Ad will apear here
Next
भर्तृहरीचे नीतिशतक – पूर्वार्ध
कालिदास, बाण, भवभूती, माघ आणि श्रीहर्ष हे पाच संस्कृत महाकवी होऊन गेले. त्याच परंपरेतील भर्तृहरीची शतकत्रयी शतकानुशतके लोकप्रियता टिकवून राहिली. आजही त्यांचा अभ्यास होत असतो. त्यातील ‘नीतिशतका’बद्दल लिहीत आहेत ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर, त्यांच्या ‘किमया’ या सदरात... आज पूर्वार्ध...
.........
सुश्लोक वामनाचा अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची।
ओवी ज्ञानेशाची तैसी आर्या मयूरपंतांची।।

हे एक प्रसिद्ध वचन आहे. सुदैवाने संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर लोकांना चांगले ज्ञात आहेत. मग भले गाथा किंवा ज्ञानेश्वरी वाचलेली असो वा नसो! अहो, पण हे वामन आणि मयूरपंत कोण? मोरोपंत आणि वामन पंडितांना ओळखणाऱ्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. त्यांचे रसाळ आणि प्रासादिक काव्य पाठ करण्याची परंपरा आमच्या लहानपणी होती. आता पाठांतर हा प्रकार इतिहासजमा झाला आहे. हवी ती गोष्ट मोबाइलवर तात्काळ मिळते. महाकवी कालिदासापासून अनेक थोर कवी भारतभूमीत होऊन गेले. त्या प्रत्येकाचे एकेक स्वतंत्र वैशिष्ट्य होते - आहे. भर्तृहरीची ‘शतकत्रयी’ म्हणजे एक अमूल्य असे ज्ञानभांडारच आहे. भाषा, तत्त्वज्ञान, चिंतन, प्रदीर्घ अनुभव यांच्यावरील प्रभुत्वाची परिणती म्हणजेच नीतिशतक, शृंगारशतक आणि वैराग्यशतक. 

आपल्या संशोधकांना ‘एकाचे दोन’ करण्याची भारी हौस असते! उदाहरणार्थ - व्यासांनी वेदांची व्यवस्था लावली म्हणजे मूळ ऋचांचे संपादन करून त्याचे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद असे चार भाग केले. व्यासांनीच महाभारत आणि १८ महापुराणे लिहिली. एक व्यक्ती एवढे अफाट काम कसे करू शकेल? तेव्हा ‘व्यास’ ही एक गादी किंवा परंपरा असली पाहिजे. अनेक जणांनी ते काम केलेले आहे. एक माणूस एवढा विद्वान आणि इतक्या क्षमतेचा कसा असेल! भगवान कृष्णालाही संशोधकांनी सोडले नाही. गोकुळात गोपींबरोबर रासक्रीडा करणारा कृष्ण आणि गीता सांगणारा कृष्ण एक असणे अशक्य! त्या वेगळ्याच दोन व्यक्ती असाव्यात. पुढे आख्यायिकांमधून त्यांना ‘एक’ करण्यात आले, इत्यादी. ज्ञानेश्वर एक का दोन? 

राजा भर्तृहरीहा एवढा लेखनप्रपंच कशासाठी, तर भर्तृहरी एक का अनेक? राजा भर्तृहरी वेगळा, नाथपंथी अधिकारी भर्तृहरी वेगळा, शतकत्रयी लिहिणारा आणखी नंतरचा, अशा समजुती आहेत. आपले नाव, स्थळ, काळ यांचा स्पष्ट उल्लेख करण्याची पद्धत जुन्या काळी नव्हती. लोकांच्या हितासाठी लेखन होत होते. कोणीही आपले ‘कॉपीराइट’ लिहून ठेवले नाहीत. हे बरोबर का चूक हा वेगळा प्रश्न आहे. 

इ. स. पूर्व पहिल्या शतकातील शककर्ता राजा विक्रमादित्य याचा भर्तृहरी हा थोरला भाऊ. तोच आधी उज्जैन येथे राज्य करत होता. कालिदास त्याच्या समकालीन होता. राजा भर्तृहरी आपल्या पत्नीच्या वर्तनामुळे/विरहामुळे दु:खी झाला. त्यामुळे वैराग्य प्राप्त होऊन त्याने राज्यकारभार विक्रमादित्याकडे सोपवला आणि वनात निघून गेला. गोरक्षनाथांचा अनुग्रह प्राप्त होऊन तो नाथसंप्रदायातील एक महत्त्वाचा योगी बनला. ही झाली एक आख्यायिका. भर्तृहरी सातव्या शतकात होऊन गेला असेही मानतात. काहीही असो, त्याने जीवनाचा सर्वांगीण अभ्यास केलेला होता. चारही पुरुषार्थ उत्तमपणे संपादले. 
आपले अनुभव लोकांच्या कल्याणार्थ त्याने काव्यरूपात उतरवले. त्यांचे तीन विभाग पाडले. तेच नीतिशतक, शृंगारशतक आणि वैराग्यशतक या नावाने प्रसिद्ध झाले.

शतक म्हणजे शंभरच श्लोक आहेत असे नाही. निरनिराळ्या आवृत्त्यांमध्ये नीतिशतक ११७ ते १४६ श्लोक, शृंगारशतक १०८ श्लोक आणि वैराग्यशतक १०० ते १२१ श्लोक, अशी संख्या आहे. ते संस्कृतमध्ये लिहिलेले आहेत. वामन पंडितांनी १७व्या शतकात म्हणजे रासदास स्वामींच्या काळात या शतकत्रयीचे मराठीत समश्लोकी भाषांतर केले. आधुनिक काळात कै. ल. गो. विंझे यांनी अधिक सुलभपणे, निरनिराळ्या वृत्तांमध्ये मराठी काव्य लिहिले आहे. 

योगी भर्तरीनाथकालिदास, बाण, भवभूती, माघ आणि श्रीहर्ष हे पाच संस्कृत महाकवी होऊन गेले. त्याच परंपरेतील भर्तृहरीची शतकत्रयी शतकानुशतके लोकप्रियता टिकवून राहिली. आजही त्यांचा अभ्यास होत असतो. त्यातील ‘नीतिशतका’चा आपण थोडक्यात परामर्श घेऊ. संपूर्ण रचना मुळातून, मराठी अर्थांसह वाचणे आवश्यक आहे, हे मात्र लक्षात ठेवावे. 

‘नीतिशतका’चे सार 
स्थलकालातील ज्ञानघन आत्मस्वरूपाला प्रथम वंदन केलेले आहे. 
अडाणी व ज्ञानी व्यक्तीचे समाधान करणे सोपे, परंतु अर्धवट गर्विष्ठाची ब्रह्मदेवसुद्धा समजूत घालू शकत नाही. विद्वानांच्या समोर अज्ञ माणसाने मौन स्वीकारावे. साहित्य-संगीत-कलाविहीन व्यक्ती म्हणजे शिंग आणि शेपूट नसलेला पशूच होय! असे लोक गवत खात नाहीत, हे प्राण्यांचे भाग्यच होय. विद्या, तपश्चर्या, दातृत्व, ज्ञान, शील, सद्गुण आणि धर्माचे पालन यांचा अभाव असलेला माणूसही जनावरच म्हटला पाहिजे. ‘आपण मूर्ख आहोत’ याचे ज्ञान होणे, म्हणजे गर्व संपून ज्ञानाकडे वाटचाल सुरू. हेकट आणि मूर्ख लोकांच्या नादी लागू नये. अशुद्ध (अभद्र) वाणी उच्चारणारे मुख म्हणजे गुदद्वारच! मूर्खांना उपदेश म्हणजे त्यांना क्रोधी करणे. पती आंधळा असेल तर पत्नीचा नट्टापट्टा जसा व्यर्थ, तसेच निर्बुद्ध श्रोत्यांसमोर सर्वज्ञाचे वक्तृत्व फोल ठरते. अवघड डोंगरदऱ्यांत रानटी माणसांची वा पशूंची संगत परवडली, पण स्वर्गातसुद्धा मूर्खांची साथ नको. हा झाला पहिला ‘मूर्खविभाग.’

दुसरा भाग ‘काव्य-शास्त्र-विद्वानां’विषयी आहे. विद्वान, पंडितांना दारिद्र्यात राहावे लागत असेल, तर तिथला राजा मंदमती असला पाहिजे. तो रत्नाची किंमत, ओळख नसलेला गाजर-पारखीच होय. विद्यारूपी गुप्त धन ज्यांना लाभले, त्यांच्यासमोर गर्व करू नका - त्यांच्याशी स्पर्धा अशक्य आहे. आत्मज्ञानी पंडितांचा कधीही अपमान करू नका. त्यांना संपत्तीच्या मोहाने बंधनात टाकता येत नाही. राजा गुणीजनांचा छळ करू शकेल; पण त्यांचे गुण थोडेच हरण करता येतील! स्नान, केश-वेशभूषा, अलंकारांनी माणसाला शोभा येत नाही. संस्कारयुक्त वाणी हाच एकमेव व मूल्यवान अलंकार आहे. धन नव्हे, तर विद्याच राजांना पूज्य वाटते. अंगी क्षमा असेल तर स्वरक्षणासाठी कवचाची काय गरज? क्रोध असेल तर आणखी वेगळा शत्रू नकोच. चांगले मित्र हीच आपली औषधे, सुविद्या धनाहून श्रेष्ठ आणि विनय हेच भूषण. काव्य आणि कला असेल तर त्यापुढे राज्यही त्याज्य ठरते. प्रासादिक रचना करणाऱ्या महाकवींचा सदैव जयजयकार होतो. त्यांच्या कीर्तीला वार्धक्य वा मृत्यू यांचे भय नसते. लोभ हाच दुर्गुण, दुष्टपणा हेच पातक. सत्य हीच तपश्चर्या (दुसरे काही तप करण्याची गरज नाही). मन शुद्ध असल्यास तीर्थाटनाची गरजच नाही. सत्कीर्तीसारखा अलंकार नाही. दुष्कीर्ती हेच मरण. गुणी माणसांची भेट हाच मोठा लाभ; मूर्खांची संगत म्हणजे दु:खच; ज्याने इंद्रियांवर विजय मिळवला तोच खरा शूर, विद्या हीच संपत्ती; प्रजा आज्ञा पाळते तीच आदर्श राजसत्ता. दुसऱ्याचे मन ओळखणे, हेच खऱ्या बुद्धीचे फळ होय. 

पुढचा विभाग ‘क्षुद्र, भेकड आणि मानी पुरुष’ असा आहे. क्षुद्र व्यक्तींना क्षुद्र वस्तूंमुळेही समाधान होते, तिची क्षुद्रता जाणवत नाही. संकटात शौर्य दाखवणे योग्य, पलायन करणे नव्हे. मानी व्यक्ती अडचणींच्या काळातही आपले सत्त्व सोडत नाही. क्षुद्र, लाचार लोक स्वार्थासाठी कोणापुढेही गडबडा लोळतील, परंतु मानी व्यक्तीला मदत स्वीकारण्यासाठीसुद्धा अनेक आर्जवे करावी लागतात. मानी, तेजस्वी लोक कसे असतात? भूक, थकवा, वार्धक्य, अवदशा आली; तेज संपले, अगदी प्राण कंठाशी आले, तरी मानी लोक आपले स्वत्व सोडत नाहीत. ज्याच्या जन्माने वंशाची कीर्ती, उन्नती होते तोच खरा जन्मला. थोर पुरुषांची इच्छा म्हणजे एक तर सर्वांच्या शिरोभागी शोभावे किंवा कोणाच्या लक्षात न येता रानात सुकून जावे. तेजस्वी व्यक्ती दुर्बल झाली, तरी आपल्या योग्यतेच्या मोठ्या लोकांशीच झुंजते. सज्जनांची थोरवी वर्णनापलीकडची असते. तेजस्वी व्यक्ती दुसऱ्याने केलेला अपमान सहन करू शकत नाही. सिंहाचे पिल्लूही मदमस्त हत्तीवर तुटून पडते. तो शूरांचा स्वभावच आहे. तेज वयावर अवलंबून नसते. सत्यव्रती तेजस्वी पुरुष निर्मल मनाच्या मातेसाठी मात्र कोणतीही प्रतिज्ञा मोडू शकतात (स्वतत्त्वाविरुद्ध असली तरी). दैवगती फिरली तरी थोर पुरुष क्षुद्र, हलके काम करत नाहीत. धैर्यवान पुरुष पडला, तरी पुन्हा उसळी घेऊन वर येतो, मातीच्या ढेकळासारखा पडून राहत नाही. महापुरुषाला अथांग, विशाल महासागराची उपमा देतात. त्यात पर्वतांचा समुदाय आहे, शत्रूंची सेना (प्राणी) आणि वडवानल आहे - इतकेच काय तर शेषशायी विष्णूही पहुडलेला आहे. या सर्वांना समुद्र लीलया सामावून घेतो. महापुरुषांची शक्ती तशीच अफाट असते. 

नीच, दुर्जन, विभाग : दुर्जन व्यक्ती कशानेच बधत नाही. त्यांचा स्वभावधर्म म्हणजे निर्दयपणा, भांडकुदळ, परधन व परस्त्रीलोभ, आप्त-सज्जनांचा दुस्वास करणे. दुर्जन पंडित असला, तरी त्याची संगती टाळावी. तो मस्तकी रत्न धारण करणाऱ्या सर्पासाखाच असतो. गुणांचा द्वेष करणाऱ्या दुष्टाकडून त्याच्या बांधवांना काय सुख मिळणार! उपद्रवी नसलेल्या सज्जन व्यक्तींचे दुर्जन हे अकारण वैरी असतात. दुष्ट लोक सर्वच गुणांची निंदा करतात. त्याच्या दृष्टीने व्रत म्हणजे ढोंग, शौर्य ते क्रौर्य, मुनींना वंदन हा वेडगळपणा, प्रियभाषण म्हणजे लाचारी, स्वाभिमान हा गर्व आणि सहनशीलता म्हणजे दुर्बलता असते. परोपकारी लोक कसे असतात? वैभव प्राप्त झाले तरी ते नम्रता सोडत नाहीत, केलेल्या उपकारांचा गर्व करत नाहीत. त्यांच्या कामाला विद्येने, हाताला दानाने, देहाला परोपकाराने शोभा येते. ते सहजगत्या, स्वत: पुढाकार घेऊन परहिताची कामे करतात. 

संत-सज्जन, महात्मे यांची थोरवी : न्याय्य पण प्रियवृत्ती, प्राणांशी बेतले तरी वाईट कृत्य न करणे, कोणाकडेही याचना न करणे, संकटातही धीर राखणे असे सज्जनांचे असिधाराव्रत असते. दान गुप्तपणे देणे, अतिथीचा सत्कार, उपकारांची कधीही वाच्यता न करणे, संपत्तीचा गर्व न करणे, दुसऱ्याची टवाळी कधीच न करणे हे त्यांचे गुणविशेष होय. त्याग, गुरूंना वंदन, सत्यवचना, शांतहृदय, अतुल शौर्य (धैर्य) हेच त्यांचे ऐश्वर्य. दुर्जनांना ते क्षमेने लज्जित करतात. शुद्धचरित थोरांनी हाती घेतलेले कार्य, संकटांचे डोंगर मध्ये आले तरी पूर्ण होणारच. वैभवकाळी थोरांचे हृदय कमलासमान कोमल, परंतु संकटकाळी मात्र पाषाणासारखे कठीण होते. अशा संतांची सेवा केलीच पाहिजे. त्यांचे सहज बोललेले शब्दसुद्धा शास्त्रवचन असते. एकदा आपला मानला (शिष्य) की सज्जन त्याचे सदैव परिपालन करतात, कल्याण करतात. 

सद्वर्तन, कार्यकुशलता : जगाला स्थिरता देणारे कार्यकुशल लोक थोडेच असतात. ते आप्तांशी सौजन्य, नोकरांशी ममत्व, शठाशी शाठ्य, संतसज्जनांशी प्रेम, शत्रूबरोबर शौर्य, विद्वानांशी निष्कपटता, वडिलधाऱ्यांशी क्षमावृत्ती, स्त्रियांशी धूर्तपणा - याप्रमाणे उचितपणे वागतात. अहिंसा, परद्रव्याचा अपहार न करणे, मन ताब्यात ठेवणे, सत्यवचन, यथाशक्ती दान, सर्वांशी विनम्रभाव, हाच शास्त्रोक्त हिताचा मार्ग आहे. तोच सद्वर्तनी लोक आचरतात. सज्जनांची लक्षणे म्हणजे सत्संगाची इच्छा, गुणीजनांवर प्रेम, विद्येचे व्यसन, ज्येष्ठांशी नम्र, आपल्या पत्नीवरच प्रेम असणे, लोकनिंदेची भीती, मन:संयम, दुष्टांपासून अलिप्त असणे आणि ईश्वराची भक्ती. अशा लोकांनीच पृथ्वीला अलंकारयुक्त केले आहे. 

धन, दान, दारिद्र्य आदि : संपत्तीविना सारे गुण निष्फळ होतात. ती असेल तरच कोणाचेही कुल, सद्गुण, शील, पराक्रम यांना अर्थ प्राप्त होतो. ज्याच्या संपत्तीचा नाश झाला, तो माणूस जगाला निराळाच वाटू लागतो. त्याला संपत्ती मिळाली, की तीच व्यक्ती कुलीन आणि विद्वान ठरते; गुणज्ञ, उत्तम वक्ता, सुंदर वाटू लागते. ‘सर्वे गुणा: कांचनमाश्रयन्ते!’ दान देणे, उपयोग घेणे आणि नष्ट होणे, या संपत्तीच्या तीन गती आहेत. जो देत नाही, उपभोगत नाही, त्याचे धन नष्टच होते. याचकांना धन देऊन क्षीण झालेला राजा हाच शोभिवंत ठरतो. कष्टाने मिळवलेल्या आणि प्राणांहून प्रिय असलेल्या संपत्तीचा एकच योग्य विनियोग म्हणजे दान. दुसऱ्या सर्व गती म्हणजे संकटेच. परिस्थितीच्या सापेक्षतेनुसार कोणतीही वस्तू चांगली-वाईट, लहान-मोठी वा कमी-अधिक ठरते. जे दान द्यायचे, ते याचकांना लज्जा न आणता, त्यांच्या दीनवाण्या शब्दांची वाट न बघता द्यावे. द्रव्याला सर्व जण वश होतात. सहसा त्यातून कोणीही सुटलेला नाही. दारिद्र्यापेक्षा मरण पत्करले, असे त्याने पोळलेल्या लोकांना वाटू लागते. 

(या लेखाचा उत्तरार्ध वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

(‘भर्तृहरीकृत शतकत्रयी’चे ल. गो. विंझे यांनी केलेले मराठी रूपांतर ‘ई-बुक’ स्वरूपात ‘बुकगंगा डॉट कॉम’वर उपलब्ध आहे. तसेच शतकत्रयीसंदर्भातील अन्य काही पुस्तके आणि ई-बुकही तेथे उपलब्ध आहेत. खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

संपर्क : ९८२३३ २३३७०
ई-मेल : rvgurjar@gmail.com

रवींद्र गुर्जर(‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या रवींद्र गुर्जर यांच्या ‘किमया’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/TiSWnh या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi