Ad will apear here
Next
अस्तु : अंतर्मुख करणारी अनुभूती

सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकरांच्या सिनेमात, विषयाची गंभीर हाताळणी कायमच पाहायला मिळते. समांतर सिनेमासारख्या प्रकारात तर ती फारच महत्त्वाची असते. समस्या, समस्याग्रस्त व्यक्ती (मध्यवर्ती पात्र), इतर सहायक पात्रं, समस्येचं गांभीर्य, त्यामुळे होणारे परिणाम, पात्रांच्या भावविश्वात आणि बाह्य विश्वात होणारी खळबळ, समस्येची वाढती तीव्रता, त्यावरची उपाययोजना आणि मग येणारा क्लायमॅक्स, अशी विशिष्ट स्वरूपाची रचना ‘अस्तु’मध्येही पाहायला मिळते... ‘रसास्वाद’ या सदरात या वेळी पाहू या ‘अस्तु’ या मराठी चित्रपटाबद्दल...
.....................
सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकरसुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर ही माझी अत्यंत आवडती दिग्दर्शकद्वयी आहे. दहावी फ, वास्तुपुरुष, देवराई, नितळ, बाधा, कासव असे एकापेक्षा एक सरस पुरस्कारप्राप्त चित्रपट, लघुपट आणि दूरदर्शन मालिका या जोडीने बनवलेल्या आहेत. भावे आणि सुकथनकर यांचा सिनेमा, हा बऱ्याचदा एखादा गंभीर आजार झालेली अथवा एखादी समस्या असणारी एक व्यक्ती, त्या आजाराचा अथवा समस्येचा, त्या व्यक्तीवर आणि पर्यायानं इतरांवर होणारा परिणाम आणि यामुळे ढवळून निघणारं त्या पात्रांचं भावविश्व, या स्वरूपाच्या विषयांभोवती फिरतो. अस्तु चित्रपटाची धाटणीही साधारण अशीच आहे. 

डॉ. मोहन आगाशेअस्तु या चित्रपटामध्ये मध्यवर्ती पात्र आहे ते अप्पा तथा डॉ. चक्रपाणी शास्त्रींचं. डॉ. मोहन आगाशेंनी ते साकारलं आहे. डॉ. शास्त्री हे अत्यंत विद्वान असे संस्कृतचे प्राध्यापक आहेत. अनेक श्लोक, कविता, मेघदूत, खंडच्या खंड मुखोद्गत असणारे असे. मात्र या संस्कृत पंडिताला ‘डायमेंशिया’ म्हणजे एक प्रकारचा ‘अल्झायमर्स’ होतो. वय होतं. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून, हळूहळू त्यांना श्लोकच काय, तर घरातल्या लोकांच्या नावांचा, स्वतःच्या नावाचाही विसर पडू लागतो! नात्यांचं भान जाऊ लागतं. स्थळ-काळाचं भान जातं. विस्मरण इतकं प्रचंड, की थोड्या वेळापूर्वी केलेल्या गोष्टींचादेखील विसर पडतो. 

मिलिंद सोमणअप्पांची एक मुलगी इरा पुण्यात राहते, तर दुसरी मुलगी देविका मुंबईला. इरा (इरावती हर्षे) आणि माधव (मिलिंद सोमण) हे साधारण चाळीस-पंचेचाळिशीतलं जोडपं. काही वर्ष अमेरिकेत व्यतीत करून आता भारतात परतलेलं. माधव व्यवसायानं डॉक्टर, तर इरा गृहिणी असते. ती, माधवचा अत्यंत व्यग्र असणारा दिनक्रम, टीनएज मुलीची तंत्र/नखरे, लहान मुलाचं रूटिन इत्यादी सांसारिक जबाबदाऱ्यांमुळे व्यग्र असते. या सगळ्यांकडे पाहतानाच, तिला अप्पांनाही सांभाळावं लागतं. सांसारिक जबाबदाऱ्या आणि अप्पांचं आजारपण अशी तारेवरची कसरत तिला करावी लागते. 

अप्पा डायमेंशियामुळे त्रस्त आहेत. काहीच आठवत नसल्यामुळे आणि एकंदरच भान कमी झाल्याने त्यांना मधेच हताश, उदास वाटतं. चिडचिड होते. विचित्र वर्तन घडतं, तेही आपोआप. ठरवून, समजून नव्हे. घरातल्या सगळ्यांनाच याचा त्रास होऊ लागतो. नात आणि नातवाचं वय कमी असल्यामुळे ते आजोबांना समजून घेण्यात कमी पडू लागतात. दरम्यान घरात अप्पांमुळे विचित्र स्वरूपाचे काही प्रसंग घडतात, त्यामुळे त्यांना त्यांच्या दुसऱ्या घरी ठेवायचं असं ठरतं. दिवसभर सांभाळणाऱ्या मुलासोबत आणि स्वयंपाकपाणी पाहणाऱ्या आजींसोबत त्यांचं हळूहळू रूटिन लागतं, पण एक दिवस काही कारणांमुळे, आप्पा इराकडे रहायला जाणार असतात. इरा त्यांना स्वतःच्या घरी घेऊन जायला येते. 

वाटेत लागणाऱ्या बाजारात, तिला एके ठिकाणी काम असल्यानं, लगेचच परत यायच्या हिशोबानं ती अप्पांना गाडीमध्येच सुरक्षितरीत्या बसवून एका दुकानात जाते. तेवढ्यातच त्या बाजाराच्या ठिकाणी एक हत्ती येतो. हत्तीला पाहून, भान हरपून अप्पा गाडीतून उतरून चक्क त्या हत्तीमागे चालत जातात. हा प्रकार लक्षात आल्यावर इराचा प्रचंड गोंधळ उडतो. तिला टेन्शन येतं. ती नवऱ्याला कळवते. पोलिसांना सूचित करते. युद्धपातळीवर शोधकार्य सुरू होतं. अप्पांना झालेल्या आजारामुळे त्यांना स्वतःचं नावदेखील आठवत नाही. त्यामुळे एखादं बोलताही न येणारं लहान मूल हरवल्याप्रमाणे अवघड परिस्थिती निर्माण होते. इराच्या आयुष्यात घडलेल्या या अत्यंत अवघड आणि नाजूक अशा एका दिवसाची ‘अस्तु’ नावाची ही विलक्षण कहाणी आहे. 

समस्या, समस्याग्रस्त व्यक्ती (मध्यवर्ती पात्र), समस्याग्रस्त इतर सहायक पात्रं, समस्येचं गांभीर्य, त्यामुळे होणारे परिणाम, पात्रांच्या भावविश्वात आणि बाह्य विश्वात होणारी खळबळ, समस्येची वाढती तीव्रता, समस्येवर उपाययोजना आणि मग येणारा क्लायमॅक्स, अशी विशिष्ट स्वरूपाची, पण भावे-सुकथनकर यांच्या इतर चित्रपटांमध्ये यापूर्वीही पाहायला मिळालेली, नेहमीच्याच पठडीतली रचना ‘अस्तु’मध्येही पाहायला मिळते. पूर्वार्धात, समस्या, तिची गंभीरता, क्लिष्टता, परिणाम इत्यादी गोष्टी मांडत चित्रपट थोडा जास्त वेळ घालवतो आहे असं प्रेक्षकाला वाटू शकतंच पण पुढच्या घटना पाहताना, मागचे संदर्भ आठवून, उत्तरार्धातल्या सीन्सना दिलेला वेळ हा अत्यंत योग्य आहे हेसुद्धा जाणवतं. 

सगळी पात्रं, त्यांचे आपापसांतले नातेसंबंध, समस्या, त्यामुळे उद्भवलेली बिकट परिस्थिती, एकंदर वातावरण, लोकेशन्स या सगळ्याला अत्यंत व्यवस्थित पद्धतीने, आवश्यक तितका वेळ देऊन पूर्वार्धाची मांडणी केली गेली आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा सिनेमा अतिशय मुद्देसूद पद्धतीने समस्येची मांडणी आणि त्यावर योग्य रीतीने भाष्य करतो. भावे आणि सुकथनकरांच्या सिनेमात, विषयाची गंभीर हाताळणी कायमच पाहायला मिळते. समांतर सिनेमासारख्या प्रकारात तर ती फारच महत्त्वाची असते. दर्जेदार, मोजके आणि संस्कृतनिष्ठ संवाद हे या सिनेमाचं अजून एक महत्त्वाचं वैशिष्ट्य. ज्यांना संस्कृतचं चांगलं ज्ञान आहे, त्यांना यातले संवाद जास्त अपील होतील. सिनेमाला इंग्रजी सबटायटल्स असल्यामुळे व्यवस्थित संदर्भ लागतो; पण संस्कृत श्लोकांकरिता मात्र बऱ्याच ठिकाणी इंग्रजी सबटायटल्स दिलेले नाहीत. महत्त्वाच्या श्लोकांचे अर्थ, संवादावाटे मराठीत सांगितले जातात. परंतु पार्श्वसंगीताचा एक भाग असल्यासारखे श्लोक किंवा पात्राच्या तोंडून काही ठिकाणी पुटपुटल्यासारखे येणारे (मटर्ड) श्लोक येतात, त्यांचा अर्थ काही वेळा लागत नाही.

सिनेमाच्या एकंदर मांडणीची पद्धत पाहता, मला अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘अग्ली’ या सिनेमाची आठवण आली. अर्थाअर्थी हे दोन्हीही सिनेमे खूप वेगळे आहेत. कथानकदृष्ट्याही त्यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. ‘अग्ली’मध्ये एका लहान मुलीचं अपहरण होतं. तिचा तपास करताना, तिचे आई-वडील, नातेवाईक, पोलीस या सर्वांचे आपांपसातले संबंध, त्यातली गुंतागुंत आणि खरेखुरे भेसूर चेहरे ‘अग्ली’मध्ये सामोरे येतात. तसंच, ‘अस्तु’मध्ये हरवलेल्या आजोबांना शोधण्याच्या निमित्ताने, त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या, त्यांच्या नात्यात असणाऱ्या माणसांची एकमेकांना नव्यानं ओळख होते. आत्मपरीक्षण करण्यासाठी वाव मिळतो. प्रेक्षक म्हणून सिनेमा बघत असताना, आपणही नकळत अंतर्मुख होऊन विचार करू लागतो, चित्रपटात दाखवल्या गेलेल्या समस्येशी जोडले जातो, हेच अस्तु या चित्रपटाचं यश आहे.
 
ईरावती हर्षेझेन तत्त्वज्ञानात सांगितलेल्या गोष्टींचा एक-दोन ठिकाणी उल्लेख होतो. यांपैकी पहिली गोष्ट म्हणजे, माणसानं कायम वर्तमानात जगलं पाहिजे. भूत आणि भविष्यात नाही. इराची मुंबईला असणारी, स्वतंत्र, रॅशनल विचारसरणीची बहीण देविका तिला म्हणते, की अप्पा आत्ता त्यांची स्मृती नसलेले गृहस्थ आहेत, म्हणजे ते अप्पा नाहीतच. त्यामुळे ते नसल्यातच जमा आहेत या जगात! इराला तिचे हे विचार ऐकून प्रचंड धक्का बसतो. ती देविकाला झेन तत्त्वज्ञानातली दुसरी गोष्ट सांगते. ती म्हणजे, मुलांना त्यांच्या आई-वडिलांची काळजी फक्त स्मशानापर्यंत घेता येते आणि त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे! या दोन्ही गोष्टी, विशेषतः दुसरी गोष्ट ऐकून माझं विचारचक्र सुरू झालं. सिनेमात अनेक संवाद, ‘बिटवीन-द-लाइन्स’ स्वरूपाचे आहेत. आवश्यक तिथेच संगीताचा वापर आणि संवाद आहेत. प्रत्येक पात्र तुमच्या-आमच्यासारखं आहे. त्यात कुठेही फिल्मीपणा, बेगडीपणा नाही. घरं, वेशभूषा, चित्रीकरण स्थळं, सगळंच अगदी खऱ्या आयुष्यातल्यासारखं. 

मी कोण आहे? (कोssहं?) माझे नातेवाईक, माझी मुलं, माझे स्नेही, माझं कुटुंब म्हणजे नक्की काय? आपसांतली नाती खरी आहेत की खोटी? एकंदरीतच अस्तित्वाला काय अर्थ आहे, माझ्या आणि इतरांच्या? एकंदर आयुष्याचा उद्देश्य काय आहे? काय असावा? अनोळखी माणसं जीव लावतात आणि रक्ताची माणसं मात्र अनोळख्यासारखी वागतात, हे सगळं का होतं. कसं होतं? म्हातारपणात आधाराची गरज असते. म्हाताऱ्या माणसांना, अगदी लहान मुलांप्रमाणे जपावं लागतं. काय हवं नको ते पहावं लागतं. माणूस कसंही असलं, तरी एकदा आपलं म्हणलं, की ते आपलं असतं, त्याला अंतर देऊन चालत नाही; असा संदेश अत्यंत समर्पकरीत्या पोहोचवण्यात सिनेमा यशस्वी होतो.

अमृता सुभाषहत्तीवाल्याची बायको - चन्नम्मा (अमृता सुभाष) जेव्हा म्हणते, की बाबांच्या (अप्पा) नजरेला सगळं सारखं दिसतंय आणि त्याचा आता देव झालाय, तेव्हा तिचं हे तत्त्वज्ञान फार वेगळं आणि अद्भुत वाटतं. या सिनेमाचा ‘इमोशनल कोशंट’ उच्च पातळीचा आहे. अनेक प्रसंग पाहताना डोळ्यांत अश्रू आणि गळ्यात आवंढा अशी परिस्थिती होते. संवाद हेलावून टाकतात आणि ‘आत्मपरीक्षण करा’ असं सुचवतात. डॉ. मोहन आगाशे, इरावती हर्षे, मिलिंद सोमण, अमृता सुभाष, देविका दफ्तरदार, नचिकेत पूर्णपात्रे, इला भाटे अशी कलाकारांची दमदार फौज अस्तुमध्ये आहे. सर्वच कलाकारांचा अभिनय सुरेख झाला आहे. विशेषतः ईरावती हर्षे आणि डॉ. मोहन आगाशे यांनी आपापल्या भूमिकेचं सोनं केलंय. या दोघांसाठी आणि इतक्या सेन्सिटिव्ह विषयाच्या अर्थपूर्ण मांडणीसाठी अस्तु पाहायलाच हवा. 

सगळ्यांचं करावं लागतं म्हणून फरपट होणारी, वडिलांच्या अशा परिस्थितीमुळे थोडीशी चिडचिडी झालेली, पण हे सगळं आपल्याला करावंच लागणार आणि ती आपलीच जबाबदारी आहे, याची जाण असणारी इरा, इरावतीनं अप्रतीम साकारली आहे. देविका दफ्तरदारला छोटीशी भूमिका आहे, पण ती लक्षात राहते आणि इतक्या थोड्या वेळाच्या सीनमध्येही देविका आपली चुणूक दाखवून देते. अभिनय, दिग्दर्शन, सुरेख-बांधीव अशी पटकथा, याबरोबरच छायांकन आणि संगीत विशेष दाद देण्याजोगं! हा सिनेमा चकाचक नाही. दिखावा करत नाही. खूप काहीतरी सांगितल्याचा आव आणत नाही. ‘टू-द-पॉइंट’ प्रकारात मोडणारा हा एक ‘कंटेंट मूव्ही’ आहे. या प्रकारचे, ‘फूड फॉर थॉट’ असणारे, म्हणजेच विचारप्रक्रियेला चालना देणारे सिनेमे फारच क्वचित बनतात आणि पाहिले जातात. ते न-चुकता आवर्जून पाहायला हवेत. अनेकदा. अनुभवसमृद्ध होण्यासाठी, अंतर्मुख होण्यासाठी आणि आपलं वर्तमान (आणि पर्यायाने भविष्य ) घडवण्यासाठी! 

- हर्षद सहस्रबुद्धे
ई-मेल : sahasrabudheharshad@gmail.com

(लेखक पुण्यात उत्पादन अभियांत्रिकी क्षेत्रात कार्यरत असून, गेली अनेक वर्षे वैविध्यपूर्ण विषयांवर लेखन करतात. त्यांचे ‘रसास्वाद’ हे सदर दर १५ दिवसांनी, मंगळवारी ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर प्रसिद्ध होते. या सदरातील सर्व लेख https://goo.gl/bBLgCE या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language