Ad will apear here
Next
हुळहुळलेल्या अस्मितेचा मायावी पुळका
केंद्र सरकारच्या नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यातील त्रिभाषा सूत्राच्या शिफारशीनंतर हिंदी भाषेच्या विरोधातील सूर उमटला आणि जणू सगळ्याच दाक्षिणात्यांच्या भावना उफाळून आल्याचे भासवले गेले. ‘तमिळ लोक म्हणजे हिंदीविरोधी, त्यांची भाषिक अस्मिता हाच आदर्श आणि मराठी लोकांनी त्यांचा कित्ता गिरवावा,’ असा धडा देण्याचा प्रयत्न झाला; पण प्रत्यक्षात स्थिती वेगळी आहे. तमिळनाडूतील अनेकांनी तमिळच्या सक्तीला विरोध करून हिंदी हवी असल्याची मागणी केली आहे.
..............
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकहाती विजय मिळवून दुसऱ्यांदा पदाची शपथ घेतली. त्या शपथेचा कौतुकसोहळा पारही पडत नाही, तोच वादाची ठिणगी पडली आणि तीदेखील अत्यंत संवेदनशील विषयाची. गेल्या ५० वर्षांहून अधिक काळ ज्या विषयाने अनेक सरकारांना डोकेदुखी दिली आणि ज्याची सोडवणूक आजही दृष्टिपथात नाही, असा हा विषय. 

निमित्त झाले केंद्र सरकारच्या नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे. या धोरणाच्या मसुद्यानुसार सर्व राज्यांमध्ये त्रिभाषा सूत्र अवलंबण्याची एक शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे हिंदी भाषेच्या नावाने ठणाणा करणाऱ्या त्याच त्या व्यक्तिरेखांनी विरोधाचा सूर काढला. जणू सगळ्याच दाक्षिणात्यांच्या भावना उफाळून आल्या, असा आव आणला गेला.

आपल्याकडे दुर्दैवाने १९६५च्या दशकातील हिंदीविरोधाची स्मृतिचित्रे लोकांच्या मनातून आजही गेली नाहीत. त्यामुळे हे सूर अस्सल असल्याचे मानण्यात आले. शिवाय तमिळनाडूतील हिंदीविरोध अस्सल आहे आणि त्याची अभिव्यक्ती ठरलेली आहे, हे मानायचीही एक पद्धत पडली आहे. ती यंदाही पाळण्यात आली.

इकडे तमिळ लोकांवरून मराठीसहित अन्य भाषांच्या अस्मितेलाही फुंकर घालायचा प्रयत्न झाला. तमिळ लोक म्हणजे हिंदीविरोधी, त्यांची भाषिक अस्मिता हाच आदर्श आणि मराठी लोकांनी त्यांचा कित्ता गिरवावा म्हणजे गिरवावाच, असा कल्लाही पुन्हा त्याच उमाळ्याने करण्यात आला; मात्र वास्तव किती वेगळे होते!

दिनमलार वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेले व्यंगचित्रहा गदारोळ सुरू असतानाच ‘दिन मलर’ या तमिळ वृत्तपत्रात पहिल्या पानावर एक व्यंगचित्र प्रकाशित झाले होते. त्यात लुंगीधारी एक नेता आपल्या मुलाला म्हणतो, ‘हा हिंदीविरोध वगैरे फक्त लोकांसाठी आहे. तू गुपचूप जाऊन शाळेत हिंदी शिक.’ अन् हीच वस्तुस्थिती होती.

ज्या तमिळनाडूत १९६०च्या दशकात हिंदीच्या सक्तीच्या विरोधात हिंसक आंदोलने झाली, त्याच तमिळनाडू राज्यात अनेक पालक आणि शाळांनी तमिळच्या सक्तीविरोधात युद्ध सुरू केले आहे. त्याउप्पर मजा म्हणजे या पालकांनी व लोकांनी ‘आम्हाला हिंदी पाहिजे आहे,’ अशी मागणी केली आहे. 

हिंदीच्या सक्तीच्या विरोधात द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) हा पक्ष सदैव अग्रेसर राहिला आहे. किंबहुना या आंदोलनावर या पक्षानेच एकाधिकार मिळविला आहे, असे म्हटले तरी चालेल. या पक्षाच्या विरोधामुळेच १९६५पासून तमिळनाडूत हिंदी शिक्षण सरकारी शाळांमध्ये लागू करता आलेले नाही. दूरदर्शनवरच्या हिंदी बातम्या दाखवता येत नाहीत. या पक्षाच्या सरकारने २००६मध्ये एक अध्यादेश काढून इयत्ता दहावीपर्यंत तमिळ शिकवणे अनिवार्य केले होते. त्या आदेशाला शाळा आणि पालकांच्या एका गटाने न्यायालयात आव्हान दिले आहे. ज्या वेळी हिंदीच्या तथाकथित सक्तीच्या मुद्द्यावरून मालकीय माध्यमे व समूह माध्यमांमध्ये विरोधाचे थैमान सुरू होते, त्याच दरम्यान म्हणजे पाच जून रोजी ही याचिका सुनावणीस आली. त्यावर मद्रास उच्च न्यायालयाने राज्य सरकारकडून प्रतिसाद मागवला आहे.

हिंदी आणि इतर भाषा न शिकल्यामुळे भारतात, तसेच परदेशातही नोकरीची संधी मिळण्यात अडचण येते, असे तमिळ विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. म्हणून हिंदी शिकण्याचे प्रमाण वाढले आहे. राष्ट्रभाषा समितीसारख्या संस्थांना त्यामुळेच जास्त प्रतिसाद लाभत आहे. खरी गोम इथेच आहे. कारण विद्यार्थ्यांचा ओढा हिंदीकडे असल्यामुळे सरकारी शाळांतील उपस्थिती कमी होऊन तो लोंढा खासगी शाळांकडे वळत आहे. 

तमिळनाडूच्या शिक्षण खात्यांतर्गत येणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी आपला मोहरा केंद्रीय शिक्षण मंडळाच्या शाळेत म्हणजे सीबीएसई शाळांकडे वळवला आहे. यातील बहुतांश शाळा या द्रमुक नेत्यांच्या मालकीच्या आहेत. भारतीय जनता पक्षाचे नेते एच. राजा यांनी तर द्रमुक नेत्यांच्या हिंदी शिकवणाऱ्या शाळांची एक यादीच ट्विटरवर जाहीर केली. यात तब्बल ४५ नेत्यांची नावे आहेत आणि द्रमुकचे सर्वेसर्वा एम. के. स्टॅलिन यांची कन्या सेनतामरै सावरीशन हिचे नाव या यादीत प्रामुख्याने झळकले. ‘सरकारी शाळांमध्ये हिंदी शिकवली, तर या सगळ्यांची दुकाने बंद पडतील,’ असा शेराही राजा यांनी मारला. (ही यादी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.) 


अन्य राजकीय नेत्यांनीही या मोहिमेचे बिंग फोडले आहे. पुदिय तमिळघम पक्षाचे नेते डॉ. के. कृष्णस्वामी यांनी हिंदी भाषा हवी, या बाजूने आपले मत व्यक्त केले. ‘संपूर्ण राज्यात आम्हाला हिंदी हवी आहे, अशी मोहीम आम्ही सुरू करणार आहोत. खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांना हिंदी शिकण्यासाठी उपलब्ध असताना सरकारी शाळांच्या विद्यार्थ्यांना ही संधी देण्यापासून रोखण्यात द्रमुकसारख्या पक्षांचा काय हेतू आहे,’ असा प्रश्न कृष्णस्वामी यांनी विचारला आहे. 

हा दुटप्पीपणा इथेच थांबत नाही. ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार हिंदीची सक्ती झाली तर रक्तपात होईल,’ असा इशारा द्रमुकचे स्टॅलिन यांनी दिला होता; मात्र याच द्रमुकला मते मागताना हिंदीचा वापर करण्याचे वावडे नाही. चेन्नईच्या भिंतींवर हिंदीतून मतदारांकडे मतांचा जोगवा मागणाऱ्या पोस्टर्सची नोंद आपल्याकडे कोणी घेतली नसेल, परंतु २०११च्या निवडणुकीपासून द्रमुकतर्फे अशा पोस्टर्सचा वापर सुरू आहे. 

द्रमुकचे हिंदी भाषेतील पोस्टर

चेन्नईतील सावकारपेट या भागात श्रीमंत मारवाडी व्यापाऱ्यांची वस्ती असून, ते व्यवसायाचे केंद्रही आहे. या भागातील मारवाडी मतदारांना आकर्षित करण्यासाठी हिंदी पोस्टर्स आणि मुस्लिमबहुल भागांमध्ये उर्दू पोस्टर्स लावण्याची शक्कल कोणाची, तर स्टॅलिन यांचीच! हिंदीविरोधी आंदोलनाचे प्रतीकचिन्ह असलेल्या करुणानिधी यांचे भाचे दयानिधी मारन यांचे राजस्थानी पगडी घातलेले छायाचित्र आणि सोबत हिंदी ओळी असणारी ही पोस्टर्स इंटरनेटला आजही शोभा आणत आहेत. त्यावरही कडी म्हणजे याच दयानिधी मारन यांच्या प्रचारासाठी करुणानिधींनी स्वतः हिंदी गाणे म्हटले होते. मदुराई येथे मीनाक्षी मंदिराजवळील गल्लीत हिंदीतून प्रचार होत असताना सदर लेखकाने स्वतः पाहिलेले आहे. 

म्हणजे, सरकारी शाळांत नसलेली हिंदी द्रमुक नेत्यांच्या शाळेत येते. दूरदर्शनवर हिंदी बातम्या नसल्या, तरी हिंदी वाहिन्या सुखेनैव चालतात. या वाहिन्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचविणारा केबल उद्योग द्रमुक नेत्यांच्याच हातात. तमिळ नेत्यांचे हे कथनी आणि करणीतील अंतर लोकांच्या नजरेतून सुटलेले नाही. 

स्वभाषेचा अभिमान केव्हाही चांगलाच आणि तमिळ लोकांमध्ये तो पुरेपूर उतरला आहे. सुब्रह्मण्यम भारती यांच्यासारखा महाकवी म्हणतो, ‘यामरिंद मोळीगळिले तमिळमोळि पोल इनिदावदु एंगुम काणोम’. याचा अर्थ ‘मनुष्याला माहीत असलेल्या भाषांमध्ये तमिळसारखी गोड भाषा कोणाला माहीत आहे का?’ मात्र महाकवी भारती संस्कृत व हिंदीचेही पंडित होते. या भाषांना त्यांनी कधीही विरोध केला नाही. कारण त्यांना भाषेच्या नावावर दुकान चालवायचे नव्हते. भाषेच्या नावावर हुळहुळती अस्मिता उभी करून मायावी खेळ त्यांना करायचा नव्हता! 

हिंदीसक्तीच्या विरोधाच्या नावाखाली चाललेल्या लाथाळीत आपण भाग घेण्यापूर्वी मराठी लोकांनी याचा विचार करावा!

– देविदास देशपांडे
ई-मेल : devidas@dididchyaduniyet.com

(लेखक मुक्त पत्रकार व अनुवादक आहेत. ‘बाइट्स ऑफ इंडियावरील त्यांचे सर्व लेख https://goo.gl/wvsqQ8 या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi
Select Language