Ad will apear here
Next
अंगी नाना कळा असलेले नाना शंकरशेट!
नाना शंकरशेटभारतात रेल्वे सुरू करण्याची कल्पना मांडणारे आणि मुंबईचे शिल्पकार म्हणजेच नामदार जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेट! इंग्रजी आणि संस्कृत भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. मुंबईतील अनेक महत्त्वाच्या संस्थांच्या उभारणीतही त्यांचे योगदान होते. त्यांचे नाव मुंबई सेंट्रल स्थानकाला देण्याची मागणी होत आहे. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त (३१ जुलै) मुंबईतील ज्येष्ठ वास्तुविशारद चंद्रशेखर बुरांडे यांनी लिहिलेला हा लेख...
............
सतराव्या शतकात कलकत्ता, मद्रास व बॉम्बे या गावांची स्थान ओळख मर्यादित स्वरूपात होती. एके काळी ही स्थानके मासेमारी व विणकाम करणारी केंद्रे होती. ईस्ट इंडिया कंपनीने सर्वप्रथम कलकत्त्याचा विकास करून आर्थिक घडी बसवली व भारतावर राज्य करण्यास सुरुवात केली. भारत स्वतंत्र झाल्यानंतर स्थानिक प्रशासनाने शहरांची नावे बदलली. कलकत्ताचे कोलकाता, मद्रासचे चेन्नई, तर बॉम्बेचे मुंबई असे नामकरण झाले. पुढे एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात ही शहरे त्या त्या राज्यातील सत्ताकेंद्रे बनली. ही तीनही शहरे वसाहतकालीन आहेत. 

नानांचा वाडा (फोटो सौजन्य : शंकरशेट कुटुंबीय)

एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात परकीय राजवटीत मुंबई शहराचा पाया घातला गेला. उपरोल्लेखित शहरांपैकी मुंबई हे भारतातील संपूर्णत: नव्याने वसवलेले पहिले शहर आहे. शहरविस्तार व नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मुंबईतील विविध धर्मांतील धनिक समाजसुधारकांनी आपापल्या क्षमतेनुसार शहराच्या जडणघडणीत योगदान दिले. या सामाजिक बंधिलकीतून समाजसेवेच्या नव्या प्रथा निर्माण झाल्या. समाजासाठी मार्गदर्शक ठरणाऱ्या व्यक्तींना समाजात ओळख मिळत असते. तत्कालीन समाजसुधारकांच्या नामावलीत नामदार जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेट अग्रेसर होते. ३१ जुलै हा त्यांचा स्मृतिदिन. नानांच्या पुण्यस्मरणनिमित्ताने घेतलेला हा मागोवा...

साधारणत: एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात उपरोल्लेखित शहरांची आर्थिकदृष्ट्या भरभराट झाली. ब्रिटिशांनी सत्ताकेंद्र मुंबईला हलवले. मुंबई शहराचा पाया घालण्याचे काम जेरॉल्ड अँगियरने केले. मुंबईतील कोट परिसरात १७ फेब्रुवारी १८०३ रोजी मोठी आग लागल्यामुळे अनेक घरे व व्यावसायिक इमारती जळून खाक झाल्या. घटनास्थळी हजर असलेल्या राज्यपाल डंकनने तेथून निघून जाण्याचा सल्ला नाकारून मुंबईला आग व हानीपासून वाचवले. म्हणून, त्याच्या स्मरणार्थ डंकन रोड असे नाव देण्यात आले. यानंतर इ. स. १८५३ ते १८६०च्या दरम्यान मुंबईचा गव्हर्नर लॉर्ड एलिफन्स्टनचे नाव लोकल रेल्वे स्थानकास दिले होते. वसाहतकाळात नव्याने वसवलेले मुंबई हे भारतातील पहिले शहर होय. त्याचे संपूर्ण श्रेय गव्हर्नर सर बार्टल फ्रियरचे आहे. तत्कालीन राज्यकर्ते परकीय होते. म्हणून मुंबई विकासातील त्यांचे योगदान कमी लेखता येत नाही. 

इ. स. १८६५
वसाहतकालीन राज्यकर्ते व एतद्देशीय धनिकांनी वेगवेगळ्या कालावधीत व वेगवेगळ्या परिस्थितीत दिलेले योगदान मुंबईस मिळाले नसते तर मुंबई शहरदेखील इतर राज्यांतील शहरासारखेच घडले असते. कालांतराने मुंबईतील बहुतांश वसाहतकालीन नावे बदलण्यात आली. मुंबईतील धनिक समाजसेवकांच्या यादीत नानांचे नाव अग्रेसर होते. 

१० फेब्रुवारी १८०३ रोजी नानांचा जन्म मुंबईत होणे, हे विधिलिखित असावे, हे त्यांनी दिलेल्या सर्वक्षेत्रीय योगदानातून दिसून येते. नाना अठरा वर्षांचे असताना त्यांच्या वडिलाचे निधन झाले. त्यांच्या वडिलांनी नानांचे सर्व शिक्षण गिरगाव येथील राहत्या वाड्यात केले होते. मुंबईतील उत्तमोत्तम गुरुजनांकडून मिळालेल्या शिक्षणाचा त्यांनी पुरेपूर उपयोग करून घेतला. शालेय अथवा महाविद्यालयीन शिक्षण घेतले नसतानाही नानांनी संस्कृत व इंग्रजीवर प्रभुत्व मिळवले होते. नानांच्या स्वभावामुळे वयाने मोठे असलेले अनेक एतद्देशीय स्नेही, शासनकर्ते व सरकारी अधिकाऱ्यांशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध जोडले गेले होते. 

मरीन ड्राइव्ह स्मशानभूमी

तत्कालीन मुंबईच्या विकासात नानांचे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष योगदान असलेल्या सर्व कार्याचा उल्लेख करणे येथे शक्य नाही. तरी पण महत्त्वपूर्ण संस्थांच्या नामावलीत एलफिन्स्टन कॉलेज, ग्रँट मेडिकल कॉलेज, सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट अँड आर्किटेक्चर, डॉ. भाई दाजी लाड संग्रहालय, मुंबई विद्यापीठ, जे. जे. हॉस्पिटल, मुलींची शाळा, बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय आदींच्या उभारणीत त्यांचा पुढाकार होता. समाजोपयोगी कार्यात सर्वांत महत्वाचे असे योगदान म्हणजे मरीन ड्राइव्ह व बाणगंगा येथील स्मशानभूमीला दिलेली त्यांनी दिलेली खासगी जागा. महिला शिक्षण, सती चालीचे निर्मूलन असो, की नागरी व्यवस्था असोत, त्या कार्यात त्यांचा सिंहाचा वाटा असे. यातील त्यांनी केलेले कोणते एक कार्य अधिक महत्त्वाचे होते हे सांगणे कठीण आहे. लोहमार्गाचा शुभारंभ नानांनी केल्यामुळे त्यांना ‘रेल्वेचे जनक’ व ‘मुंबईचे आद्य शिल्पकार’ असेही संबोधले जाते!

टाउन हॉलमधील पुतळानानांनी मुंबई व समाजासाठी एकनिष्ठेने केलेल्या सेवेचे प्रतीक म्हणून ते हयात असतानाच पुतळ्याच्या रूपात त्यांचे स्मारक उभारण्यात यावे अशा अर्थाचा ठराव प्रो. दादाभाई नवरोजी यांनी मांडला व तो सभेत पास करूनही घेतला. दुर्दैवाने पुतळ्याचे काम नानांच्या हयातीत पूर्ण होऊ शकले नाही. हा पुतळा राणीच्या बागेत ठेवण्याचे आरंभी ठरले होते; परंतु शेवटी नानांचे समकालीन समाजसुधारक व सरकार दरबारातील अति महत्त्वाच्या व्यक्तींचे पुतळे व तसबिरी ज्या टाउन हॉलमध्ये ठेवल्या आहेत, त्या इमारतीच्या तळमजल्यावर त्यांचा मानवी आकारातील पुतळा बसवण्यात आला. हा पुतळा लंडन येथील मॅथ्यू नोबल या जगप्रसिद्ध शिल्पकाराने बनवला होता. पुतळ्यातील बारकाव्यातून नानांच्या रुबाबदार व्यक्तिमत्त्वाचे पैलू दिसून येतात. पुतळ्यातून नानांचे व्यक्तिमत्त्व खुलून दिसण्यासाठी जमशेटजी जिजीभॉय यांनी शिल्पकारास दिलेल्या सूचनापत्रातून नानांबद्दल असलेला आदर व स्नेहाची भावना दिसून येते. नानांच्या संस्कृतप्रेमाच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांचे चिरंजीव विनायकराव शंकरशेट यांनी इ. स. १८८६पासून मॅट्रिकच्या परीक्षेसाठी जगन्नाथ शंकरशेट संस्कृत शिष्यवृत्तीची स्थापना केली. या शिष्यवृत्तीने एक इतिहास घडविला. संस्कृतच्या अभ्यासक्रमाला उत्तेजन मिळाले. यापैकी अनेकांनी उत्तरायुष्यात नावलौकिक मिळवला. यशवंत वासुदेव आठल्ये हे या शिष्यवृत्तीचे पहिले मानकरी होते. भारताचे माजी अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख यांनी १९१२ साली संस्कृत विषयात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन ही शिष्यवृत्ती मिळवली. तसेच विनायकराव जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्ती मिळवण्याचा बहुमानही त्यांनाच मिळाला होता. ही अनन्यसाधारण गौरवास्पद गोष्ट होती. अशा रीतीने संस्कृतसारख्या भाषेला अनेक वर्षे प्रोत्साहन मिळाले. या प्रथेत खंड पडू नये म्हणून त्यांच्या स्मारक प्रतिष्ठाननेदेखील गेल्या तीन वर्षांपासून संस्कृत शिष्यवृत्ती सुरू केली आहे. 

नाना चौककोणत्याही शहराच्या स्थान ओळखीतून जागेचे मूल्य कळून येते, तर व्यक्ती ओळख त्या व्यक्तीने निर्माण केलेल्या सामाजिक कार्यात दिसून येते. समाजकल्याणकारी पुरुषांनी केलेल्या कार्याची आठवण पुढील पिढ्यांना राहावी म्हणून प्रमुख स्थळे किंवा रस्त्यांना थोर व्यक्तींची नावे देण्यामागचा हेतू असतो. याच हेतूने ग्रँट रोड येथील चौकास नाना शंकरशेट चौक असे नाव देण्यात आले होते. भरपूर मोकळी असलेला नाना चौक या परिसराची शान होता. २०१७मध्ये स्थानिक प्रशासनाने चौकाच्या जागेत स्कायवॉक बांधून एकाच वेळी त्या मोकळ्या परिसराची शान व सौंदर्यही घालवले! मोकळ्या जागेस वळण लावणे सोपे असते. परंतु रहदारीस वळण लावणे अवघड असते हे बोजड व रिकाम्या स्कायवॉककडे पाहून समजते. मुंबईच्या विकासात महत्त्वाचा वाटा असलेले नाना जर का आज जिवंत असते, तर ते म्हणाले असते, ‘देवा, मुंबईला या जाचातून वाचवण्यासाठी एक तर मला पुर्नजन्म तरी दे अथवा अव्यवहार्य निर्णय घेणाऱ्या मुंबई प्रशासनास सुबुद्धी तरी दे!’ असो! 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इमारतीवरील शिल्प

मुंबईतील धनिकांनी समाजऋण फेडण्याच्या उद्देशाने आपापल्या क्षमतेनुसार योगदान दिले, हे त्यांनी उभारलेल्या खासगी संस्थेतून दिसून येते. परंतु नानांचा सहभाग केवळ एखादी धर्मादाय इमारत वा एखाद-दुसरे सामाजिक कार्य तडीस नेण्याइतपत मर्यादित नव्हता, तर तो सर्वंकष होता हे ध्यानात येईल. भारतातील पहिली रेल्वे सुरू करण्यात महत्त्वाचा वाटा असणाऱ्या दहा संचालकांच्या अर्धप्रतिमा रेल्वे कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर बसवल्या आहेत. त्यात नाना शंकरशेट व जमशेटजी जिजीभॉय हे दोघे भारतीय आहेत. मुंबई शहराच्या जडणघडणीत एतद्देशीयांचाही सहभाग असावा म्हणून ब्रिटिशांकडून ‘जस्टिस ऑफ पीस’ हा दर्जा व सन्मान मिळालेले नाना शंकरशेट हे पहिले भारतीय होते. 

टपाल तिकीटनानांचा भव्य पुतळा टाउन हॉल इमारतीत बसवण्यात आला. भारत सरकारने १९९१ साली त्यांचा सन्मान करण्यासाठी पोस्टाचे तिकीट काढले. तसेच त्यांची तसबीर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात लावली आहे. यातून नानांचे योगदान कळून येते. मुंबई सेंट्रल स्थानकाला नाना शंकरशेट यांचे नाव देण्याची मागणी ‘नाना शंकरशेट स्मारक समिती’च्या वतीने सन्माननीय पदाधिकारी व समस्त नानाप्रेमी गेली अनेक वर्षांपासून करीत आहेत. त्यातील महत्त्वाचे मुद्दे असे - 

- भारतात रेल्वे सुरू करण्याची कल्पना नाना शंकरशेट यांनी मांडली होती. 

- नानांचे सामाजिक कार्यक्षेत्र कुलाबा ते मुंबई सेंट्रल हेच होते. 

- मुंबई सेंट्रल हे कुणा व्यक्तीचे नाव नसल्यामुळे ते बदलण्याने कुणाच्या भावना दुखावण्याचा प्रश्न उद्भवत नाही! मुंबई सेंट्रल स्थानकाच्या नामांतरातून नानांची कार्य ओळख केवळ मुंबईपुरती मर्यादित न राहता देशभर पोहोचेल व त्यातून वैचारिक देवाणघेवाण सुरू राहील.

या मागणीला सर्व मुंबईकरांनी पाठिंबा देण्याची गरज का आहे हे उपरोल्लेखित कार्यातून समजून येते. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, सार्वजनिक स्थळांच्या नावातील अनेक शब्दांमुळे आदरणीय व्यक्तीच्या नावाच्या आद्याक्षरातून शॉर्टकट प्रचलित होण्याच्या प्रथेमुळे नाव बदलण्याचा मूळ हेतू साध्य होत नाही. हे एलटीटी किंवा सीएसएमटी अशा शब्दोच्चारांतून दिसून येते. मुंबईतील बहुतांश रेल्वेस्थानकांची नावे एक किंवा दोन शब्दांत आहेत. त्याच धर्तीवर प्रस्तावित नामकरण असावे. 

देशभरातील मोठमोठ्या शहरांची व इतर सार्वजनिक स्थळांची नावे बदलण्याचा इतिहास आपणास ज्ञात आहे. नानांनी केलेल्या सामाजिक कार्याचा आवाका खूप मोठा असल्याकारणाने आपण त्यांच्या ऋणातून कधीच मुक्त होऊ शकत नाही. म्हणून, मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाच्या नामांतरातून ते निरंतर आपल्या स्मृतीत राहतील अशा प्रकारची प्रतीकात्मक ‘स्थान ओळख’ निर्माण करण्याची संधी आहे. नानांनी समाजहित जोपासण्याच्या दृष्टीने केलेले कार्य समस्त मुंबईकरांच्या स्मरणात राहावे म्हणून त्यांचे कायमस्वरूपी स्मारक उभारले जाणार आहे. स्मारक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेंद्र वि. शंकरशेट, सचिव अॅड. मनमोहन चोणकर व इतर सन्माननीय सदस्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांतून वडाळा येथे १५०० चौरस मीटरचा भूखंड महाराष्ट्र शासनाकडून उपलब्ध झाला आहे. तेथे प्रतिष्ठानची इमारत उभी करण्यासाठी लागणारी आर्थिक मदत केंद्र आणि राज्य सरकार व स्थानिक प्रशासनानेही कर्तव्यभावनेतून करावी ही अपेक्षा आहे. तसेच, गरजेनुसार प्रतिष्ठानने काही योजना आखल्या, तर मुंबईकरदेखील आपले कर्तव्य समजून आर्थिक हातभार लावतील ही अपेक्षा. वडाळा येथील स्मारक व मुंबई सेंट्रल स्थानकाचे नामांतर म्हणजेच नानांना खऱ्या अर्थाने दिलेली आदरांजली ठरेल! 

नोबेल पारितोषिक विजेते, लेखक, पत्रकार रुडयार्ड किपलिंग यांच्या शब्दांत नाना शंकरशेट यांचे व्यक्तिमत्त्व मांडावयाचे झाले तर ते असे मांडता येईल - 
". . . talk with crowds and keep your virtue, or walk with king -nor lose the common touch. . . . " 

३१ जुलै १८६५ रोजी नानांनी वैयक्तिक व सामाजिक जीवनातील कर्तव्ये पूर्ण करून जगाचा निरोप घेतला. १५४व्या स्मृतिदिनानिमित्त दिवंगत जगन्नाथ शंकरशेट (नाना) यांना सर्व मुंबईकरांच्या वतीने विनम्र अभिवादन!!! 


संपर्क : चंद्रशेखर बुरांडे – fifthwall123@gmail.com

(चंद्रशेखर बुरांडे यांचे अन्य लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप

(राजेश लाटकर यांनी नाना शंकरशेट यांच्यावर केलेल्या डॉक्युमेंटरीचे व्हिडिओ सोबत देत आहोत.) 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi
Select Language