Ad will apear here
Next
पश्चिम बंगालमधली आगळी दिवाळी


देशाच्या अन्य प्रांतांतही महाराष्ट्राएवढी मोठ्या प्रमाणावर नसली, तरी दिवाळी साजरी केली जातेच. सध्या पुण्यात असलेल्या श्रीया निखिल गोळे या पूर्वाश्रमीच्या चंद्रानी डे. त्यांचे माहेर कोलकात्याला. बंगाल प्रांतातली दिवाळी कशी असते, याबद्दल त्यांनी सांगितलेली माहिती त्यांची नणंद मधुरा महेश ताम्हनकर यांनी शब्दबद्ध केली आहे. 
.....................
दिवाळी हा महाराष्ट्रातल्या लोकांचा सगळ्यात मोठा सण. दिवाळी भारतात सर्व प्रांतांतच साजरी केली जाते. महाराष्ट्रातल्यासारखी पाच दिवस नसली, तरी निदान छोटी दिवाळी आणि बडी दिवाळी अशी दिवाळी सर्वत्र साजरी केली जाते, तशीच पश्चिम बंगालमध्येही. 

प. बंगालमध्ये दुर्गापूजा आणि दसरा यांना अनन्यसाधारण महत्व आहे. तो त्यांचा सर्वांत महत्त्वाचा सण असला, तरी दिवाळीही तिथे आनंदाने साजरी केली जाते. पश्चिम बंगालमध्ये नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन असे दोन दिवस दिवाळी असते. तसेच भाऊबीजही मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. 

आपण नरकचतुर्दशी साजरी करतो, त्या दिवसाला बंगालमध्ये ‘छोडो बाती’ म्हणतात. त्या दिवशी संध्याकाळी घरातले मुलगे चौदा दिवे पाण्यात सोडतात. हे चौदा दिवे मागच्या चौदा पिढ्यांतील पूर्वजांना मार्ग दाखवतात, असे मानतात. 

काली पूजादुसरा दिवस म्हणजे आपल्याकडील लक्ष्मीपूजन. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी बंगालचे आराध्य दैवत असलेल्या कालिमातेची पूजा केली जाते. त्या दिवसाला ‘काली पूजा’ असेच म्हणतात. ही काली पूजा त्या अमावस्येच्या रात्री, पूर्ण रात्रभर-रात्रीच्या प्रत्येक प्रहरी केली जाते. कालिमाता ही असुरमर्दिनी असल्याने तिला पूजले जाते. हा चांगल्याचा वाईट शक्तींवरचा विजय म्हणून साजरा केला जातो. 

काली पूजा दोन प्रकारची असते. एक घरी किंवा पंडालमध्ये (मांडवात) साजरी करतात. त्या पूजेत रात्री कालिमातेची जास्वंदीच्या फुलांनी पूजा करून तिला खिचडी, पाच प्रकारचे भाजा (म्हणजे महाराष्ट्रात आपण वांग्याचे परतून काप करतो, तसे पाच प्रकारचे काप), डालना (मिश्र भाजी), चटणी आणि गोड पदार्थ असा नैवेद्य दाखवला जातो.  

दुसरी असते ती स्मशान काली या कालीच्या तामसी, उग्र रूपाची पूजा. ती पूजा स्मशानात केली जाते. ही पूजा म्हणजे तांत्रिक पूजा असते. या काली पूजेत बायका सहभागी होत नाहीत, फक्त पुरुष सहभाग घेतात. 

आपल्यासारखे लक्ष्मीपूजन तिथे दिवाळीत होत नाही. लक्ष्मीपूजन ते कोजागिरी पौर्णिमेला सर्व घरोघरी आवर्जून करतात.  बंगालमध्ये दिवाळी म्हणजे हे दोन दिवस. या दोन्ही दिवशी आपल्याप्रमाणेच तिकडे तेलाचे दिवे लावले जातात. दिव्यांच्या माळा लावून रोषणाई केली जाते. काली पूजेच्या दिवशी फटाके उडवले जातात; पण महाराष्ट्रातल्यासारखी आकाशकंदील किंवा रांगोळ्यांची प्रथा तिथे नाही.

दिवाळी हा त्यांचा विशेष महत्त्वाचा सण नसल्याने फराळासारखी दिवाळीची विशेष अशी काही मिठाई तेव्हा केली जात नाही. बंगाली माणसे तशीही गोड-धोड रोजच खातात. त्यामुळे तेच पदार्थ दिवाळीनिमित्त तिथे असतात.

भाई फोटात्यानंतर येते ती भाऊबीज अर्थात भाई फोटा. बंगालमध्ये राखीपौर्णिमेचे विशेष महत्त्व नाही; मात्र भाऊबीज फार महत्त्वाची आहे. भाई फोटा दोन दिवस साजरा केला जातो. बलिप्रतिपदा आणि यमद्वितीया हे ते दोन दिवस. पहिल्या म्हणजे प्रतिपदेच्या दिवशी बहीण भावाकडे जाऊन त्याला मातीचा तिलक लावून, द्वितीयेला घरी येण्यासाठी आमंत्रित करते. हा फोटा (टिळा) लावताना, ‘प्रोतिपदे दिया फोटा, राखिलाम नियोम, दितीया ते फोटा कोराईबो भोजन’ असे म्हटले जाते. 

दुसरा दिवस जास्त महत्त्वाचा. त्या दिवशी भाऊ बहिणीकडे जातो. बहीण सकाळी ताम्हनात आम्रपल्लव आणि फूलयुक्त कलश ठेवते. त्यासोबत भाताच्या लोंब्या आणि दूर्वा ठेवते आणि त्यासोबत असतो फोटा अर्थात तिलक. हा फोटा चंदन, पाणी, अत्तर, मध आणि दूध अशा पाच गोष्टींपासून बनवला जातो. तो भावाला कपाळ, कान, गळा, छाती, पोट, पाठ इत्यादी ठिकाणी मिळून तेरा वेळा लावला जातो. तेव्हा, ‘शोर्गे हुलूश्तूल, मोरते जोगार, ना जाईयो भाई जोमेर द्वार, जोमेर द्वारे दिलाम कता, यमुना देई यम रे फोटा ,आमीओ देई आमार भाई रे फोटा’ असे म्हणत त्याला ओवाळून मग पाणी आणि मिठाई देऊन, भेटवस्तू दिल्या घेतल्या जातात आणि मग भावाला प्रेमाने जेवू घातले जाते. 

अशा प्रकारे बंगालमध्ये दिवाळी दोन दिवस साजरी केली जाते. ते भाई फोटा हा दिवाळीचा भाग मानत नसले, तरी आपण भाऊबीज दिवाळीचाच भाग मानतो. त्यामुळे भाईफोटाचाही समावेश येथे केला आहे. 

संपर्क : श्रीया निखिल गोळे, पुणे
मधुरा महेश ताम्हनकर, डोंबिवली

मोबाइल :
७०४५५ १३४२२

(‘आठवणीतली दिवाळी’ या मालिकेतील सर्व लेख वाचण्यासाठी https://goo.gl/riz56x या लिंकवर क्लिक करा.)

 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi
Select Language