Ad will apear here
Next
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात ‘ईसीए’ची मार्गदर्शक नियमावली
पुणे : ‘पालक फार विश्वासाने लहान मुलांना स्कूल बस किंवा व्हॅनमधून शाळेत पाठवतात; मात्र या दरम्यान होणारे ­­­अपघात आणि मुलांवरील अत्याचाराच्या घटनांमुळे या बाबतीत भीती आणि संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर तोडगा म्हणून ‘अर्ली चाइल्ड असोसिएशन’ने (ईसीए) शाळा व्यवस्थापन व पालकांसाठी दक्षतेच्या दृष्टीकोनातून एक मार्गदर्शक नियमावली जाहीर केली आहे,’ अशी माहिती  ‘ईसीए’चे राष्ट्रीय केंद्रीय समिती सदस्य आदित्य तापडिया यांनी दिली.

‘एज्युफेस्ट २०१९’ परिषदेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. त्या दरम्यान ही नियमावली जाहीर करण्यात आली.

‘ईसीए’च्या अध्यक्ष डॉ. स्वाती पोपट वत्स म्हणाल्या, ‘दमलेले मूल बसमध्ये झोपी गेल्याची चालकाला माहितीच नसल्याने तो गाडी बंद करून निघून गेला आणि तो चिमुरडा गुदमरून मरण पावला, ही घटना असो किंवा शाळेची अधिकृत व्हॅनच नसल्याने आजीने चुकीच्या व्हॅनमध्ये नातीला बसवले आणि ती बालिका हरवली, या खरोखर घडलेल्या असून, त्या या क्षेत्रातील चिंताजनक परिस्थिती अधोरेखित करतात. स्कूल व्हॅन वा स्कूल बसच्या चालकाने मुलांवर अत्याचार केल्याच्या बातम्याही आपण वाचतो. खबरदारी घेऊन असे प्रसंग टाळण्यासाठी ‘ईसीए’मार्फत आम्ही एक सर्वेक्षण केले असून, त्यावर आधारित मार्गदर्शक नियमावली बनवली आहे.’

‘मुलांना गाडीत बसवताना व उतरवताना पालक आणि शिक्षकांनी न विसरता रजिस्टरवर नोंद करणे सक्तीचे करावे आणि ते नियमित पाळले जावे म्हणून ‘ईसीए’ आग्रही प्रयत्न करीत आहे. शाळेचे वाहन अधिकृत आहे की नाही याची पालकांनी खात्री करणे व शाळेनेही वाहनावर शाळेच्या नावाचा फलक लावणेही गरजेचे आहे. सर्व मुलांना शाळेत वा घरी सोडून आल्यावर, तसेच मुलांना घ्यायला जाण्यापूर्वी संपूर्ण गाडी तपासली जाणे आवश्यक आहे. शिवाय कोणत्याही परिस्थितीत शाळेला कळवल्याशिवाय बसमधील मदतनीसाने बस सोडून जाणे अपेक्षित नाही,’ असे वत्स यांनी सांगितले. 

या नियमावलीविषयी माहिती देताना तापडिया म्हणाले, ‘रिक्षा किंवा दोन्ही बाजूंनी उघड्या असणाऱ्या वाहनातून मुलांना शाळेत पाठवणे शक्यतो टाळावे. बंद वाहनातून नेतानाही आग लागल्यावर किंवा इतर संकटाच्या परिस्थितीत वाहनाचा आपत्कालीन दरवाजा कसा उघडायचा, स्वतःचा बचाव कसा करायचा हे मुलांना शिकवावे व दर तीन महिन्यांनी मुलांना प्रत्यक्ष प्रशिक्षणही द्यावे.’

‘ईसीए’च्या कार्यकारी संचालिका डॉ. रिता सोनावत म्हणाल्या, ‘शाळेच्या वाहनात एक चालक व दोन सेविका असणे आवश्यक आहे. त्यांना धूम्रपान, तंबाखू सेवन व अमली पदार्थ सेवनास सक्त मनाई असावी. त्याच प्रमाणे त्यांच्यापैकी कुणीही फोनवर अश्लील किंवा आक्षेपार्ह मजकूर, व्हिडिओ बघताना आढळल्यास त्यांच्यावर सक्त कारवाई व्हावी. त्यांना शिव्या किंवा आक्षेपार्ह शब्द उच्चारण्यास व कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीस गाडीत प्रवेश देण्यास सक्त मनाई असावी. याविषयीच्या जाणीव जागृतीसाठी त्यांना प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. तसेच वाहनात नेहमी प्रथमोपचार साहित्य असावे, या मार्गदर्शक नियमांचा यात समावेश करण्यात आला आहे.’

प्री-स्कूल आणि पाळणाघरात काम करणारे शिक्षक, मुलांची काळजी घेणाऱ्या ताई, मदतनीस, सफाई कर्मचारी, मुलांना प्री-स्कूलमध्ये सोडणाऱ्या बसचे चालक आणि शाळेतील सुरक्षा कर्मचाऱ्यांनाही विशेष प्रशिक्षणाची आवश्यकता भासते. नजिकच्या काळात ठिकठिकाणी लहान मुलांच्या सुरक्षिततेसंबंधी घडलेल्या काही घटनांमुळे मुलांना सांभाळणाऱ्या व्यक्ती प्रशिक्षित असण्याची गरज अधोरेखित झाली आहे. हेच उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून ‘ईसीए’ ही संस्था काम करते.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi
Select Language