Ad will apear here
Next
पु. भा. भावे, वा. गो. आपटे, डॉ. छाया महाजन, डॉ. रामचंद्र देखणे
नवकथेचे जनक, भाषाप्रभू पु. भा. भावे, ‘शब्दरत्नाकर’कार वा. गो. आपटे, कथाकार डॉ. छाया महाजन आणि संतसाहित्याचे गाढे अभ्यासक आणि प्रवचनकार डॉ. रामचंद्र देखणे यांचा १२ एप्रिल हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी....
........ 
पुरुषोत्तम भास्कर भावे 

१२ एप्रिल १९१० रोजी जन्मलेले पुरुषोत्तम भास्कर भावे हे ‘भाषाप्रभू’ या उपाधीने प्रसिद्ध असणारे महाराष्ट्राचे प्रतिभासंपन्न लेखक होते. ‘मराठी नवकथेचे जनक’ असंही त्यांना प्रेमादराने म्हटलं जातं. ‘गदिमा’ त्यांचे अत्यंत जवळचे मित्र होते आणि ते भाव्यांना ‘गुरू’ म्हणून संबोधत असत. भाव्यांनी आपल्या मनोरम आणि हृदयस्पर्शी कथांनी वाचकांच्या मनावर अनेक वर्षं अधिराज्य गाजवलं  होतं. 

१७वे वर्ष, घायाळ, परंपरा, पहिला पाऊस, प्रतारणा, फुलवा, बंगला, सतरावे वर्ष, साडी, सार्थक, हिमानी, ठरीव ठश्याची गोष्ट यांसारखे कथासंग्रह; अकुलिना, अडीच अक्षरे, दर्शन, दोन भिंती, मागे वळून, वर्षाव, व्याध यांसारख्या अनेक कादंबऱ्या आणि पद्मिनी, महाराणी, मुक्ती, विषकन्या आणि स्वामिनी यांसारखी त्यांची नाटकंही प्रसिद्ध आहेत. ‘प्रथम-पुरुषी एक-वचनी’ हे त्यांचं आत्मचरित्रही लोकप्रिय आहे. 

ते जहाल हिंदुत्ववादी होते. त्यांच्या लेखांमधून त्यांची हिंदुत्ववादी विचारसरणी अत्यंत जोशपूर्ण आणि तेजस्वीपणे प्रकट होत असे. त्यांना सरकारने भिवंडीच्या खटल्यात गोवलं होतं आणि तो खटला त्यांनी सरकारविरोधात लढून जिंकला होता. त्यांनी नागपूरमधून ‘सावधान’ आणि ‘आदेश’ अशी नियतकालिकं चालवली होती. 

१९७७ साली पुण्यात भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. तसंच त्यांनी नगरच्या नाट्यसंमेलनाचं अध्यक्षपदही भूषवलं होतं. 

१३ ऑगस्ट १९८० रोजी त्यांचं निधन झालं. 

(पु. भा. भावे यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)
..........

वासुदेव गोविंद आपटे 

१२ एप्रिल १८७१ रोजी धरणगावमध्ये जन्मलेले वासुदेव गोविंद आपटे हे लेखक, भाषांतरकार, पत्रकार आणि ‘शब्दरत्नाकर’कार म्हणून ओळखले जातात. १९०६ साली सुरू झालेल्या ‘आनंद’ या मुलांच्या लोकप्रिय मासिकाचे ते संस्थापक आणि संपादक होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पहिले घटनाकार म्हणूनही ते ओळखले जातात.

अशोक अथवा आर्यावर्तातला पहिला चक्रवर्ती राजा, बौद्धपर्व अथवा बौद्ध धर्माचा साद्यंत इतिहास, ही त्यांची सुरुवातीची प्रकाशित पुस्तकं होती. त्यांनी मिसेस हेन्रीमवुड, सॅम्युएल लव्हर, बंकिमचंद्र चटोपाध्याय, श्रीहरनाथ ठाकूर यांच्यासारख्या अनेक लेखकांच्या उत्तमोत्तम साहित्यकृतींची सुंदर मराठी भाषांतरं केली होती. 

मराठी भाषेचे संप्रदाय व म्हणी, लेखनकला आणि लेखनव्यवसाय, मराठी शब्दरत्नाकर, मराठी शब्दार्थचंद्रिका, मराठी-बंगाली शिक्षक, जैनधर्म, टापटीपचा संसार, बालोद्यान पद्धतीचे गृहशिक्षण, सौंदर्य आणि ललितकला, महाभारतातील सोप्या गोष्टी, नाट्यभारत, नाट्यरामायण, बालभारत, मनी व मोत्या, महाराष्ट्राचा बालबोध इतिहास, मुलांसाठी गोड गाणी, एक दिवसाच्या सुटीत, अशी त्यांची कित्येक पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 

दोन फेब्रुवारी १९३० रोजी त्यांचं पुण्यामध्ये निधन झालं. 

(वा. गो. आपटे यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)
..........

डॉ. छाया महाजन 

१२ एप्रिल १९४९ रोजी जन्मलेल्या छाया महाजन या कथाकार आणि कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध आहेत. 

त्यांच्या ‘कॉलेज’ या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा वि. स. खांडेकर पुरस्कार मिळाला आहे, तसंच त्यांना राजेंद्र बनहट्टी कथा पुरस्कारसुद्धा मिळाला आहे.  

जानेवारी २०१५ साली जालन्यामध्ये झालेल्या मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या.
 
ओढ, कॉलेज, तन अंधारे, दशदिशा, धुळीच्या चमकत्या पडद्याआड, नकळत, पाण्यावरचे दिवे, मानसी, मुलखावेगळा, मोरबांगडी, यशोदा, राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, राहिलो उपकाराइतुका, वळणावर, स्पर्श, हरझॉग, होरपळ, अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत.
 
(छाया महाजन यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)
..........
रामचंद्र अनंत देखणे 

१२ एप्रिल १९५६ रोजी जन्मलेले रामचंद्र अनंत देखणे हे संतसाहित्याचे व्यासंगी अभ्यासक, लेखक, प्रवचनकार आणि भारुडकार म्हणून ओळखले जातात. त्यांच्या घरातूनच त्यांना वारकरी संप्रदायाची परंपरा लाभली आहे. 

‘भारूड वाङ्मयातील तत्त्वज्ञान’ या प्रबंधासाठी त्यांना पुणे विद्यापीठाची डॉक्टरेट मिळाली आहे. ‘माझं अध्यात्म’ आणि ‘पालखी’ या महाराष्ट्र टाइम्समधील त्यांच्या लेखमाला गाजल्या. 

अंगणातील विद्यापीठ, आनंद तरंग, आनंदाचे डोही, आषाढी, गोंधळ : परंपरा स्वरूप आणि आविष्कार, गोरज, जीवनयोगी, जीवनाची सुंदरता, तुका म्हणे जागा हिता, तुका झालासे कळस, दिंडी, भारूड आणि लोकशिक्षण, भारूड वाङ्मयातील तत्त्वज्ञान, भूमिपुत्र, मनाचे श्लोक : जीवनबोध, महाकवी, महाराष्ट्राची सांस्कृतिक लोककला, लागे शरीर गर्जाया, लोकशिक्षक गाडगेबाबा, वारी : स्वरूप आणि परंपरा, शारदीचिये चंद्रकळा, श्रावणसोहळा, संत साहित्यातील पर्यावरणविचार, समर्थांची भारुडे, साठवणीच्या गोष्टी, सुधाकरांचा महाराष्ट्र, ज्ञानदीप लावू जगी, अशी त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 

त्यांना २०१४ सालचा बहिणाबाई चौधरी साहित्यरत्न पुरस्कार, तसंच २०१७ सालचा जिजामाता विद्वत्‌ गौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे. 

(रामचंद्र देखणे यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi
Select Language