Ad will apear here
Next
संस्कृत भाषेच्या उन्नतीसाठी झटणारी पुण्यातील आनंदाश्रम संस्था
संस्कृत प्रसारासाठी १३०हून अधिक वर्षे कार्यरत
आनंदाश्रमउच्च न्यायालयात वकिली करणारे महादेव चिमणाजी आपटे यांनी ‘संस्कृतस्य उन्नत्यर्थमेव निर्मित:’ हे ध्येय समोर ठेवून पुण्यात १८८८मध्ये ‘आनंदाश्रम’ संस्थेची स्थापना केली. तेव्हापासून ही संस्था संस्कृतची उन्नती, प्रसार यांसाठी कार्यरत आहे. ‘किमया’ सदरात ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर आज लिहीत आहेत या संस्थेबद्दल...
..........
पुण्यातील सुप्रसिद्ध अप्पा बळवंत चौकातून लक्ष्मी रोडकडे जाताना, नूतन मराठी विद्यालयाच्या अलीकडे एक भव्य प्राचीन वास्तू उभी आहे. कौलारू छत आणि प्रशस्त प्रवेशद्वार असलेली तीच आनंदाश्रम संस्था. फारच कमी पुणेकरांना तिच्याबद्दल माहिती असेल; परंतु संस्कृतप्रेमी लोकांची तिथे नियमित हजेरी असते. एकदा आत शिरले, की तिथल्या सुंदर इमारती आपल्याला आकृष्ट करतात. मुंबईच्या उच्च न्यायालयात वकिली करणारे महादेव चिमणाजी आपटे (सन १८४५ ते १८९४) यांनी ‘संस्कृतस्य उन्नत्यर्थमेव निर्मित:’ हे ध्येय समोर ठेवून ‘आनंदाश्रम’ संस्थेची स्थापना केली. त्यांनी १८८७मध्ये आपली सर्व मालमत्ता विकून टाकली आणि एक ट्रस्ट निर्माण केला. पुण्यातील मध्यवर्ती ठिकाणी १८८८मध्ये ‘आनंदाश्रमा’चे कार्य सुरू झाले. ब्रिटिश सरकारची संमती घेऊन आपली समाधी त्याच वास्तूत बांधावी, अशी त्यांनी तरतूद करून ठेवली.

मुख्य प्रवेशद्वारयाच इमारतीमध्ये ‘भांडारकर प्राच्यविद्या संशोधन’ ही संस्था सुरू करावी, याबद्दल विचार करण्यासाठी पहिली बैठक झाली होती. १८८८मध्येच ‘आनंदाश्रमा’चे विश्वस्त म्हणून रा. ब. वासुदेव बापूजी कानिटकर, शिवराम हरी साने आणि गं. बा. रेळे यांची निवड करण्यात आली. पहिले व्यवस्थापक कोण होते? महादेवरावांचे पुतणे, प्रसिद्ध ऐतिहासिक/सामाजिक कादंबरीकार, मराठी-संस्कृतचे उत्तम ज्ञान असलेले आणि समाजसुधारक असे हरी नारायण आपटे. यांच्या देखरेखीखाली तळमजल्याची वास्तू उभी राहिली. तिथल्या एका कोपऱ्यातील खोलीत बसून ह. ना. आपटे आपले लेखन करीत आणि संस्थेचे सर्व कामकाज बघत. संस्कृत भाषा, वेद-उपनिषदादि भारतीय तत्त्वज्ञान, रामायण-महाभारत यांच्यावर संशोधन करणाऱ्या जिज्ञासू व्यक्ती आणि संस्थांना ‘आनंदाश्रम’ हे अभ्यासाचे स्थान निर्माण झाले. आजही तिथे अनेक कार्यक्रम विनामूल्य किंवा अल्प भाड्यात साजरे होत असतात. उदाहरणार्थ, पं. गणेशशास्त्री शेंड्ये यांनी १९३३मध्ये स्थापन केलेली ‘गीर्वाण वाग्वर्धिनी’ ही संस्था संस्कृत भाषेत बोलण्याची सवय व्हावी यासाठी निरनिराळ्या विषयांवर गेली ८६ वर्षे एक आड एक रविवारी तिथे सभा घेत असते. श्रोत्यांची संख्या कितीही कमी असली तरी निराश/नाउमेद न होता ते व्रत अखंड चालू आहे.

ग्रंथालयरत्नागिरीचे पं. पुरुषोत्तमशास्त्री फडके (१९१५-२०१५) उत्कृष्ट प्रवचनकार होते. कोकणात त्यांची सहा हजारांहून अधिक प्रवचने झाली. पुणेकरांना त्यांच्या ज्ञानयज्ञात सहभागी होण्याची संधी आनंदाश्रमातच मिळाली. ‘संतकृपा’ मासिकातर्फे ‘गायत्री पुरश्चरण’ आणि ‘छांदोग्य उपनिषदा’वर १९७९मध्ये त्यांची प्रवचने ठेवण्यात आली. आनंदाश्रमाचे हे अनमोल कार्य अविरतपणे चालू आहे. मूळ संस्कृत ग्रंथांच्या आधारे तज्ज्ञ शिक्षक तिथे पाणिनीचे व्याकरण, रामायण-महाभारत आणि विविध उपनिषदांचे वर्ग चालवतात. ऑगस्ट महिन्यात (संस्कृत दिन) शालेय विद्यार्थ्यांसाठी संस्कृत स्तोत्र पाठांतर स्पर्धा घेण्यात येतात. संस्थेतर्फे बक्षिसेही दिली जातात. दिल्लीच्या राष्ट्रीय संस्कृत संस्थानाच्या वतीने अनौपचारिक संस्कृत शिक्षणाचे वर्ग आनंदाश्रमात वर्षभर चालतात.

ग्रंथालयमहादेवरावांनी मृत्यूपूर्वी ‘आतुर संन्यास’ स्वीकारला. त्यांच्या इच्छेप्रमाणे ह. ना. आपटे यांनी त्यांची समाधी बांधून घेतली. त्याच्या वरील मजल्यावर शिवशंकराचे (सच्चिदानंद) मंदिर आणि सभागृह आहे. मंदिरात महाशिवरात्र, त्रिपुरारी पौर्णिमा, तसेच श्रावण सोमवारी लघुरुद्रादि धार्मिक विधी केले जातात. तळमजल्यावर हस्तलिखिते आणि छापलेल्या ग्रंथांचे संग्रहालय आहे. तिथेच समृद्ध ग्रंथालय आहे. संस्थेच्या उद्दिष्टांनुसार संस्कृतीविषयक सर्व विषयांवरील पुस्तके संस्कृत भाषेत छापणे, जुनी हस्तलिखिते भारतभरातून गोळा करणे, त्यांचे जतन व संवर्धन करून ती अभ्यासकांना उपलब्ध करून देणे, त्याशिवाय पुण्याबाहेरील मध्यवर्गीय मुलांसाठी वसतिगृह बांधणे या सर्व गोष्टींची पूर्ती झालेली आहे. वास्तूच्या डाव्या हाताला तीन मजली वसतिगृह आहे. त्यासाठी अल्प भाडे आकारले जाते. तिथे तळमजल्यावर स्वयंपाकघर आणि जेवणाची जागा आहे. इमारतीच्या बाहेरच्या बाजूला एक दवाखाना आणि दुकाने आहेत. त्याच्या वरील मजल्यावर संस्थेचे कार्यालय, एक मोठे सभागृह, बैठकीची खोली, संदर्भ ग्रंथालय इत्यादी आहे. सभागृहात संस्थापक कै. महादेव आपटे आणि ह. ना. आपटे यांची तैलचित्रे आहेत. तिथल्या खिडक्यांना रंगीत इटालियन काचा बसवलेल्या आहेत. दालनाची फरशी १३० वर्षांपूर्वीची असून, ती अद्याप जशीच्या तशी टिकून आहे, हे विशेष!

सिंहगड बंगलासंस्थेने आतापर्यंत १४६ संस्कृत ग्रंथ छापले. त्यांचे एकूण १९७ खंड आणि एकूण पानांची संख्या ६४ हजार आहे. वाजवी किंमतीत ते लोकांना मिळतात. बरेचसे ग्रंथ आता उपलब्ध नाहीत. मागणीनुसार काही पुस्तकांचे पुनर्मुद्रण करण्यात येते. निधीची कमतरता असल्यामुळे मिळणाऱ्या देणग्यांमधून शक्य तेवढे ग्रंथ छापले जातात. निरनिराळ्या विषयांवरची खंड धरून सुमारे २०० पुस्तके सध्या उपलब्ध आहेत. हस्तलिखितांमध्ये २६ विषयांवरील १५ हजार १०३ पुस्तके आहेत. त्यांच्या एकूण पानांची संख्या एक लाखावर जाते. त्यात, सर्वांत जुने म्हणजे १४४९ साली लिहिलेले ‘ज्योतिषरत्नमाला’ नावाचे एक हस्तलिखित आहे. या सर्व मौलिक ठेव्याचे जतन करणे हे एक आव्हानच आहे. आधुनिक शास्त्रानुसार संस्था ते काम करतच असते. दिल्लीच्या ‘नॅशनल मिशन फॉर मॅन्युस्क्रिप्ट्स’ या संस्थेच्या मदतीने २०१२मध्ये ८० टक्के हस्तलिखिते ‘डिजिटाइज’ करण्यात आली. बाकीचा खर्च आनंदाश्रमाने केला. त्यांच्या डीव्हीडी बनवलेल्या आहेत.

वाई येथील प्राज्ञ पाठशाळेच्या पुढाकाराने सुरू झालेले वैदिक धर्मकोशाचे काम गेली ११-१२ वर्षे आनंदाश्रमात चालते. आतापर्यंत त्याचे २८ खंड प्रकाशित झाले असून, तेवढेच काम अद्याप बाकी आहे. आनंदाश्रमाचे व्यवस्थापकीय विश्वस्त वसंत अनंत आपटे असून, अन्य विश्वस्तांमध्ये दिलीप विष्णू आपटे, प्रा. सौ. सरोजा भाटे, सौ. अपर्णा वसंत आपटे आणि डॉ. सौ. माधवी कोल्हटकर यांचा समावेश आहे.

वसतिगृहपुण्यापासून ३० किलोमीटरवर असलेल्या सिंहगड किल्ल्यावर एक बंगला आनंदाश्रमाच्या मालकीचा आहे (सिंहगड बंगला). सुमारे २० हजार चौरस फूट जागेत ३३७५ चौरस फूट बांधकाम असून, त्यात चार खोल्या, मागे-पुढे ५० फूट लांब व सहा फूट रुंद असे व्हरांडे आहेत. त्याशिवाय नोकरांसाठी पाच खोल्या बांधलेल्या आहेत. हा बंगला दिवसांवर भाड्याने मिळू शकतो. त्याचे आरक्षण पुण्यातील कार्यालयात करता येते.

पुण्यात रोज अनेक प्रकारचे कार्यक्रम चालू असतात. त्यासाठी बरीच सभागृहे उपलब्ध आहेत. तिथे एका कार्यक्रमासाठी विनामूल्य ते ८-१० हजार रुपयांपर्यंत भाडे आकारले जाते. आनंदाश्रम पुण्याच्या केंद्रस्थानी आहे. तिथे मोफत किंवा अल्प भाड्यात अनेक कार्यक्रम होतच असतात. कायमस्वरूपी उत्पन्नासाठी २०० ते २५० आसनांचे सभागृह सर्वांना परवडेल अशा भाड्यात तिथे नियमितपणे उपलब्ध करून दिले, तर फारच सोयीचे होईल. वातानुकूलित असण्याची आवश्यकता नाही, फक्त पुरेसे पंखे असावेत. त्याची लोकांना एकदा माहिती झाली की सभागृह वर्षभर ‘फुल’ राहील. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून प्रकाशनासारख्या उपक्रमांना निधी मिळत राहील.

आनंदाश्रमासारख्या अनेक आदर्श संस्था पुण्यात आहेत. जुनी इमारत पाडून एक मोठा ‘मॉल’ बांधवा, या मोहाला त्या बळी पडत नाहीत, हे आपल्यावर मोठे उपकारच आहेत. त्यांना कृतज्ञपणे वंदन!

संस्थेचा पत्ता :
आनंदाश्रम, २२ बुधवार पेठ, बाजीराव रोड, पुणे - ४११००२. 
फोन : (०२०) २४४५७११९, ८२७५० ६७८४०
ई-मेल : anandashramsan@gmail.com
वेबसाइट : http://www.aanandashram-sanstha.org

संपर्क : ९८२३३ २३३७०
ई-मेल : rvgurjar@gmail.com

रवींद्र गुर्जर(‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या रवींद्र गुर्जर यांच्या ‘किमया’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/TiSWnh या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप


हेही जरूर वाचा : 

‘प्रज्ञाभारती वर्णेकरांचा आदर्श तरुणांनी घ्यावा’

 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language