Ad will apear here
Next
कॅरमपटू आकांक्षा कदम हिला राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्कार प्रदान
राष्ट्रीय कॅरमपटू आकांक्षा कदम हिला पुरस्कार प्रदान करताना डॉ. परीक्षित शेवडे. शेजारी शिर्के प्रशालेच्या मुख्याध्यापिका गायत्री गुळवणी, क्रीडा शिक्षक विनोद मयेकर, गीतांजली कदम, उदय कदम, डॉ. सुभाष देव, माधव हिर्लेकर, चंद्रकांत हळबे आदी.

रत्नागिरी : कर्‍हाडे ब्राह्मण सहकारी संघातर्फे राष्ट्रीय शालेय कॅरमपटू आकांक्षा कदम हिला राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. राणी लक्ष्मीबाईंच्या १६१व्या पुण्यस्मरणदिनी लेखक डॉ. परीक्षित शेवडे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. संघाच्या राणी लक्ष्मीबाई सभागृहात हा कार्यक्रम झाला.

या वेळी शिक्षणतज्ज्ञ, प्राचार्य डॉ. सुभाष देव, संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर, करसल्लागार चंद्रकांत हळबे, उपाध्यक्ष मिलिंद आठल्ये, रा. भा. शिर्के प्रशालेच्या मुख्याध्यापिका गायत्री गुळवणी, क्रीडा शिक्षक विनोद मयेकर, गीतांजली कदम, उदय कदम आदी उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना डॉ. देव म्हणाले, ‘१८५७च्या स्वातंत्र्यसमरामध्ये राणी लक्ष्मीबाईंनी जे योगदान दिले त्यांचा आदर्श समोर ठेवून विद्यार्थिनींनी राष्ट्रकार्यात योगदान द्यावे. ‘इदं न मम’ असे राणीने म्हटले व राष्ट्रासाठी बलिदान दिले. आज या विचारांचे स्मरण केले पाहिजे. राष्ट्रीय कॅरमपटू आकांक्षा कदम हिनेसुद्धा ‘आकांक्षापुढती गगन ठेंगणे..’ असे समजून कामगिरी करावी.’

या वेळी डॉ. शेवडे यांच्या ‘पाकिस्तान- विनाशाकडून विनाशाकडे’ या पुस्तकाच्या दुसर्‍या आवृत्तीचे प्रकाशन प्राचार्य डॉ. देव यांच्या हस्ते झाले. विवाहाला ५० वर्षे पूर्ण झालेल्या कर्‍हाडे ज्ञातीतील निमंत्रित जोडप्यांचे सत्कार या प्रसंगी करण्यात आले. 

आकांक्षाचे वडील उदय कदम म्हणाले, ‘आकांक्षाला आंतरराष्ट्रीय कॅरमपटू मामा व शाळेतून भरपूर मार्गदर्शन मिळते. ती वयाच्या नवव्या वर्षापासून कॅरम खेळत आहे. तिला राणी लक्ष्मीबाई पुरस्कार जाहीर झाल्याचे कळताच खूप आनंद झाला. ती अजून अनेक स्पर्धा नक्की गाजवेल.’

कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे गेल्या तीन वर्षांपासून हा पुरस्कार दिला जात असून, राणी लक्ष्मीबाईंचे स्मरण व्हावे आणि शालेय विद्यार्थिनींना प्रोत्साहन मिळण्यासाठी हा पुरस्कार म्हणजे कौतुकाची थाप असल्याचे हिर्लेकर यांनी सांगितले. रेणुका भडभडे हिने सूत्रसंचालन केले. मिलिंद आठल्ये यांनी आभार मानले.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language