Ad will apear here
Next
विस्मय : दी वंडर ऑफ इट ऑल
सेलिब्रेशन

‘त्यांच्या चित्रावर रंग, रंग आणि रंगच दिसतात. पिवळा, तांबडा, हिरवा, निळा, जांभळा... अगदीच लहान लहान आकारात जाऊन बसलेले. त्यांना चित्रात स्वतःचे स्थान नाहीच. स्थान दिसते ते पार्श्वभूमीवरचे झेलकरी असल्यासारखें. नाना रंगांच्या पोताची ही पार्श्वभूमी आणि त्यातून उमलणारे मानवाकृतींचे आकार... काहींवर पार्श्वभूमीतील पोतांचं पोतेरं उमटलेलं, तर काहींवर वरून रंगवलेल्या आकृतीचे रंग....’ प्रसिद्ध चित्रकार शक्ती बर्मन यांच्या चित्रांच्या दुनियेत सैर... ‘स्मरणचित्रे’ सदरातून...
...........
‘त्यांच्या’ चित्रावर रंग, रंग आणि रंगच दिसतात. पिवळा, तांबडा, हिरवा, निळा, जांभळा... अगदीच लहान लहान आकारात जाऊन बसलेले. त्यांना चित्रात स्वतःचे स्थान नाहीच. स्थान दिसते ते पार्श्वभूमीवरचे झेलकरी असल्यासारखे. मूळ चित्रातील विषयाला ‘जी जी रं जी जी’ म्हणणाऱ्या सहायकाची भूमिका हे रंगांचे अनियंत्रित ठिपके टेक्श्चरच्या रूपाने बजावत असतात. नाना रंगांच्या पोताची ही पार्श्वभूमी आणि त्यातून उमलणारे मानवाकृतींचे आकार... काहींवर पार्श्वभूमीतील पोतांचे पोतेरे उमटलेले, तर काहींवर वरून रंगवलेल्या आकृतीचे रंग.

शक्ती बर्मन यांची चित्रे पहिल्यांदा पाहताना नव्या चित्रकाराचा गोंधळ उडू शकतो. ती चित्रे रंगवली कशी, हे समजावून घेताना माझाही सुरुवातीला गोंधळ उडाला होता; मात्र एकदा त्यांची रंग लावण्याची तांत्रिक बाजू लक्षात आली, की आपण साहजिकच विषयाकडे वळतो. बहुतेक सर्व चित्रांना शीर्षक असतं. ते शीर्षक चित्रविषय समजावून देते. चित्र पाहणाऱ्याला काही दिशा मिळेल, असेच नाव चित्राला ते देतात.

‘सेलिब्रेशन’ हे त्यांनी २००० साली काढलेले चित्र पाहू या. रंगारंगांची पोतयुक्त पार्श्वभूमी... तो शक्ती यांच्या चित्रांचा जणू ट्रेडमार्कच... मराठीत आपण त्याला लक्षण म्हणू या. या पार्श्वभूमीवर भगवान बुद्ध किंवा जैन तीर्थंकर ध्यानस्थ बसलेले...अगदी थेट पद्मासनात. चित्राच्या उजव्या कोपऱ्यात वर नीलवर्ण कृष्णाची छबी रेखाटलेली... मुकुट धारण केलेली, हातात पावा घेतलेली... चित्रचौकटीच्या वरच्या बाजूस भस्मांकित शंकराची निळी लहान प्रतिमा. चार मुखांची हत्तीवर बसलेली आकृती शंकराच्या उजव्या बाजूला चितारलेली, तर डावीकडे आकाशगामी अप्सरा अत्याधुनिक पोशाखात. मध्ये एक भक्तगण ढोलक वाजवणारा. हे पाहताना आणि चित्र मिथके, पौराणिक कथा यांभोवती गुंफले आहे, असे म्हणताना चित्रात आपले लक्ष अगदी आजच्या वाटाव्या अशा स्त्रीकडे जाते... इव्हिनिंग गाउन वापरणारी ही स्त्री. मोठ्या आकाराच्या गालिच्यावर बसलेली... त्याच गालिच्यावर पुढे जवळच बाळासह पहुडलेली आई. त्यापुढे लहान बाळाला घेऊन जाणारे जोडपे. त्यांच्या डावीकडे सशांची जोडी, एकशिंग्यासारखा प्राणी.. मागे पाहणारा... असलंच काय काय? प्रश्न पडतो, की काय आहे हे? उत्सुकता वाटू शकते, अतिवास्तववाद आहे का? की आकृत्यांची गुंफण, मांडणी, की स्वप्नमय असं जग? की मनाच्या स्थिती या आकृती प्रतिबिंबित करतात? काही स्मृती मांडलेल्या आहेत का? कुठे वास्तव संपते आणि कुठे काल्पनिक जग सुरू होते? कोणत्या स्वरूपाच्या स्मृती यांच्या चित्रात ओतू जात आहेत, असे काही प्रश्न चित्रे पाहताना मनात येतातच.

एका मुलाखतीत शक्ती बर्मन म्हणाले होते, ‘एकदा लहान असताना आमच्या एका नातेवाईकांनी सर्व कुटुंबाला नदीतून नावेने फिरायला नेले होते. नदीचे नाव आठवत नाही. परंतु लाटांचे नावेला धडकण्याचे आवाज स्पष्ट आठवतायत.’ अशीच काहीशी स्मृती व विस्मृतींची गुंफण त्यांच्या चित्रात असावी का? शक्तींच्या अनेक स्मृती असणारच... बंगाली ग्रामीण जग, कला महाविद्यालय, दुर्गापूजेचे मांडव, कोलकात्यातील पटुआ चित्रे, कालिघाट पट, ताजमहाल, अजिंठा, महाबलीपुरम, मातीस आणि काहीबाही... त्यांनी काय पाहिले, त्यापेक्षा ते आपल्याला काय दाखवतात, ते महत्त्वाचे. 

जुन्या आकाराच्या आरशात दिसणारा चेहरा, स्त्री चेहरा लाभलेली पक्षीण आणखी काही काही... कधी कधी पिकासोच्या चित्रातील विदूषक, सर्कशीतील खेळगडी, अप्सरा, गंधर्व, नानाविध प्राणी-पक्षी अशा अनेक प्रतिमा त्यांच्या चित्रात होत्या. स्वतःला चित्रात दाखवण्याचा मोह त्यांना अनेक चित्रांत पडला होता. हिचकॉक स्वतःला चित्रपटात दाखवतो किंवा आपल्याकडे सुभाष घई स्वतः चित्रपटात कुठेतरी येऊन जात, तसे काहीतरी हे असते. मग तो चित्रकार म्हणून चित्र काढणारा किंवा देवतेच्या वाहनाला स्वतःचा चेहरा असे... शक्ती बर्मन यांच्या चित्रांत आत्मप्रतिमा अधूनमधून डोकावत होत्या. 

जलप्रलयाच्या वेळी सृष्टी भरलेली नौका किंवा ताजमहालासमोर दिसणारे माने (२) या फ्रेंच चित्रकाराचे चित्रजगत... अशा कितीतरी अद्भुतरम्य कल्पनांचा भरणा काही चित्रांत होता. चित्रांबरोबर शिल्पेदेखील... एका विशिष्ट शैलीबद्ध रचनांची चित्रे. त्यावरही पोत, दी रायडर, सनबाथिंग, चाइल्ड विथ पिजन, थिंकर अशी काही नावे शिल्पांना दिलेली. (अनुक्रमे) प्राण्यावर बसलेला मनुष्य, ऊन अंगावर घेणारी स्त्री, डोक्यावर पक्षी बसलेल्या मुलाचा चेहरा आणि असेच विषय.... ऑक्सिडाइज झालेले हे ब्राँझचे पुतळे म्हणू या. यालाही पोत दिलेला... 

शक्ती बर्मन यांचे सेल्फ पोर्ट्रेट२०१२ साली शक्ती बर्मन यांचे ‘दी वंडर ऑफ इट ऑल’ नावाचे प्रदर्शन मुंबईतील पंडोल आर्ट गॅलरी आणि अप्पाराव गॅलरीच्या सहयोगाने आयोजित करण्यात आले होते. पंडोलचे दादीबा स्वतः बरीचशी कामे करताना दिसत होते. शक्ती बर्मन यांच्या कारकीर्दीचे सिंहावलोकन करणाऱ्या या प्रदर्शनासाठी शांत, साध्या व प्रसन्न व्यक्तिमत्त्वाच्या दादिबांनी पुढाकार घेतलेला दिसत होता. उद्घाटनासाठी जावेद अख्तर यांना पाचारण करण्यात आले होते. लहानशी पार्टी आणि कॅटलॉगवर सही करून देण्याचा विधी होता. त्यात खरेदीदार आणि संग्राहकांच्या कॅटलॉगवर ड्रॉइंग आणि सही एकत्रित दिली जात होती. एखाद्या चित्रकाराला एकाच एक तंत्रपद्धतीत चित्रे काढताना त्याबद्दल बहुधा प्रेम निर्माण होते, सवय होते, लोकांमध्ये त्या कलावंताची ती चित्रभाषा प्रसिद्ध होते. लोक ती स्वीकारतात, ओळखू लागतात आणि ही ओळख आपला छाप म्हणून किंवा ट्रेडमार्क म्हणून कलावंत वापरू लागतो का, असे कितीतरी प्रश्न मनात अशा प्रदर्शनानंतर मनात येत असतात. त्यांना कोणतेही ठाम उत्तर नसले, तरी शक्यता समोर येतात. अनेक पदरी आणि आयामी दृष्टिकोनातून या प्रश्नांची उकल मनात किंवा चित्रकारांच्या गटात चर्चेद्वारे चालू असतेच. परंतु शक्ती बर्मन यांच्या या प्रदर्शनाच्या शीर्षकाप्रमाणे हे सगळे कायमच विस्मयकारी वाटत राहते आणि दुसऱ्या चित्रकाराच्या कलाकृती पाहतानाही ‘दी वंडर ऑफ इट ऑल’चा अनुभव वारंवार येत राहतो.

शक्ती बर्मनशक्ती बर्मन यांच्याविषयी :
सुप्रसिद्ध चित्रकार शक्ती बर्मन हे मूळचे भारतीय असून, सध्या त्यांचे वास्तव्य फ्रान्समध्ये आहे. फ्रान्सबरोबरच इटलीतील भित्तिचित्रे आणि अजिंठा भित्तिचित्रे यांच्या विशेष अभ्यासाने आणि कौशल्यपूर्ण मिश्रणाने त्यांनी एक स्वतंत्र चित्रशैली विकसित केली. त्यांना ‘स्वप्नांचे जादूगार’ असेही संबोधले जाते. त्यांची जवळपास पन्नासहून जास्त एकल चित्रप्रदर्शने झाली असून, महत्त्वाच्या संग्राहकांकडे त्यांची चित्रे आहेत. भारत सरकारने त्यांना २०१३मध्ये पद्मश्री किताबाने सन्मानित केले.

- डॉ. नितीन हडप
ई-मेल : nitinchar@yahoo.co.in

(लेखक पुण्यातील चित्रकार असून, काष्ठशिल्पे, पुरातन वास्तू, फॅशन आदी त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत. ‘स्मरणचित्रे’ या पाक्षिक सदरातील सर्व लेख https://goo.gl/w99eTN या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi
Select Language