Ad will apear here
Next
डॉक्टरांनी केली पथनाट्याद्वारे स्तनपान जागृती
नौरोसजी वाडीया रूग्णालयाचा उपक्रम

मुंबई :  एखादा महत्त्वाचा विषय लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पथनाट्ये सादर करणारे कार्यकर्ते आपण अनेकदा पाहतो; पण स्तनपानाचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी नौरोसजी वाडिया प्रसूती रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकांनीदेखील पथनाट्याचा आधार घेतला. अत्यंत प्रभावी सादरीकरण करत या पथकाने स्तनपानाचे महत्त्व समजावून सांगितले. त्याबाबत असणारे गैरसमज, शंका दूर केल्या.  

मुंबईतील वाडिया हॉस्पिटलमध्ये सोमवारी झालेल्या या कार्यक्रमासाठी ७५ गर्भवती महिला आणि नवमाता उपस्थित होत्या. त्यांना स्तनपानाचे लाभ आणि तंत्र याविषयी आवश्यक माहिती देण्यात आली. ज्या मातांना स्तनपान देणे कठीण जात आहे, त्यांच्यासाठी स्तनपानाच्या विविध पद्धतींचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. स्तनपान सल्लागार, डॉक्टर आणि परिचारिका  कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. आईचे पहिले दूध म्हणजे कोलोस्ट्रम हे बाळासाठी चांगले नसते, बाळ रात्री रडत असल्यामुळे बाळासाठी आईचे दूध योग्य नाही, यासारखे गैरसमज दूर करण्यात आले.

ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा जगभरात जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा करण्यात येतो. ‘पालकांचे सबलीकरण, स्तनपानाचा प्रसार’ अशी यंदाची संकल्पना आहे. या सप्ताहाचे औचित्य साधून नौरोसजी वाडिया प्रसूती रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकांनी हा अनोखा उपक्रम राबवला.  

वाडिया रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिनी बोधनवाला म्हणाल्या, ‘वाडिया हॉस्पिटलतर्फे दर वर्षी स्तनपान सप्ताह साजरा करण्यात येतो. अजूनही महिलांमध्ये आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये स्तनपानाबद्दल अनेक गैरसमज असल्याचे दिसून येते. त्यामुळे त्यांना या संदर्भात माहिती देण्यासाठी अशा नाटुकल्यांची महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे आम्ही यंदा पथनाट्याद्वारे जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. सर्व नवजात बालकांना आईचे दूध देण्यात यावे, कारण त्याचे दीर्घकालीन सकारात्मक परिणाम होतात आणि ते बाळाच्या आरोग्यासाठीही लाभदायक असते. वाडिया हॉस्पिटलमधील मिल्क बँकेमध्ये दर वर्षी ५०० लिटर दूध साठवून ठेवण्यात येते. दररोज सुमारे १५ ते २० मुदतपूर्व प्रसूती झालेल्या आणि आपल्या बाळांना स्तनपान देण्यास सक्षम नसलेल्या मातांच्या बाळांना या दुधाचा फायदा होतो.’
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi