Ad will apear here
Next
तू ही रे....

१९९५मध्ये आलेला मणिरत्नम यांचा ‘बॉम्बे’ हा चित्रपट अनेक गोष्टींसाठी वेगळा वाटतो आणि लक्षातही राहतो. त्यापैकी एक गोष्ट म्हणजे त्यातील अभिनेत्री मनीषा कोईराला आणि अरविंद स्वामी यांच्यावर चित्रित झालेलं ‘तू ही रे...’ हे गाणं. ए. आर. रहमान यांचं संगीत आणि हरिहरन व कविता कृष्णमूर्ती यांच्या आर्त आवाजातलं हे गाणं आजही प्रेमी युगुलांच्या मनांत खऱ्या प्रेमाची एक जाणीव जिवंत ठेवणारं असं आहे... ‘रसास्वाद’ या सदरात या वेळी पाहू या ‘बॉम्बे’ चित्रपटातील ‘तू ही रे..’ या गाण्याबद्दल.... ‘रसास्वाद’ या सदरात या वेळी पाहू या ‘बॉम्बे’ चित्रपटातील ‘तू ही रे..’ या गाण्याबद्दल....
.........................
शैलाबानोची (मनीषा कोईराला) प्राण कंठाशी आणून आतुरतेनं वाट पाहणारा शेखर (अरविंद स्वामी). ती येईल की नाही, ही जीवघेणी अनिश्चितता अनुभवणारा शेखर. आर नाहीतर पार अशा मनःस्थितीत असलेला तो, किल्ल्याच्या तटबंदीवरून चालतोय. नजर, किल्ल्याच्या आत येणाऱ्या वाटेवर जडवून असलेली. ब्लेडनं मनगटावर कट द्यायच्या विचारात..

परंपरांना छेदताना स्वतःलाही क्लेश होणारच! सागराला उधाण आलेलं, प्रचंड तगमग! हिरवट शेवाळानं भरून गेलेली ती किल्ल्याची काळीशार तटबंदी. शेवाळ म्हणजे बुरसटलेपण! अनिश्चितता. बुरसटलेपणातून आलेली शेवाळासारखीच निसरडी वाट. शेखर आणि बानोची..

दर्याचं उधाण म्हणजे जणू समाजाकडून होणारा विरोध. अशातच रहमान नावाच्या जिनिअसचं गलबलायला लावणारं संगीत. पडद्यावर लाटा. तशाच त्या मनातही उचंबळणाऱ्या. कमीत कमी वाद्य. हावी होणारा हरिहरनजींचा आवाज. अरविंदला एकदम सूट होणारा.

अखेरीस ती येते. काळा बुरखा घालून. बुरखा - परंपरा, धर्म, बंधन.. हे सगळं दर्शवणारा. पांढरा-करडा, अनिश्चित, अजिबात ठहराव नसणारा समुद्र, लाटांचं थैमान अजूनही सुरूच असलेला! काळ्याशार बुरख्याच्या आत नखशिखांत गडद निळा पोशाख घातलेली बानो खूप गोड दिसते. किल्ल्याच्या काळ्या हिरव्या पार्श्वभूमीवर तो निळा रंग अधिकच उठून दिसतो. 

जणू तो निळा रंग आता बानोचा नवीन रंग आणि तसाच तो शेखरचाही. निळा रंग – आकाशाचा, मुक्तीचा, संथतेचा. शांततेचा. प्रेमाचा नवीन रंग. रूढी, परंपरा, प्रतिष्ठा. अशाच चाली-रीतींचं प्रतीक असलेला बानोचा बुरखा, जो येता येता वाटेत कुठल्याश्या खाचेत अडकतो. प्रयत्नपूर्वक ती त्यातून आपली सोडवणूक करून घेते आणि बेभान पळत सुटते. परंपरा, रूढी यांना झुगारून देत पुढे... 

एकमेकांना पाहून दोघंही अतिशय सुखावतात. कविताचा (कविता कृष्णमूर्ती) आवाज एव्हाना प्रचंड टिपेला पोचलेला असतो. मनीषाला अगदीच सूट होणारा हा आवाज. दोघेही भेटल्यावर बानोचा चेहरा हातात घेण्याच्या विचारात असलेला शेखर नुसतेच हात समोर पसरून उभा राहतो. हात चेहऱ्याभोवती आणतो, पण जाणीवपूर्वक स्पर्श टाळतो. ती आली आहे, हे अजूनही स्वप्नवतच वाटत असल्याचे त्याचे हावभाव!

तीही अनेक अडचणींचा सामना करून आलेली अशी. कवटाळावंसं वाटतंय शेखरला, पण नाही. दोघंही फक्त हातात हात घेऊन प्रयत्नपूर्वक आवेग नियंत्रणात आणू पाहणारे. पहिल्या काही आवेगलाटा ओसरल्यावर बानो शांतपणे शेखरच्या मिठीत शिरते. त्याची मिठी ही आश्वासक आहे. प्रेमळ आहे. त्यात कसलाही अधिकार नाही. पुरुषी वासना नाही. 

बानोचं मस्तक शेखरच्या हनुवटीखाली आहे. त्याच्या विशाल, आश्वासक छातीवर विसावलंय. हे प्रेम अत्यंत वेगळं आहे. त्यात आपलेपणा आहे. आवेग येऊनही तो नियंत्रित ठेवण्याचं बळ आहे. आवेगानंतरची स्थिरता अनुभवणं आहे. हुरहूर आहे. पराकोटीच्या उत्कट प्रेमाचा हा आविष्कार आहे.

हे गाणं म्हणजे मणीच्या (मणिरत्नम) बॉम्बे चित्रपटामधला एक टर्निंग पॉइंट! यानंतर बानो आणि शेखरचा खऱ्या अर्थाने पुनर्जन्म होतो. 

‘इन साँसों का देखो तुम पागलपन के, आए नही इन्हे चैन...’ 

‘तू ही रे..’ 

- हर्षद सहस्रबुद्धे
ई-मेल : sahasrabudheharshad@gmail.com

(लेखक पुण्यात उत्पादन अभियांत्रिकी क्षेत्रात कार्यरत असून, गेली अनेक वर्षे वैविध्यपूर्ण विषयांवर लेखन करतात. त्यांचे ‘रसास्वाद’ हे सदर दर १५ दिवसांनी, मंगळवारी ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर प्रसिद्ध होते. या सदरातील सर्व लेख https://goo.gl/bBLgCE या लिंकवर उपलब्ध आहेत.)

 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language