Ad will apear here
Next
नादब्रह्माचा वारकरी
संगीतकारांची मांदियाळी‘माझ्या अनेक छंदांमध्ये संगीताला सर्वांत वरचा क्रमांक द्यावा लागेल. तो माझ्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. संगीताच्या सुरांमधून गेली ६५ वर्षे मला जी ‘ऊर्जा’ मिळत गेली, त्याच्या आधारावरच मी आज ‘उभा’ आहे. शरीराच्या रोमारोमांत भिनलेले संगीत कुठल्याही क्षणी बाहेर पडेल आणि अन्य पेशींच्या सुरांत सूर मिसळून गाऊ लागेल, असे वाटते......’ लिहीत आहेत ज्येष्ठ अनुवादक, साहित्यिक रवींद्र गुर्जर... त्यांच्या ‘किमया’ या सदरात.... 
...........
आपल्या जीवनात विरंगुळा म्हणून आपण अनेक प्रकारचे छंद जोपासत असतो. त्यातून मिळणाऱ्या समाधानाच्या निरनिराळ्या छटा असतात. त्या सगळ्यांना आपण ‘आनंद’ या एकाच शब्दात मोजतो. नाटक-चित्रपट किंवा एखादे दृश्य पाहून ‘आनंद’ झाला; पुस्तक वाचून ‘आनंद’ झाला; भीमसेनजींचे गाणे ऐकून ‘आनंद’ झाला; मित्राची भेट झाल्याने ‘आनंद’ झाला, असे आनंदाचे कितीतरी प्रकार असतात. 

वास्तविक, सत्-चित्-आनंद यातील ‘आनंद’ हा खरा आनंद! आत्मस्वरूपाची ओळख झाल्याने निर्माण होणारी अवस्था, हे त्याचे स्वरूप असते. अर्थात, असा आनंद मिळणे, ही अत्यंत दुर्मीळ गोष्ट आहे. सर्वांना तो मिळणे दुरापास्तच. परंतु निरनिराळ्या छंदांमधून मनाला जे काही ‘चांगले’ वाटते, ती त्या आत्मानंदाची, अल्पांशाने का होईना, अनुभूतीच असते. जागृतावस्थेतली एक प्रकारची समाधीच म्हणा ना!

माझ्या अनेक छंदांमध्ये संगीताला सर्वांत वरचा क्रमांक द्यावा लागेल. तो माझ्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. संगीताच्या सुरांमधून गेली ६५ वर्षे मला जी ‘ऊर्जा’ मिळत गेली, त्याच्या आधारावरच मी आज ‘उभा’ आहे. शरीराच्या रोमारोमांत भिनलेले संगीत कुठल्याही क्षणी बाहेर पडेल आणि अन्य पेशींच्या सुरांत सूर मिसळून गाऊ लागेल, असे वाटते. निद्रिस्त अर्जुनाच्या सर्वांगातून येणारा ‘कृष्ण, कृष्ण’ असा आवाज किंवा संत चोखामेळ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या हाडांमधून चाललेला ‘पांडुरंगा’चा जप, या काही अशक्य गोष्टी नसाव्यात. 

सुधीर फडके यांनी अमर रचना करून ठेवल्या आहेत.लहानपणी, म्हणजे पाच-सहा वर्षांच्या कळत्या वयात, शाळेला जाण्यासाठी उठण्यापूर्वी पुणे आकाशवाणीवर लागलेल्या भक्तिगीतांचे संस्कार प्रथम सुरू झाले. त्याही वयात अवीट आनंदाच्या लहरी अंगातून निघत असत. पुढे सुधीर फडके यांचे ‘गीत रामायण’ १९५५मध्ये सुरू झाले. संपूर्ण महाराष्ट्राला त्याने वेड लावले. तेव्हापासून आज २०१८पर्यंत गीत रामायण किती वेळा ऐकले, याला गणतीच नाही. निरनिराळ्या रागांमध्ये फडक्यांनी ‘अमर’ रचना करून ठेवल्या आहेत. 

वर्षानुवर्षे, आम्ही घरात असताना रेडिओ सतत चालू असतो. शाळा-कॉलेजचा संपूर्ण अभ्यास, वाचन-लेखन, घरात कोणीही आलेले असो, इतकेच काय तर दूरदर्शनचे कार्यक्रम चालू असतानाही आत रेडिओ चालू असतो. पुणे, मुंबई, रेडिओ सिलोन, पुढे विविध भारती ते अगदी आताच्या ‘रेडिओ मिरची’पर्यंत संगीताने दिलेल्या आनंदाची बेरीज केली तर ती बहुधा ‘ब्रह्मानंदा’एवढी नक्कीच भरेल. 

नाट्यसंगीत, भावगीते, भक्तिगीते, हिंदी-मराठी चित्रपट संगीत, गझल आदी सुगम संगीत आणि अर्थातच शास्त्रोक्त संगीत, हे सगळे सप्तसुरांचे महासागरच आहेत. दाक्षिणात्य संगीतही त्याला अपवाद नाही. पाश्चात्य संगीताची जरी जास्त ओळख नसली, तरी ‘कम सप्टेंबर’, ‘माय फेअर लेडी’, साउंड ऑफ म्युझिक’ आणि संगीताला प्राधान्य असलेले इंग्रजी चित्रपट अत्यानंद देतातच. 

संगीत हा चित्रपटांचा आत्मा आहे. आपले मराठी-हिंदी चित्रपटसंगीत इतके समृद्ध आहे, की त्याला तोडच नाही. या विषयाला थोडा स्पर्श करू या. पुन्हा बालवयात जायचे झाल्यास, इयत्ता चौथीत असताना, भावे स्कूलमधील आम्हा विद्यार्थ्यांना मंडईजवळच्या ‘आर्यन’ थिएटरमध्ये ‘प्रभात’चा ‘संत तुकाराम’ हा सिनेमा दाखवला होता. त्यातील केशवराव भोळे यांचे संगीत आणि तुकाराम महाराज वैकुंठाला जाताना, त्या वयातही मी खूप रडलो होतो आणि आजही ते बघताना डोळे पाणावतात. बंगाली आणि पुढे हिंदी ‘काबुलीवाला’ बघताना तीच स्थिती झाली होती. 

जुन्या संगीतकारांबरोबरच वसंत पवार, सुधीर फडके, दत्ता डावजेकर, वसंत प्रभू, श्रीनिवास खळ्यांपासून ते आजच्या अजय-अतुलपर्यंतच्या संगीतकारांनी आपल्यावर संगीताचा मधुवर्षाव करून अनंत उपकार केलेले आहेत. भावगीत-भक्तिगीतांना चाली लावणाऱ्या मराठी संगीतकारांची परंपरा फार मोठी आहे. गजानन वाटव्यांपासून पद्मजा फेणाणी-जोगळेकरांपर्यंत किती किती नावे घ्यावीत! जाणकार संगीतप्रेमींना ती ठाऊक आहेतच. गायक-गायिकांबद्दल बोलायचे तर लता, आशा, माणिक वर्मा, मालती पांडे, सुधीर फडक्यांपासून ते ‘वाजले की बारा’च्या बेला शेंडेपर्यंत न संपणारी यादी आहे. हिंदी गायकांबद्दल बोलायचे तर के. सी. डे, पंकज मलिक, के. एल. सैगलपासून सुरुवात करून, रफी, किशोरकुमार, यांना न विसरता आजच्या सुनिधी चौहान, श्रेया घोषाल ते अगदी ‘सारेगमप’च्या ‘लिटिल चॅम्प्स’पर्यंत बोलावे लागेल.  

संगीतकार काय कमी आहेत? हुस्नलाल भगतराम, गुलाम महंमद, खेमचंद प्रकाश, आदी जुने, तर नंतरचे नौशाद, सी. रामचंद्र, रोशन, मदनमोहन, एस. डी. बर्मन, शंकर जयकिशन, कल्याणजी-आनंदजी, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, आर. डी. बर्मन, हृदयनाथ मंगेशकर ते ए. आर. रेहमान या सगळ्यांची गाणी आठवा. या सगळ्यांची मधु-मधुर गाणी ऐकताना असे वाटते, की याहून आणखी चांगले असामान्य गुणी कलाकार नव्याने कसे पुढे येतील? तोपर्यंत अनेक नवनवीन गायक-संगीतकार दाखल होताना दिसतातच! हजारो वर्षांची भारतीय संगीत परंपरा हा अक्षय, चिरंतन असा अतिविशाल प्रवाह आहे. शास्त्रीय संगीत ही तर जणू विश्वसंचारी आकाशगंगाच आहे. त्यात कोट्यवधी महातेजस्वी संगीततारे पसरलेले आहेत. विस्तार पावणाऱ्या विश्वाप्रमाणे त्यात युगानुयुगे वाढच होत आहे. त्या सगळ्यांच्या गायन-वादनाने आपल्या हृदयातून ओसंडून जाणाऱ्या आनंदाच्या लाटा वाहू लागतात, हे त्रिवार सत्य आहे.   

एकेका गाण्याच्या एकेक आठवणी चित्तात ठसलेल्या आहेत. लहानपणापासून ऐकत असलेले आशा भोसलेंचे ‘विठू माझा लेकुरवाळा’ हे भक्तिगीत... त्यातील ‘निवृत्ती हा खांद्यावरी, सोपानाचा हात धरी....’ ही ओळ आली की माझे संपूर्ण बालपण आठवते आणि ‘तो’ संतांचा मेळा आशीर्वाद देत समोर उभा आहे, असे वाटते. परवीन सुलताना, अमजद अली खान ऐकताना, मुलींच्या भावे स्कूलमध्ये ‘सवाई गंधर्व’ कार्यक्रमात झालेल्या त्यांच्या पहिल्या मैफली दिसू लागतात. 

‘ससुराल’मधले ‘तेरी प्यारी प्यारी सूरतको......’ हे गाणे लागले, की आमची अकरावी आठवते. त्याच सुमाराची ‘जंगली’तील सर्व गाणी! ‘आज फिर जीने की तमन्ना’ इंदूरच्या स्मृती जाग्या करते. कारण ‘गाइड’ मी प्रथम तिथे पाहिला होता. लाखाची गोष्ट, भाऊबीज, सुवासिनी, अवघाचि संसार या मराठी, आणि हिंदीमध्ये जिस देश में, ममता, अलबेला, आराधना यांपासून ते दिल तो पागल है, हम आपके है कौन आणि दिल चाहता है या चित्रपटांमधील प्रत्येक गाण्याला मित्र किंवा स्थळांशी निगडित आठवणी आहेत. 

रवींद्र गुर्जर
गाणारा गळा आणि प्रतिभावान संगीतकारांची कला या दैवी देणग्याच म्हणाव्या लागतील. मला तर असे वाटते, की पूर्वी होऊन गेलेले असामान्य कलाकार (वरून) आज आपल्यात वावरणाऱ्या (पूर्वजन्मीचे संस्कार घेऊन आलेल्या) कलाकारांची ‘निवड’ करून, त्यांच्याद्वारे, भगवान शंकराने निर्माण केलेल्या संगीतकलेचा सर्वत्र वर्षाव करत असतात. निखळ, निर्भेळ, निरतिशय, विशुद्ध आणि आत्मानंदाची अनुभूती देणारी ही संगीत-कला आमचे जीवनच आहे. 

संपर्क : ९८२३३ २३३७०
ई-मेल : rvgurjar@gmail.com

(‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या रवींद्र गुर्जर यांच्या ‘किमया’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/TiSWnh या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi
Select Language