Ad will apear here
Next
सुनेच्या लेखणीतून उभे राहिले इंदिरा संतांचे व्यक्तिमत्त्व
वीणा संत यांनी लिहिलेल्या ‘आक्का, मी आणि...’ या पुस्तकाचे बेळगावात प्रकाशन
पुस्तकाचे प्रकाशन करताना (डावीकडून) रवींद्र संत, वीणा संत, प्रा. माधुरी शानभाग, डॉ. जब्बार पटेल, विजय कुवळेकर, मंदार जोगळेकर

बेळगाव :
कवयित्री इंदिरा संत यांच्या स्नुषा वीणा रवींद्र संत यांनी ३५ वर्षांच्या सहवासात त्यांना उमजलेल्या इंदिराबाईंचे व्यक्तिमत्त्व ‘आक्का, मी आणि...’ या पुस्तकाद्वारे शब्दबद्ध केले आहे. इंदिरा संत यांच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला या पुस्तकाचे बेळगावमध्ये प्रकाशन झाले. ‘बुकगंगा पब्लिकेशन्स’ने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. लेखिका वीणा संत, त्यांचे पती रवींद्र संत यांच्यासह प्रसिद्ध दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर, ‘बुकगंगा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार जोगळेकर, प्रा. माधुरी शानभाग यांच्या उपस्थितीत पुस्तकाचे प्रकाशन झाले. 

१३ जुलै रोजी इंदिरा संत यांचा स्मृतिदिन होता. त्याचे औचित्य साधून बेळगावमधील आयएमईआर सभागृहात १२ जुलैला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

या वेळी पुस्तकाच्या लेखिका वीणा संत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘आक्कांच्या सहवासाच्या अनंत आठवणी आहेत. मी काही लेखिका नव्हे. तरीही पुस्तक लिहिण्याच्या माझ्यासारख्या सामान्य गृहिणीच्या धाडसाला अनेकांचे पाठबळ मिळाले. त्यामुळे हे पुस्तक प्रत्यक्षात येऊ शकले. काव्यगंगेच्या काठावरून मी त्या नदीचा खळाळ मन भरून पाहिला. गंगेच्या काठावरचे अपूर्व, रमणीय दृश्य मी पाहिले. नदीच्या अवतभीवती मृदू मातीचे हिरवेगार, शीतल वातावरण तयार झाले. त्या गंगेचे चार थेंब माझ्यावर उडाले. त्या थेंबांचेच हे पुस्तक आहे,’ असे त्या म्हणाल्या.

‘एका पुस्तकात आक्कांबद्दलचे अनुदार उद्गार, विपर्यस्त माहिती देण्यात आली होती. त्यामुळे माझ्या पतींना आणि मला अतीव दुःख झाले. ही तगमग कशाने कमी करता येईल, याचा विचार केला. आपल्याला त्या जशा दिसल्या, त्याचे यथार्थ चित्र आपण मांडले, तर मनाला शांतता वाटेल, या उद्देशाने हे पुस्तक लिहिले,’ अशा शब्दांत पुस्तक लेखनाबाबतची आपली भूमिका त्यांनी मांडली.

ज्येष्ठ पत्रकार आणि झी वृत्तसमूहाचे मुख्य संपादक विजय कुवळेकर यांचा इंदिरा संतांशी आणि त्यांच्या कुटुंबीयांशी स्नेह होता. त्यांनी हे पुस्तक संपादित केले आहे. या पुस्तकाला त्यांचीच प्रस्तावना आहे. ते म्हणाले, ‘आक्कांच्या स्मृतिदिनाच्या औचित्याने त्यांच्या धाकट्या सुनेने त्यांच्याबद्दल लिहिलेले पुस्तक प्रकाशित होणे, यातून वेगळ्या स्मृतिबंधाचे दर्शन घडते. आक्का देहरूपाने गेल्या असल्या, तरी त्या आपल्या मनात आहेत. पुस्तकाच्या रूपाने आपल्यात आहेत. तसे नसते तर आपण एवढ्या मोठ्या संख्येने येथे आलो नसतो.’

‘आक्का कुठेही गेल्या तरी आपली साहित्यिक उत्तुंगता त्यांनी कधी मिरवली नाही, हे त्यांचे वैशिष्ट्य होते,’ असेही कुवळेकर म्हणाले. 

प्रा. माधुरी शानभाग म्हणाल्या, ‘या पुस्तकाच्या रूपाने इंदिरा संतांचे समग्र व्यक्तिमत्त्व उभे राहिले आहे. हे पुस्तक म्हणजे साहित्य क्षेत्रासाठी मोठे योगदान असून, तो महत्त्वाचा दस्तऐवज आहे. त्याची प्रस्तावनाही सुंदर आहे.’

इंदिरा संतांबद्दलची एक हृद्य आठवणही प्रा. शानभाग यांनी सांगितली. ‘एकदा एका पत्रकाराने त्यांना विचारलं, की कवितेने त्यांना काय दिले? कवितेने माझ्या शब्दांना वजन दिले, बळ दिले, वेगवेगळे काही सुचायला लागले, असे त्या म्हणाल्या. पुढचा प्रश्न विचारण्यात आला, की त्यांनी कवितेला काय दिले? त्यावर त्या म्हणाल्या होत्या, ‘मी कवितेला पूर्ण आयुष्य दिले.’ त्यांचे हे आयुष्य या पुस्तकामध्ये दिसतेच. हे पुस्तक जसे इंदिरा संत यांचे आहे, तसेच ते वीणावहिनींचेही आहे. पुस्तकाच्या शीर्षकातही बराच अर्थ सामावलेला आहे,’ असे त्या म्हणाल्या.

डॉ. जब्बार पटेल म्हणाले, ‘मी इंदिरा संतांना कधी भेटलो नाही; पण काही कालावधीपूर्वी मी त्यांच्या कविता वाचल्या. त्यांच्या कवितांमध्ये भावनिक साद आहे. वीणा संत यांनी लिहिलेले हे पुस्तक इंदिरा संतांना जाणून घेण्यास नक्की मदत करील. वीणा संत यांनी आपल्या सासूचे कवयित्रीपण टिपतानाच आजूबाजूच्या जगाचाही मागोवा घेतला आहे. त्यामुळे हे पुस्तक एका अर्थाने कौटुंबिक असले, तरी त्याची व्याप्ती मोठी आहे.’

‘बुकगंगा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार जोगळेकर यांनी पुस्तक प्रकाशनाबद्दलची भूमिका मांडली. तसेच ‘बुकगंगा’च्या उपक्रमांबद्दल माहिती दिली. 

वीणा संत यांच्या स्नुषा आसावरी यांनी मान्यवरांचे स्वागत आणि प्रास्ताविक केले. तसेच, वीणा संत यांचे पुत्र निरंजन यांनी आभारप्रदर्शन केले. या कार्यक्रमाला संजीवनी कुवळेकर, साहित्यिक ना. सी. फडके यांची कन्या, मणी पटेल, यांच्यासह बेळगावातील विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. 

(‘आक्का, मी आणि...’ हे पुस्तक आणि ई-बुक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.)


(इंदिरा संत यांच्याबद्दल वाचण्यासाठी येथे क्लिक करा. इंदिरा संत यांच्या ‘रक्तामध्ये ओढ मातीची’ या कवितेबद्दलचा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा. ‘दारा बांधता तोरण’ या कवितेबद्दलचा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा. त्यांची ‘गवतफुला रे गवतफुला’ ही कविता वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi