Ad will apear here
Next
मुंबईतील बंदरे
प्रिन्सेस गोदीतील ड्राय डॉक

सध्या भारताच्या जलमार्गातील वाहतुकीचा ४० टक्के हिस्सा मुंबईतील बंदरांचा आहे. मुंबईच्या बंदरांचा विकासामध्ये महत्त्वाचा वाटा आहे. ‘करू या देशाटन’ सदरात आज माहिती घेऊ या मुंबईतील बंदरांची...
..........
अपोलो बंदर म्हणजेच गेटवे ऑफ इंडियापासून शिवडीपर्यंत असलेल्या मुंबईच्या किनाऱ्यावर ब्रिटिश राजवटीत अनेक बंदरे उभी राहिंली. ही बंदरे पूर्व किनाऱ्यावर असल्याने मुख्य समुद्रापासून येणाऱ्या आरमारी आक्रमणापासून सुरक्षित आहेत. सुमारे १० किलोमीटर लांबीच्या किनाऱ्यावर अनेक बंदरे आजही उभी आहेत. सुएझ कालवा कार्यान्वित झाल्यावर मुंबई बंदराचे महत्त्व वाढले. सध्या भारताच्या जलमार्गातील वाहतुकीचा ४० टक्के हिस्सा मुंबईतील बंदरांचा आहे. मुंबईच्या बंदरांचा विकासामध्ये महत्त्वाचा वाटा आहे. येथील सुरक्षित बंदरांमुळे मुंबईत व्यापार व उद्योगांना मोठा हातभार लागला व लोकांना रोजगाराचे मोठे साधन उपलब्ध झाले. 

प्रिन्सेस गोदीचे जुने छायाचित्र

पूर्व किनाऱ्यावर मासेमारी, प्रवासी, मालवाहतूक करणारी, तसेच आरमारी बंदरे ब्रिटिश काळात उभी राहिली. स्वातंत्र्यानंतर अनेक बंदरांचा विकासही करण्यात आला आहे. दक्षिण टोकाला असलेली ससून गोदी आज मासेमारीकरिता मर्यादित राहिली आहे. अपोलो बंदरावरून पूर्वी परदेशी जाणाऱ्या बोटी सुटत असत. आज तेथून घारापुरीच्या व अलिबागजवळील मांडावापर्यंत जाणाऱ्या छोट्या यांत्रिक बोटी सुटतात व आसपास नौकानयनही करता येते. बॅलार्ड पिअर हा परदेशी प्रवासी बोटी सुटण्याचा प्रमुख धक्का होय. देशांतर्गत प्रवासी वाहतूक भाऊच्या धक्क्यावरून चालते. अलेक्झांड्रा, इंदिरा (व्हिक्टोरिया) व प्रिन्सेस या तीन गोद्या मालवाहतुकीकरिता विशेष प्रसिद्ध आहेत. याशिवाय मोदी, मॅलेट, कसारा, लकडी, न्यू टँक, हे हाजी, शिवडी, बॅलार्ड पिअर, पीरपाव इत्यादी अनेक छोट्या बंदरांमधून अरबी समुद्रातून नावांमार्फत व्यापार सुरू असतो. तुर्भे व बुचर बेटावर तेल उतरविले जाते. याशिवाय भारतीय नौसेनेची माझगाव गोदी येथेच आहे. मांडवी, डोंगरी व कॉटन ग्रीन येथे मालाची गोदामे आहेत. अनेक वाहतूक कंपन्यांची कार्यालये येथे केंद्रित झाली आहेत. भारतातील बंदरांद्वारे होणाऱ्या आयातीमधील मुंबईचा वाटा ४३ टक्के आणि निर्यातीमधील वाटा २२ टक्के आहे. अशुद्ध तेलाच्या वाढत्या आयातीमुळे आकडा फुगला आहे. अशुद्ध तेलांव्यतिरिक्त लोखंड, पोलाद, तयार वस्तू इत्यादी मुंबईत येतात. 

मुंबई बंदराच्या पार्श्वप्रदेशात महाराष्ट्र, मध्य प्रदेशचा पश्चिम भाग, राजस्थान, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक यांचा काही भाग इत्यादींचा समावेश होतो. मुंबई गोदीवरचा ताण कमी करण्यासाठी न्हावा-शेवा प्रकल्प उभारण्यात आला असून, त्यामुळे मुंबई बंदर, तसेच मुंबईतील अंतर्गत वाहतुकीवरील ताण कमी झाला आहे. 

पायधुणी : फार पूर्वीपासून कोकणातून, तसेच कर्नाटकातून, तसेच गुजरातपासून मुंबईला येण्यासाठी जलमार्गाचा वापर होत असे . त्या वेळी आता आहेत तसे बांधीव धक्के नव्हते व मोठ्या बोटी दूर अंतरावर उभ्या राहत असत व प्रवासी गुडघाभर पाण्यात चिखल तुडवीत येत असत आणि नंतर पाय धुवून ते येत असत. एक प्रकारे पायांना समुद्रस्नान होत असे. म्हणून मशीद बंदर परिसरातील केशवजी नाईक कारंजा परिसराला पायधुणी असे नाव पडले. प्रिन्सेस मॅलेट बंदर, भाऊचा धक्का, तसेच माझगावमधून येथे प्रवासी जमिनीवर येत असत. 

भाऊच्या धक्क्याचे उद्धव ठाकरे यांनी काढलेले हवाई छायाचित्रभाऊचा धक्का : सन १८६२मध्ये मुंबईच्या जडणघडणीत मोलाचा सहभाग असलेल्या पाठारे प्रभू ज्ञातीतील लक्ष्मण हरिश्चंद्रजी अजिंक्य उर्फ भाऊ रसूल यांनी हा धक्का बांधला. हा धक्का बांधण्यापूर्वी उतारूंचे बोटीतून जमिनीवर येईपर्यंत खूप हाल होत असत. रात्रभर समुद्राचे हेलकावे खात यायचे. बोट समुद्रात लांब कोठे तरी नांगर टाकायची. रात्री अपरात्री बोटीवरून छोट्या मचव्यांतून कसेबसे किनाऱ्यापर्यंत यायचे व चिखल तुडवत जमिनीवर पाय ठेवायचे. गोदीत कंत्राटदारी करणाऱ्या भाऊंना हे दृश्य पाहून वाईट वाटत असे. सरकार काही करील अशी आशा नसल्याने शेवटी ज्या उतारूंच्या जिवावर ते धनाढ्य झाले, त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी कर्ज काढून हा धक्का उभारण्यात आला. हा धक्का बांधण्याचे उद्दिष्ट ब्रिटिशांनी ठेवले होते; पण आर्थिक टंचाईमुळे त्यांना काम करता येत नव्हते. अखेर मालकी हक्काने बांधकाम करून देण्यासाठी त्यांनी निविदा मागविल्या. अत्यंत अवघड जागी समुद्राची भरती-ओहोटी या गोष्टी लक्षात घेऊन हे आव्हान स्वीकारण्यास कोणी धजावत नव्हते; पण भाऊंनी हे आव्हान स्वीकारले. त्यांच्याकडून नियोजित बंदर कामाचा आराखडा घेऊन त्यावर अभ्यास करून भाऊंच्या अर्जाला काही अटींवर सरकारने मंजुरी दिली. त्यांच्याकडे भरपूर पैसे होते, असे नव्हते. त्यांनी तत्कालीन गव्हर्नर रॉबर्ट ग्रांट यांच्याकडून ६ टक्के चक्रवाढ व्याजदराने दीड लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून घेतले व कामाला सुरुवात केली. 

भाऊचा धक्का

भरती-ओहोटी-वादळवाऱ्यांनी मातीचा भराव टिकणार नाही हे लक्षात घेऊन कचऱ्याचा भराव घालून नियोजित बांधकामासाठी वापर करण्याचे ठरविले. कचरा पाण्याने ओला झाल्यावर त्याचा लगदा जमिनीला पकड घेणार हे भाऊंच्या लक्षात आले. ते कचऱ्याची विल्हेवाट लावणारे कंत्राटदार असल्याने त्यांना कचरा मिळवणेही सोपे गेले. त्यांनी चार वर्षांत वखारीसह बंदराचे काम पूर्ण केले. 

भाऊचा धक्का

मुंबईच्या जडणघडणीत ज्या काही मराठी व्यक्तींचा प्रामुख्याने समावेश आहे, त्यात भाऊंचे नाव घेणे आवश्यक आहे. पाठारे प्रभू ज्ञातीतील लक्ष्मण हरिश्चंद्रजी अजिंक्य उर्फ भाऊ रसूल यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील उरणजवळील करंजा या गावी इ. स. १७८९ साली झाला. मुंबईत आल्यावर युद्धसाहित्य व यंत्र बनवणाऱ्या कुलाबा येथील कारखान्यात अव्वल कारकून म्हणून ते कामावर रुजू झाले. तेथील कॅप्टन रसेल यांची त्यांच्यावर मर्जी बसली. त्यांच्याशिवाय त्यांचे पान हलत नसे. त्यांची वागणूक सौहार्दाची असल्याने ते कामगारजगात भाऊ म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांचे मूळ नाव मागे पडून त्यांना भाऊ नावाने ओळखायला लागले. कॅप्टन रसेलचा लोभ भाऊंना लाभल्याने त्यांना भाऊ रसूल म्हणूनही ओळखले जाऊ लागले. त्या वेळी माहीम, माटुंगा, वरळी, परळ, माजगाव, धाकटा कुलाबा आणि मोठा कुलाबा या सात बेटांत मुंबई विभागलेली होती. कुलाब्यातील कारखान्यात सात बेटांवरून कामगार येत असत. त्यांचे जेवणाखाण्याचे हाल होत असत. कामगारांच्या दुपारच्या भोजनाची व्यवस्था करण्यासाठी उपाहारगृह सुरू करण्याची विनंती त्यांनी प्रशासनाला केली. ती जबाबदारी प्रशासनाने त्यांच्यावरच सोपविली. त्यांनी कर्मचाऱ्यांना माफक दरात दुपारचे भोजन उपलब्ध करून दिले व त्यांच्या व्यवसायाला सुरुवात झाली. त्यांनी बंदरातील काही रस्त्यांवर भराव टाकण्याची कामे मिळवली व ते पूर्ण वेळ ठेकेदार झाले. त्यांनी कर्नाक बंदराच्या धक्क्याचे काम मिळविले व पूर्ण केले.
 
पहिले महायुद्ध खलाशी स्मारक (फोटो : Bijoor.me)

पहिले महायुद्ध खलाशी स्मारक :
मस्जिद बंदर येथील इंडियन सेलर होम सोसायटीमध्ये पहिल्या महायुद्धाचे स्मारक आहे. ज्ञात-अज्ञात युद्धात मरण पावलेल्या खलाशांच्या जीवनाविषयी तेथे माहिती मिळते. दिल्ली स्ट्रीट आणि ठाणे स्ट्रीटदरम्यान गोदामांच्या ओळीच्या मध्यभागी घुमटाकार रचना असलेल्या इमारतीमध्ये हे स्मारक आहे. भिंतींवर पितळ पट्ट्या लावलेल्या आहेत. त्यात मृत नाविकांची नावे, तसेच त्यांच्या मालकीच्या जहाजाची नावे आहेत. येथील अष्टकोनी हॉलमध्ये नौदल इतिहासातील ध्वज आले आहेत. रॉयल इंडियन मरीनचे जुने झेंडे (‘स्टार ऑफ इंडिया’सह निळे रंग), रॉयल इंडियन नेव्ही (व्हाइट इग्निज), मर्चंट नेव्ही आणि रॉयल नेव्हीचे झेंडे येथे बघण्यास मिळतात. 

केशवजी नाईक फाउंटनकेशवजी नाईक फाउंटन : केशवजी नाईक पथ आणि नरसी मेहता पथ जेथे मिळतात तेथील त्रिकोणात हे कारंजे आहे. त्या वेळचे धनिक लोकोपयोगी कामे करायचे. त्यात त्यांची प्रसिद्धी व्हायची, तसेच परिसराची शोभाही वाढत असे. जानेवारी १८७६मध्ये मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर सर फिलीप एडमंड वुडहाउस यांच्या हस्ते या कारंज्याचे उदघाटन झाले. हे कारंजे अष्टकोनी असून, त्याचे बांधकाम चार प्रकारच्या नैसर्गिक दगडांमध्ये केले आहे. यामध्ये काळा बेसॉल्ट, मालाड खाणीतील फिकट पिवळसर बेसॉल्ट दगड, धोलपूर येथील लाला दगड व पिवळ्या चुनखडी दगडाचा वापर केला आहे. पशु-पक्ष्यांनाही सहजपणे पाणी उपलब्ध व्हावे, या दृष्टीने कुंडांची रचना केलेली दिसून येते. २०१५मध्ये या कारंज्याचे पुनरुज्जीवन करण्यात आले. (याबद्दल अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मुंबईतील प्रमुख बंदरे : मुंबईच्या बंदरांमध्ये आत जाऊन तेथील कामकाज बघणे खूप आनंददायी आहे. कंटेनरची वाहतूक, क्रेनद्वारे ती उचलून बोटीवर ठेवणे व बोटीतून उतरविणे ही कामे काळजाचा ठोका चुकवणारी आहेत. महाकाय क्रेन जेव्हा एखादा कंटेनर लीलया उचलते, ते दृश्य आश्चर्यकारक असते. २४४ तास येथील काम अव्याहतपणे चालू असते. उतरलेला माल बाहेर पाठविणे, तसेच निर्यात माल बंदरात आणणे यासाठी शेकडो मालट्रक, कंटेनर यांची लगबग चालू असते. मुंबईवरील अतिरेकी हल्ल्यानंतर येथील सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आली आहे. 

मुंबई पोर्ट ट्रस्टची स्थापना २६ जून १८७३ रोजी करण्यात आली (बॉम्बे ट्रस्ट पोर्ट). कर्नल जे. ए. बॅलार्ड हे पहिले अध्यक्ष होते. मुंबई बंदरावर तीन डॉक्स आहेत. त्यापैकी प्रिन्सेस डॉक सन १८८०मध्ये सुरू करण्यात आली. प्रिन्सेस गोदीचे क्षेत्र १२ हेक्टर आहे. प्रिन्सेस गोदीला जहाजासाठी २० मीटर रुंदीचा दरवाजा आहे. व्हिक्टोरिया व अलेक्झांड्रा या मुख्य गोद्या आहेत. व्हिक्टोरिया डॉक १८९१मध्ये बांधले गेले. व्हिक्टोरिया गोदीला २४.४ मीटर रुंदीचा दरवाजा आहे, तर व्हिक्टोरिया गोदीचे क्षेत्र १० हेक्टर आहे. दोन्ही गोद्या एका लहान जलपाशाने जोडलेल्या आहेत. या दोन्ही गोद्यांत पूर्ण भरतीच्या आधी तीन तास जहाजे आत घेतात किंवा त्यांतून बाहेर जातात. व्हिक्टोरिया गोदीत २४५४ मीटर लांबीचे धक्के आहेत. प्रिन्सेस गोदीजवळच मॅलेट बंदर येथे किनारी वाहतुकीसाठी नवा भाऊचा धक्का बांधण्यात आला आहे. 

अलेक्झांड्रा गोदीचे क्षेत्रफळ सुमारे २० हेक्टर असून, तीत एकूण २० धक्के आहेत. तिचा जलपाश २२५ मीटर लांब व ३० मीटर रुंद असून, तिच्यात पाण्याची खोली कायम ८.१ मी.असते. त्यामुळे या गोदीत दिवसभरात केव्हाही जहाजे आणणे आणि बाहेर नेण शक्य असते. धक्क्यावर ६० टन व ११० टन वजनाच्या दोन याऱ्या आहेत. त्यांशिवाय लहान वजनाच्या बऱ्याच याऱ्या आहेत. 

अलेक्झांड्रा गोदी

अलेक्झांड्रा गोदीच्या पश्चिमेस बंदराचा धक्का ५०० मीटर लांब वाढविला आहे. तोच बॅलार्ड पियर होय. तेथे पाण्याची खोली ९-१० मीटर असते. तेथे व अलेक्झांड्रा गोदीचा धक्का क्र. १८ येथे परदेशी जाणाऱ्या प्रवासी जहाजांची व्यवस्था आहे. शिवाय तीन टन वजनाच्या याऱ्या व तासाला २०० टन तेल उतरवून घेण्याचीही सोय येथे आहे. 

कसे जाल मुंबईच्या बंदर परिसरात?
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे मध्य रेल्वेच्या उपनगरी व मुख्य रेल्वे मार्गावरील कोणत्याही ट्रेनने येता येते. तेथून टॅक्सी किंवा बसने बॅलार्ड पियरपर्यंत जात येते. येथे बेस्टच्या बसेस उपलब्ध आहेत. तसेच टॅक्सी सेवाही उपलब्ध आहे. 

- माधव विद्वांस

ई-मेल : 
vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी आणि शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)

(मुंबईतील पुरातन वारसा वास्तूंबद्दल माहिती देणारे, आर्किटेक्ट चंद्रशेखर बुरांडे यांनी लिहिलेले  लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi