Ad will apear here
Next
समृद्ध बालपणाची सफर घडविणारी ‘फालतूगिरी’
जान्हवी सामंत यांनी लिहिलेल्या ‘फालतूगिरी अँड अदर फ्लॅशबॅक्स : हाऊ आय सर्व्हाइव्ह्ड ए चाइल्डहूड इन दी एटीज’ या पुस्तकाचे प्रकाशन दिग्दर्शक रोहित शेट्टी, पारोमी वोहरा आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या उपस्थितीत झाले.

७०-८०च्या दशकातील आपले बालपण कसे अनुभवसमृद्ध होते, याची सफर मुंबईतील जान्हवी सामंत यांनी ‘फालतूगिरी अँड अदर फ्लॅशबॅक्स : हाऊ आय सर्व्हाइव्ह्ड ए चाइल्डहूड इन दी एटीज’ या पुस्तकातून घडविली आहे. त्या काळात वाढलेल्या मुलांचे बालपण आजकालच्या गॅजेट्समध्ये रमलेल्या मुलांच्या बालपणापेक्षा खूप वेगळे होते. हेच वेगळेपण त्यांनी त्यात अधोरेखित केले आहे. हे पुस्तक लिहिण्यामागची त्यांची भूमिका आणि विचार जाणून घेण्याचा हा प्रयत्न...
........... 

जान्हवी सामंत- बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारे हे पुस्तक लिहिण्याचे आणि मुख्य म्हणजे ते इंग्रजीमध्ये लिहिण्याचे कारण काय?

जान्हवी सामंत : मी मुंबईत मराठी घरात जन्मले, वाढले; पण मी शिकले इंग्रजी माध्यमातून. त्यामुळे मी विचार करते इंग्रजीमधूनच. त्यामुळे इंग्रजी मी जितक्या सहज आणि उत्तम पद्धतीने लिहू शकते, तितक्या उत्तम पद्धतीने मराठी लिहू शकत नाही. मी मराठी बोलू शकते; पण लिहू शकत नाही. त्यामुळे मी हे पुस्तक इंग्रजीमधून लिहिले आहे. या पुस्तकात मी ८०च्या दशकात मुंबईत गेलेले माझे बालपण, त्या अनुषंगाने येणारे संदर्भ, व्यक्तिचित्रण केले आहे. असे लेखन मराठीत मोठ्या प्रमाणात आहे; पण इंग्रजीमध्ये फार दिसत नाही. त्यामुळे इंग्रजीमध्ये लिहिण्याच्या माझ्या नैसर्गिक उर्मीला पाठबळच मिळाले. 

हे पुस्तक लिहिण्याचे मुख्य कारण म्हणजे आजच्या काळातील मुलांचे बालपण हरवून चालले आहे, असे वाटते. आजकाल मुलांना नको इतके जपले जाते. त्यामुळे अनेक अनुभवांपासून ती वंचित राहतात. त्यांच्या आजूबाजूला माणसांपेक्षा यंत्रांचा गराडा जास्त असतो. या मुलांचे बालपण आणि आपले बालपण यातील फरक लक्षात यावा, तेव्हाच्या चांगल्या गोष्टी आजच्या मुलांना देता येतील का, त्यासाठी पालकांना उद्युक्त करता येईल का, या विचारांतून मी हे पुस्तक लिहिले. 

- या पुस्तकाला ‘फालतूगिरी...’ असे नाव देण्यामागचे कारण काय? 

जान्हवी सामंत : मी मुंबईतील दादरसारख्या भागात जन्मले, वाढले आणि आजही मी याच भागात राहते. विशेष म्हणजे ज्या इमारतीत माझ्या आई-वडिलांचे घर आहे, जिथे माझे बालपण आणि लग्नापर्यंतचे आयुष्य गेले, त्याच इमारतीत मी पती आणि मुलांसमवेत राहते. त्यामुळे माझे बालपण आजही मला इथे ठायीठायी दिसते. बालपणीचा काळ सुखाचा असे म्हणतात. ८०च्या दशकातील माझ्या बालपणाचा विचार केला, तर मला खरेच असे वाटते, की तो काळ खरेच खूप समाधानाचा आणि आनंदाचा होता. आम्ही खूप धमाल करायचो. तेव्हा टीव्ही नव्हता. फोन घरोघरी नव्हते. वाहनांची गर्दी नव्हती. साबणाचा चुरा, तोंडाला लावायची पावडर अशी क्षुल्लक, आजच्या भाषेत फालतू साधने खेळायला पुरेशी असायची. त्या काळातील आमचे खेळ, सुखसोयी, सुविधा या गोष्टी आजच्या काळात फालतूच वाटतील. म्हणून मी तसे नाव पुस्तराला दिले आहे. 

- तुमच्या आठवणींतून तुम्हाला नेमके काय सांगायचे आहे?

जान्हवी सामंत : त्या वेळी मुलांना एकटे बाहेर पाठवताना भीती नसायची. एकत्र खेळताना ‘मी श्रीमंत, तू गरीब,’ असा विचार मुलांच्या मनात येत नसे. आज मुंबईत लहान मुलांना खेळायला जागा नाही. उंचचउंच इमारतींच्या जंगलात, मोबाइल, टीव्ही, प्ले स्टेशन्स अशा नानाविध उपकरणांच्या गर्दीत ती हरवून गेली आहेत. सामाजिक, आर्थिक स्तरांमधील विभागणी अतिशय तीव्र झाली आहे. आपल्याला जे मिळाले नाही, ते मुलांना देण्याची पालकांची चढाओढ लागलेली असते. त्यामुळे आजच्या मुलांकडे नवनवीन, महागड्या वस्तू असतात, त्यामुळे त्यांच्या मनातही गरीब, श्रीमंत अशी भावना निर्माण होते. पूर्वी सगळी मुले इमारतीच्या खाली एकत्र येऊन पळापळी, लपंडाव, आबाधुबी असे खेळ खेळायची. आजी-आजोबा, काका-काकू, आत्या, शिक्षणासाठी, नोकरीसाठी परगावाहून आलेली नातेवाईक मंडळी घरात असायची. त्यांनी मुलांना रागवले, ओरडले तरी पालक नाराज व्हायचे नाहीत. मुले म्हणजे खास कोणी आहेत, अशी वागणूक नसायची. दादरच्या गल्ल्यांमधून आम्ही बिनधास्त फिरायचो. एकट्याला पाठवण्यात भीती वाटायची नाही. माझ्या वडिलांकडे स्कूटर होती, तेसुद्धा खूप अप्रूप होते. त्याची लाज वाटायची नाही. आपल्याकडे हे आहे, ते नाही, अशी जाणीव नसायची. त्यामुळे आहे त्या परिस्थितीत आनंदी राहायचे हे बाळकडू आपोआप मिळत होते. आजकालच्या मुलांना असे सुरक्षित, समाधानी, बिनधास्त वातावरण मिळत नाही. आजकालच्या पालकांनी हे पुस्तक वाचून आपल्या मुलांना आपण काय देतोय याचा विचार करावा, असे मला वाटते. तेच माझ्या आठवणींतून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. 

- त्या वेळची मुंबई आणि आताची मुंबई यात प्रामुख्याने कोणते बदल प्रकर्षाने जाणवले? 

जान्हवी सामंत : १९८०च्या दशकातील मुंबई आणि आताची मुंबई यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. मी ज्या दादर भागात वाढले, त्याचा चेहरामोहरा आता खूप आधुनिक झाला आहे. आम्ही लहानपणी येथील गल्ल्यांमध्ये धुमाकूळ घालायचो. मुंबईविषयी अनेकांना आकर्षण असते. जुन्या काळातील मुंबई कशी होती, याचे चित्रण यात करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्या काळातील ठिकाणे, व्यक्ती, सामाजिक संदर्भ, सांस्कृतिक जीवन, कालानुरूप होत गेलेले बदल, जीवनमूल्ये या सगळ्याचे चित्र यातून उभे राहते.

- पुस्तकाबाबत वाचकांच्या काय प्रतिक्रिया आल्या आहेत?

- अत्यंत सोप्या इंग्रजी भाषेत लिहिल्याने अनेकांनी हे पुस्तक वाचल्यावर बालपणीच्या रम्य आठवणींमध्ये रमून गेल्याची, जुन्या मुंबईत फिरून आल्याचा अनुभव घेतल्याची भावना व्यक्त केली. माझ्या लेखनातून मला हेच होणे अभिप्रेत होते. तो हेतू साध्य झाला असे वाटते. आता हे पुस्तक मराठीत आणण्याची माझी इच्छा आहे.  

(‘फालतूगिरी अँड अदर फ्लॅशबॅक्स : हाऊ आय सर्व्हाइव्ह्ड ए चाइल्डहूड इन दी एटीज’ हे पुस्तक आणि ई-बुक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language