Ad will apear here
Next
देशातील आदर्श ग्रंथालय - कृष्णदास शमा गोवा स्टेट सेंट्रल लायब्ररी


‘कृष्णदास शमा गोवा स्टेट सेंट्रल लायब्ररी’ हे देशातील पहिले ग्रंथालय. विपुल ग्रंथसंग्रहासह सर्वच बाबतींत आदर्श घ्यावे असे हे ग्रंथालय आहे. ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर त्यांच्या ‘किमया’ या सदरात आज त्या ग्रंथालयाची ओळख करून देत आहेत.
.........
वाचन ही एक अत्यानंदाची गोष्ट आहे. ज्ञान, माहिती आणि मनोरंजन त्यातूनच साध्य होते. तथापि, ती जीवनावश्यक बाब नाही. म्हणजे मनाची हानी होईल; पण प्राणभय नाही. ई-बुक, मोबाइल, ऑडिओ बुक यांसारख्या बदलत्या माध्यमांमुळे छापील पुस्तकांचे भवितव्य अधांतरी टांगलेले आहे. पुस्तकांची दुकाने आणि ग्रंथालये वेगाने बंद होत आहेत. महाराष्ट्रातील १२ हजार सार्वजनिक (त्यातच १००हून अधिक शतवर्षे पार केलेली) ग्रंथालये सदस्यसंख्या घटत चालल्याने अडचणीत आलेली आहेत. खासगी ग्रंथालयांची साधारण तीच स्थिती आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर अशीही काही ग्रंथालये आहेत, ज्यांची उत्तरोत्तर भरभराटच होत आहे. वाचनसंस्कृतीचे आदर्श म्हणून त्यांच्याकडे बघता येते. पणजी येथील ‘कृष्णदास शमा सेंट्रल लायब्ररी’ (पूर्वनाम गोवा स्टेट सेंट्रल लायब्ररी) ही त्यात अग्रेसर आहे, असे निश्चितपणे म्हणता येईल.

मॅगझिन विभाग

सर्व प्रकारच्या सोयीसुविधांनी युक्त असे हे (अति) अत्याधुनिक, भारतामधील सर्वांत प्राचीन ग्रंथालय आहे. त्याचा इतिहास अभ्यासण्यासारखा आहे. सध्याची भव्य नवी इमारत अलीकडच्या काळातील आहे. विशेष म्हणजे, त्यात पुस्तकविक्रीचे केंद्रही आहे. एकूण सहा मजल्यांवर ग्रंथांच्या राशी आणि वाचनाची सोय आहे. सार्वजनिक सुटीचे दिवस सोडून सातही दिवस ग्रंथालय खुले असते. तिथले सभासद आणि भेट देणाऱ्या व्यक्तींचे अत्यंत प्रेमाने स्वागत होते. मुलांसाठी एक स्वतंत्र दालन आहे. संशोधकांना मोफत इंटरनेटची सोय आहे. इतरत्र कुठेही मिळणार नाहीत, अशी गोव्याच्या इतिहासाची दुर्मीळ आणि असंख्य पुस्तके तिथे उपलब्ध आहेत; तसेच पोर्तुगीज भाषेतील सहाव्या क्रमांकाचा ग्रंथसंग्रह त्यात आहे. जोडीलाच नियतकालिके, हस्तलिखिते, संशोधन-पत्रिका, नकाशे, वृत्तपत्रे आणि ब्रेल लिपीतील पुस्तके विपुल प्रमाणात आहेत. पुस्तकप्रेमींसाठी हे स्थळ म्हणजे ‘सातव्या स्वर्गा’सारखे आहे. ही झाली या ग्रंथालयाची धावती ओळख. आता सविस्तर परिचय करून घेऊ.

सन २०१२मध्ये या ग्रंथालयाचे ‘कृष्णदास शमा सेंट्रल लायब्ररी’ असे नामकरण करण्यात आले. अधिकृत माहितीनुसार, १५ सप्टेंबर १८३२ रोजी, त्या वेळी पोर्तुगीज शासनाखाली असलेल्या गोव्याचे व्हाइसरॉय डॉम मॅन्युएल डी पोर्तुगाल ई कॅस्ट्रो यांनी ‘पब्लिका लिब्रेरिया’ या नावाने त्याची स्थापना केली. भारताचे पहिले ग्रंथालय! लगेच १८३६मध्ये त्याचे नाव ‘बिब्लिओथेका पब्लिका’ असे बदलण्यात आले. त्याच वर्षी नगरपालिकेच्या जागी हलवण्यात आले. तिला ‘नॅशनल लायब्ररी’चा दर्जा देण्यात आला. नावे बदलण्याची परंपरा चालूच होती. फेब्रुवारी १८९७मध्ये ग्रंथालय ‘बिब्लिओथेका नॅशनल वास्को द गामा’ या नावाने ओळखले जाऊ लागले. सुरुवातीला तिथे पोर्तुगीज, फ्रेंच, स्पॅनिश, लॅटिन आणि इंग्रजी भाषेतील पुस्तके होती. पुढे त्यात भारतीय भाषांची भर पडत गेली. १९०७मध्ये तिथली पहिली ‘ग्रंथसूची’ छापण्यात आली. नंतर लेखक, शीर्षक आणि परस्पर संदर्भांची कार्डस् बनवण्यात आली.सन १९६१मध्ये गोव्यातील पोर्तुगीज सत्ता समाप्त झाली. त्यानंतर ग्रंथालयालचे नाव ‘सेंट्रल लायब्ररी’ असे झाले. कामकाजात वाढ झाली. सदस्यांना पुस्तके देणे, संदर्भ विभाग आणि मुलांसाठी खास कार्यक्रम सुरू करण्यात आले. इंग्रजीसह मराठी, हिंदी आणि अन्य भारतीय भाषांमधील पुस्तकांची भर पडू लागली. स्थानिक इतिहास आणि दुर्मीळ पुस्तकांचा प्रचंड संग्रह तिथे आहे. गोव्यात प्रसिद्ध होणाऱ्या सर्व पुस्तकांच्या प्रत्येकी तीन प्रती या ग्रंथालयाला १९५६च्या कायद्यानुसार द्याव्या लागतात. सध्या ग्रंथालयाच्या नियंत्रणाखाली सात तालुक्यांमधील ग्रंथालये, १२१ सरकारी ग्रामीण ग्रंथालये, पंचायत आणि खासगी संस्थांची वाचनालये येतात.

१९६१पर्यंत विविध भाषांमधील पुस्तके आणि नियतकालिकांचे ४० हजार खंड येथे उपलब्ध होते. त्यात गोवा, मुंबई आणि अन्य काही राज्यांमधील वृत्तपत्रांचाही समावेश आहे. जगातील कुठल्याही व्यक्तीसाठी हे ग्रंथालय सदैव खुले आहे. आजमितीला सुमारे अडीच लाख पुस्तके तिथे उपलब्ध आहेत. दुर्मीळ पुस्तके, गॅझेट्स आणि वृत्तपत्रांची सुमारे १५ लाख पाने मायक्रोफिल्मच्या स्वरूपात येथे उपलब्ध आहेत. 

संदर्भ विभागात अनेक विषयांचे शब्दकोश, ज्ञानकोश, ‘हूज हू’, चरित्रकोश, सरकारी अधिनियम, अॅटलास, प्रवास मार्गदर्शक पुस्तके आणि अन्य अगणित ग्रंथ अभ्यासकांना उपलब्ध आहेत. ग्रंथालयाची नवी सहा मजली इमारत मुख्य बस स्थानकाजवळ, पणजीच्या ‘पॅटो’ विभागात आहे. सन २०११मध्ये पोलिस मुख्यालयातून तिकडे स्थलांतर झाले. प्रख्यात वास्तुविशारद गेराल्ड डा कुन्हा यांनी इमारतीची आखणी केली. बांधकामाचा एकूण खर्च सुमारे ३२ कोटी रुपये झाला. सहा मजल्यांचे क्षेत्रफळ १३ हजार ३७० चौरस मीटर म्हणजे एक लाख ३३ हजार ७०० चौरस फूट. विशेष म्हणजे, गोवा सरकारने आपला खजिना त्यासाठी मुक्तपणे खुला केला. महाराष्ट्राने तो आदर्श घेण्यासारखा आहे.

ब्रेल विभाग

सदस्यांची माहिती, पुस्तक देवघेव, पुस्तक खरेदीपासूनची नोंदणी असे सर्व काही संगणकाद्वारे नियंत्रित केले जाते. त्यासाठी ग्रंथालयांसाठी खास बनवलेले ‘लिबसिस’ हे सॉफ्टवेअर वापरण्यात येते. भविष्यकालीन गरज लक्षात घेऊन, पाच लाख पुस्तके संग्रहित करण्याची व्यवस्था आताच करण्यात आलेली आहे. दुसऱ्या मजल्यावर मुलांचा खास विभाग आहे. ब्रेल लिपीतील पुस्तकांची विशेष व्यवस्था केलेली आहे. इंटरनेटची सोयही आहे. मध्यवर्ती वातानुकूलित यंत्रणेसह एकूण २७ विभाग ग्रंथालयात आहेत.

डॉ. कार्लोस फर्नांडिसडॉ. कार्लोस फर्नांडिस हे ‘सेंट्रल लायब्ररी’चे ‘क्युरेटर’ आहेत. एक आदर्श ग्रंथपाल कसा असावा, याचे ते मूर्तिमंत उदाहरण आहे. अत्यंत उत्साही, वाचकांच्या सेवा-सोयींसाठी सदैव तत्पर, माहिती/वाचन संस्कृतीच्या उत्कर्षासाठी (सरकारी नियमांची आडकाठी येऊ न देता) दिवस-रात्र झटणे, ग्रंथालयाला भेट देणाऱ्या लहानमोठ्या सर्व लोकांचे आगत-स्वागत करणे, ग्रंथालय अद्ययावत असावे यासाठी चौफेर लक्ष, असे थोडक्यात त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन करता येईल. त्यांना आवश्यक ते अधिकारही दिलेले आहेत. भारतभरातील ग्रंथपालांनी अशा ‘ग्रंथयोग्या’ला आणि त्या आदर्श ग्रंथालयाला एकदा तरी भेट द्यावी. गोव्यातील सर्व सरकारी ग्रंथालये ‘सेंट्रल लायब्ररी’ला संगणकाद्वारे जोडण्याचे काम सुरू आहे. त्यांच्या वेबसाइटवरून आपल्या घरात बसूनसुद्धा, तिथल्या सर्व पुस्तकांची आणि अन्य साहित्याची माहिती सहजगत्या मिळू शकते. सकाळी ९.३० ते सायंकाळी ७.३० अशी कामकाजाची वेळ आहे. (शनिवार/रविवारी सायंकाळी ५.४५ पर्यंत) जेवणाच्या सुटीतही काम बंद राहत नाही.

ग्रंथालयातर्फे जागतिक पुस्तक दिवस, ग्रंथपाल दिन, राष्ट्रीय पुस्तक आठवडा आणि तत्सम दिवस साजरे होतात. शिवाय, सरकारी आणि बिगर सरकारी संस्था, तुरुंग, महाविद्यालये यांच्यात पुस्तकांची आंतर-ग्रंथालयीन देवघेव होते. ‘सेंट्रल लायब्ररी’ला सदस्यतेसाठी वार्षिक वर्गणी नाही. फक्त २०० ते ७५० रुपये कायमस्वरूपी अनामत रक्कम भरावी लागते. सदस्य होण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. गोवा सरकारच्या ‘डायरेक्टोरेट ऑफ आर्ट अँड कल्चर’च्या व्यवस्थापनाखाली हे ग्रंथालय चालते.

सहा मजल्यांवर पुढीलप्रमाणे सेवा-सुविधा उपलब्ध आहेत : 

पहिला मजला : सदस्यता काउंटर, वृत्तपत्र/नियतकालिके. ब्रेल विभाग, पुस्तक देवघेव. आत जाण्या-येण्याची नोंद करणारी यंत्रणा, पुस्तके परत टाकण्यासाठी बॉक्स. पुस्तक-विक्री दुकान, आर्ट गॅलरी, प्रदर्शन हॉल.
दुसरा मजला : मुलांचा विभाग. नकाशे/पृथ्वीगोल, मुलांसाठी दृक्-श्राव्य हॉल, इंटरनेट व्यवस्था, व्यवस्थापकीय कक्ष, व्याख्यानांसाठी सभागृहे, अभ्यास-कक्ष, व्यायामशाळा.
तिसरा मजला : पुस्तकांची कपाटे, व्यवस्थापन विभाग, तांत्रिक विभाग, इमारत व्यवस्था आणि हिशेब विभाग, चर्चासत्र गृह, क्युरेटरचे कार्यालय, संशोधकांसाठी छोटे कक्ष.
चौथा मजला : गोव्याचा इतिहास आणि दुर्मीळ पुस्तकांचा विभाग, हस्तलिखिते, मायक्रोफिल्म बघण्याची जागा, डाटा इमेजिंग सेंटर, ग्रंथसंरक्षण प्रयोगशाळा, सेवकांसाठी खोल्या, भोजनगृह
पाचवा : संदर्भ विभाग, वाचन-सज्जा, लॅपटॉपसाठी कक्ष.
सहावा : पोर्तुगीज विभाग.

ग्रंथालयास ज्यांचे नाव दिलेले आहे ते ‘श्रीमान कृष्णदास शमा’ यांना कोकणी गद्याचे प्रवर्तक आणि कोकणी साहित्याचे जनक मानले जाते. १६व्या शतकात ते गोव्यातील निवासी होते. सन १५२६मध्ये त्यांनी ‘श्रीकृष्णकथे’चे लेखन सुरू केले. ते भागवत पुराणाच्या १०व्या स्कंधावर आधारित आहे. त्याचे एकूण १९ अध्याय असून, कोकणीत ३१२३ ओव्या आहेत. या भरीव कामगिरीबद्दल ग्रंथालयाला त्यांचेच नाव देण्यात आहे. त्याचे मूळ हस्तलिखित ग्रंथालयात ठेवण्यात आलेले आहे.

ग्रंथालयाची सदस्यसंख्या २५ हजारपेक्षा जास्त आहे. त्याशिवाय १२०० मुले स्वतंत्र सदस्य आहेत. तिथे नियमितपणे ३६ वृत्तपत्रे, २७० नियतकालिके आणि ५५ अन्य अंक येतात. मुलांच्या विभागात २३ हजार पुस्तके आहेत. सुमारे एक लाख पुस्तकांची देवाण-घेवाण होते. बाकी ३३ हजार संदर्भ ग्रंथ आहेत. गोव्याच्या इतिहासावरची १७ हजार पुस्तके येथे आहेत.

कधी गोव्यात गेलात, तर पणजीमधील हे ग्रंथालय बघण्यासाठी किमान अर्धा दिवस राखून ठेवा.

ग्रंथालयाचा पत्ता : कृष्णदास शमा गोवा स्टेट सेंट्रल लायब्ररी, संस्कृती भवन, पॅटो सेंटर, पणजी, गोवा ४०३००१. 
फोन : (०८३२) २४०४५००, २४३७९४७, २४३७९४४ 
ई-मेल : lib-cent.goa@nic.in 
वेबसाइट : www.centrallibrary.goa.gov.in

संपर्क : ९८२३३ २३३७०
ई-मेल : rvgurjar@gmail.com

रवींद्र गुर्जर(‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या रवींद्र गुर्जर यांच्या ‘किमया’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/TiSWnh या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप

(विविध वैशिष्ट्यपूर्ण ग्रंथालयांबद्दल जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language