Ad will apear here
Next
मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष नको!
जागतिक मानसिक आरोग्य दिनी आत्महत्या प्रतिबंधासाठी जनजागृती

पुणे : सध्याच्या जगात मानसिक आरोग्य सांभाळण्याचे मोठे आव्हान मानवजातीसमोर उभे आहे. स्पर्धा, ताणतणाव, इंटरनेट, मोबाइल गेम्सचा अति वापर अशा अनेक कारणांमुळे लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांच्याच मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसत आहे. त्यातून आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. ही एक मोठी गंभीर समस्या निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर, ‘आत्महत्या प्रतिबंधावर भर’ ही यंदाच्या जागतिक मानसिक आरोग्य दिनाची संकल्पना आहे. मानसिक आरोग्य जपण्याबाबत जनजागृतीसाठी जगभर १० ऑक्टोबर हा मानसिक आरोग्य दिन म्हणून पाळला जातो. 

जगभरात दर वर्षी आठ लाखांपेक्षा जास्त आत्महत्या होतात. आत्महत्यांमध्ये भारत प्रथम क्रमांकावर असून, दर वर्षी सुमारे अडीच लाख लोक आत्महत्या करत असल्याचे दिसते. साधारण १५ ते २९ वर्षे या वयोगटात आत्महत्या करण्याचे प्रमाण अधिक असून, ९० टक्के आत्महत्या मानसिक आजारातून होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. अगदी सहा-सात वर्षांच्या मुलांमध्येही आत्महत्येची प्रवृत्ती वाढत असल्याचे दिसत आहे. ही चिंताजनक बाब असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ताणतणाव, स्पर्धा, अभ्यासाचा दबाव, मोबाइल, इंटरनेट, मोबाइल गेम्सचा अति वापर यामुळे लहान मुलांमध्ये नैराश्य आणि अति चंचलता यांसारखे आजार वाढत आहेत. 

दीप्ती पन्हाळकर
‘योग्य वेळी उपचार, आधार मिळाल्यास निम्म्यापेक्षा जास्त आत्महत्या रोखता येऊ शकतात. यासाठी मानसिक आजारांची लक्षणे ओळखण्याची गरज आहे. कोणतेही किंतू न बाळगता त्या व्यक्तीला मानसोपचारतज्ज्ञांकडे घेऊन जाणे, मानसोपचार घेण्यासाठी त्या व्यक्तीचे मन वळवणे आवश्यक आहे,’ असे मत पुण्यातील मानसशास्त्रज्ञ (सायकॉलॉजिस्ट) आणि ‘माइंड स्पा’च्या संस्थापक दीप्ती पन्हाळकर यांनी ‘बाइट्स ऑफ इंडिया’शी बोलताना व्यक्त केले. 

‘कोणतीही व्यक्ती मनात आले की तत्काळ आत्महत्या करत नसते. आत्महत्या करणाऱ्यांच्या वागण्या-बोलण्यात, स्वभावात, दैनंदिन जगण्यात काही दिवस आधीपासूनच लक्षात येण्याजोगा बदल झालेला असतो व तो आप्तस्वकीयांना सहजपणे टिपता येऊ शकतो. आत्महत्येचे विचार येणाऱ्या व्यक्ती दु:खी दिसतात, कमी बोलतात किंवा नेहमीच्या आवडत्या कामात रस घेत नाहीत, स्वत:कडे दुर्लक्ष करतात, व्यसनांच्या आहारी जातात, आत्महत्येचे विचार बोलून दाखवतात. अशा वेळी त्यांची थट्टामस्करी न करता त्यांचे म्हणणे ऐकून घेणे, त्यांना मानसिक-भावनिक आधार देणे, त्यांच्याशी सकारात्मक, आशादायी संवाद साधणे, समुपदेशक किंवा मानसोपचातज्ज्ञांशी बोलण्यास प्रोत्साहन देणे अत्यंत आवश्यक असते,’ असे पन्हाळकर म्हणाल्या.

‘एकूणच मानसिक आजारांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे. मानसिक आजार कुणालाही व कधीही होऊ शकतो, हे लक्षात घेऊन त्यावर उपचार करण्यासाठी पुढे आले पाहिजे. तरच ही समस्या नियंत्रणात येऊ शकेल आणि लाखो जीव वाचू शकतील,’ असेही पन्हाळकर यांनी नमूद केले. 

(दीप्ती पन्हाळकर यांचे विचार ऐकण्यासाठी सोबतचा व्हिडिओ पाहा.)

 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi