Ad will apear here
Next
ये कौन चित्रकार है....!
काल, सात एप्रिल रोजी ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांनी ७७व्या वर्षात पदार्पण केले. त्या निमित्ताने, ‘सुनहरे गीत’ सदरात आज आस्वाद घेऊ या, त्यांच्यावर चित्रित झालेल्या ‘ये कौन चित्रकार है...’ या गीताचा...
..........
सात एप्रिल १९४२ हा अभिनेता जितेंद्रचा जन्मदिवस. काल म्हणजे सात एप्रिलला त्याने आपल्या वयाची ७६ वर्षे पूर्ण केली. गेल्या वर्षी त्याच्या अमृतमहोत्सवाचा जास्त गाजावाजा झाला नाही. अनेक चित्रपट समीक्षक, अभ्यासक आणि जाणकार जितेंद्रला अभिनेता मानतच नाहीत.

चित्रपटातील कलावंतांच्या यशापयशाचा फैसला मुंबईतून होत असेल; पण त्यांची लोकप्रियता लहान-मोठ्या गावात असलेले त्यांचे चाहतेच जपत असतात. अमिताभचा ‘जंजीर’ पडद्यावर आला, तेव्हाचा एक प्रसंग सांगतो.. साधारण १९७२-७३ हे वर्ष असेल. अमिताभ हा नवीन नट कसा भारी आहे, याची चर्चा आम्हा मित्रांमध्ये सुरू होती. उद्धव हा आमचा मित्र अमिताभचे कौतुक करत होता. त्याचे बोलणे खोडून काढत आमचा मित्र शेखर म्हणाला, ‘असे नवीन कोणी येऊ देत; पण जितेंद्रला तोड नाही, हे लक्षात घे. जितेंद्र तो जितेंद्रच!’ आता अमिताभ आणि जितेंद्रची तुलना होऊ शकत नाही हा प्रश्न वेगळा; पण एवढे खरे, की आमच्या ‘शेखर’सारखे जितेंद्रचे चाहते गावोगावी असल्यामुळेच त्याचे चित्रपट चालत राहिले, तो मागणी असलेला नायक बनून राहिला.

काही प्रमाणात का होईना पण जितेंद्रचे चाहते असण्यासाठी जितेंद्रमध्ये काय होते? तो अभिनयाचा सम्राट नाही; पण म्हणून ‘त्याचा चेहरा शेळपट आहे; तो आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा नाही,’ असेही आपण म्हणू शकणार नाही. देखणेपण हे तर त्याचे खरे वैशिष्ट्य. यथायोग्य उंची, त्याला साजेशी देहयष्टी (जी अजूनही कायम आहे), डोक्यावरील भरगच्च केसांची आकर्षक ठेवण. धारदार नाक, बोलके डोळे या त्याच्या ‘लूक’मध्ये चित्रपती व्ही. शांताराम यांना ‘स्टारपण’ जाणवले, म्हणून तर ‘सेहरा’ चित्रपटात एक-दोन सेकंदांपुरता पडद्यावर दिसणारा हा कलावंत त्यानंतर ‘गीत गाया पत्थरों ने’ या चित्रपटाचा नायक बनला.

व्ही. शांताराम यांच्या ग्रुपमध्ये जितेंद्र असण्याचे कारण म्हणजे, व्ही. शांताराम यांच्या चित्रपटातील कलावंतांसाठी त्या त्या भूमिकेला अनुरूप असणारे दागिने पुरविण्याचे काम जितेंद्रचे वडील करीत होते. वडिलांनी निश्चित केलेले दागिने देण्यासाठी म्हणून एक-दोन प्रसंगी जितेंद्र राजकमल स्टुडिओत गेला होता. चित्रपटांच्या निर्मितीचे त्याला अप्रूप वाटे, आकर्षण वाटे. सिनेमा कसा तयार होतो ते तो बघत बसू लागला. आणि त्यातूनच ‘सेहरा’ चित्रपटातील मॉब सीनमध्ये त्याचा प्रवेश झाला आणि नंतरच्या ‘गीत गाया पत्थरों ने’साठी तर व्ही. शांताराम यांनी त्याला नायक केले. नंतर ‘बूंद जो बन गए मोती’ हा त्याची भूमिका असलेला चित्रपट पडद्यावर आला.

जितेंद्र चित्रपटसृष्टीत आला, तेव्हा शम्मी कपूर, राजेंद्र कुमार यांचा काळ चालू होता. जितेंद्रजवळ राजेंद्रकुमारसारखे देखणेपण होते आणि त्याने शम्मी कपूरची रांगड्या प्रणयाची स्टाइल आपलीशी केली. आठवा तो ‘फर्ज,’ ‘हिम्मत,’ ‘जिगरी दोस्त,’ ‘काँखा’मधील जितेंद्र! ‘जंपिंग जॅक’ असे त्याला उपहासाने म्हटले गेले; पण त्याचे चित्रपट बघण्यासाठी गर्दीही केली गेली. शरीराच्या वाढत्या आकारमानाने शम्मी कपूरची सद्दी संपली होती. त्याची जागा जितेंद्रने बरोबर घेतली. त्याचे चित्रपट धडाधड येत राहिले. तो हिंदी चित्रपटांचा जेम्स बाँड बनला.

त्याने नूतनपासून माधुरी दीक्षितपर्यंत नायिकांच्या चार पिढ्या पहिल्या. नायिकांच्या पिढ्या बदलत गेल्या, तरी नायक म्हणून असलेली त्याची मागणी कायम राहत गेली. तो उत्तम व्यावसायिक व चतुर अभिनेता म्हणून लोकप्रिय ठरला. इमेजचा विचार न करता त्याने पिता- पुत्र अशाही भूमिका केल्या. देव आनंदनंतर एव्हरग्रीन म्हणून शोभणारा जितेंद्र दक्षिणेकडच्या चित्रपटांतही चमकत राहिला. त्यासाठी त्याने तमीळ, तेलुगू या क्लिष्ट भाषाही आत्मसात केल्या. 

बदलत्या काळाची पावले ओळखून ‘बालाजी टेलिफिल्म्स’ या संस्थेची त्याने निर्मिती केली. पोषाखी चित्रपटात तो राजकुमार म्हणून शोभला आणि ‘मेरी आवाज सुनो’सारख्या चित्रपटात पोलीस अधिकारी म्हणूनही शोभला. हाणामारीच्या चित्रपटातील, तसेच ‘जंपिंग जॅक’ ही त्याची इमेज पुसून टाकण्यासाठी गुलजार यांनी त्याला एका नव्या रुपात आणले. ‘परिचय,’ ‘खुशबू,’ ‘किनारा’ हे ते चित्रपट होते. त्यामध्ये तो ‘उपरा’ वाटला नाही. असा हा जितेंद्र! त्याला ७६व्या वाढदिवसाबद्दल खूप खूप शुभेच्छा... त्याच्यावर चित्रित झालेले एक आशयसंपन्न, मधुर चालीतील सुनहरे गीत त्या निमित्ताने जाणून घेऊ या.

१९६७मध्ये प्रदर्शित झालेल्या व्ही. शांताराम यांच्या ‘बूंद जो बन गए मोती’ या चित्रपटाचा नायक जितेंद्र होता. त्यामध्ये त्याच्या तोंडी एक गीत होते. पार्श्वगायक मुकेश यांनी ते गायले होते. भरत व्यास यांनी ते काव्य लिहिले होते. आणि संगीतकार? तो मात्र परिचित नाही. अन्य चित्रपटांना त्याने संगीत दिले असावे; पण या चित्रपटाचे संगीत मात्र खरोखरच छान होते. सतीश भाटिया हे त्या संगीतकाराचे नाव. हे गीत निसर्गाची विविधता आणि महत्त्व वर्णन करणारे आहे व त्यातून बोध काय घ्यावा हेही भरत व्यास सांगतात. बघा, ते निसर्गाचे वर्णन करताना काय म्हणतात -

हरी हरी वसुंधरा पे नीला नीला ये गगन 
के जिस पे बादलों की पालकी उड़ा रहा पवन 
दिशाएँ देखो रंग भरी, चमक रही उमंग भरी 
ये किसने फूल फूल पे किया सिंगार है 
ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार है....

हिरव्यागर्द भूमीवर असणारे हे निळेशार आकाश आणि वर ढगांची वाऱ्यामुळे होणारी हालचाल पाहून वाटते, की ही ढगांची पालखीच वारा वाहून नेत आहे. सर्व दिशांना पसरलेला हा रंग, त्यामुळे पसरलेली आनंदाची लहर (उमंग) आणि फुलांचे हे विविध रंग-रूप पाहता या फुलांच्या साह्याने कोणी (अर्थात धरतीने) शृंगार केला आहे (हा प्रश्न उभा राहतो) (खरोखरच) हे असे इतके सुंदर निसर्गचित्र काढणारा कोण बरे चित्रकार आहे? (परमेश्वराशिवाय तो दुसरा कोण असणार म्हणा?)

निसर्गवर्णन करताना कवी म्हणतो -

तपस्वियों सी है अटल ये पर्बतोंकी चोटियाँ
ये सर्पसी घूमेरदार घेरदार घाटियाँ
ध्वजा से ये खडे हुए है वृक्ष देवदार के 
गालिचे ये गुलाब के, बगीचे ये बहारके 
ये किस कवी की कल्पना का चमत्कार है 
ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार है

ही उंच उंच, निमुळती पर्वतांची शिखरे पाहून असे वाटते, की जणू तपाला बसलेल्या ऋषीमुनींच्या डोक्यावरील जटांच्या त्या रचना आहेत. डोंगरावरची ही नागमोडी वळणे, नागमोडी वळणाचे रस्ते, आणि ध्वजांसारखी उभी असलेली देवदाराची झाडे, गुलाबांचे गालिचे व वसंत ऋतूमुळे फुललेल्या फुलांचे बगीचे, हे सर्व पाहून असे वाटते, की हा कोणा कवीच्या कल्पनेचा आविष्कार आहे! (खरेच) हा कोण चित्रकार आहे?

हे असे सारे निसर्गसौंदर्य फक्त पाहायचे का? नाही! म्हणूनच पुढच्या कडव्यामध्ये कवी म्हणतो -

कुदरत की इस पवित्रता को तुम निहार लो 
इनके गुणों को अपने मन में तुम उतार लो 
चमका लो आज लालिमा अपने ललाटकी 
कण कण से झाँकती तुम्हें छबी विराट की 
अपनी तो आँख एक है, उस की हजार है 
ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार

निसर्गाची ही पवित्रता, या सृष्टिसौंदर्यातील पावित्र्य तुम्ही निरखून पाहा. या निसर्गामधील (पर्वत, नदी, फुले, झाडे, वारा इ.) गुण आपल्या मनात, स्वभावात आणायचा प्रयत्न करा आणि त्या आधारे आपल्या ललाटावरील भाग्यरेषा उजळण्याचा प्रयत्न करा. या निसर्गाच्या कणा-कणामध्ये ते विराट (परमेश्वराचे) रूप तुम्हाला दिसेल, त्याचे अस्तित्व जाणवेल. (अरे) आपली तर नजर एकच आहे; पण त्याचे नेत्र हजार आहेत (हे विसरू नका.) (खरेच) हा कोण चित्रकार आहे? कोण जाणे? (तो परमात्माच आहे.)

चित्रपटगीत असूनही वेगळा आशय मांडणारे हे गीतकार भरत व्यास. पंडितजीच म्हणायचे त्यांना. आणि अशा गीतांना आपल्या चित्रपटात स्थान देणारे कल्पक दिग्दर्शक, निर्माते व्ही. शांताराम. लोकप्रियता न मिळालेला आणि तरीही सुंदर संगीत देणारा संगीतकार सतीश भाटिया. आणि पडद्यावर साध्या पोशाखातील सभ्य, सज्जन व छान दिसणारा जितेंद्र... एखाद्या गीताला सुनहरे गीत म्हणताना हे एवढे सारे पुरेसे असते, नाही का? 

- पद्माकर पाठकजी
मोबाइल : ८८८८८ ०१४४३

(लेखक चित्रपट समीक्षक आणि जुन्या चित्रपटगीतांचे अभ्यासक आहेत.दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या त्यांच्या ‘सुनहरे गीत’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/8ABN2G या लिंकवर एकत्रितपणे उपलब्ध आहेत.)

 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language