी शीतलला पद्मश्री देण्यावर शिक्कामोर्तब केलं. शीतलच्या नावाआधी पद्मश्री शीतल महाजन असं मानाचं बिरूद लागलं आणि आता या खेळाला भारतात सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवायचं असं तिनं ठरवलं.

शीतलनं फिनिक्स अॅकॅडमी ही संस्था स्थापन करून या संस्थेतर्फे स्काय डायव्हिंगचं प्रशिक्षण देणं सुरू केलं. आपण एकट्याच न राहता भारतात अनेक शीतल महाजन तयार होऊन त्यांनी जागतिक स्तरावर भारताचं नाव उंचावलं पाहिजे असं तिला वाटतं. आपल्याला स्काय डायव्हिंग या खेळानं जिद्द दिली, आत्मविश्वारस दिला, लढण्याची ताकद दिली आणि निडरपणाही दिला, असं शीतलला वाटतं. शीतल नेहमीच आपल्या विद्यार्थ्यांना सांगते, ‘एकदा आकाशातून जमिनीवर उडी मारून तर बघा....मनातली कुठल्याही गोष्टीची सगळी भीती कायमची नष्ट होईल आणि तुम्हाला स्वतःचाच नव्यानं शोध लागेल.’

स्वतःचा शोध घेणाऱ्या, या खेळासाठी आपलं आयुष्य वाहिलेल्या आणि भारताचं नाव जगात उंचावणाऱ्या पद्मश्री शीतल महाजनला पुढल्या अनेक विक्रमांसाठी खूप खूप आणि खूप शुभेच्छा!

संपर्क : शीतल महाजन
ई-मेल : princi19skydiver@gmail.com

- दीपा देशमुख
मोबाइल : ९५४५५ ५५५४०
ई-मेल : deepadeshmukh7@gmail.com

(दीपा देशमुख या प्रसिद्ध लेखिका असून, त्या वैविध्यपूर्ण विषयांवर लेखन करतात.)

(‘अनवट वाटेवरचे वाटसरू’  हे सदर दर पंधरा दिवसांनी गुरुवारी प्रसिद्ध होते.)

(शीतलच्या विक्रमाबद्दल माहिती देणारा, तसेच नऊवारी साडी नेसून स्कायडायव्हिंग करण्याच्या तिच्या विक्रमाचा व्हिडिओ सोबत देत आहोत.) 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language