Ad will apear here
Next
श्रीपाद अमृत डांगे, आर. के. नारायण, डॉ. प्रतिमा इंगोले
‘भारतीय कम्युनिस्ट चळवळीचे भीष्माचार्य’ म्हणून ओळखले जाणारे कॉम्रेड श्रीपाद डांगे , एकाहून एक इरसाल माणसांचे भन्नाट नमुने असणाऱ्या ‘मालगुडी’ या काल्पनिक गावाचं विश्व आणि ‘गाइड’सारख्या मनाचा ठाव घेणाऱ्या अनेक लोकप्रिय कादंबऱ्यांचे लेखक रासिपुरम कृष्णस्वामी अय्यर नारायणस्वामी उर्फ आर. के. नारायण आणि ग्रामीण विदर्भातल्या समस्यांवर आपल्या कथांमधून बोट ठेवणाऱ्या डॉ. प्रतिमा इंगोले यांचा १० ऑक्टोबर हा जन्मदिन. त्यानिमित आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा परिचय.....
..................

श्रीपाद अमृत डांगे

१० ऑक्टोबर १८९९ रोजी नाशिकमध्ये जन्मलेले कॉम्रेड श्रीपाद डांगे हे भारतीय कामगार चळवळीचे (आयटक) आणि संयुक्त महाराष्ट्र स्वातंत्र्य लढ्याचे प्रमुख नेते होते. आंतरराष्ट्रीय कामगार चळवळीत त्यांना मानाचं स्थान होतं. त्यांनी स्टालिन, ख्रुश्चेव्ह, ब्रेझनेव्ह, मिकोयान वगैरे कम्युनिस्ट नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या. १९६४ ते १९७८ अशी चौदा वर्षं ते भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अध्यक्ष होते. त्यांच्या आंतरराष्ट्रीय कम्युनिस्ट चळवळीतलं योगदान पाहून सोव्हिएत सरकारच्या वतीने त्यांना ‘लेनिन पारितोषिक’ देण्यात आलं होतं. 

त्यांचं वक्तृत्व असाधारण आणि अमोघ शैलीचं. त्यांनी मुंबई विधानसभा आणि भारतीय लोकसभा आपल्या वक्तृत्वाने गाजवल्या होत्या. त्यांनी ‘सोशॅलिस्ट’ हे वर्तमानपत्रही सुरू केलं होतं.

गांधी विरुद्ध लेनिन, अंमळनेरच्या हत्याकांडाची भाषणे, बारा भाषणे, इतिहास कोण घडवतो, गाडगीळ आणि भारतीय लोकशाहीचे अर्थशास्त्र, अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत.

२२ मे १९९१ रोजी मुंबईमध्ये त्यांचं निधन झालं.
 .....................

रासिपुरम कृष्णस्वामी अय्यर नारायणस्वामी 

१० ऑक्टोबर १९०६ रोजी मद्रासमध्ये जन्मलेले रासिपुरम कृष्णस्वामी अय्यर नारायणस्वामी ऊर्फ आर. के. नारायण हे गेल्या शतकातले इंग्लिशमध्ये लेखन करणारे अग्रगण्य भारतीय लेखक!

दक्षिण भारतात बहुतेक आयुष्य घालवल्यामुळे त्यांच्या लेखनात तिथले संदर्भ, तिथलं लोकजीवन अपरिहार्यपणे आलेलं दिसतं. मालगुडी नावाचं एक काल्पनिक गाव आणि तिथली माणसं यांच्यावर त्यांनी लिहिलेल्या कथा प्रचंड लोकप्रिय झाल्या. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी ‘स्वामी अँड हिज फ्रेंड्स’, ‘ड बॅचलर ऑफ आर्टस्’ आणि ‘ड इंग्लिश टीचर’ अशी तीन कादंबऱ्यांची मालिका लिहिली जी अफाट लोकप्रिय झाली. गंमत म्हणजे या कादंबरीच्या प्रकाशनाचं श्रेय जातं ते आर. के. नारायण यांचे स्नेही प्रसिद्ध इंग्लिश कादंबरीकार ग्रॅहॅम ग्रीन यांना. त्यांनीच हे हस्तलिखित वाचून त्याचं नाव ठेवलं आणि प्रकाशक गाठून दिला होता.
 
आर. के. नारायण यांनी ३४ कादंबऱ्या आणि अनेक कथा लिहिल्या. याशिवाय त्यांनी संक्षिप्त रूपात लिहिलेलं महाभारत आणि रामायणसुद्धा लोकप्रिय झालं होतं.
 
इंग्लिशमधून लेखन करणारे आर. के. नारायण भारताच्या घराघरात पोहोचले ते मात्र त्यांच्या ‘गाइड’ कादंबरीमुळे. १९५८ सालच्या त्यांच्या या कादंबरीवर देव आनंदने त्याच नावाचा सिनेमा १९६५ साली काढला. विजय आनंद दिग्दर्शित हा सिनेमा देव आनंद, वहिदा रेहमानच्या अभिनयाबरोबरच त्यातल्या सचिनदेव बर्मन यांच्या संगीतामुळे तुफान लोकप्रिय झाला.
 
१९८७ साली नारायण यांच्या कथांवर आधारित ‘मालगुडी डेज’ ही हिंदी सीरियल दूरदर्शनवरून भारतभर प्रसारित झाली आणि आर. के. नारायण यांच्या सशक्त व्यक्तिरेखा आणि त्यांना न्याय देणारे सर्वच बहारदार कलाकार यांमुळे ती सीरियल लोकांनी डोक्यावर घेतली. अर्थात आर. के. नारायण यांचे जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार बंधू आर. के. लक्ष्मण यांनी काढलेली कॅरिकेचर्स यामुळे त्या पात्रांची स्वभाववैशिष्ट्यं खुलून आली होती.
 
ड डार्क रूम, मिस्टर संपथ, दी फायनान्शियल एक्स्पर्ट, वेटिंग फॉर दी महात्मा, दी मॅनइटर ऑफ मालगुडी, दी व्हेंडर ऑफ स्वीट्स, दी पेंटर ऑफ साइन्स, ए टायगर फॉर मालगुडी, टॉकेटिव्ह मॅन, दी वर्ल्ड ऑफ नागराज अशी त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 

१३ मे २००१ रोजी त्यांचं चेन्नईमध्ये निधन झालं.
................

डॉ. प्रतिमा इंगोले

१० ऑक्टोबर १९५३ रोजी विदर्भात जन्मलेल्या डॉ. प्रतिमा इंगोले या लोकसाहित्याच्या अभ्यासक म्हणून ओळखल्या जातात. ग्रामीण भागातील समस्या, शेतकऱ्यांचे प्रश्न, तिथल्या लोकांचा जीवघेणा जीवनसंघर्ष यांवर त्यांनी सातत्याने कथा लिहिल्या आहेत.

वऱ्हाडी बोलीभाषेचा लहेजा असणारा ‘हजारी बेलपान’ हा त्यांचं वैशिष्ट्यपूर्ण संग्रह आहे.

२०१२ साली घोटीमध्ये भरलेल्या पहिल्या महिला कृषी साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. महाराष्ट्र राज्य पुरस्कार, यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कार, विदर्भभूषण पुरस्कार असे एकूण ८६ पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.

अंधारपर्व, अमंगल युग, आस्वाद गंध, उलटे झाले पाय, ओविली फुले मोकळी, जावयाचं पोर, पार्ट टाईम, लेक भुईची, शेतकरी व्यथा, हॅटट्रिक अशी त्यांची ८०हून अधिक पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 

 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi