Ad will apear here
Next
साच्यांच्या जमान्यात हस्तकौशल्यातून मूर्ती साकारणारा कलावंत
देवरुखमधील उदय भिडे साकारतात केवळ शाडू मातीच्याच गणेशमूर्ती
हस्तकौशल्यातून गणेशमूर्ती साकारताना उदय भिडे.देवरुख : वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी अलीकडे साच्यातून झटपट गणेशमूर्ती तयार करण्यावर भर दिला जातो; मात्र देवरुखातील (ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) एका मूर्तिशाळेत फक्त हस्तकौशल्यातूनच मूर्ती साकारल्या जातात. शाडूच्या मातीपासून तयार केल्या जाणाऱ्या या मूर्ती अत्यंत सुबक असतात. देवरुखच्या मधल्या आळीतील या मूर्तिकाराचे नाव आहे उदय भिडे. सध्या ६३ वर्षांचे असलेले भिडे गेली ३३ वर्षे ही कला जोपासत आहेत. 

कोकणात गणेशोत्सवाला अनन्यसाधारण महत्व आहे. येथे सार्वजनिक उत्सवांचे प्रमाण कमी असून, घरगुती मूर्तींची प्रतिष्ठापना मोठ्या प्रमाणावर होते. दर वर्षी घरांची संख्या वाढत असल्याने मूर्तींची ऑर्डरही वाढते. त्यामुळे मूर्तिकार पेण किंवा पनवेलमधुन आयत्या मूर्ती आणून त्यावर रंगरंगोटी करून देतात. तसेच काम झटपट होण्यासाठी साचेही वापरले जातात. त्यामुळे कमी कालावधीत अधिक मूर्ती तयार होत असल्या, तरी हस्तकौशल्य असणारे कलाकार कमी होत चालले आहेत. ही कला काही मोजक्या मूर्तिशाळांमध्ये जपली जाते. त्यापैकीच एक म्हणजे उदय भिडे. 

उदय गजानन भिडे यांना २२व्या वर्षी मूर्तिकलेची आवड निर्माण झाली. त्या काळात त्यांना हे तुमचे काम नव्हे, असे काहींनी हिणवले होते. यातूनच त्यांनी मूर्तिकला करायचीच या हट्टाने पेटून उठून देवगड (सिंधुदुर्ग) येथील अण्णा पावसकर यांच्या कारखान्यात काम करण्यास सुरुवात केली. माती भिजवण्यापासून काम सुरू करून पुढे ते हस्तकलेतून मूर्ती घडविण्यात निपुण झाले. १९८६मध्ये देवरुखात त्यांनी स्वतःचा कारखाना सुरू केला. पाच मूर्तींच्या ऑर्डरपासून सुरू झालेल्या कारखान्यातील मूर्तींची संख्या काही वर्षांतच ५५०वर गेली; मात्र आपल्याकडच्या मूर्ती शाडूच्या मातीच्याच असाव्यात, या भावनेने काम करणाऱ्या भिडेंनी २००७मध्ये आपला व्यावसायिक कारखाना बंद केला. १९९४ ते ९७ या काळात त्यांनी मुंबईतही मूर्तिशाळा सुरू केली. तिथेही खूप ऑर्डर्स मिळाल्या, नंतरच्या काळात त्यांनी देवरुखातून मूर्ती मुंबईत पाठवल्या. काहीही झाले तरी प्लॅस्टर ऑफ पॅरिस आणि साच्याचा आधार घ्यायचा नाही, असा निर्धार केलेले उदय भिडे गेली नऊ वर्षे परिसरातील ५० निवडक ग्राहकांनाच हस्तकलेतून मूर्ती साकारून देत आहेत. 

जुनी मॅट्रिक झालेले उदय भिडे पेशाने ठेकेदार आहेत. ते देवरुखात जांभूळ पोळीचाही व्यवसाय करतात. वर्षभर सुरू असलेल्या या व्यापातून वेळ काढून ते दर वर्षी न चुकता शाडूच्या मातीपासून हस्तकलेतून सुंदर गणेशमुर्ती साकारून अर्थार्जनाबरोबर कलेची आराधनाही करत आहेत. 

आजच्या व्यावसायिक युगात झटपट पैशाच्या मागे न धावता कलेची आराधना करणाऱ्या भिडेंचे वेगळेपण नक्कीच नोंद घेण्यासारखे आहे.

संपर्क :
उदय भिडे : ९५५२८ ०१९५६
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi