Ad will apear here
Next
‘आयआयटी-कानपूर’मध्ये तयार झाले चांद्रयानाला दिशा देणारे सॉफ्टवेअर
भारतात असे सॉफ्टवेअर विकसित होण्याची पहिलीच वेळ


लखनौ :
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) ‘चांद्रयान-२’ येत्या १५ जुलै रोजी चंद्राकडे झेपावणार आहे. या यानाची चंद्रावरील हालचाल आणि चंद्राच्या पृष्ठभागावरील मार्ग ठरवण्यासाठी आवश्यक असलेले सॉफ्टवेअर कानपूर येथील भारतीय तंत्रज्ञान संस्था अर्थात ‘आयआयटी’मधील शास्त्रज्ञांनी विकसित केले आहे. अशा प्रकारचे सॉफ्टवेअर भारतात विकसित होण्याची ही पहिलीच वेळ आहे. चंद्राच्या पृष्ठभागावरील ठरवलेल्या ठिकाणी पोहोचण्यासाठी लागणारे इंधन आणि वेळ यांची बचत करण्यास या सॉफ्टवेअरची मदत होणार आहे. 

‘आयआयटी-कानपूर’मधील मेकॅनिकल इंजिनीअरिंग विभागातील प्रा. आशिष दत्ता आणि इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग विभागाचे प्रा. के. एस. व्यंकटेश यांनी हे सॉफ्टवेअर तयार केले असून, ‘मोशन प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट’ असे त्याचे नाव आहे. या सॉफ्टवेअरला ‘इस्रो’ने मंजुरी दिल्याचे त्यांनी सांगितले. चंद्रावर पाठविण्यात येणार असलेल्या रोव्हरसाठीचे सॉफ्टवेअर भारतात तयार केल्याची ही पहिलीच वेळ असल्याचे त्यांनी सांगितल्याचे हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तात म्हटले आहे. त्यामुळे तशी क्षमता असलेल्या देशांच्या यादीत आता भारतही पोहोचला आहे.

हे सॉफ्टवेअर असलेला रोव्हर चंद्रावर उतरल्यानंतर चंद्राच्या पृष्ठभागावरील पाणी व खनिजे शोधणार आहे. तसेच हा रोव्हर तेथील छायाचित्रे पृथ्वीवरील प्रयोगशाळेत पाठवणार असून, त्याद्वारे पुढील संशोधन केले जाणार आहे.

‘हे सॉफ्टवेअर अल्गोरिदम पद्धतीवर आधारित असून, ते विकसित करण्यासाठी सुमारे एक वर्षाचा कालावधी लागला,’ असे प्रा. दत्ता यांनी सांगितले. इंटेलिजंट कंट्रोल सिस्टीम, मायक्रो-सेन्सर आणि बायो-रोबोटिक्स या विषयांवर प्रा. दत्ता काम करतात. 

हे सॉफ्टवेअर २० वॅटच्या सोलर बॅटरीवर कार्यान्वित होईल आणि रोव्हरला चंद्राच्या पृष्ठभागावर खोदण्यासाठी मदत करील. पाणी आणि अन्य रसायनांच्या अस्तित्वाचा शोध लावण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या १५ चाचण्या या सॉफ्टवेअरद्वारे करता येतील, असा दावाही या शास्त्रज्ञांनी केला आहे.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language