Ad will apear here
Next
बांधकाम कामगारांना मिळणार पाच रुपयांत जेवण
‘अटल आहार योजने’चा शुभारंभ
बांधकाम कामगारांसाठी अटल आहार योजनेचा पुण्यात शुभारंभ करण्यात आला. या वेळी क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष सुहास मर्चंट, जे. पी. श्रॉफ, कामगार विभागाच्या वरिष्ठ अधिकारी शीतल निकम, कामगार अधिकारी एम. ए. मुजावर आदी उपस्थित होते.

पुणे : दिवसभर अंगमेहनतीचे काम करणाऱ्या बांधकाम कामगारांना आता कामाच्या ठिकाणी केवळ पाच रुपयांत दुपारचे जेवण उपलब्ध होणार आहे. नोंदणीकृत बांधकाम कामगारांना दररोज स्वच्छ आणि गरम जेवण मिळावे यासाठी सरकारने सुरू केलेल्या ‘अटल आहार योजने’चा  क्रेडाई पुणे मेट्रोच्या सहकार्याने पुण्यात प्रारंभ करण्यात आला.

बाणेर येथील ‘कल्पतरू जेड’ या बांधकाम साइटवर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ४०० हून अधिक नोंदणीकृत बांधकाम कामगारांना जेवण पुरवून योजनेचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.

कामगार विभागाच्या उपजिल्हा कार्यकारी अधिकारी शीतल निकम, कामगार अधिकारी एम. ए. मुजावर, क्रेडाई पुणे मेट्रोच्या कुशल उपक्रमाचे, तसेच कामगार कल्याण समितीचे अध्यक्ष जे. पी. श्रॉफ, कामगार कल्याण समितीचे निमंत्रक पराग पाटील, सदस्य समीर बेलवलकर, मिलिंद तलाठी, इंद्रनील मुजुगुले, कल्पतरू प्रकल्पाचे वरिष्ठ उपाध्यक्ष नीलकंठ सरदेसाई, विश्वास कदम, संजय चव्हाण, क्रेडाई पुणे मेट्रोचे महासंचालक डॉ. डी. के. अभ्यंकर, संस्थेचे कामगार कल्याण अधिकारी समीर पारखी या वेळी उपस्थित होते.

जे. पी. श्रॉफ म्हणाले, ‘कोणतीही इमारत उभी राहण्याच्या प्रक्रियेत कामगारांची भूमिका मूलभूत व अतिशय महत्त्वाची असते. त्यामुळे त्यांना वेळच्या वेळी व चांगले अन्न नाममात्र दरात उपलब्ध होणे गरजेचे होते. क्रेडाई पुणे-मेट्रोच्या माध्यमातून ही योजना राबवण्यासाठी शासनाला यापुढेही पूर्ण सहकार्य दिले जाईल.’

कामगार अधिकारी एम. ए. मुजावर माहिती देताना

‘प्रत्येक बांधकाम कामगाराची महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत (बीओसीडब्ल्यू) नोंदणी करून दर वर्षी नोंदणीचे नूतनीकरण करणे आवश्यक आहे,’ असे मुजावर यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘ग्रामीण भागात राहणाऱ्या कामगाराचे तिथे कच्चे घर असेल किंवा त्याची अर्धा गुंठा जागा असेल, तर त्यावर पक्के घर बांधण्यासाठी शासनाकडून दीड लाख रुपयांची आर्थिक मदत, तसेच घर बांधून पूर्ण झाल्यावर आणखी ५० हजार रुपयांचे अर्थसाहाय मिळू शकते. नोंदणी झालेल्या कामगारांसाठी शासनाच्या सुमारे २८ विविध योजना असून, त्याचा लाभ कामगारांनी घ्यायला हवा.’

निकम म्हणाल्या, ‘बांधकाम कामगारांच्या मुलांच्या शालेय, तसेच उच्च शिक्षणासाठी शासनाच्या उत्तम योजना असून कामगारांनी अधिकाधिक संख्येने त्यात सहभागी होण्यासाठी अर्ज करावेत.’

‘क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष सुहास मर्चंट यांच्या मार्गदर्शनातून हा प्रकल्प कल्पतरू साइटवर प्रथम सुरू करण्यात आला असून, सर्व कामगारांना नियमितपणे जेवणाची सुविधा प्राप्त होईल याची काळजी घेऊ,’ असे सरदेसाई यांनी सांगितले.

समीर बेलवलकर यांनी सूत्रसंचालन केले. 
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi