Ad will apear here
Next
तरुणांना व्यवसाय उभारण्याची संधी देण्यासाठी अभिनव उपक्रम
दीड लाखात मिळणार उद्योग सामुग्री व प्रशिक्षण
पुणे : ‘सरकारी नोकऱ्यांमधील वाढलेली स्पर्धा, समाजातील वाढती बेरोजगारी लक्षात घेऊन तरुणांना व्यवसाय उभारण्यासाठी एमपीएससी स्टुडंट्स राईट्स आणि अॅ्मस्टेड क्लोदिंग कंपनीने पुढाकार घेतला असून, अवघ्या दीड लाख रुपयांत स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याची संधी शहरी व ग्रामीण तरुणांना मिळणार आहे. या दीड लाखामध्ये तरुणांना व्यवसायाची संपूर्ण सामग्री, प्रशिक्षण आणि उत्पन्नाची हमी देण्यात येणार आहे,’अशी माहिती अॅमस्टेड क्लोदिंग कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल सोंडकर व एमपीएससी स्टुडंट्स राईट्सचे महेश बडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी अॅमस्टेड कंपनीचे प्रमुख राकेश ओसवाल, स्टुडंट्स राईट्सचे किरण निंभोरे, विजय मते, साईनाथ डहाळे उपस्थित होते.

निखिल सोंडकर म्हणाले, ‘अॅमस्टेड क्लोदिंग कंपनी २००४ पासून पुण्यात कार्यरत आहे. कापड उद्योगांमध्ये ही कंपनी काम करत असून, कंपनीचा पसारा संपूर्ण जगभर पसरलेला आहे. सामाजिक व्यावसायिक बांधिलकीच्या नात्याने व या तरुणांना व्यवसायाची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी कंपनीने हा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमात कंपनीकडून शंभर ते दीडशे तरुणांना व्यवसाय उभारण्याची संधी देण्यात येणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कंपनीला होणाऱ्या नफ्यातून कंपनी त्यातील काही रक्कम स्पर्धा परिक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी व व्यवसाय उभारणीसाठी देणार आहे. याशिवाय, दुष्काळग्रस्त भागातील उमेदवारांसाठी अभ्यासिका, अल्पदरात भोजनव्यवस्था, दिव्यांगांसाठी विशेष अभ्यासिका, स्पर्धा परीक्षेविषयी मार्गदर्शन व सेमिनार्स, व्यवसाय मार्गदर्शन शिबिर, व्यवसाय उभारणीसाठी सहकार्य, गरीब-होतकरूंना शैक्षणिक मदत अशा प्रकारची विविध सामाजिक कामे या निधीमधून करण्यात येणार आहेत’.

‘कमी भांडवलात व्यवसाय उभारण्याची संधी तरुणांना देत असताना कंपनी त्यांना कपड्याच्या व्यवसायाबाबतचे सर्व प्रशिक्षण देणार आहे;तसेच त्यांची व्यवसायात वृद्धी व्हावी, यासाठी सर्व सहकार्य कंपनी करणार आहे. या तरुणांचे कसलेही आर्थिक नुकसान होणार नाही, याची संपूर्ण काळजी कंपनी घेणार आहे. राज्य सरकार विविध योजना राबवित असताना सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून खाजगी कंपनीने या नात्याने या तरुणांना व्यवसायाची संधी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे,’ असेही सोंडकर यांनी स्पष्ट केले.

महेश बडे म्हणाले, ‘स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांची संख्या लाखोंवर आहे. मात्र, जागा केवळ हजारांमध्येच आहेत. त्यामुळे जीवघेणी स्पर्धा आहे. चार-चार वर्षे अभ्यास करुनही स्पर्धा परीक्षेत अपेक्षित यश आले नाही, तर तरुणांमध्ये नैराश्य, ताणतणाव निर्माण होतो. त्यातून अनेकदा आत्महत्येसारखे पाऊलही उचलले जाते. त्यामुळे स्पर्धा परीक्षेचे हे वास्तव समजून घेऊन वेगळ्या वाटा शोधायला हव्यात. स्पर्धा परीक्षेविषयी मार्गदर्शन करताना मान्यवर विद्यार्थ्यांना ‘बी प्लन’ आखण्याचा सल्ला देतात. मात्र, आम्ही विद्यार्थ्यांना थेट ‘बी प्लान’ उपलब्ध करुन देत आहोत. स्पर्धा परिक्षेचे विद्यार्थी, ग्रामीण भागातील तरुण स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी हा उपक्रम सुरू करत आहोत. एमपीएससी स्टुडंट्स राईट्स ही एक सामाजिक संघटना असून, गेल्या चार वर्षांपासून स्पर्धा परीक्षेविषयी निगडित विषयांवर काम करत आहे. विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी चालवलेली ही एक चळवळ आहे’. 

किरण निंभोरे म्हणाले, ‘जून महिन्यात गणेश कला क्रीडा मंच येथे झालेल्या तीन दिवसीय स्पर्धा परीक्षा महोत्सवातच ‘उभारा दीड लाखात व्यवसाय’ या उपक्रमाचे अनावरण झाले. तरुणांनी व्यवसाय सुरू करावा, हाच हेतू यामागे आहे. आर्थिक समावेशन करून सामाजिक समावेशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न या दोन संस्था करू पाहात आहेत. अशाच प्रकारे भविष्यात विविध व्यावसायिक कंपन्या, सामाजिक संस्थांना सोबत घेऊन तरुणांना कमी भांडवलात व्यवसाय उभा करण्याची संधी उपलब्ध करुन दिली जाणार आहे. हा उपक्रम महाराष्ट्र पातळीवर राबविण्यात येणार आहे.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi
Select Language