Ad will apear here
Next
मुंबईतील पर्यटन : काळा घोडा परिसर
‘करू या देशाटन’ या सदराच्या मागील भागात आपण मुंबईतील नरिमन पॉइंट, कफ परेड व कुलाबा या भागातील पर्यटनस्थळांची माहिती घेतली. आजच्या भागात माहिती घेऊ या मुंबईचा सांस्कृतिक इतिहास जपणारा फोर्ट भागातील काळा घोडा परिसराची.....
.........
फोर्टमधील महात्मा गांधी पथावर अनेक ब्रिटिशकालीन वारसा इमारती आहेत. अनेक व्यापारी संस्थांची कार्यालये, अनेक बँका, राज्य व केंद्र सरकारी कार्यालयेही येथे आहेत. या भागात ब्रिटिश शैलीतील जुन्या, देखण्या इमारती आहेत. 

छत्रपती शिवाजी संग्रहालय

छत्रपती शिवाजी संग्रहालय :
११ नोव्हेंबर १९०५ रोजी ब्रिटिश राजपुत्राच्या भेटीची स्मृती म्हणून याची पायाभरणी करण्यात आली. १९२२मध्ये हे संग्रहालय प्रेक्षकांना खुले करण्यात आले. या संग्रहालयाची इमारत तीन एकर जमिनीवर असून, तीन मजली बांधकाम १२,१४२ चौरस फूट आहे. इंडो-सरेसेनिक स्थापत्यशैलीत हे बांधलेले असून, मुघल, मराठा व जैन वास्तुकलेची छाप यावर आहे. आर्किटेक्ट जॉर्ज विट्टेट यांनी त्याचे संकल्पचित्र करताना गोवळकोंडा किल्ल्यावरील घुमट व विजापूरमधील गोल घुमटामधील आतील कमानी विचारात घेतल्या. तसेच अंतर्भागात छज्जा व कठडे १८व्या शतकातील मराठा वाडा शैलीप्रमाणे व खांब जैन शैलीप्रमाणे बांधण्यात आले आहेत. हे ठिकाण कलाप्रेमी, इतिहासप्रेमी आणि विज्ञानाची गोडी असणाऱ्यांची जणू पंढरीच आहे. 

जॉर्ज विट्टेटसर्वस्पर्शी असे हे एकमेव संग्रहालय आहे. सभोवताली सुंदर बाग आहे. तांबे, पितळ, कासे, तसेच पंचधातूपासून केलेल्या अतिशय सुबक अशा देवदेवतांच्या मूर्ती हेही येथील आकर्षण आहे. देश-विदेशातील नामवंत चित्रकाराच्या सुंदर कलाकृती येथे बघण्यास मिळतात. पुरातत्त्व विभागाने केलेल्या उत्खननात सापडलेल्या अनेक गोष्टी खासकरून इसवी सनापूर्वीच्या कालखंडातील बुद्धकालीन मूर्ती, वस्तू यांमुळे प्रगल्भ भारतीय संस्कृतीची ओळख होते. 

हे संग्रहालय कला, पुरातत्त्व आणि नैसर्गिक इतिहास या तीन विभागांत साकारले आहे. या संग्रहालयातील दालने पुढीलप्रमाणे - शिल्पकला गॅलरी, प्री आणि प्रोटो हिस्ट्री गॅलरी, नैसर्गिक इतिहास विभाग, भारतीय लघु चित्रकला गॅलरी, कृष्णा गॅलरी, हिमालयन आर्ट गॅलरी, मेटलवेअर गॅलरी, हाउस ऑफ लक्ष्मी - नाणे गॅलरी, कार्ल आणि मेहेरबाई खंडावाला गॅलरी, चिनी आणि जपानी आर्ट गॅलरी, सर रतन टाटा आणि सर दोराबजी टाटा युरोपियन पेंटिंग्जची गॅलरी, शस्त्रे आणि चिलखत गॅलरी, जहांगीर निकोलसन गॅलरी, प्रेमचंद रॉयचंद गॅलरी, की गॅलरी, प्रथम मजला मंडळाची गॅलरी, दुसरा मजला मंडळाची गॅलरी, युरोपियन सजावटीची आर्ट गॅलरी, बॉम्बे स्कूल गॅलरी, जहांगीर सबावाला गॅलरी, कापड गॅलरी, प्रिंट गॅलरी, क्युरेटर गॅलरी आणि संवर्धन केंद्र. 

प्रत्येक दालनात विषयाप्रमाणे अतिशय कल्पकतेने मांडणी केलेली आहे. शिल्प विभागात देश-विदेशांतील मूर्तिकलेचे नमुने बघण्यास मिळतात. पुरातत्त्व विभागात नाणी, बौद्ध संस्कृतीच्या खुणा, शस्त्रे, मेसोपोटेमिया संस्कृतीतील काही वस्तू, मातीच्या वस्तू, नाणी, ख्रिश्चन-लाकडी कोरीव कामाचे नमुने, प्राचीन काळातील मातीची भांडी, हस्तिदंतावरील कोरीव काम, गंधर्व, मथुरा, गुप्त काळातील वस्तू बघण्यास मिळतात. अल्लाउद्दिन खिलजीची तलवार (खांडा) आणि सन १५९३ सालचे सम्राट अकबराचे चिलखत आणि ढाल ही या दालनाची प्रमुख आकर्षणे आहेत. 

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने म्युझियम ट्रस्टला नैसर्गिक इतिहास विभाग तयार करण्यासाठी साह्य केले. हा विभाग फ्लेमिंगो, ग्रेट हॉर्नबिल, इंडियन बायसन आणि वाघांसह इतर भारतीय वन्यजीवनाची ओळख करून देतो. संग्रहालय पाहताना अश्मयुगीन काळापासून सुरू झालेला मानवी इतिहास उलगडत जातो. तसेच भौगोलिक नैसर्गिक परिवर्तनाचीही जाणीव होते. इतिहास तर पावलोपावली दिसून येतो. शेकडो वर्षांपासून ते आतापर्यंतच्या कलाकारांच्या कलाकृतींमधील जादू मोहित करते. प्रत्येक दालन वैशिष्ट्यपूर्ण आहेच. यासाठी मुंबईतील अनेक तत्कालीन प्रतिष्ठित नागरिकांनी, उद्योगपतींनी त्यांच्या व्यक्तिगत मालकीच्या सुंदर वस्तू दिल्या आहेत. इ. स. १६४९मधील रामायणाची सुमारे २०० लघुचित्रे, तसेच अनेक प्राचीन कलात्मक चित्रे या ठिकाणी पाहावयास मिळतात. 

आता राणीच्या बागेत असलेला काळा घोडा पुतळा

काळा घोडा परिसर :
१८७५ साली इंग्लंडचा राजा किंग एडवर्ड सातवा (प्रिन्स ऑफ वेल्स) याने मुंबईस भेट दिली होती. त्याची आठवण म्हणून त्याचा हा भव्य अश्वारूढ पुतळा या ठिकाणी उभारण्यात आला. सर अल्बर्ट अब्दुल्ला डेव्हिड ससून यांनी हा पुतळा भेट दिला होता. सातव्या एडवर्डचा हा पुतळा त्याच्या नावाने कधीच ओळखला गेला नाही. तो ‘काळा घोडा’ म्हणूनच मुबईकरांना माहिती आहे. हा पुतळा १९६५मध्ये जिजामाता उद्यानात (राणीची बाग) हलविण्यात आला; मात्र हा परिसर काळा घोडा म्हणून ओळखला जाऊ लागला. या जागी आता २५ फूट उंचीचा फक्त घोडा (यावर कोणताही स्वार नाही) नव्याने बसविण्यात आला आहे. अल्फाज मिलर यांनी डिझाइन केलेले हे शिल्प शिल्पकार श्रीहरी भोसले यांनी साकारले आहे. काळा घोडा असोसिएशनने यासाठी प्रयत्न केले होते. हा परिसर मुंबईतील कला संस्थांचा परिसर म्हणूनही ओळखला जातो. दर वर्षी काळा घोडा परिसरात ‘काळा घोडा फेस्टिव्हल’ भरविला जातो. हा भाग मुंबईमधील आर्ट डिस्ट्रिक्ट म्हणूनही ओळखला जातो. (काळा घोडा फेस्टिव्हलसंदर्भात सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

जहांगीर आर्ट गॅलरी

जहांगीर आर्ट गॅलरी :
कलाकारांना आपली कला प्रसिद्धी व व्यावसायिकदृष्ट्या लोकांसमोर मांडण्यासाठी मुंबईसारख्या मोठ्या आंतरराष्ट्रीय प्रसिद्धीच्या शहरात असा प्रदर्शन हॉल नव्हता. मुंबईत अनेकांना अशा कलादालनाची उणीव भासत होती. के. के. हेब्बर आणि होमी भाभा यांच्या आग्रहानुसार सर कावसजी जहांगीर यांनी याची स्थापना केली. यासाठी बॅरिस्टर व्ही. व्ही. ओक, चित्रांचे संग्राहक डॉ. होमी भाभा, चित्रकार के. के. हेब्बर, वॉल्टर लँगहॅमर, कलासमीक्षक रऊडी व्हॅन लायडन अशा अनेकांनी प्रयत्न केले. या इमारतीचा संपूर्ण खर्च कावसजी जहांगीर यांनी केला होता. त्यांनी यासाठी सुमारे ६० लाख रुपये देणगी दिली. इमारतीचे संकल्पचित्र इमारत दुर्गा बाजपेयी यांनी केले आहे. 

कावसजी जहांगीरप्रवेशद्वारावर पुढे आलेले शिंपल्याच्या आकाराचे काँक्रीटचे छत अहे. सभागृह आणि कलादालन अशा दोन्ही उद्देशाने ही गॅलरी बांधली आहे. २७०० चौरस फुटाचे ऑडिटोरियम कम आर्ट गॅलरी आणि ३७०० चौरस फुटांची मोठी आर्ट गॅलरी असे या इमारतीचे दोन प्रमुख भाग आहेत. १९५२मध्ये हे कलादालन अस्तित्वात येऊन मुंबईच्या सांस्कृतिक वैभवात भर पडली. १९६०मध्ये कलादालन वातानुकूलित करण्यात आले. २०१२मध्ये सभागृहाचे नूतनीकरण करून तेही वातानुकूलित करण्यात आले. आज अनेक कलाकारांना त्यांची कला लोकांपर्यंत पोहोचविण्याची मोठी संधी मुंबईत या कलादालनमुळे उपलब्ध आहे. ‘जहांगीर’मध्ये असंख्य प्रदर्शने झाली व सतत होत असतात. एम. एफ. हुसेन, एस. एच. रझा, जहांगीर सबावाला, माधव सातवळेकर, एम. आर. आचरेकर यांच्यासारख्या भारतीय चित्रकारांप्रमाणे परदेशी कलाकारांनीही येथे हजेरी लावली आहे. 

वेलिंग्टन फाउंटन

वेलिंग्टन कारंजे :
छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयासमोरील चौकात (डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक) भव्य वर्तुळाकार जागेत हे अष्टकोनी कारंजे १८६५मध्ये उभारण्यात आले. ब्रिटिश सैन्याने प्लासीची लढाई व १८५७च्या युद्धात दाखवलेल्या शौर्याचे प्रतीक म्हणून हे कारंजे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला, तेच वेलिंग्टन फाउंटन. ड्यूक ऑफ वेलिंग्टन ही ब्रिटिश शासनातील मानाची पदवी आहे. युद्धात केलेल्या कामगिरीबद्दल ही पदवी ऑर्थर वेलस्ली याला देण्यात आली होती. त्यामुळे वेलिंग्टन सर्कल असे नाव ठेवण्यात आले. लेफ्टनंट कर्नल जे. जे. स्कॉट या स्थापत्यकाराने याचे संकल्पचित्र केले. रॉयल इंजिनीअर्सचे जनरल ऑगस्टस फूलर यांच्या पर्यवेक्षणाखाली निओक्लासिकल शैलीत ते बांधून पूर्ण करण्यात आले. याचे नूतनीकरण करण्यात आले असून, त्यात मार्बलमधील मूळ शिल्पाचा वापरही करण्यात आला आहे. (या कारंज्याबद्दल सविस्तर माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

वेलिंग्टन फाउंटन

नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट :
वेलिंग्टन सर्कलमधील कावसजी जहांगीर हॉलमध्ये हे संग्रहालय आहे. ही इमारत आर्किटेक्ट जॉर्ज विट्टेट यांच्या प्लॅनप्रमाणे १९११मध्ये कावसजी जहांगीर यांनी बांधली. ही इमारत सुरुवातीला मैफलीचे ठिकाण होती. नंतर १९५४मध्ये तिचे आर्ट गॅलरीत रूपांतर करण्यात आले. भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयामार्फत या संग्रहालयाची स्थापना १९९६मध्ये करण्यात आली. संपूर्ण देशातील कलाकारांच्या कलाकृतींना प्रोत्साहित करण्यासाठी हे केंद्र निर्माण करण्यात आले. 

नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट

मॅडम कामा रोड :
वेलिंग्टन सर्कलपासून मंत्रालयाकडे गेलेल्या रस्त्याचे नाव आहे मॅडम कामा रोड. या भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील प्रमुख महिला नेत्या होत्या. २२ ऑगस्ट १९०७ रोजी स्टुटगार्ड येथील आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत भारताचा झेंडा सर्वप्रथम फडकावताना कामा म्हणाल्या होत्या, ‘माझ्या स्वतंत्र भारताचा हा तिरंगा झेंडा मी हातात धरून फडकवीत आहे. स्वातंत्र्यप्रेमी म्हणविणाऱ्या या परिषदेतील सदस्यांना स्वतंत्र हिंदुस्थानचे मानचिन्ह असणारा हा तिरंगा आव्हान देत येथे फडकत आहे. या ध्वजाला प्रणाम करा.’ त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या निकटवर्ती होत्या. 

वॉटसन हॉटेल : ही इमारत आता एस्प्लनेड मॅन्शन म्हणून ओळखली जाते. काळा घोड्यासमोरच ही भारतातील सर्वांत जुनी ओतीव लोखंड वापरून तयार केलेली पहिली इमारत आहे. त्या काळच्या मापदंडाप्रमाणे ते भारतातील पहिले पंचतारांकित हॉटेल होते. या इमारतीचे फॅब्रिकेशन इंग्लंडमध्ये झाले होते. नंतर ते भारतात जोडले गेले. अब्दुल हक याना ९९९ वर्षांच्या कराराने ही जागा ९२ रुपये १२ आणे वार्षिक भाड्याने देण्यात आली होती. सध्या ही इमारत मोडकळीला आलेली आणि धोकादायक आहे. इटालियन वास्तुविशारद रेन्झो पियानो यांनी या इमारतीची सद्यस्थिती लोकांच्या नजरेपुढे आणली. त्यांच्या प्रयत्नांचा परिणाम म्हणून ही इमारत जून २००५मध्ये न्यूयॉर्कमधील वर्ल्ड स्मारक फंडाच्या यादीमध्ये सूचीबद्ध करण्यात आली आहे. या हॉटेलमध्ये पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान मोहंमद अली जिना येत असत. या हॉटेलमध्ये सर्व सेवक इंग्लंडमधील असायचे. त्यामुळे लोक गमतीने म्हणायचे ‘येथील हवासुद्धा इंग्लडची असते.’ असे म्हणतात, की जमशेटजी टाटा यांना या हॉटेलमध्ये प्रवेश नाकारला होता. म्हणून त्यांनी इर्ष्येने ताजमहाल हॉटेल बांधले. 

डेव्हिड ससून लायब्ररीडेव्हिड ससून लायब्ररी : हे मुंबईतील प्रसिद्ध ग्रंथालय असून, देखणी वारसा वास्तू आहे. शहराच्या मध्यभागी असलेल्या ग्रंथालयाची कल्पना प्रसिद्ध बगदादी ज्यू समाजसेवक डेव्हिड ससून यांचा मुलगा अल्बर्ट ससूनची यांची होती. या इमारतीचे संकल्पचित्र आर्किटेक्ट जे. कॅम्पबेल आणि जी. ई. गोसलिंग यांनी बनवले होते. १८७०मध्ये ही इमारत पिवळ्या मालाड दगडाने बांधली गेली आहे. 

एल्फिन्स्टन कॉलेज : ही मुंबई विद्यापीठाशी संलग्न उच्च शिक्षण संस्था आहे. १८५६मध्ये स्थापन केलेले हे मुंबई विद्यापीठाच्या सर्वांत जुन्या महाविद्यालयांपैकी एक आहे. लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वीरचंद गांधी, बद्रुद्दीन तैयबजी, फिरोजशाह मेहता, काशिनाथ त्र्यंबक तेलंग, जमशेटजी टाटा आणि दादाभाई नौरोजी यांच्यासारख्या नामांकित प्राध्यापकांनी येथे काम केले आहे. काळा घोडा परिसरातील ही देखणी इमारत मुंबईचे वैभव आहे. 

कसे जाल काळा घोडा परिसरात?
मुंबईतील काळा घोडा परिसर छत्रपती शिवाजी टर्मिनसपासून चालत जाता येण्याएवढा जवळ आहे. 

(या लेखासाठी निवृत्त अधीक्षक अभियंता श्री. नारायणे यांचे मार्गदर्शन मिळाले आहे.) 

- माधव विद्वांस

ई-मेल : 
vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी आणि शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)

(मुंबईतील पुरातन वारसा वास्तूंबद्दल माहिती देणारे, आर्किटेक्ट चंद्रशेखर बुरांडे यांनी लिहिलेले  लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language