Ad will apear here
Next
मुलुखगिरीच्या प्रतीक्षेतील एक भाषा
मराठीला वाढायचे असेल, तर तिला प्रांतापुरते राहून चालणार नाही. तिला मुलुखगिरी करावी लागेल. अर्थात अठराव्या शतकाप्रमाणे सैन्य घेऊन हे काम करायचे नाही. एकविसाव्या शतकाच्या हिशेबाप्रमाणे नव्या पद्धतीने हे काम करावे लागेल.
...............
भाषावर प्रांतरचनेमुळे मराठीचे मोठे नुकसान झाले आहे, अशी खंत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी नुकतीच व्यक्त केली. ‘अनेक विद्यापीठांमधून मराठी भाषा लयास चालली आहे. महाराष्ट्रातच पालक मुलांना मराठी शाळेत घालत नाहीत. शासन काही करत नाहीच; समाजातही जागरूकता नाही. भाषा रोजगाराशी जोडली गेली असती, तर ही वेळ आली नसती. पन्नास वर्षांनी मराठी लिहिलीच जाणार नाही, अशी भीती वाटते आहे. हे चित्र बदलण्यासाठी, भाषेचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी भाषेकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे लागेल. मराठीवर केवळ इंग्रजी नव्हे, तर हिंदीचेही आक्रपण झाले आहे. हिंदीने राजस्थानी, पंजाबी भाषेचे नुकसान केले. तीच वेळ आता मराठीवर आली आहे. आपली मूळ भाषा आपणच जतन केली पाहिजे,’ असे ठाले-पाटील म्हणाल्याचे प्रसिद्ध झाले आहे.

भाषेच्या आधारावर राज्यांची पुनर्रचना व्हावी, ही मागणी तशी जुनीच. अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासूनची. ब्रिटिशांच्या काळातच विविध ठिकाणी भाषावार चळवळी उभ्या राहिल्या होत्या. त्या वेळी जी राज्यांची निर्मिती झाली, ती मुख्यतः प्रशासनाच्या सोयीसाठी. भाषेच्या आधारावर भारतीय लोकांचे पहिले एकत्रीकरण झाले ते १९०५मध्ये. त्या वेळी वंगभंगाची चळवळ झाली आणि बंगाली भाषक एकवटले. त्यानंतर मद्रास प्रांतातील तेलुगू लोकांनी १९१७मध्ये आंदोलने केली होती.
स्वातंत्र्याच्या पूर्वी भाषेच्या आधारावर निर्माण होणारे प्रथम राज्य होते ओडिशा. मधुसूदन दास यांच्या प्रयत्नामुळे १९३६ साली बिहारमधून वेगळ्या ओडिशाची निर्मिती झाली. त्यानंतर राष्ट्रीय सभेच्या १९२०च्या नागपूर अधिवेशनात आणि १९२८च्या नेहरू अहवालामध्ये भाषावार प्रांतरचनेचा तत्त्वतः स्वीकार करण्यात आला होता.  सेच १९४५-४६च्या निवडणूक जाहीरनाम्यातसुद्धा राष्ट्रीय सभेने याच तत्त्वाचा समावेश केला होता. स्वातंत्र्यानंतर राज्यघटनेत भारताचे वर्गीकरण चार भागांत करण्यात आले.

परंतु हे वर्गीकरण अयशस्वी ठरले. त्यामुळे सरकारने राज्य पुनर्रचना करण्यासाठी विविध आयोग नेमले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९४८मध्ये एस. के. धर आयोगापुढे एक निवेदन दिले होते. त्यात त्यांनी भाषावार प्रांतरचनेला पाठिंबा दिला होता. खासकरून मराठी भाषक लोकांसाठी महाराष्ट्र हे राज्य असावे आणि त्याची राजधानी मुंबई असेल, या मागणीवर बाबासाहेबांनी भर दिला होता. केंद्र शासनाची जी अधिकृत भाषा असेल, तीच प्रत्येक राज्याची अधिकृत भाषा असावी, असा आग्रह त्यांनी धरला होता. ‘एक भाषा एक राज्य’ याऐवजी ‘एक राज्य एक भाषा’ हे सूत्र त्यांनी सुचविले होते. म्हणजे भाषेवर आधारित राज्य न बनता राज्यकारभाराच्या सोयीसाठी एक भाषा स्वीकारावी, असे त्यांचे म्हणणे होते. भारतातील प्राचीन राज्यांच्या कारभाराला ते अनुसरून होते.

उदाहरणच घ्यायचे झाले, तर देवगिरीच्या यादवांच्या काळात मराठी भाषेला प्रोत्साहन मिळाले. त्यांच्या राजाश्रयामुळे ज्ञानेश्वरांपासून अनेक संतांनी मराठीची महती गायली व साहित्य निर्माण केले; मात्र याच यादवांची एक शाखा पुढे विजयनगरची शासक बनली, तेव्हा तेलुगू, कन्नड आणि मराठी या तिन्ही भाषांना त्यांनी उत्तेजन दिले; मात्र बाबासाहेबांची ती सूचना मान्य झाली नाही आणि भाषावार प्रांतरचना अस्तित्वात आली. ज्या वेळी भाषावार प्रांतरचना करण्याचा निर्णय घेण्यात आला, त्यामागचा उद्देश हा होता, की सरकारचे कामकाज स्थानिक लोकांना समजेल अशा भाषेत झाले पाहिजे. दुसरा उद्देश म्हणजे त्या त्या भाषेतील साहित्य आणि संस्कृतीचे संवर्धन झाले पाहिजे. तसेच जगातील विविध भाषांतील साहित्य लोकांना मिळाले पाहिजे, जेणेकरून त्यांना ज्ञान प्राप्त होईल. या उद्देशाच्या दिशेने पावले पडलेही.

महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी प्राधान्याने जे निर्णय घेतले, त्यामध्ये ‘मराठी भाषेच्या सांस्कृतिक आणि ज्ञानात्मक विकासासाठी मराठी साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना करणे’ हा एक महत्त्वपूर्ण निर्णय होता. या मंडळाच्या स्थापनेपासून भाषा, तसेच साहित्य आणि संस्कृती संवर्धनाचे कार्य सुरू आहे. याअंतर्गत विविध ग्रंथांची निर्मिती करणे, पदनाम कोश आणि शासकीय व्यवहार कोशाची निर्मिती करणे अशी अनेक कामे करण्यात आली.
त्यातून ‘मराठी विश्वकोशा’ची निर्मितीही झाली. म्हणजेच सरकारने आपल्या परीने भाषेचा व्यवहार करण्यात फारशी कसूर ठेवली नाही. कुठल्याही समाजाला तीन अधिष्ठाने असतात – धर्म, लोकसमूह आणि राज्य (सरकार). श्लोक, पूजा आणि प्रार्थना अशा माध्यमातून धर्माच्या द्वारे भाषा टिकू शकते. संस्कृतसारखी भाषा ही याचे उदाहरण आहे. राज्य म्हणजे सरकार आपल्या पद्धतीने काम करू शकते; मात्र ते लोकांना भाषा वापरण्यास भाग पाडू शकत नाही. खासकरून लोकशाही व्यवस्थेत तर नाहीच नाही. त्यामुळे वर म्हटल्यासारखे कोशनिर्मिती किंवा काही सरकारी कार्यक्रम यापलीकडे शासनाचे प्रयत्न जाऊ शकत नाहीत. आता उरला लोकसमूह. या समूहाने लोकगीते, मौखिक किंवा लिखित साहित्य इत्यादी माध्यमातून आपली भाषा पुढे नेली तर ती टिकू शकते, वाढू शकते.

मराठी भाषेची गोम इथेच आहे. मराठी भाषकांनाच आपल्या भाषेबद्दल आत्मविश्वास नाही. ही भाषा बोलली, तर आपण गावंढळ ठरू, अशी त्यांनाच भीती वाटते. त्यासाठी कोणाला दोषी धरायचे म्हणून ते बोट दाखवतात हिंदीकडे. निव्वळ भाषावार प्रांतरचना ही भाषेच्या आकुंचनासाठी जबाबदार असती, तर हिंदी ही आतापर्यंत उत्तर प्रदेश किंवा मध्य प्रदेशापुरती उरली असती; मात्र सनदी सेवेपासून रोजंदारी मजुरांपर्यंत हिंदी भाषकांनी सर्वत्र संचार केला आणि प्राणपणाने आपली भाषा जपली म्हणून ती आज पसरताना दिसते.

एके काळी मराठीने हेच केले होते. नामदेव ते रामदास अशा संतांनी भारतभर संचार करून मराठीची पताका फडकवली. त्यानंतर मावळ्यांनी मुलुखगिरी करून आपल्या भाषेच्या सीमा वाढविल्या. आजही हे करण्यापासून कोणीही त्यांना रोखलेले नाही; मात्र आता आपले राज्य, आता मेहनत करायची गरज नाही, या सुखवस्तू विचारात ते अडकले आणि वरचेवर आपली भाषा संकुचित होताना पाहत राहिले. ‘मनी नाही भाव आणि देवा मला पाव,’ अशी त्यांची अवस्था झाली. मराठीला वाढायचे असेल, तर तिला प्रांतापुरते राहून चालणार नाही. तिला मुलुखगिरी करावी लागेल. अर्थात अठराव्या शतकाप्रमाणे सैन्य घेऊन हे काम करायचे नाही. एकविसाव्या शतकाच्या हिशेबाप्रमाणे नव्या पद्धतीने हे काम करावे लागेल. ते झाले, म्हणजे मग कोणावर दोषारोप करण्याची वेळ येणार नाही.

– देविदास देशपांडे
ई-मेल : devidas@dididchyaduniyet.com

(लेखक मुक्त पत्रकार व अनुवादक आहेत. ‘बाइट्स ऑफ इंडियावरील त्यांचे सर्व लेख https://goo.gl/wvsqQ8 या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप

(आंतरराष्ट्रीय स्थानिक भाषा वर्षानिमित्त 
‘बाइट्स ऑफ इंडियाने राबविलेल्या बोलू ‘बोली’चे बोल! या मराठीच्या बोलीभाषांसंदर्भातील उपक्रमाबद्दल वाचण्यासाठी आणि विविध बोलीभाषांचा आस्वाद घेण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi
Select Language