Ad will apear here
Next
जागतिक वारसास्थळ – विजयनगर
हजारा राम मंदिरातील कलाकुसर

विजयनगर
हे जागतिक वारसास्थळाचा दर्जा मिळालेले कर्नाटक राज्यातील ठिकाण आहे. तेथील बऱ्याच ठिकाणी आज अवशेषच पाहायला मिळत असले, तरी त्यांचे सौंदर्य डोळे दिपवून टाकणारे आहे. ‘करू या देशाटन’ सदरात आज या वारसास्थळाची सैर करू या.
...............
वैभवसंपन्न इतिहासाची साक्ष देणारे विजयनगर प्रत्येक भारतीयाने बघितलेच पाहिजे. हे ठिकाण कर्नाटकातील बेल्लारी जिल्ह्यात आहे. हम्पीचे अवशेष कर्नल कोलिन मॅकेन्झीने इ. स. १८००मध्ये जगाच्या पुढे आणले. जागतिक वारसास्थळ म्हणून मान्यता पावलेले हम्पी तथा विजयनगर पाहताना डोळे दिपून जातात. उद्ध्वस्त असले, तरी त्याचे सौंदर्य आजही टिकून आहे. अवशेष पाहिल्यावर त्या काळच्या वैभवाची कल्पना येते. झुलणारे हत्ती, त्यावर अंबारी, त्यात बसलेले राजपुरुष, बाजारात चाललेली उलाढाल, विठ्ठल मंदिराच्या पुढील प्रांगणात असलेल्या संगीत मंडपात सुरू असलेले नृत्य, गायन... असे सारे मनःचक्षूंपुढे घडत आहे असे वाटते. हम्पी हे परंपरेने पंपा क्षेत्र, किष्किंधा क्षेत्र किंवा भास्कर क्षेत्र म्हणून ओळखले जाते. पंपा हे तुंगभद्रा नदीचे प्राचीन नाव आहे. हम्पी हा शब्द पंपा या शब्दापासून आल्याचे मानले जाते. रामायणातील प्राचीन किष्किंधा नगरी आजच्या हम्पीजवळ वसलेली होती, असे मानले जाते. 

हजारा राम मंदिरातील कलाकुसर

‘काव्यशास्त्रविनोदेन कालो गच्छति धीमताम्’ या संस्कृत वचनाप्रमाणे या राजधानीतील लोक आपले जीवन सुख-शांतीने व्यतीत करीत होते. वास्तू, शिल्प, चित्रादि कलांबरोबर संगीत, नृत्यादी कलांना विजयनगरच्या सम्राटांनी प्रोत्साहन दिले. मोठ्या समारंभप्रसंगी राजदरबारात नृत्य-संगीताचे कार्यक्रम होत असत. या काळात संगीतावर अनेक ग्रंथ लिहिले गेले. इम्मडी देवरायाच्या आज्ञेवरून कल्लिनाथ याने शादेवाच्या संगीतरत्नाकर या ग्रंथावर टीका लिहिली. कर्नाटक शैलीची अभिवृद्धी याच काळात झाली. तसेच धृपद व ख्याल या गायनप्रकारांचा प्रसारही झाला. राघवेंद्र-विजयम् ग्रंथामध्ये कृष्णदेवराय स्वतः वीणा वाजवीत असल्याचे वर्णन आढळते. अल्लाउद्दीन खिलजीने काकतीय राजवट संपविल्यावर दक्षिणेतील हिंदू राजवट खिळखिळी झाली होती. इ. स. १३३६मध्ये स्वामी विद्यारण्य यांच्या प्रेरणेतून स्फूर्ती घेऊन इ. स. १३३६मध्ये हरिहर व बुक्कराय या दोन बंधूंनी हम्पी येथे विद्यानगरीची स्थापना केली. हे ठिकाण पुढे विजयनगर राज्याची राजधानी म्हणून ओळखले जाऊ लागले. २२७ वर्षांच्या कालखंडात हे साम्राज्य दक्षिण भारतात श्रीलंकेपर्यंत पसरले. पोर्तुगीजांशी त्यांचे राजनैतिक संबंध असल्याने विजयनगरच्या दरबारात पोर्तुगीजांचा राजदूत उपस्थित असे. त्यामुळे पोर्तुगीज अहवालातून विजयनगरमधील काही घटनांचे तपशील मिळतात. 

हजारा राम मंदिरातील खांबदाक्षिणात्य स्थापत्य आणि मूर्तिकलेत विजयनगर शैलीची भर पडली. या शैलीने दक्षिण भारतात एक वेगळा ठसा निर्माण केला. होयसळ किंवा चालुक्य शैलीतील एखादे मंदिर विजयनगर राजवटीत दुरुस्त केले गेले असेल किंवा विस्तारले गेले असेल, तर त्याची वेगळी छाप अजूनही दिसून येते. तत्कालीन तेलुगू व संस्कृत साहित्यातून विजयनगरच्या सांस्कृतिक प्रगतीचा आलेख दिसून येतो. सायणाचार्य व माधवाचार्य यांच्या ग्रंथांतून, येथील राजांच्या शासनपद्धतीविषयी माहिती मिळते. कंपणाच्या पत्नीने मधुराविजयम् नावाचे काव्य लिहिले होते. राजेही संस्कृतचे उत्तम जाणते होते. व्यंकट सेनापती अनंत यांच्या काकुस्थ-विजयम् या ग्रंथातून ऐतिहासिक माहिती मिळते. 

विजयनगरचे राजे हिंदू होते; मात्र त्यांना इतर धर्मांबद्दलही आदर होता. परधर्माबाबत ते सहिष्णू होते. फिरिश्ता याबाबत लिहितो, की दुसरा देवराय याने आपल्या सैन्यातील मुसलमानांची संख्या लक्षात घेऊन त्यांना प्रार्थनेसाठी राजधानीत एक मशीद बांधून दिली होती. त्याच्या धर्मसहिष्णुतेबद्दल बार्बोसाने पुढील गौरवौद्‌गार काढले आहेत – ‘राजा ख्रिस्ती, ज्यू, मूर वा अन्य धर्मी अशा कोणत्याही जाती-धर्मांच्या व्यक्तीस राजधानीत वास्तव्य करण्यास मुभा देत असे. अन्य धर्मीयास कोणी कधी उपद्रव केल्याचे वा त्याची चौकशी झाल्याचे ऐकिवात नाही.’ त्या वेळी विजयनगरची लोकसंख्या पाच लाख होती. यावरून राजधानी कशी असेल याची कल्पना येते. 

जलव्यवस्थापन

व्यापारउदीम यांनी समृद्ध असे मध्ययुगीन साम्राज्य अहमदनगरचा निजामशहा, विजापूरचा आदिलशहा, बिदरचा इमादशहा, बेरारचा बरीदशहा व गोवळकोंडाचा कुतुबशहा अशा पाच बहामनी सुलतानांनी एकत्र येऊन तालिकोटच्या लढाईत संपवून टाकले. तब्बल दोन महिने विजयनगरची लूट चालू होती.

लढाईत विजयनगरची सरशी होत असताना रामरायाचे दोन मुसलमान सरदार फितूर झाले. त्यांनी रामरायाला रणांगणात कैद केले व तेथेच त्याचा शिरच्छेद केला. हे पाहून विजयनगरचे सैन्य सैरावैरा पळत सुटले व सुलतानांचा विजय झाला. २३ जानेवारी १५६५ रोजी झालेल्या या लढाईत विजयनगरचा पराभव झाला व दक्षिण भारतात अनिर्बंध मुस्लिम सत्तेला सुरुवात झाली. विजयनगरमधून सोन्याचा धूर निघत असे, असे तेथील सुबत्तेबद्दल बोलले जायचे. 

राणीचे स्नानगृह

राज्य नष्ट झाले; पण वैभवाची साक्ष अद्यापही टिकून राहिली आहे. तुंगभद्रेचे पाणी हम्पीमध्ये छोट्या दगडी कालव्यांद्वारे (पाट) पोहोचविले जात होते. जलव्यवस्थापनाचा उत्कृष्ट नमुना येथे बघण्यास मिळतो. हम्पी येथे सतत उत्खनन व शोधकार्य चालू असते. पाणी वाहून नेणारे टेराकोटाचे पाइपही नुकतेच तेथे सापडले आहेत. तत्कालीन दगडी पुलांचे अवशेषही दिसून येतात. येथील पुष्करिणी अतिशय सुंदर आहे. राजवाड्याचे अवशेष, राणीवसा, हत्तीखाना टांकसाळ, भोजनशाळा, घरांची जोती असे अनेक अवशेष येथे पाहायला मिळतात. तेथील काही स्थळांबद्दल माहिती घेऊ या.

विठ्ठल मंदिर

विठ्ठल मंदिर :
हे हम्पीचे मुख्य आकर्षण आहे. राजा देवराया दुसरा याच्या कारकीर्दीत (इ. स. १४२२ ते १४४६) याची उभारणी झाली. श्री विजयविठ्ठल मंदिर म्हणूनदेखील हे ओळखले जाते. हे भगवान विष्णू यांचे रूप श्री विठ्ठलास समर्पित आहे. मंदिरात विठ्ठलाची एक मूर्ती होती. बहुधा ती तालिकोट लढाईच्या वेळी लपविली गेली असावी व त्यानंतर ती भानुदास महाराजांनी पंढरपूरला नेली असावी, असे मानले जाते. या बाबतीत अनेक कथा प्रचलित आहेत. राजा कृष्णरायाने ती मूर्ती पंढरपूरहून विजयनगरला नेली व ती भानुदास महाराजांनी परत आणली, अशीही कथा सांगितली जाते. तालिकोटची लढाई १५६५मध्ये झाली. म्हणजे मूर्ती त्याअगोदर पंढरपूरला आणली असावी. कारण भानुदास महाराज १५१३मध्ये निवर्तले होते. याबाबत उलट सुलट सांगितले जाते. शक आणि सन यांचा ताळमेळ लागत नाही; पण एक मात्र नक्की, की पंढरपूरच्या विठ्ठलाचे हम्पीशी अतूट नाते नक्कीच आहे. 

विठ्ठल मंदिरातील अखंड बीम

‘कानडाऊ विठ्ठलु कर्नाटकु....’ ही संत ज्ञानेश्वरांच्या अभंगातील ओळ कर्नाटकाशी निगडित आहे. ज्ञानेश्वरांचे वडीलसुद्धा पंढरपूरला जात असत. संत ज्ञानेश्वर १२९६मध्ये समाधिस्थ झाले, तर विजयनगरची स्थापना १३३६मधील आहे. म्हणजे विठ्ठलाची मूर्ती त्याआधीच महाराष्ट्रात स्थापन झाली होती. म्हणजे कृष्णदेवरायाने ती मूर्ती पंढरपूरहून हम्पीला नेली असावी व संत भानुदासांच्या विनंतीला मान देऊन परत केली असावी, असे मानण्यास हरकत नाही. मुख्य विठ्ठल मंदिराची मोठ्या प्रमाणावर तोडफोड झालेली आहे. तरीही सभामंडपातील अखंड पाषाणातील दोन फूट रुंदीचा साधारण २० फूट लांबीचा एक बीम अद्यापही दिसून येतो. त्यावरून त्याच्या भव्यतेची कल्पना करता येते. मंदिरातील स्तंभावरील शिल्पकला पाहिली, की मंदिराच्या सभागृहाच्या त्या वेळच्या देखणेपणाची कल्पना येते. विठ्ठल मंदिरात व आसपासची मुख्य ठिकाणे म्हणजे रंगमहाल, विजयरथ आणि बाजार. 

रंगमहाल

रंगमहाल :
हा ५६ खांबांवर उभा असून, संगीत मंडप म्हणून प्रसिद्ध आहे. याला ‘सारेगम मंडप’ असेही संबोधले जाते. याच्या खांबांवर हलक्या हाताने कमी-जास्त चापटवजा मारले असता नाद उमटतातच; पण आता तेथील खांबांना हात लावता येत नाही. हे स्तंभ अतिशय सुबक आहेत. 

विजयरथ

विजयरथ :
एकाच दगडात कोरलेला विजयरथ हे येथील वैशिष्ट्य आहे. याची चाके हलू शकतात. तसेच याचे भाग वेगळे होऊ शकतात; पण तसे करण्यास आता शासनाने बंदी घातली आहे. विजयनगरचा शिल्पकार हा एकसंध दगडात रथाचे शिल्प खोदण्यात विलक्षण कुशल होता. ताडपत्री आणि हम्पी येथील रथ हे याचे उत्कृष्ट नमुने होत. विठ्ठल मंदिराच्या जवळ तत्कालीन बाजारपेठेचे अवशेषही आहेत. 

उग्र नरसिंहउग्र नरसिंह/लक्ष्मी नरसिंह/प्रसन्न नरसिंह : नरसिंह हा विष्णूचाच अवतार असल्याने वैष्णवांमध्ये त्याचे खूप महत्त्व आहे. सात नागाच्या फण्याने आच्छादित केलेल्या या मूर्तीच्या मांडीवर पूर्वी लक्ष्मी बसलेली होती. म्हणून लक्ष्मी-नरसिंह असेही संबोधले जायचे. मूळ मूर्तीची तोडफोड करण्यात आली. त्या वेळी तिचे डोळे काढण्यात आले होते. त्या जागी नवे डोळे बसविल्यावर ती उग्र दिसू लागली. म्हणून उग्र नरसिंह म्हटले जाते. 

बडवी लिंग

बडवी लिंग :
लक्ष्मी-नरसिंह मूर्तीजवळ नऊ फूट उंचीचे शिवलिंग आहे. एकाच काळ्या पाषाणात हे शिवलिंग कोरलेले आहे. हे पाण्यात असून बडवीलिंग मंदिर म्हणूनही ओळखले जाते. बारकाईने पाहिले असता यामध्ये शिवाचे तीन नेत्र दिसून येतात. 

हजारा राम मंदिर

हजारा राम मंदिर :
हजारा राम मंदिर हे हम्पीच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. विजयनगर शैलीतील हे देखणे मंदिर असून, यामध्ये रामायणाचे प्रसंग कोरलेले आढळून येतात. हे मंदिर राजाच्या स्वतःच्या साधनेसाठी बांधण्यात आले होते. मंदिराच्या अंतर्बाह्य बाजू शिल्पकलेने ओतप्रोत भरलेल्या आहेत. येथे एक बुद्धमूर्तीही आहे. या मंदिरात राम विवाह, जंगलामध्ये गमन, सीतेचे अपहरण आणि राम आणि रावण यांच्यातील शेवटच्या लढाईचे वर्णन चित्रांतून घडविण्यात आले आहे. मंदिराच्या बाह्य भिंतीवर घोडे, हत्ती, उंट यांसारख्या काही प्राण्यांची शिल्पेदेखील आहेत. 

हजारा राम मंदिरातील खांबावरील शिल्प

१५व्या शतकाच्या सुरुवातीस देवराय दुसरे यांनी हजारा राम मंदिर बांधले. ‘हजारा राम’चा शब्दशः अर्थ म्हणजे हजारो राम. यातील भिंतींवर मोठ्या पट्ट्यांत रामायणातील प्रसंग दाखविण्यात आले आहेत. हे मंदिर राज्याचे खासगी मंदिर व विजयनगरच्या शाही परिवारासाठी असल्याचे मानले जाते. हे मूळ मंदिर आयताकृती संकुलामध्ये एक साधी संरचना म्हणून बनवले गेले होते. यात केवळ एक सभामंडप आणि अर्ध-मंडप होता. त्यानंतर एक खुला पोर्च आणि सुंदर खांब जोडण्यासाठी मंदिराची पुनर्निर्मिती केली गेली. हॉलमध्ये अद्वितीय काळ्या दगडांचे खांब आहेत. तीन छिद्रांसह एका रिकाम्या जागी राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्ती होत्या. 

कमल महाल

कमल महाल :
हम्पीमधील एकमेव नुकसान न झालेली देखणी वास्तू म्हणजे कमल महाल. हा महाल कमळाच्या आकारात असून दोन मजली आहे. याच्या कमानी इस्लामिक पद्धतीच्या असल्याने बहुधा याला लढाईच्या वेळी धक्का लावला गेला नसावा. यावर एक पाण्याची टाकी असून, त्यातून सर्व इमारतीत पाणी खेळविले गेले आहे. त्यामुळे तो थंड राहतो. हा महाल राजवाड्यातील स्त्रियांचे खेळ, मनोरंजन यासाठी बांधला होता. राणीचे स्नानगृह, राणी वसा अशा अनेक इमारती आसपास आहेत. 

गजशालागजशाला : हम्पीमधील कमीत कमी नासधूस झालेल्या इमारतींपैकी हे एक प्रमुख पर्यटन ठिकाण आहे. इस्लामिक शैलीतील हे बांधकाम असून, डोम असलेल्या ११ खोल्या हत्ती बांधण्यासाठी बांधलेल्या आहेत. विजयनगर राजांना हत्ती खूप प्रिय होते. त्यांच्या सैन्यदलातही हत्ती असायचे. 

पुरातत्त्व संग्रहालय : भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणानुसार बांधण्यात आलेले हे पहिले संग्रहालय आहे. या संग्रहालयात प्राचीन शिल्पकला आणि अनेक कलाकृती पाहायला मिळतात. तसेच हम्पीच्या इतिहासाची झलक येथे पाहायला मिळेल. तुम्ही इतिहासाचे अभ्यासक असाल, तर या संग्रहालयाच्या भेटीमुळे आपल्याला नक्कीच समाधान मिळेल. सोन्या- चांदीची नाणी, अनेक देवतांच्या मूर्ती येथे पाहायला मिळतात. निरनिराळ्या प्रकारचे अनेक कक्ष येथे आहेत. त्यात मौल्यवान दागदागिने, शिल्पे आहेत. 

पट्टाभिरामा मंदिर

पट्टाभिरामा मंदिर :
हे मंदिर हम्पी संग्रहालयापासून सुमारे ५०० मीटर अंतरावर आहे. ते १६व्या शतकाच्या सुरुवातीला बांधण्यात आले. हे मंदिर ६४ खांबांवर उभे आहे. मंदिराजवळचा भाग वरादा देवी अम्माना पेट म्हणून ओळखला जात असे. वरादा देवी अम्माना तुलुवा राजा अच्युत राय यांची राणी होती. 

राजाची तुला

राजाची तुला :
विजयनगरचे एक आकर्षण म्हणजे राजाची तुला. तिला तुलपुरुषंदना म्हणतात. हे विठ्ठल मंदिराच्या दक्षिणेस आहे. पाच मीटर (सुमारे १५ फूट) उंचीच्या दोन दगडांत कोरलेला तुला स्तंभ असून, त्यामध्ये राजाची ग्रहणादी काळामध्ये सोन्या-चांदीने तुला केली जात असे. त्यानंतर त्याचे दान करण्यात येत असे. 

ससीवेकालु आणि कडालेकूल गणेशमूर्ती

गणेशमूर्ती :
हेमकुटा टेकडीवर दोन मोनोलिथिक गणेशमूर्ती आहेत. एकाचे नाव कडालेकूल गणेश व दुसऱ्याचे नाव ससीवेकालु गणेश असे आहे. कडालेकूल गणेश १५ फूट उंचीचा आहे, तर ससीवेकालु गणेश आठ फूट उंचीचा आहे. या मूर्तीचीही बऱ्याच प्रमाणात तोडफोड झालेली आहे. ससीवेकालु गणेश अजूनही सुंदर दिसतो. विजयनगरचा राजा नरसिंह याच्या काळात १४९१ ते १५०५ यादरम्यान याची निर्मिती झाली होती. 

कसे जाल कोठे राहाल?
विजयनगरजवळ होस्पेट रेल्वे स्टेशन असून, हुबळी-चेन्नई रेल्वेमार्गावर होस्पेट व बेल्लारी स्टेशन्स येतात. जवळचा विमानतळ बेल्लारी येथे आहे. होस्पेट हे ठिकाण चित्रदुर्ग-विजापूर राष्ट्रीय हमरस्त्यावर आहे. होस्पेट येथे राहण्याची, जेवण्याची व्यवस्था होऊ शकते. ऑक्टोबर ते मेपर्यंत या ठिकाणी जायला हरकत नाही; पण फेब्रुवारीपर्यंत हवा चांगली असते. नंतर तीव्र उन्हाळा असतो. 

या सदराच्या पुढील भागात पाहू या विजयनगरमधील विरूपाक्ष मंदिर, बेल्लारी जिल्ह्यातील अस्वलांचे अभयारण्य आणि इतर प्रेक्षणीय ठिकाणे. 

- माधव विद्वांस
ई-मेल :
 vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.) 
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi
Select Language