Ad will apear here
Next
वैभवशाली साताऱ्याची सफर – भाग ७
औंधच्या यमाई मंदिर शिखर‘करू या देशाटन’ सदराच्या गेल्या भागात आपण सातारा जिल्ह्याचा उगवत्या सूर्याचा प्रदेश म्हणजेच माणदेश पाहिला. आजच्या भागात पाहू या सातारा जिल्ह्याचा नैर्ऋत्येकडील भाग, ज्यामध्ये प्रामुख्याने खटाव तालुका येतो. 
..........
कायम दुष्काळी भाग असलेला खटाव आता कात टाकत आहे. रखडलेल्या पाणीपुरवठा योजना मार्गी लागत असताना लोकांनी जिद्दीने वॉटरकप स्पर्धेत भाग घेऊन पाणी प्रश्न स्थानिक पातळीवर सोडविण्याचाही प्रयत्न चालू केला आहे. या भागातील लोकही सांगलीतील ‘जत’प्रमाणे गलई (सोने गाळणे) व्यवसायात गुंतले आहेत. द्राक्षे, डाळिंब, पेरू अशा फळांच्या उत्पादनातसुद्धा येथील शेतकरी पुढे आहेत. ज्वारी, बाजरीबरोबर घेवडा, बटाटा यांचेही उत्पादन येथे होत आहे. ऊस लागवड होत असल्याने काही खासगी साखर कारखानेही उभे राहत आहेत. ही भूमी क्रांतिकारकांची आहे, विचारवंतांची आहे. सत्यशोधक महात्मा जोतिबा फुले यांचे घराणे याच भागातील. 

यमाई मंदिर महाद्वार

औंध म्युझियम - दमयंतीऔंध म्युझियम - ओलेतीऔंध : स्वातंत्र्यपूर्व काळातील औंध हे महाराष्ट्रातील एक संस्थान होते. या संस्थानाची स्थापना किन्हईचे परशुराम त्रिंबक पंतप्रतिनिधी यांनी सन १६९९ या वर्षी केली. परशुराम त्रिंबक यांना छत्रपती राजाराम यांनी १६९०मध्ये सरदारकी आणि सुभालष्कर व समशेरजंग हे किताब दिले होते. संस्थानिकांच्या जहागिरीचे औंध हे मुख्यालय होते. गावामध्ये पंतप्रतिनिधींचा मराठा स्थापत्य शैलीतील दुमजली वाडा आहे. शेजारी श्री अंबामातेचे सुंदर मंदिर आहे. या मंदिराच्या सभागृहातच राजेसाहेबांचे कलाप्रेम दिसून येते. पौराणिक प्रसंगांची मोठी आकर्षक चित्रे येथे पाहायला मिळतात. तसेच दुर्मीळ अशा हंड्या व झुंबरेही पाहण्यास मिळतात. मूळ दोन मजली राजवाडा फारशा चांगल्या अवस्थेत नसला, तरी त्याची भव्यता लक्षात येते. बऱ्याचदा पर्यटक म्युझियम पाहून गावात न येता परस्पर निघून जातात. औंधला आल्यावर हे मंदिर आवर्जून पाहावे. 

यमाई देवीच्या मंदिराच्या पायथ्याशी असलेले राजे पंतप्रतिनिधी यांच्या कलाप्रेमातून निर्माण झालेले हे संग्रहालय पाहण्यासाठी पर्यटक सतत येत असतात. तसेच शिवानंदस्मृती संगीत सोहळ्यात भाग घेण्यासाठी दिग्गज गायकांची उपस्थितीही येथे असते. 

यमाई मंदिर

यमाई देवीचे मंदिर :
यमाई देवीचे मंदिर समुद्रसपाटीपासून सुमारे तीन हजार तीनशे फुटांवर असून, सातव्या शतकात बांधले असावे असे मानले जाते. पंतप्रतिनिधी घराण्यातील लोकांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करून सोन्याचा कळसही बसविला आहे. एखादा गड किंवा किल्ल्याप्रमाणे तटबंदी असणाऱ्या या मंदिराचा आकार शिवलिंगाप्रमाणे आहे. तटावरून भोवतालच्या प्रदेशाचे विहंगम दृश्य दिसते. मंदिराकडे येण्यासाठी खालपासून पायऱ्यांचे बांधकाम केले आहे. छोटी गाडी मंदिरापर्यंत जाते; पण यात्रा काळामध्ये मात्र गाडी वर नेता येत नाही. या मंदिराबाबत असे सांगितले जाते, की पौराणिक काळात अंबऋषी मोरणतीर्थ परिसरात तप आणि यज्ञ करीत असत. मायावी विद्या येणाऱ्या औंधासुर राक्षसाने त्यांच्या यज्ञात विघ्ने आणायला सुरुवात केली. तेव्हा यमाई मातेने त्याच्याशी घनघोर युद्ध केले आणि त्याला ठार मारले; मात्र औंधासुराने मरताना देवीजवळ आपली चूक कबूल केली आणि आपले नाव अमर राहावे अशी इच्छा व्यक्त केली. त्या वेळी यमाई मातेने त्याची इच्छा पूर्ण केली. तेव्हापासून त्या नगरीला ‘औंधा’ म्हणून ओळखले जाऊ लागले. औंधासुराच्या कापलेल्या मस्तकाचे छोटे देऊळ मंदिर परिसरात बांधण्यात आले आहे. औंधासुराला ठार मारल्यानंतर यमाई माता स्नानासाठी केस मोकळे सोडून येथील तळ्यात उतरली. तेव्हापासून तिला ‘मोकळाई’ असेही म्हणतात. आजही या दगडी बांधणीच्या प्रशस्त मोकळाई तलावात पाय धुवून मग देवीदर्शनाला जाण्याची प्रथा आहे. या तळ्याची श्रमदानाने साफसफाई करण्यात येते. यमाईचे दर्शन झाल्यावर पायथ्याशी असलेल्या सुंदर बागेत आराम करून म्युझियम पाहावे. 

भवानी संग्रहालय : हे वस्तुसंग्रहालय १९३८ साली बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी निर्माण केले. आता ते महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व वस्तुसंग्रहालय विभागाच्या ताब्यात आहे. यामध्ये आठ हजारांपेक्षा जास्त वस्तू असून, प्रामुख्याने चित्रकला, शिल्पकला यांसाठी ते प्रसिद्ध आहे. स्वतः पंतप्रतिनिधी यांनी काढलेली व नामवंत चित्रकारांची पेंटिंग्ज, संगमरवरातून कोरलेली शिल्पे, कोरीव काम केलेल्या धातूच्या, लाकडाच्या वस्तू, हस्तिदंती कोरीव कलाकृती आणि स्ट्राँगरूममधील दुर्मीळ मौलिक ऐतिहासिक रत्ने यांचे दर्शन या ठिकाणी घडते. राजा रविवर्मा, चित्रमहर्षी बाबूराव पेंटर, सांगलीचे पंत जांभळीकर, गणपतराव वडणगेकर, आबालाल रहिमान, विनायक मसोजी, चंद्रकांत मांढरे, रवींद्र मेस्त्री, दिलीप डहाणूकर, रावबहादूर धुरंधर, एस. एच. रझा, पेस्तनजी बमनजी, एम. आर. आचरेकर, एस. एल. हळदणकर, प्र. अ. धोंड यांसारख्या अनेक ज्ञात-अज्ञात प्रसिद्ध चित्रकारांची चित्रे या प्रदर्शनामध्ये प्रदर्शित केली आहेत. 

पंतप्रतिनिधी स्वदेशीचे पुरस्कर्ते होते. संस्थानाच्या शेतात पिकलेले धान्यच त्यांच्या भोजनात असे. संस्थानामधील विणकरांनी विणलेली साधी वस्त्रेच ते परिधान करीत. सूर्यनमस्कार या जुन्या व्यायामप्रकाराचे त्यांनी शास्त्रशुद्ध संशोधन करून पुनरुज्जीवन केले. ते स्वत: सूर्यनमस्कार घालीत. संस्थानातील शालेय विद्यार्थीही हा व्यायाम करीत. त्यांच्या या सूर्यनमस्कार ‘वेडा’वर आचार्य अत्र्यांनी ‘साष्टांग नमस्कार’ नावाचे नाटक लिहिले. 

साखरगड प्रवेशद्वार

अंबाबाई मंदिर दीपमाळसाखरगड अंबाभवानीकिन्हईचा साखरगड : १७३६ ते १७४६च्या दरम्यान औंधचे राजे पंतप्रतिनिधी यांनी येथील प्रसिद्ध अंबाबाई मंदिराची उभारणी केली. औंधची यमाई कार्तिक महिन्यात येथे मुक्कामाला असते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. दोन्ही देवींचा भेटीचा सोहळा बघण्यासारखा असतो. हे मंदिर हेमाडपंती शैलीतील असून, संपूर्ण तटबंदी असलेले हे मंदिर बघण्यासारखे आहे. मंदिराच्या आवारात चार भव्य दीपमाळा आहेत. या ठिकाणाला अर्थात साखरगड संस्थान व संबंधित आर्किटेक्ट यांना सांस्कृतिक वारसा संवर्धनासाठी युनेस्को एशिया पॅसिफिक पुरस्काराने २८ फेब्रुवारी २०१५ रोजी सन्मानित करण्यात आले आहे. वास्तविक हे ठिकाण साताऱ्याविषयीच्या चौथ्या लेखात अपेक्षित होते; पण औंध, किन्हई व साखरगड यांचा संबंध असल्याने या लेखात हे समाविष्ट केले आहे. जरूर भेट द्यावे असे हे ठिकाण आहे. साताऱ्यापासून एका तासात येथे पोहोचता येते. 

जयराम स्वामींचे वडगाव : स्वातंत्र्य सैनिकांचे बलिदान व काही ऐतिहासिक दस्तऐवज सापडल्याने या गावाचे ऐतिहासिक महत्व वाढले आहे. रामदासी संप्रदायातील जयराम स्वामी वडगावकर यांचा मठ वडगाव येथे आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी नऊ सप्टेंबर १९४२ रोजी चले जाव आंदोलनात वडगावचे सुपुत्र परशुराम घार्गे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील लोकांनी खटाव तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता. या मोर्चावर जुलमी इंग्रज अधिकाऱ्यांनी केलेल्या बेछूट गोळीबारात खटाव तालुक्यातील बलभीम हरी खटावकर, बाळकृष्ण खटावकर, (पुसेसावळी) परशुराम घार्गे, आनंदा गायकवाड, सिधू पवार, किसन भोसले, खाशाबा शिंदे, रामचंद्र सुतार (वडगाव), श्रीरंग शिंदे (उंचिठाणे) या नऊ जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. वडगाव मठातील मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराजांना या मठाची सफाई करताना एक दफ्तर सापडले. त्यामध्ये ऐतिहासिक व्यक्तींची मोडी लिपीतील पत्रे मिळाली आहेत. या पत्रांमध्ये छत्रपती शाहू महाराज, सेनापती संताजी घोरपडे, माधवराव पेशवे यांच्या पत्रांचा समावेश आहे. ही कागदपत्रे स्वामींनी इतिहास अभ्यासक घन:श्याम ढाणे यांच्याकडे सुपूर्द केली आहेत. त्यावर आता अभ्यास चालू असून काही ऐतिहासिक संदर्भ इतिहासकारांना उपलब्ध होतील. 

सेवागिरी महाराज, पुसेगावपुसेगाव : पुसेगावचे मूळ नाव पुसेवाडी असे होते. सेवागिरी महाराजांच्या वास्तव्याने पवित्र झालेले हे ठिकाण असून, पश्चिम महाराष्ट्रात त्यांचे भक्त आहेत. सेवागिरी महाराजांचा जन्म गुजरातमधील जुनागड येथे झाला. तेथे त्यांनी पूर्णगिरी महाराज यांच्याकडे दीक्षा घेतली. पूर्णगिरी महाराजांनी ‘वेदवती तीरी दंडकारण्यात जा, तिथे सिद्धेश्वराचे स्वयंभू शिवलिंग आहे, तीच तुझी कर्मभूमी आहे,’ असा आदेश त्यांना दिला. त्यानुसार ते दक्षिणेत निघाले. पुसेगावचे जोतीराव जाधव, श्रीरंगकाका, बोंबाळ्याचे निंबाळकर, वर्धनगडचे काशीराम मोरे यांच्याशी त्यांची गाठ पडली. त्यांनी सन १९०५मध्ये त्यांना पुसेगावला आणले. पुसेगावात आल्यानंतर सेवागिरी महाराजांनी लोकांना अध्यात्म व योगाची शिकवण दिली. तसेच सामाजिक प्रबोधनही केले. सेवागिरी महाराजांनी १० जानेवारी १९४८ रोजी मार्गशीर्ष वद्य चतुर्दशीला पुसेगाव येथे समाधी घेतली. तेव्हापासून पुसेगाची रथयात्रा सुरू झाली. हा रथोत्सव प्रसिद्ध असून, लाखोंच्या संख्येने लोक येथे येत असतात. कुस्त्यांचे मैदान, बैलगाड्यांची शर्यत (शर्यतीवर सध्या बंदी आहे) हे येथील एक आकर्षण. संस्थानामार्फत वर्षभर अनेक सांस्कृतिक कार्यक्रम राबविले जातात. हे ठिकाण सातारा-पंढरपूर मार्गावर असून, फलटण-सांगली येथूनही तेथे जाता येते. 

खटाव : देशाचे पंतप्रधान घडविणाऱ्या गुरूंचे हे जन्मठिकाण, अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरू लक्ष्मणराव इनामदार यांचे हे गाव. त्यांचा जन्म खटाव येथे झाला. हे तालुक्याचे नाव असलेले ठिकाण आहे; मात्र प्रशासकीय सोयीसाठी तहसीलदार कार्यालय व अन्य शासकीय कार्यालये वडूज येथे आहेत. पूर्वी संपूर्ण गावाभोवती तटबंदी होती. शिवाजी महाराज, विजापूरचा लुत्फुल्लाखान, कृष्णराव खटावकर यांचे या भागावर आधिपत्य होते.

साखरगड

गुरसाळे :
वडूजपासून नऊ किलोमीटरवर असणारे गाव म्हणजे गुरसाळे. या गावात १३व्या शतकातील रामलिंग मंदिर आहे. 

साखरगड परिसर

पुसेसावळी :
येथील अयाचित घराण्यातील पूर्वज पांडुरंग अयाचित यांना आळंदीकडून दोन अजानवृक्ष व ज्ञानेश्वरांची मूर्ती प्राप्त झाली. आज या ठिकाणी दोन-अडीचशे वृक्ष आहेत. या ठिकाणी असलेली ज्ञानेश्वरांची मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. 

कलेढोण : या गावाने महाराष्ट्राला मुख्यमंत्री व एक कुलगुरू दिला. माजी मुख्यमंत्री बॅ. बाबासाहेब भोसले व त्यांचे बंधू विद्यावाचस्पती प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचे हे जन्मठिकाण आहे. 

वेळू गावाने वॉटर कप स्पर्धेत यश मिळविले आहे.

वेळू :
अभिनेता आमीर खानच्या पुढाकारातून सुरू झालेल्या ‘सत्यमेव जयते वॉटर कप’च्या पहिल्या टप्प्यातील स्पर्धेत साताऱ्यातील ‘वेळू’ गावाने बाजी मारली. ५० लाखांचे प्रथम पारितोषिक पटकावले; पण हा प्रवास सोपा नव्हता. वर्षानुवर्षे टँकरग्रस्त असलेले हे गाव पाण्याच्या प्रश्नासाठी एकत्र आले. एकजुटीने गावकऱ्यांनी श्रमदान करून दुष्काळावर मात करण्याचा प्रयत्न केला आहे. या गावात कुष्ठरोग पीडितांसाठी एक आश्रम काढण्यात आला होता. त्या आश्रमाचा मी विश्वस्त होतो. त्या वेळी या गावाची पाण्याबाबतची अवस्था पहिली होतो. हा आश्रम आता दुसऱ्या संस्थेकडे वर्ग केला असून, तेथे गोपालन संस्था काढण्याचे नवीन विश्वस्तांचे नियोजन आहे. वेळू हे गाव कोरेगाव तालुक्यात असून, रहिमतपूर-औंध रस्त्यावर डावीकडे आतल्या बाजूला आहे. 

मायणी पक्षी अभयारण्यमायणी इंदिरा गांधी पक्षी अभयारण्य : दुष्काळी भागातील शेतीला पाण्याची सोय व्हावी, या उद्देशाने या ठिकाणी ब्रिटिशांनी १०० वर्षांपूर्वी तलाव बांधला. वन खात्यामार्फत या तलावाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्ष वाढवून या परिसराचे पक्षी अभयारण्यात रूपांतर करण्यात आले आहे. पक्षीनिरीक्षणासाठी वन विभागाने येथे दोन मनोरे उभारले आहेत. या ठिकाणी पक्ष्यांसाठी विविध प्रकारचे खाद्य आणि निवाऱ्यासाठी झाडी व झुडपे अशी अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्यामुळे केवळ देशातीलच नव्हे, तर परदेशतील नाना प्रकारचे पक्षीही येथे हिवाळ्यात येतात. सायबेरियातील फ्लेमिंगो मोठ्या प्रमाणावर येतात. गरुड, ससाणा, विविध जातीची बदके, पाण्यावरून पळत जाणारे नाम्यापक्षी, सारस (करकोचे), पाण्यात बुड्या मारणारे पाणबुडे इत्यादी पक्षी हंगामानुसार पाहायला मिळतात. चांद नदीच्या काठावर वसलेले मायणी हे गाव या भागातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील गाव समजले जाते. या गावामध्ये यशवंतबाबा व सिद्धनाथाची यात्रा भरते. गावात इसवी सनाच्या १३व्या शतकात यादवकालीन राजा सिंधण याने बांधलेले महादेवाचे हेमाडपंती प्राचीन मंदिर आहे. तसेच येथील मातोश्री सरुताईंचा मठ प्रसिद्ध आहे. 

कुरोली सिद्धेश्वर : खटाव, येरळा नदीच्या काठावर सिद्धेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. पिंडीवर अभिषेकाची धार धरल्यावर शिट्टीसारखा शिवनाद निघतो. त्याला सिंहनाद म्हणतात. भारतातील शिवस्थानांपैकी शिवनाद करणारे हे एकमेव स्थान आहे. सुप्रसिद्ध अभिनेते राजा गोसावी यांचे हे जन्मगाव. 

नेर तलाव : पुसेगावजवळ उत्तरेस नेर गावाजवळ व्हिक्टोरिया राणीच्या काळात इ. स. १८७३मध्ये या धरणाचे बांधकाम तत्कालीन इरिगेशन डिपार्टमेंटकडून झाले आहे. या तलावाच्या मध्यभागी टेकडी असून, त्यावर चैतोबाचे मंदिर आहे. या मंदिरात जाण्यासाठी एक पायवाट आहे. या वाटेचे वैशिष्ट्य असे, की धरणातील पाणी वाढले, तरी रस्ता पाण्याखाली कधीही जात नाही. हा गाळाने भरला होता. अलीकडेच यातील गाळ काढला आहे. त्यामुळे साठवण क्षमता वाढली आहे. या बंधाऱ्यातून खटावच्या काही भागातील शेतीला छोट्या कालव्याद्वारे पाणी दिले जाते. येथे जवळ असलेल्या नागनाथवाडीत श्रावण सोमवारी उत्सव असतो. या दिवशी खऱ्या नागाचे दर्शन होते. 

कटगुण : थोर समाजसुधारक व स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा जोतिबा फुले यांचे हे मूळ गाव. त्यांचे मूळचे आडनाव गोऱ्हे होते. त्यांचे वाडवडील पुण्यात स्थायिक झाले होते व ते फुलांचा व्यवसाय करीत. त्यामुळे त्यांचे आडनाव फुले पडले. त्यांच्या पत्नीचे माहेर सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथील. हे गाव शिरवळच्या पश्चिमेला असून, त्यांचे तेथे स्मारक बांधण्यात आले आहे. कटगुणचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे या गावातील एक विद्वान चार पीठांपैकी एका पीठाच्या शंकराचार्य पदावर जाऊन पोहोचले होते. गावकऱ्यांना या दोन्ही गोष्टींचा अभिमान आहे. जवळ असलेल्या खातगुण गावात पीर राजेसाहेब बागर यांचा दर्गा असून, तेथे दर वर्षी मोठा उरूस भरतो. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या खातगुण उरसाला संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक येत असतात. 

निढळ : सातारा-पंढरपूर मार्गावरील हे गाव आदर्श गाव म्हणून महाराष्ट्राच्या नकाशावर अधोरेखित झाले आहे. गावात अनेक सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. कर्तृत्ववान माजी प्रशासकीय अधिकारी चंद्रकांत दळवी यांचे हे गाव. त्यांच्या पुढाकाराने गावात अनेक चांगले उपक्रम राबविले जात आहेत.

वर्धनगड

वर्धनगड :
शिवशाहीतील हा एक महत्त्वाचा किल्ला आहे. हा किल्ला कोणी बांधला याचा संदर्भ मिळत नाही. परंतु छत्रपती शिवाजी महाराज या गडावर मुक्कामाला होते. कोरेगावच्या पश्चिमेला सातारा-पंढरपूर रस्त्यावरूनच याचे दर्शन होते. सह्याद्रीची एक रांग माणदेशातून फिरली आहे, तिचे नाव महादेव डोंगररांग. त्या रांगेवर भांडलीकुंडल नावाचा जो फाटा आहे, त्यावर कोरेगाव व खटाव तालुक्याच्या सीमेवर हा किल्ला दिमाखाने उभा आहे. बाजूला ललगून व रामेश्वर हे दोन डोंगर असून, यावरून किल्ल्यावर तोफांचा मारा करता येत असे. पाच मे १७०१ या दिवशी मुघलांनी पन्हाळा जिंकला. त्यानंतर औरंगजेबाने आपले लक्ष साताऱ्यातील किल्ल्यांकडे वळवले. मुघल सरदार फतेउल्लाखान याने सल्ला दिला, की बादशहाने खटावला छावणी करावी, म्हणजे पावसाळ्यात चंदन-वंदन व नांदगिरी हे किल्ले जिंकून घेता येतील. तसेच पावसाळ्यात मुक्कामासाठी हा भाग चांगला आहे. या योजनेस औरंगजेबाने मंजुरी दिली.

आठ जूनला फतेउल्लाखान आपल्याबरोबर काही सैन्य घेऊन या भागात आला व त्याने वर्धनगडाला वेढा घातला. किल्लेदाराने वाटाघाटीसाठी काही काळ खानाला गुंतवून ठेवले होते. खानाने १३ जून १७०१ रोजी किल्ल्यावर हल्ला चढवला. १९ जूनला रात्री मराठ्यांनी वर्धनगड सोडला. २२ जून रोजी मीर ए सामान या खात्याचा व्यवस्थापक अली रजा हा वर्धनगडातील मालमत्ता जप्त करण्यासाठी गेला. त्याने किल्ल्यातून ६७५ मण धान्य, ४० मण सोरा व बंदुकीची दारू, सहा मोठ्या तोफा व जंबुरक असा माल जप्त केला. त्याच दिवशी औरंगजेबाने किल्ल्याचे नाव बदलून सादिकगड असे ठेवले. औरंगजेबाची पाठ फिरताच हा किल्ला मराठ्यांनी परत जिंकला आणि त्याचे सादिकगड हे नाव बदलून वर्धनगड असे केले. आजही किल्ल्याची तटबंदी चांगल्या स्थितीत शाबूत आहे. पायथ्यापासून किल्ल्यावर जाण्यासाठी एक प्रशस्त पायवाट आहे. साधारण अर्ध्या तासात गडावर जाता येते. पायथ्याशी असलेल्या वर्धनगड गावात शिरताना दोन तोफा आपले स्वागत करण्यासाठी मोठ्या डौलाने उभ्या आहेत. गोमुखी बांधणीचे गडाचे प्रवेशद्वार पूर्वाभिमुख असून, सुस्थितीत आहे. गडावर अधिष्ठात्री वर्धनी मातेचे मंदिर आहे. बाकी अवशेष नाहीत; पण या किल्ल्यावरून पश्चिमेला अजिंक्यताऱ्यापर्यंतचा प्रदेश, तर पूवेला महिमानगडापर्यंतचा प्रदेश दिसतो.
 
कसे जाल खटाव भागात?
फलटण-आटपाडी रस्ता, चिपळूण-कराड-पंढरपूर रस्ता, तसेच सातारा-पंढरपूर रस्ता या मार्गांनी खटाव भागात जाता येते. जवळचे रेल्वे स्टेशन कोरेगाव. मार्च ते मेअखेर उन्हाळा जास्त असतो. राहण्याची, जेवणाची व्यवस्था कोरेगाव व सातारा येथे होऊ शकते. 

- माधव विद्वांस
ई-मेल : vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी आणि शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi