Ad will apear here
Next
वस्त्रोद्योगातील सर्वांत मोठ्या ‘सोर्स इंडिया’ प्रदर्शनाला प्रारंभ

मुंबई : भारतीय वस्त्रोद्योग क्षेत्रातील सर्वांत मोठे ‘सोर्स इंडिया २०१९’  प्रदर्शन २१ ते २३ ऑगस्टदरम्यान मुंबईत  आयोजित करण्यात आले आहे. भारतातील सर्वात जुनी निर्यातदारांची संघटना असलेल्या ‘द सिंथेटिक अँड रेयॉन टेक्स्टाइल्स एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल’ने भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सहकार्याने हे महाप्रदर्शन भरवले आहे. यामध्ये १२५ आघाडीच्या भारतीय कंपन्यानी त्यांची सिंथेटिक आणि रेयॉन उत्पादने प्रदर्शित केली असून, त्यात धागे, कापड, तयार वस्त्रे, गृहोपयोगी कापड आणि औद्योगिक वापरात उपयोगी पडणारे कापड आदी  उत्पादनांचा समावेश आहे. 

‘सोर्स इंडिया २०१९’ विषयी बोलताना ‘एसआरटीईपीसी’चे अध्यक्ष रोनक रुघानी म्हणाले, ‘भारतीय वस्त्रोद्योगाची निर्यात सध्याच्या ४० अब्ज डॉलरवरून २०२४-२५ पर्यंत १५० अब्ज डॉलरपर्यंत जाईल, अशी अपेक्षा आहे. ढोबळ राष्ट्रीय उत्पन्नाच्या दोन टक्के उत्पन्न मानवनिर्मित धाग्यांपासून मिळते. या उद्योगात एक कोटी प्रत्यक्ष आणि दोन कोटींहून अधिक अप्रत्यक्ष रोजगार निर्माण झाले आहेत. मानवनिर्मित धागे आणि त्यापासून निर्मिती होणारे कापड आणि तयार कपडे यांची भारतातून १४० देशांना निर्यात होते. एकूण निर्यातीपैकी ६० टक्के निर्यात कापड आणि तयार कपडे यांसारख्या मूल्यवर्धित उत्पादनांची आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, टिकाऊपणा आणि पर्यावरण पूरक गुणधर्म यामुळे मानवनिर्मित धाग्यांची लोकप्रियता सातत्याने वाढत आहे. सध्या मानवनिर्मित धागे आणि नैसर्गिक धागे (सुती /लोकरी ) यांच्या वापराचे प्रमाण ७२:२८ असे आहे.’  

‘किमतीतील चढ-उतार, टिकाऊपणा आणि पर्यावरणविषयक जबाबदारी या मुद्द्यांचा विचार करून आघाडीच्या फॅशन ब्रँडचे उत्पादन करणाऱ्या कंपन्या त्यांच्या उत्पादनांमधील कृत्रिम धाग्यांचे, विशेषतः पॉलिस्टर आणि व्हिस्कोजचे  प्रमाण वाढवीत आहेत. या धाग्यांच्या उत्पादनातील तंत्रज्ञानाची प्रगती या प्रवाहाला बळकटी देत आहे. साड्या आणि इतर पारंपरिक वस्त्रांमध्येही हलक्या कृत्रिम धाग्यांचा वापर वाढत आहे. आजघडीला भारतात १४४ कोटी किलोग्रॅम मानवनिर्मित धाग्यांचे आणि ३०० कोटी किलो मानवनिर्मित फिलामेंटचे उत्पादन होते, तर २३०० कोटी चौरस मीटर कापड या धाग्यांपासून किंवा या धाग्यांचे मिश्रण असलेल्या धाग्यांपासून तयार होते. कृत्रिम धाग्यांचे बहुतांश प्रकार भारतात तयार होतात. भारत पॉलिस्टर आणि व्हिस्कोज धाग्यांचा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा उत्पादक आहे. यामध्ये पॉलिस्टर, व्हिस्कोज, अक्रिलिक आणि पॉलिप्रोपिलिनचा समावेश आहे,’ असेही  रुघानी यांनी नमूद केले. 
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language