Ad will apear here
Next
‘देशाचेच नव्हे, तर जगाचे वैचारिक नेतृत्व करण्याची क्षमता पुण्यात’
निवृत्त हवाई दलप्रमुख भूषण गोखले यांचे प्रतिपादन; ‘माझं पुणं सुंदर पुणं’ या त्रैमासिकाच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन
निवृत्त हवाई दलप्रमुख भूषण गोखले

पुणे :
‘बदलत्या आधुनिक काळातही पुण्याने आपली संस्कृती टिकवून ठेवून सर्व बदल स्वीकारले. अनेकदा काळाच्या पुढे पाहण्याचे काम पुणेकरांनी केले. त्यामुळे पुण्यामध्ये केवळ देशाचेच नव्हे, तर संपूर्ण जगाचेही वैचारिक नेतृत्व करण्याची क्षमता आहे,’ असे प्रतिपादन निवृत्त भारतीय हवाई दलप्रमुख भूषण गोखले यांनी केले. पुण्याचा विविधांगांनी वेध घेणाऱ्या ‘माझं पुणं सुंदर पुणं’ या त्रैमासिकाच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन गोखले यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

अंकाचे प्रकाशन करताना (डावीकडून) (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, (निवृत्त) हवाईदलप्रमुख भूषण गोखले, कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, व्यवस्थापकीय संपादक योगेश गोगावले, कार्यकारी संपादक स्वाती महाळंक

त्रैमासिकाचे व्यवस्थापकीय संपादक योगेश गोगावले यांनी प्रास्ताविक केले. त्रैमासिक सुरू करण्यामागील भूमिका त्यांनी विशद केली. पुण्याचे वेगळेपण आणि आजपर्यंतच्या पुण्याच्या परंपरांबरोबरच पुण्याने आधुनिकतेकडे घेतलेली झेप या सगळ्याची नोंद घेणे गरजेचे असून, त्यासाठी हे त्रैमासिक सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या अंकाचे वितरण विनामूल्य होणार असून, विविध क्षेत्रांतील विचारवंतांनी या नोंदी करण्यासाठी ‘थिंक टँक’ म्हणून काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले. 



त्रैमासिकाच्या कार्यकारी संपादक स्वाती महाळंक यांनी अंकाच्या अंतरंगाविषयी माहिती दिली. पुण्याचे वेगळेपण हे एखाद-दुसऱ्या अंकामध्ये सामावणारे नाही याची जाणीव असल्यामुळेच या पहिल्या अंकात पुण्याचे वेगळेपण टिपणाऱ्या मोजक्या गोष्टींचा अंतर्भाव केल्याचे त्यांनी सांगितले. पुणे ही देशाची राजधानी करण्याचा ब्रिटिशांनी केलेला विचार, पुण्यामधील शैक्षणिक वाटचाल, पुण्याचा व्यापार-उदीम, पुण्याला आर्थिक शिस्त लावणाऱ्या नागरी बँकांची वाटचाल, याचबरोबर पुण्याची स्मार्ट सिटी योजना, संग्रहालयसमृद्ध पुणे अशा विविध विषयांचा यामध्ये मागोवा घेतल्याचे त्यांनी सांगितले. मुळात पुण्यामध्ये जन्माला आलेल्या, सुरू झालेल्या आणि नंतर देशामध्ये आणि काही वेळा जगभर विस्तारलेल्या काही वेगळ्या उपक्रमांचा वेधही या अंकात घेण्यात आल्याचे त्या म्हणाल्या. 

योगेश गोगावले

पहिल्या अंकाचे मुखपृष्ठ‘जे चांगले आहे ते ते पुण्यामध्ये वाखाणले जाते. पुण्याची ज्ञानसंपदा, संस्कृती याचबरोबर पुण्याच्या खवय्येगिरीचासुद्धा अभ्यास करावा अशी ही गोष्ट आहे. पुण्याने अनेक गुणवंतांना सहजपणे सामावून घेतले आहे. आगामी काळात पुण्याला ‘नॉलेज क्लस्टर’ बनविण्याचा केंद्र सरकारने केलेला विचार म्हणूनच महत्त्वपूर्ण आहे,’ असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. करमळकर यांनी केले. 

‘पुणे हे मुळातच सुंदर आहे, स्मार्ट आहे, आता ते सुरक्षितही कसे होईल याचाही विचार या त्रैमासिकाच्या माध्यमातून करावा,’ असे प्रतिपादन ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी केले. 

या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. विद्याधर अनास्कर, सूर्यकांत पाठक, सुधीर गाडगीळ, अजय धोंगडे, राहुल सोलापूरकर, मनीषा साठे, शमा भाटे, किशोर सरपोतदार, प्र. के. घाणेकर, प्राचार्य दिलीप शेठ, विनया मेहेंदळे, आनंद देशमुख आदींचा त्यामध्ये समावेश होता. 

स्वाती महाळंक
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi