Ad will apear here
Next
मूल चुकतंय? का आपण?

बऱ्याचदा मुलांच्या चुकीच्या वर्तनाला आपणच जबाबदार असतो, कारणीभूत असतो आणि ही गोष्ट आपल्या लक्षातच येत नाही. उलट आपल्या मुलानं सुधारावं किंवा चुकीचं वागू नये, अशी अपेक्षा करत आपण त्याच्यावरच वेगवेगळे प्रयोग करत असतो... ‘मनी मानसी’ सदरात या वेळी पाहू या मुलांच्या वर्तनाबद्दल...
....................................
चार वर्षांच्या सुजलला घेऊन त्याची आई भेटायला आली. आईबरोबर तिची एक मैत्रिणदेखिल आली होती. याच मैत्रिणीनं तिला सुजलला समुपदेशनासाठी घेऊन येण्याबाबत सुचवलं होतं. त्यामुळे दोघी सुजलला घेऊन आल्या होत्या. आईने तिची स्वतःची ओळख करून दिली. आई एका कंपनीमध्ये नोकरी करते. घरात आई-वडील, सुजल, त्याची मोठी बहिण आणि आजी-आजोबा राहतात. गेल्या आठ-दहा महिन्यांत सुजलचं वागणं खूपंच बदललंय, हे सांगताना आईला रडू आवरणं कठिण झालं.

आई खूपच अस्वस्थ झाल्याने तिला शांत होण्यासाठी वेळ दिला. या काळात सुजलचं निरिक्षण करताना असं लक्षात आलं, की सुजल अतिशय चिडका आणि तापट आहे. प्रत्येक गोष्ट रडत-ओरडत बोलणं, आईने ऐकलं नाही, तर तिला मारणं, चिमटे काढणं, असे प्रकार तो वारंवार करत होता आणि त्याने तसं करू नये, म्हणून तो सांगेल ती प्रत्येक गोष्ट आई लगेचच ऐकत होती. त्याच्या या वर्तनाला आईने एकदाही विरोध केला नाही. आईचं हे वर्तन हेच त्याच्या चुकीच्या वर्तनामागचं किंवा समस्येमागचं महत्त्वाचं कारण असावं असं या निरीक्षणातून वाटलं, म्हणून त्याच्या या वर्तनाला आईला मुद्दाम विरोध करण्यास सांगितलं. हा विरोध अनपेक्षित असल्याने त्यानं आईला कडाडून विरोध केला. परंतु तरीही आई मात्र त्याला काहीच बोलली नाही.

काही वेळाने आईसोबत आलेली तिची मैत्रीण सुजलला घेऊन बाहेर गेली आणि मग आईशी सविस्तर बोलण्यास सुरुवात केली. तेव्हा सुजलच्या समस्येमागचं मूळ कारण लक्षात आलं. सुजलच्या आई-वडिलांचं लग्न झाल्यानंतर बऱ्याच प्रयत्नांनी व उशीरा त्यांना मुलं झाली. त्यामुळे अर्थातच सगळेजण मुलीचे आणि मुलाचे म्हणजे या दोन्ही भावंडांचे खूप लाड करायचे. ते म्हणतील ते आणि म्हणतील तेव्हा त्यांच्यासमोर हजर करायचं. अनेक गोष्टी तर गरज नसतानाही त्यांना आणून दिल्या जायच्या.

हे आईच्या लक्षात आल्यावर आई मुलांना रागवायची, पण बाकीच्यांचा मात्र याला विरोध असायचा. आईने त्यांना रागावता कामा नये, असं घरातल्या प्रत्येकाचं म्हणणं असायचं. आई मुलांना रागावली, की आजी-आजोबा तिलाच रागवायचे. मुलीचा स्वभाव मुळातच शांत असल्याने तिने आईला फारसा त्रास दिला नाही, पण सुजलचा स्वभाव या अति लाडामुळे हट्टी आणि चिडका बनला. इतरांचं अनुकरण करत तोदेखिल आईसमोर आरडा-ओरडा करणं, ओरडणं, वस्तू फेकणं असं वर्तन करायला शिकला. सुरुवातीला आईने शिस्त लावण्याचा प्रयत्न केला, पण घरच्यांच्या विरोधाला कंटाळून तिनंही नाईलाजानं हा प्रयत्न सोडून दिला.

या सगळ्याचा व्हायचा तोच परिणाम सुजलवर झाला. तो जास्तच हट्टी आणि चिडखोर बनत गेला. कोणाचंच ऐकेनासा झाला. आजी-आजोबा, आई-बाबा कोणालाही मारणं, चावणं, वस्तू फेकणं, असं आक्रस्ताळं वर्तन करायला लागला. त्याची ही समस्या आणि त्याची कारणं लक्षात आल्यावर सुजलच्या आईला त्याचं गांभीर्य लक्षात आणून दिलं आणि सुजलच्या वडिलांना घेऊन दोनच दिवसात पुढील सत्रासाठी येण्यास सांगितलं. आईलाही समस्येचं गांभीर्य लक्षात आल्यामुळे ती दोनंच दिवसात सुजलच्या वडिलांना घेऊन परत भेटायला आली. या सत्रात आईला आणि वडिलांना सुजलच्या समस्यांची, कारणांची आणि परिणामांची सखोल जाणीव करून देण्यात आली. नंतर उपाय योजनांबाबतही मार्गदर्शन करण्यात आलं. वडिलांच्या मदतीने सुजलच्या आजी-आजोबांशीदेखील संवाद साधून या बदल प्रक्रियेत त्यांना समाविष्ट करून घेतलं. काही काही बदल प्रयत्नपूर्वक करण्यास सांगितले. त्यासाठी मानसोपचारातील काही वर्तन बदल तंत्रांचाही वापर केला.   

या सगळ्या प्रयत्नांमुळे आणि मुख्य म्हणजे सर्वांच्या वर्तनात, शिस्त लावण्यात एकवाक्यता, सुसूत्रता आल्याने सुजलच्या सगळ्या वर्तन समस्या हळूहळू कमी होत गेल्या आणि घरातलं वातावरणही सुधरत गेलं. या प्रयत्नांमुळे कळत-नकळत घरातील समस्या संपुष्टात येऊन नातेसंबंध सुधारायलाही मदत झाली होती.

(केसमधील नाव बदलले आहे.)

- मानसी तांबे - चांदोरीकर
ई-मेल : tambe.manasi11@gmail.com

(लेखिका पुण्यात समुपदेशक म्हणून कार्यरत आहेत. ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘मनी मानसी’ लेखमालिकेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/a3SDSr या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language